অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केशवराव भोसले नाट्यगृह

केशवराव भोसले नाट्यगृह

सध्या कोल्हापूरात असलेले हे नाट्यगृह सुमारे ९० वर्षापासून उभे आहे. महाराष्ट्नतील हे सर्वात जुने नाट्यगृह होय. या नाट्यगृहाची उभारणी राजर्षी छ. शाहू महाराजांच्या प्रेरणेने झाली. पूर्वी यास पॅलेस थिएटर या नावाने ओळखत असत. याच्या बांधकामास ९-१०-१९१३ रोजी सुरवात झाली. १४-१०-१९१५ रोजी याचे बांधकाम पूर्ण झाले. नाट्यगृहाचे रंगमंच भव्य चौकोनासारखे असून ते ७२० फूट आकाराचे आहे. रंगमंचाखाली १० फूट खड्डा असून त्यात पाणी आहे. पूर्वी ही विहीर होती असे म्हणतात. रंगमंचाखाली पाणी ठेवण्याचा उद्देश आवाज घुमावा हा आहे. हे या नाट्यगृहाचे एक खास वैशिष्ट्य आहे. पाणी खेळविण्यासाठी पक्की गटारे बांधली आहेत. रंगमंचाच्या पूर्वेकडील बाजूस दोन रंगपटगृहे आहेत.

भक्कम फळया घालून रंगमंच बांधले आहे. नाट्यगृहात कोठेही खांब नाहीत त्याकाळी बांधलेल्या बहुतेक नाट्यगृहात खांब फार असत व त्यामुळे काही प्रेक्षकांना रंगमंचावरील पूर्ण भाग पाहता येत नसे. कलाकार, प्रेक्षक व आवाजाचा अंदाज घेऊन हे नाट्यगृह बांधले असल्यामुळे कोठूनही पूर्ण रंगमंच दिसतो. व संभाषण चांगले ऐकू येते. पीटाच्या पहिल्या रांगेतील प्रेक्षक व रंगमंच यामध्ये सुमारे ८० फूट अंतर आहे. माडी प्रशस्त व खानदानी वाटते. बसण्याची जागा चांगली रुंद आहे. पूर्वी माडीवर दोन्ही बाजूस राज घराण्यातील स्त्रियांना बसण्यासाठी दोन चष्मे(बंदिस्त खोल्या) ठेवण्यात आले होते. गोषातील स्त्रिया येथून नाटके पाहत. अलिकडे नाट्यगृहात अंतर्बाह्य खूपच सुधारणा झाल्या आहेत.

नाट्यगृहाच्या सभोवताली प्रशस्त मोकळी जागा असलेने त्यांच्या सौंदर्यात भर पडली आहे. या आवारात कोल्हापूरचे सुप्रसिध्द अभिनेते कै. अरुण सरनाईक यांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. एका कारंज्याचीही रचना केलेली होती, पण हे कारंजे सद्यस्थितीत बंद आहे. नाट्यगृह रस्त्यापासून थोडे बाजूला व रस्त्याच्या पातळीपासून खाली असल्याने बाहेरच्या गलबलाटाचा नाटकावर परिणाम होत नाही. एकंदरीत नाट्यगृहाची रचना व सोयी या दृष्टीने ज्या काळात नाट्यगृह बांधले त्याचा विचार केला तर तर अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही.

हे नाट्यगृह बांधण्यापूर्वी कोल्हापूरात लक्ष्मी प्रसाद, शिवाजी व श्री. मेंढे यांचे शनिवार थिएटर अशी तीन नाट्यगृहे चालू होती. राजश्री शाहू छ. महाराज हे कलांचे रसिक भोक्ते व उदार आश्रयदाते होते. कोल्हापूरात नव्हे तर महाराष्ट्नत नाट्य व संगीत कला यांच्या वाढीस शाहू महाराजांचे सहाय्य कारणीभूत झाले. १९०२ मध्ये शाहू महाराज विलायतीला गेले. तिकडील विशेषत: रोममधील कुस्त्यांची मैदाने व पॅलेस थिएटर यांच्या रुपाने प्रगट झाले. पॅलेस थिएटरचे उद्घाटन त्यावेळचे कोल्हापूर संस्थानचे युवराज श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांचे हस्ते झाले. थिएटरचे अनावरण १९१५ साली दसऱ्यास किर्लोस्कर संगीत नाटक मंडळींच्या मानापमान या नाटकाचा प्रयोग होऊन झाले. किर्लोस्कर नाटक कंपनीबरोबर राम गणेश गडकरीही आले होते.

स्वातंत्र्यानंतर या नाट्यगृहाचे पूर्वीचे नाव पॅलेस थिएटर बदलून केशवराव भोसले नाट्यगृह असे ठेवण्यात आले. कोल्हापूरच्या केशवराव भोसले या नामवंत नटाचे नाव या नाट्यगृहास देऊन त्यांचा गौरव केला गेला. त्यांची दोन तैलचित्रे रंगमंचावर लावण्यात आली आहेत.

लेखन: ज्ञानदीप

माहिती स्रोत: myKolhapur.net© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate