অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इतिहासाचे साक्षीदार श्री क्षेत्र तुळापूर

इतिहासाचे साक्षीदार श्री क्षेत्र तुळापूर

पुरंदर गडकिल्याच्या गिरीशिखरावर महाराणी सईबाई व युगपुरुष छत्रपती शिवरायाच्या पोटी जन्म घेऊन संभाजी राजे अत्यंत विद्वान सुसंस्कृत पंडीत म्हणून नाव लौकिक पावले. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच बुद्धभुषणम नावाच्या राजनितीवर आधारित अप्रतिम ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षीच औरंगजेबाच्या दरबारात आपल्या पित्यासोबत जाऊन राजकारणाचे धडे शिकुन घेतले. शिवरायांच्या मृत्यूनंतर दुसरा छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला.

औरंगजेबासारखा महाबलाढ्य शत्रु संभाजी राजांवर चाल करुन आला. एकाच वेळी चार शत्रुशी लढत देत राहिला. परंतु स्वराज्याचा कोणताही भाग अथवा गड शत्रुला मिळवून दिला नाही. मात्र संभाजी सारखा शुर, धाडसी, राजा कोकणात रत्नागिरी जवळ संगमेश्वर येथे पकडला गेला. त्यानंतर त्यांना तुळापूर येथे ठार मारण्यात आले. येथील संभाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याखाली राजांचा अस्थिकलश शाहु राजांनी (संभाजीराजांचे पुत्र) तांब्याच्या कलश जतन करुन ठेवला आहे. तशा माहितीचा ताम्रपट उपलब्ध आहे. अशा प्रकारे पुरंदराच्या उत्तुंग शिखरावर जन्म घेतलेला हा महापराक्रमी राजपुत्र देशाकरिता, भुमिपुत्रांच्या रक्षणाकरिता, ह्या भीम, इंद्रायणी, भामा, आंद्रा, सुधा या पंचगंगेच्या त्रिवेणी संगमावर याच ठिकाणी वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी चिरनिद्रीस्त झाला.

प्राचीन स्वयंभु पाच महादेवाची मंदिरे असलेला हा भीमा, भामा, इंद्रायणीचा त्रिवेणी संगम असुन हे क्षेत्र गया, प्रयाग या तीर्थक्षेत्राच्या बरोबरीचे ठिकाण आहे. हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले व आदिल शाहीतील वजीर मुरारजगदेव यांनी हत्तीच्या वजनाच्या २४ तुळा केल्या होत्या. या गावाचे पूर्वीचे नाव नागरगाव असे होते. तुळा केल्यामुळे तुळापुर असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी प्राचीन संगमेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला व राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांच्या शुभहस्ते ह्या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत बाल शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांचे वडील शहाजीराजे व माँ जिजाऊ यांनी ह्याच संगमेश्वर महादेवाच्या साक्षीने दिली. शिवरायांनी बाल वयातच ह्या ठिकाणी आपले वडिल शहाजीराजे व माँ साहेब जिजाऊंना स्वराज्य स्थापनेचे वचन दिले.

या ठिकाणाला इतिहासासोबतच नयन रम्य अशा निसर्गाची जोड देखील लाभली आहे. यामुळे या चित्तथरारक ऐतिहासिक घटनास्थळाचा इतिहास जाणून घेतल्यानंतर तो प्रसंग आठवून थक्क झालेला पर्यटक काही काळ त्रीवेणी संगम समोर बसून सुखावतो. ग्रामपंचायतीने या ठिकाणी पर्यटकांची जेवण्याची गैरसोय होऊ नये म्हणून कॅन्टीन देखील उभारली आहे. या शिवाय लांब पल्यावरुन आलेल्या पर्यटकांसाठी शुंभुराजे भक्त निवास देखील या ठिकाणी बांधण्यात आले असून येथे मुक्काम देखील करता येतो. तसेच येथे बोटिंगचा मनसोक्त आनंद देखील घेता येतो. अशा या ऐतिहासिक साक्षीदाराला अवश्य भेट द्यावी.

कसे पोहोचाल


पिंपरी-चिंचवड मार्ग पिंपरी – भोसरी – दिघी – चऱ्होली – आळंदी – मरकळ - तुळापूर
पुण्यामार्ग जायचे झाल्यास पुणे - नगररोड – चंदननगर - वाघोली - लोणीकंद डावीकडे तुळापूर फाटा - फुलगाव - तुळापूर 

लेखक - रोहीत साबळे
जिल्हा माहिती कार्यालय, पुणे
स्त्रोत - महान्युज

 

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate