इतिहासाच्या शोधात हरणगाव
प्रत्येक गावाला एक इतिहास असतो. त्यातील अनेक पैलू अज्ञात तर काही ज्ञात असतात. त्यामुळे इतिहासाचा शोध घेत राहणे हा या ज्ञात-अज्ञाताच्या प्रवासाचाच एक भाग असतो. नाही म्हणायला इतिहासाचा शोध घेण्याचामाणसाचा स्थायीभाव असतोच. पण, एखाद्या गावाला मोठा इतिहास आहे हे माहित असूनही त्याच्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष होत असेल तर ते दुदैवच म्हणावं लागेल. मात्र पेठ तालुक्यातील हरणगावच्या ग्रामस्थांनी अजूनही आशा सोडलेली नाही. गावच्या प्राचीन इतिहासावर कधी ना कधी प्रकाश पडेल या आशेवर ते विखुरलेला वारसा सोबत घेत पुढे पुढे जात आहेत.
नागमोडी रस्ते अन् हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या डोंगर रस्त्यांनी पेठपासून २०-२५ किलोमीटर गेल्यावर कोपुर्ली-पिंपळपाडा फाटा लागला की, उजव्या हाताला दोन-तीन किलोमीटर गेल्यावर हरणगाव लागतं. अगदी दाट जंगल अन् आदिवासींची लहान लहान आकर्षक घरे मन मोहून घेतात. या गावात एकेकाळी खूप हरणे असतील म्हणून या गावाला हरणगाव असे नाव पडलं असेल बहुतेक. पण असं काही येथे होतं असे सांगणार त्या पिढीतील आता कोणी नाही. घनदाट वाटेने गावात प्रवेश करताना आपण एका अज्ञात साम्राज्यात प्रवेश करतोय याचा अंदाज येत नाही; पण या सगळ्या परिसराला मोठा इतिहास आहे अन् तो अज्ञात आहे. गावात प्रवेश करताना एक खोल उतार आपले स्वागत करतो. रस्ते बरे असल्याने थोडे हायसे वाटते. उतारावर उजवीकडे गावात प्रवेश करता येतो. प्रवेशद्वार वगैरे नसल्याने विचारून घेतलेले बरे. गावात प्रवेश केला की, समोर ग्रामपंचायतीची इमारत शेजारी लाकडी बांधणीचे जुने मंदिर अन् ग्रामपंचायतीसमोर सुंदर कला मंदिर पहायला मिळतं. कला मंदिर अन् समोर लाकडी बांधणीचे जुने मंदिर या गावाला वेगळेपण असल्याचे दाखवून देतं. पण या गावाचं वेगळेपण आहे ते २१ फूट उंच व ३ फूट रूंदीचा ‘सतखांब’ नावाचा विजयस्तंभ.
सतखांब म्हणजे सत्याच्या विजयाचे स्मृतीस्थळ. हे स्मृतीस्थळ अंदाजे दोन हजार वर्षांपूर्वी चंद्रगुप्त मौर्यांनी उभारल्याचे म्हटले जाते. तर ही वास्तू इ.स.१२३० ते १२८० च्या दरम्यान यादवकालिन असल्याचा दावा केला जातो. या दोन्ही दाव्यांना पुरावे नसल्याने ग्रामस्थ त्यांना दंतकथाच मानतात. याच काळात परिसरात बारव (विहीर) ही बांधल्या गेल्या. अशाच काही वास्तूंची जांबविहीर, मांगोणे, तळ्याचा पाडा, गढीचा माळ व शेवटी हरणगावात प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणा विखुरलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. या स्तंभाबरोबरच गावाजवळच्या डोंगररांगेच्या आगझरी या नावाचे एक स्थान आहे. आता त्याच्या खाणाखुणा पुसट झाल्या आहेत. मात्र तेथे उत्तम प्रकारचा दगड मिळत असे. तेथे या स्तंभाची निर्मिती हेमाद्रीच्या कारागिरांनी केली व हा स्तंभ हत्तीच्या सहाय्याने हरणगावात आणला गेल्याचे गावकरी सांगतात. सतखांब या विजय स्तंभाची रचना हेमाडपंथी आहे. या स्तंभाची रचना अनोखी असल्याचे म्हटले जाते. म्हणजे सूर्यकिरणाच्या पारदर्शकतेची कला स्तंभाच्या बैठकीवर केलेली होती अन् पूर्वेकडील सूर्यकिरणाचा प्रकाश स्तंभबैठकीतून पश्चिमेकडे दिसत असे म्हटले जाते. स्तंभाच्या वरच्या भागात चार खांबांचे मंडप असून त्यावर कळस आहे. मंडपातून येणाऱ्या प्रकाशामुळे असे म्हटले जात असावे. या स्तंभाचा ऐतिहासिक महत्त्व अज्ञात असल्याने आता हा विजय स्तंभ शेंदूर लाऊन देवस्तंभ झाला आहे. तेथे नवस बोलले जातात, पूजा अर्चा केली जाते. स्तंभाच्या अगदी समोरच शिव मंदिर आहे. तेथे विष्णूंची मूर्ती, ईश्वरपिंड, नंदी आहे. मंदिराच्या बाहेर गणपतीची मूर्ती आहे. तर मंदिराच्या आजूबाजूला बऱ्याच दगडी वीरगळ आहेत.
दगडावर कारागिरी करणारे हेमाद्रीचे कारागिरही त्याकाळी हरण गावात होत. याच्या खाणाखुणा गढीचा माळ येथे मिळतात. तेथे यादवांचा मोठा राजवाडा होता. या राजवाड्याचे अवशेष नुकतेच एका शेतकऱ्याला विहिर घेताना सापडल्याने गावच्या विखुरलेल्या इतिहासाची चर्चा पुन्हा सुरू झाली. या यादवांचे एक राजे जाधव यांचे वंशज अजूनही गावात आहेत. ७०० वर्षांपूर्वी झालेल्या एका युद्धांत जाधवांनी केलेल्या कामगिरीचे आणि सत्याचे प्रतीक म्हणून हा स्तंभाची प्रतिष्ठापना झाल्याचे जाधवांचे वंशज संपत जाधव सांगतात. मात्र याबाबत त्यांच्याकडे पुरावे नाहीत. ही माहिती पिढ्यानपिढ्या सांगितली जात असल्याचेही त्यांना सांगितले. परिसरात पुरातत्त्व विभागाने संशोधन केल्यास अज्ञात इतिहास समोर येईल, असेही त्यांनाही वाटते.
परिसरात अनेक लहान मोठे राजे व सरदारांच्या लहान मोठ्या समाध्या आहेत. यातूनही ऐतिहासिक पैलूंचा उलगडा होऊ शकतो, मात्र पुरातत्त्व अथवा कोणत्याही इतिहास संशोधन संस्थेने याची दखल घेतली नसल्याने हा इतिहास पडद्याआड आहे. आम्ही गावात सुखी आहोत, गावात शाळा आहे, जवळ दवाखाना आहे, पाणी, शेती, दळणवळण कसेबसे विकसित होत आहे. पण हुरहुर आहे ती आमच्या पिढ्या हरणगावात कशा आल्या, आम्ही जेथे राहतो त्या वास्तूंचा नेमका अर्थ काय?, गावातील जमिनीत दडलेला तो राजवाडा कसा असेल, येथील राजांचे पराक्रम कसे असतील. आम्ही त्यांचे सेवेकरी होतो. सैनिक होतो की, त्यांचे वंशज असे अनेक प्रश्न आम्हाला सतावत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. हरणगावाबद्दल सांगितल्या जाणाऱ्या सर्व दंतकथा असल्याचेही म्हटले जाते.
पण दंतकथेलाही एक आधार असतो. हरणगावला हा आधार नेमका कोणता? चंद्रगुप्त मौर्य काळातील प्राचीन संस्कृतीचा की, त्यानंतर घडलेल्या असंख्य ऐतिहासिक उलाढालींचा. कोणीतरी आमच्यावर संशोधन करेल, या वास्तूंचे संरक्षण होईल. पुढच्या पिढ्या या इतिहासातून प्रेरणा घेऊन पुढे जात राहतील. आम्हाला जी हुरहुर लागली आहे ती त्यांना तरी नसेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करताना दिसतो. त्यांची ही हुरहुर दखलपात्रच नाही तर इतिहासाच्या वेगळ्या जगात घेऊन जाण्यासाठीची एक हाक आहे.
अंतिम सुधारित : 6/12/2020
पुरंदर गडकिल्याच्या गिरीशिखरावर महाराणी सईबाई व यु...
इतिहासातील अनेक पात्र आपल्या आजूबाजूला वावरत असतात...
आपल्या देशातल्या अनेक स्थानिक आरोग्यपरंपरांमधून हळ...
प्रत्येक गावाला आपली एक ओळख असते. त्या ओळखीच्या खा...