অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

त्रिरश्मी डोंगरावरची पांडवलेणी

त्रिरश्मी डोंगरावरची पांडवलेणी

भारतात खडकांत कोरलेल्या सुमारे १,२०० लेणी आहेत. त्यांतील हजाराहून अधिक लेणी महाराष्ट्रात आढळतात. बेसाल्ट प्रकाराच्या दगड महाराष्ट्राच्या डोंगरामध्ये सर्वाधिक असल्याने येथे जास्त लेणी खोदल्याचे दिसते. नाशिककर म्हणूनही आपण खूप नशीबवान आहोत की आपल्या शहराची एक मुख्य ओळखही पांडवलेणी (बौद्ध लेणी) मुळेच आहे. पांडव लेणीचा सर्वसाधारण काळ इ.स.पूर्व पहिले शतक ते इ.स. आठवे शतक असा मानला जातो.

या दगडांतील गुफांना लेणी असे का म्हटले गेले, याचे श्रेयही नाशिकच्या पांडवलेणीलाच लाभले आहे. पांडवलेण्यातील शिलालेखात ‘लेण’ हा शब्द प्रथम आलेला दिसतो. ‘एतच लेण महादेवी महाराज मातामहाराज पतामही ददाति...’. ‘लेण’ हा शब्द संस्कृत ‘लयन’ म्हणजे ‘गृह’ या शब्दावरून आला आहे. त्यापासून पुढे ‘लेणी’ हा शब्द तयार झाला. पांडव लेण्यांचे स्वरूप भिक्‍खूंना राहण्यासाठी विहार असे होते. म्हणजेच बौद्ध भिक्षुकांना राहण्यासाठी त्यावेळी या लेणींची निर्मिती झाली, हेही समजते.

पांडवलेणीतील शिलालेखांमधून महत्त्वाची आणि ऐतिहासिक माहिती समजते. यातून त्यावेळीच्या प्रातांची नावे, पर्वत, नद्या, शहरे, गावे व खेडी अशा इतिहासातील बऱ्याचशा भागांचा खुलासा होतो. शिलालेखात कण्ह अथवा कृष्ण, हकुसिरि अथवा हकुश्री, क्षहरात आणि नहपान, उषवदात, गौतमीपुत्र सातकर्णी, वासिष्टिपुत्र पुलुमायी, यज्ञश्री सातकर्णी, माधरीपुत्र शिवदत्त आणि ईश्वर या राजांची नावे व वर्णन आढळतात. पांडवलेण्यात एकंदर २४ लेणी २९ शिलालेख (‌शिलालेख म्हणजे दगडावर अक्षरे कोरलेली आहेत.

ही ब्राह्मी ‌लिपीतील) आहेत. त्यात चैत्य, लयन आणि सत्र असे गुहांमध्ये तीन प्रकार दिसतात. लेणी क्रमांक १४ मधील शिलालेखात दोन हजार वर्षांपूर्वी नाशिकचे नाव ‘नासिक्य’ असल्याचे दिसते. तर नाशिक हा जिल्हा नसून, सध्याचे गंगापूररोडवरील गोवर्धन हे गाव मुख्य बाजारपेठेचे ठिकाण होते हेही पांडवलेणी सांगते. केंद्रीय पुरातत्त्व खात्याने प्रत्येक लेणीला क्रमांक दिल्याने पर्यटकांना या लेणी क्रमांकानुसार पाहता येतात. मात्र त्या क्रमाने लेणीची निर्मिती झालेली नाही.

प्रत्येक लेणीचा निर्मिती काळ वेगवेगळा आहे. ही लेणी पाहण्यासाठी सुटीत नक्की जा. बुद्धांच्या लहानमोठ्या मूर्ती, लेणींवरील नक्षीकाम, विविध मूर्तींतून दिसणारे त्यावेळच्या जीवनपद्धती व वेशभूषा, लिपी यांची तोंडओळख नक्कीच पांडवलेणीच्या भटकंतीतून होईल. जागोजागी लेणीची माहिती करून देणारे फलक लेणीची माहिती तर देतातच पण प्रत्येक लेणं आपला इतिहास आपल्याला सांगायला आतुर झालेला दिसतो.

 

लेखक : रमेश पडवळ

 

 

अंतिम सुधारित : 8/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate