सध्याच्या ठाणे शहराच्या खाडीकडील भागात या किल्ल्याची तटबंदी होती. मूळ किल्ला पूर्ण स्वरुपात शिल्ल्क नाही. तथापि आज जिल्हाधिकारी कार्यालयावरुन सरळ पुढे जाणाऱ्या रस्त्यावर जी कारागृहाची इमारत आहे ती मूळ किल्ल्याचा भाग होती.
पेशव्यांच्या काळात मराठ्यांचे सामर्थ्य खूपच वाढले होते व त्यांची सीमा थेट फिरंगाणाला जाऊन भिडली होती. पण पेशवे आणि पोर्तुगीजांमध्ये सतत काही ना काही कुरबुरी व युद्धे चालूच होती. इ.स. 1723 व इ.स. 1730 मध्ये त्यांची मोठी युद्धेही झाली होती. त्यामुळे पोर्तुगीजांनी मराठ्यांची धास्तीच घेतली होती. आज ना उद्या जर मराठ्यांशी युद्धप्रसंग ओढवला तर आपल्या प्रांताची दूरदर्शीपणाने कायमची बळकटी करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी ठाणे येथे किल्ला बांधायचे ठरवले. त्यांना हा किल्ला एवढा मोठा बांधायचा होता की वेळप्रसंग पडल्यास त्यात सर्व पोर्तुगीजांना आश्रय घेता येईल. शिवाय हा किल्ला साष्टीच्या वाटेवरच असल्यामुळे या किल्ल्याच्या सहाय्याने साष्टीच्या वाटाही रोखून धरता येतील.
थोडक्यात या साऱ्या परिस्थितीचा नीट विचार करुन पोर्तुगीजांनी ठाणे येथे युद्धकाळात स्वयंपूर्ण राहून झुंज देऊ शकेल असा भव्य किल्ला बांधण्याचे ठरवले. ठाण्याला लुई बतेलोची गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली त्याचवेळी त्याच्याबरोबर अंद्रे रिबेरो कुतिन्हु हा नामांकित इंजिनिअर किल्ल्याचा आराखडा तयार करण्यासाठी पाठविण्यात आला होता. या इंजिनिअरने सर्व पाहणी करुन प्रथम तीन नकाशे तयार केले व ते गोव्याला व्हॉइसरॉयच्या मान्यतेसाठी पाठवून दिले. व्हॉइसरॉयने त्यातील एक नकाशा पसंत केला; त्यात काही बदल सुचवले व किल्ला बांधण्यास मंजूरी दिली.
आज जी वास्तू ठाण्याचा तुरुंग म्हणून उभी आहे ती किल्ल्याचा थोडासा भाग आहे, संपूर्ण किल्ला नाही. या भागाची बरीच तटबंदी मूळ किल्ल्याची तटबंदी असावी असे मानण्यास जागा असली तरी तटबंदीचा वरचा भाग, म्हणजेच कठडे व त्यात असणारे गोळीबार गवाक्षांसारखे घटक आज नष्ट झालेले आहेत. तटबंदीचा बाह्य पृष्ठभाग उताराचा आहे.
तुरुंगाची कार्यालयीन इमारत खास पोर्तुगीज शैलीतील असून एकेकाळी ती किल्ल्याचा एक भाग होती. आज ही इमारत कारागृहाच्या दर्शनी भागातच आहे. ब्रिटिश काळातच किल्ल्याचा आतील भाग पाडून टाकून त्या ठिकाणी कैद्याच्या बराकी उभारण्यात आल्या होत्या. आज कदाचित त्यात आणखी भर पडली असेल. आज हा किल्ला तुरुंग असल्याने संपूर्ण वास्तूच प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे या किल्ल्याचा तलविन्यास व इतर तपशील जाणीवपूर्वक देण्यात आलेले नाहीत.
आधीच नमूद केल्याप्रमाणे तटबंदीच्या वरच्या बाजूचे घटक आज शिल्लक नाहीत. मुख्य तटबंदीलाही सिमेंट काँक्रीटचा गिलावा करण्यात आला आहे. आतील वास्तूही ब्रिटिशांच्याच काळात पाडून टाकण्यात आल्या आहेत. म्हणजेच आजच्या किल्ल्यात किल्ल्यातील कोणताही वास्तुघटक मूळ स्वरुपात शिल्लक नाही. पुरातत्व शास्त्राच्या परिभाषेत सांगायचे तर या किल्ल्याचे प्राचीनत्व नष्ट झाले आहे.
साष्टी बेटाच्या उत्तरेस असलेला हा किल्ला तत्कालीन भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता खरोखरीच मोक्याच्या जागी होता. या किल्ल्याला लागून असलेल्या खाडीतून पश्चिमेस वसई मार्गे अरबी समुद्रात तर पूर्वेकडून मुंबई बंदर व पनवेल या ठिकाणी जाता येत असे.
या किल्ल्याचे प्राचीनत्व नष्ट झाले असले तरीही या किल्ल्याचे स्थान, आकार व ढोबळ स्वरुप याचा अंदाज बांधता येईल इतपत अवशेष शिल्लक असल्यामुळे या किल्ल्याचा अंतर्भाव नामशेष झालेल्या किल्ल्यात न करता ‘पाश्चिमात्यांनी बांधलेले किल्ले’ या भागात करण्यात आला आहे.
लेखन - संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 5/1/2020
कन्हेरगड किल्ल्याची उंची 660 मीटर असून तो गिरीदुर्...
पुणे-नाशिक मार्गावर असलेला चाकणचा भुईकोट किल्ला ऊर...
कोकण किनारपट्टीवरील सागरावर आपली सत्ता राहावी यासा...
पावसाळ्यातील एक आनंदाचा भाग म्हणजे ट्रेकला जाणे. आ...