हिमाच्छादित शिखरे सोडली तर महाराष्ट्रात अमर्याद पर्यटन क्षमता आहे. अनेक प्राचीन वास्तू आणि निसर्गाचे लेणे महाराष्ट्राला लाभलेले आहे. जागतिक वारसा वास्तू म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजिंठा-वेरूळ-एलिफंटा लेणी तसेच भुईकोट, गड आणि सागर किल्ले याच भूमीवर आहेत. 720 किमी. लांबीचा विशाल समुद्रकिनारा लाभलेला आहे. 5 राष्ट्रीय उद्याने, अनेक अभयारण्ये, 45 वनउद्याने आणि विविध धर्मांची तीर्थस्थाने इत्यादींमुळे महाराष्ट्र पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. येथील अनेक उत्सव, कला, संस्कृती, विविध खाद्यपदार्थ पर्यटकांना आकर्षित करतात.
महाराष्ट्र राज्य हे निसर्ग समृद्ध राज्य असून, येथे पर्यटनाला वाव आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पर्यटन वृद्धीसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी होत आहे. 2017 हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र इयर म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जगभरातील पर्यटक, गुंतवणूकदार, टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स प्रतिनिधींच्या सहभागामुळे पर्यटनविषयक उपक्रमांना चालना मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील पर्यटनस्थळे वैविध्यपूर्ण असल्यामुळे पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. परकीय चलन मोठ्या प्रमाणावर मिळवून देणारा आणि रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असणारा पर्यटन हा वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. राज्याने केंद्र शासनाच्या संस्था, पर्यटन संस्था व प्रवासी संस्था यांच्या प्रतिनिधींबरोबर विचार विनिमय करून पर्यटन विकास विषयक धोरण तयार केले आहे.
महाराष्ट्राला केवळ भारतातीलच नव्हे, तर दक्षिण आशियातील प्रमुख पर्यटन केंद्र तसेच मुंबई शहराला दक्षिण आशियाचे प्रादेशिक केंद्र बनविण्यासाठी शासनाने अनेक योजना हाती घेतल्या आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सध्या 77 पर्यटक निवास व्यवस्था आहेत. यातील काही पर्यटक निवासस्थाने खाजगी उद्योजकांना चालवण्यात देण्यात आलेली आहेत.
पर्यटक निवासस्थानाच्या आरक्षणासाठी खाजगी व्यक्ती/संस्था यांनाही ’अभिकर्ते’ म्हणून नेमण्यात आले आहेत. महामंडळाच्या संकेतस्थळावरून पर्यटक निवासाच्या आरक्षणाकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संदर्भ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/9/2023
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...