অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिंब चिंब भिजायची स्थळे

रिपरिप म्हणा वा रिमझिम म्हणा.. पाऊस पडला की मन मोहरतेच. अशात चिंबचिंब भिजायला आवडते. कधी ग्रुपमध्ये, कधी दोघांनाच तर कधी एकटेच मात्र भिजायचे असते. ओले व्हायचे असते. महाराष्ट्रासारख्या विस्तीर्ण पसरलेल्या राकट देशा.. दगडाच्या देशानेही हे पावसाचे मोहरणे आपल्या काळजात हलकेच नोंदले आहे. महाराष्ट्रात पावसाळी पर्यटन स्थळे तुमची वाट पाहत आहेत.

पावसाळा सुरु झाला की, अवघ्या महाराष्ट्राला आठवण होते ती माळशेज घाटाची. आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळाळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकरणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर अहमदनगर-कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे.

माळशेज घाट

पुण्याहून 120 किमी.अंतरावर व मुंबईपासून 127 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 222 वरील हा घाट आहे. पुण्याहून नारायणगावमार्गे माळशेज घाटात जाता येते. मुंबईहून कल्याणमार्गे देखील माळशेज घाटात जाता येते. तसेच या माळशेज घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील परदेशी पाहुणे फ्लेमिंगो पक्षी, ससा, घोरपड, मुंगुस, बिबळ्या प्राण्यांचे वास्तव्य. पावसाच्या सरींसोबतच प्राण्यांची साथ यामुळे तुमच्या आनंदात भर पडते.

माळशेज घाटात राहण्याची सोयदेखील उपलब्ध आहे. कल्याण-माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी सावर्णे गावात रस्ता संपतो तेथेच हॉलिडे रिसॉर्ट उपलब्ध आहे. हॉटेलवर गाडी उभी करुन शिदवी गावापर्यंत 3 किमी कच्च्या रस्त्याने चालत जावे लागते. स्थानिक वाटाड्याबरोबर असेल तर धबधब्यापर्यंत एक दिवसाची सहल म्हणून तुम्ही पावसाळ्यामध्ये धम्माल करण्यासाठी माळशेज घाटात जाऊ शकता.

ठोसेघर धबधबा

पावसाच्या थेंबासोबतच निसर्गाची साथ, दाट हिरवळ आजूबाजूला पसरलेले दाट धुके, चिंब भिजण्यासाठी, पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, तुमच्यासाठी अप्रतिम ठिकाण ठरु शकते. सातारा शहरापासून 20 किमी अंतरावर असणारा ठोसेघर धबधबा. तुम्हाला अविस्मरणीय अनुभव देणारा आहे. अंगावर कोसळणारे तुषार आणि वातावरणातील गारवा मन अगदी चिंबचिंब करतात. त्याबरोबरच मित्रमैत्रिणींची सोबत मजा-मस्ती आनंद द्विगुणित करते. पावला-पावलावर 15 ते 20 मीटर उंचीचे लहान- मोठे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडतात. पावसाची सर, अंगावर कोसळणारे धबधबे, पक्ष्यांचे मधुर आवाज, रंगीबेरंगी फुलपाखरे, गर्द झाडी तुमच्या मनाला तजेला देतात. तुम्हाला मनमोकळा श्र्वास घेण्यास सांगतात. या धकाधकीच्या/धावपळीच्या जीवनातून थोडावेळ निसर्गाच्या सान्निध्यात नक्की या… मुंबईपासून 280 किमी अंतरावर ठोसेघर गाव आहे.

भंडारदरा

भंडारदरा 300 फूट उंचीचे थंड हवेचे ठिकाण आहे. भंडारदरा येथे धरणांचा संच आहे. सोबतच धबधबे व सुंदर निसर्गरम्य हिरवळ आहे. शिर्डीच्या मार्गाने जर प्रवास करत असाल तर शांततामय ठिकाण व घराबाहेर खेळण्यासाठी भंडारदरा याची निवड करु शकता. मुंबईपासून 180 किमी व पुण्यापासून 80 किमी अंतरावर हे ठिकाण आहे.

लोणावळा-खंडाळा

सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींनी भरगच्च भरलेले डोंगरमाथे, दऱ्या, पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सर्व मनाला खूप सुखद वाटते. तसेच लोणावळा खंडाळ्याच्या जवळपास पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. राजमाची पॉईंट, वळवण धरण, भुशीधरण, कार्ला, भाजा येथील लेणी, लोहगडही पर्यटन स्थळे आहेत. मुंबईपासून 82 किमी अंतरावर लोणावळा आहे.

सोबतच सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारा अजिंक्यतारा गड सातारा शहराला ऐतिहासिक ओळख देणारा आहे. प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. अजिंक्यताऱ्याची उंची 300 मीटर असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार 600 मीटर आहे. सज्जनगडावर दोन बुरुज व डावीकडे प्रसारभारती केंद्राचे टॉवर बघण्याजोगे आहेत. संपूर्ण गड बघण्यासाठी किमान दीड तास लागतो.

विदर्भ –मराठवाडा

मुक्तागिरी मेळघाटाच्या पायथ्याशी गुल्लर घाटरस्त्यावर सूर्य धबधबा, यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंडाचा धबधबा असो किंवा गोंदिया जिल्ह्यातील ढासगड किंवा दरेकसाजवळील हाजरा फॉल पर्यटकांना खुणावत असतो. सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत वसलेला चिचाटीचा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. धरणी तालुक्यातील रानिगावाचा कंजोली धबधबाही तुमची वाट पाहतोय. मराठवाड्यातील पावसाळी पर्यटन स्थळामध्ये औरंगाबादमधील कैलास मंदिर (एलोरा लेणी) तसेच अजिंठा लेणी व पाणचक्की यांचा समावेश आहे. तसेच नांदेडमधील कंधार किल्ला, तुळजा भवानी मंदिर, धाराशिव लेणी या भागातही पावसाळ्यात पर्यटनाला वाव आहे.

चिखलदरा

विदर्भातील काश्मीर म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. दाट हिरवळीसोबतच धबधबे, तलाव यांची साथ यामुळे पावसात भिजण्याचा आनंद हा द्विगुणित होतो. चिखलदरा येथे असणारा गाविलगड किल्ला, किचकदरा यासारखी बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. चिखलदऱ्याहून जवळच्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला नक्की भेट द्या. मुंबईपासून 763 किमी अंतरावर चिखलदरा आहे. जवळचे रेल्वे स्टेशन अमरावती हे आहे. चिखलदरा हे महाराष्ट्र व मध्यप्रदेशची सीमारेषा आहे.

पावसाळी ट्रॅकिंगची ठिकाणे

महाराष्ट्रामध्ये विविध भागात पावसाळी पर्यटनासाठी अनेक चांगली स्थळे उपलब्ध आहेत. यामध्ये माथेरानच्या कुशीत वसलेले भिवपुरी, दहीसरजवळील चिंचोटी, मुंबईपासून 2 तासांच्या अंतरावर असणारे तुंगारेश्र्वर, सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सनडॅमपासून तयार झालेला इगतपुरीजवळील रांधा फॉल, खारघर परिसरातील पांडवकडा, खोपोली येथील झेनिथ धबधबा, मुंबई –पुणे महामार्गाावरील पळसदरी, पनवेल परिसरातील गाढेश्र्वर धबधबा, फणसाड धबधबा, मुरुड-जंजिरा येथील सवतकडा, नवी मुंबई घणसोली गावाजवळील गवळीदेव धबधबा, बदलापूर जवळील कोंडेश्र्वर धबधबा, वांगणीजवळील भगीरथ धबधबा, नेरळजवळील टपालवाडी, भिवपुरीजवळील आषाणे धबधबा, माळशेज घाटाजवळील भिदबीचा धबधबा, निवळी घाटाजवळील निवळी धबधबा, कर्जतजवळील मोहिली धबधबा, मुरबाडजवळील पळुया धबधबा या ठिकाणी तुम्ही ट्रेकसुध्दा करु शकता. ठाणे जिल्ह्यातील जव्हार डोंगरदऱ्यामधील दाभोसा धबधबा, नाशिक-त्र्यंबकेश्र्वर परिसरात असणारे कावनई. गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर, बसगड, अंजनेरी इत्यादींसारख्या बऱ्याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते. धुळे – नंदुरबारजवळील तोरणमाळ हे ठिकाण पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटालगतच कावळ्या या किल्ल्यावर जाता येते. डोंगरातून वाहणारे छोटे-छोटे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्यादरीत दिसणारे छोटेसे गाव आणि त्या गावालगत वाहणारी नदी, असे वेड लावणारे सौंदर्य वरंधघाटात आहे. वरंधघाटात उतरल्यावर शिवथरघळ येथील गुहा आणि गुहेबाहेर पडणारा पाऊस आणि धबधबा म्हणजे क्या बात!

पावसाळी ट्रेकिंगसाठी खालील आकर्षक गडकिल्ले आकर्षक

राजमाची, तिकोना किंवा वितंडगड, कोरीगड, कळसुबाई शिखर, सज्जनगड, लोहगड, अजिंक्यतारा, सिंहगड किंवा कोंढाणा, हरिश्र्चंद्रगड.

लेखिका - चारुशीला बोधे

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 6/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate