वेशीवरच्या पाऊलखुणा : नाशिकचे नंदनवन नांदूरमध्यमेश्वर
एखाद्या गावाची ओळख तेथील वैशिष्ट्यांमुळे,वेगळेपणामुळे निर्माण होते. ही ओळख त्या गावाला देशांच्या सीमेपलीकडेही घेऊन जाते. मात्र, नव्या ओळखीतून साकारलेल्या विश्वात त्या गावचा मूळ इतिहास मात्र अनभिज्ञ राहतो. गावातील अनेक पैलू आपल्या इतिहासाबद्दल सांगत राहतात. असेच काहीसे पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदूरमध्यमेश्वरचे झाले आहे. नांदूरमध्यमेश्वर हा परिसर अश्मयुगातही वस्ती असल्याच्या खाणाखुणा दाखवितो तर पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध असलेले हे गाव खऱ्या अर्थाने मंदिरांच्या कलाकृतीचेही नंदनवन आहे. हा दडलेला इतिहासही पाऊलखुणांच्या रूपाने समोर येतो.
नाशिकहून सायखेडामार्गे निफाड तालुक्यातील खानगावथडीला जाता येते. हे अंतर साधारण ४५ किलोमीटर आहे. तेथून पुढे पाच किलोमीटरवर नांदूरमध्यमेश्वर हे गाव लागते. नांदूरमध्यमेश्वर हा परिसर अश्मयुगातील पुरातन लोकवस्तीचा परिसर होता हे १९०४ मध्ये गावात झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननातून स्पष्ट झाले आहे. या उत्खननात हात्तीचा सांगाडा मिळाला अन् तो अश्मयुगातील असल्याचे स्पष्ट झाल्याने नांदूरमध्यमेश्वरने प्राचीन लोकवस्तीच्या खाणाखुणा उलगडल्या. खानगावथडीतून नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याच्या रस्त्याने नांदूरमध्यमेश्वरला जाता येते. धरणाच्या बॅकवॉटर परिसरात संगमेश्वर तर धरणाच्या खाली गोदावरी नदी तीरावर मध्यमेश्वरचे मंदिर आहे. संगमेश्वर मंदिर पाहून पुन्हा खानगावात यायचे व बंधाऱ्यावर न जाता त्याखालील उजव्या हाताच्या नदी पात्रातील रस्त्याने भल्यामोठ्या गोदापात्रात एक ठेकडावर असलेले श्री गंगा मध्यमेश्वर मंदिराकडे जायचे. हे मंदिर एका भक्कम पंधरा ते वीस फूट उंच तटबंदीच्या आत आहे.
नदीच्या पाण्यापासून मंदिराचे संरक्षण व्हावे,हा हेतू यामागे असावा. नदी पात्रात मधोमध हे मंदिर असल्याने याला मध्यमेश्वर म्हटले गेले असावे, असे त्याच्या रचनेवरून वाटते. मंदिराच्या तटबंदीचे प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याप्रमाणेच आहे. आत प्रवेश केल्यावर साधारण २०-२५ फूटी दीपमाळ आपले स्वागत करते. या दीपमाळेवर मराठी शिलालेख आहे. हा शिलालेख नांदूरमध्यमेश्वर हे नाव कसे पडले असावे याबाबतचे कोडे उलगडतो. या शिलालेखात मौजे नांदूर असा उल्लेख आहे. म्हणजेच गावाचे नाव पूर्वी फक्त नांदूर असेच होते. मध्यमेश्वर मंदिरामुळे आता नांदूरमध्यमेश्वर म्हटले जाऊ लागले असावे. हा शिलालेख अस्पष्ट असल्याने त्याचे वाचन होण्याचीही गरज आहे. त्यावर रंग लावल्यानेही तो वाचता येत नाही. या मध्यमेश्वर मंदिरासमोर नंदी, मंदिरात शिवलिंग अन् भिंती दरवाज्यांवरील दगडावर कोरलेली कलाकृती थक्क करते. मंदिराबाहेरील बाजूवरही फुलांची नक्षी पहायला मिळते. मंदिराच्या आजूबाजूला लहान लहान मंदिरे आहेत. हरणाचा पाठलाग करतांना मध्यमेश्वर मंदिरात श्रीराम आल्याची दंतकथा सांगितली जाते. मंदिरातील कलाकुसर पाहण्यासारखी तर आहेच पण गोलाकृती शिवलिंग अन् त्यावरील शाळुंकेवर चारही बाजूने मुखवटा कोरलेला आहे.
मात्र त्यावर शेंदूर फासल्याने मुखवट्यांचा चेहरा धुसर झाला आहे. मंदिराच्या तटबंदीवरून नांदूरमध्यमेश्वर गावाकडे पाहिल्यास हे गाव गोदाकाठी पहुडलेले दिसते. तेथून मृगव्याध्येश्वराचे मंदिर दिसते. मध्यमेश्वर मंदिर पाहून नदीपात्रातूनच नांदूरमध्येश्वरकडे जाणारा कच्चा रस्ता आहे. हा रस्ता नदीला पाणी असल्यावर बंद असतो. त्यामुळे पुन्हा खानगाव थडीला जाऊन रूळलेल्या रस्त्याने जावे लागते. सध्या गोदेला पाणी नसल्याने या रस्त्याने जाता येते. हा रस्त्ता आपल्याला थेट मृगव्याध्येश्वर मंदिराकडे घेऊन जातो. हे मंदिर व आजूबाजूच्या लहान मंदिरांवरील दगडातील कोरीव कामामुळे खिळवून ठेवतो. यावरील अनेक शिल्पे चांगल्या स्थितीत आहेत. मृगव्याध्येश्वर मंदिरावर हरणाचे शिल्प आहे. याबाबतही अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. तसेच येथेही श्रीराम आल्याचे ग्रामस्थ सांगतात. मंदिराबाहेरील समाधीसारखा एक घुमट प्राचीन स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. २०१० मध्ये या मंदिराचा मूळ बाज जसाचा तसा ठेऊन जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिर परिसरातच गोसावी समाजाच्या समाधी पहायला मिळतात.
मृगव्याध्येश्वराचे मंदिर डोळ्यात साठवल्यावर समोर एका टेकाडावर नांदूरमध्यमेश्वर वसलेले दिसते. चारशे-पाचशे उंबरांचे नांदूरमध्यमेश्वर मंदिरांनी सजले आहे. मृगव्याध्येश्वरापासून डाव्या हाताने धरणगाव रस्त्याने गावात गेल्यावर एका उंच टेकडावर पेशवेकालीन महादेव मंदिर पहायला मिळते. मंदिरामागील बाजूला हनुमानाची मूर्ती व छोटेसे मंदिर आहे. या टेकाडाच्या पायथ्याला विविध समाध्या अन् लहान लहान मंदिरे आहेत. येथून डाव्या हाताला थोडे पुढे गेलात की, ब्राह्मण वाडा पहायला मिळतो. असे अनेक वाडे पूर्वी गावात होते मात्र, कालांतराने हे वाडे पडले, असे सांगितले जाते. मात्र गावच्या वैभवाची साक्ष देत ब्राह्मणवाडा आजही उभा आहे. ब्राह्मणवाडा पाहिल्यावर उजव्या हाताने पडलेल्या वेशीवर यायचे. वेशी कोसळल्या असल्यातरी त्यांचे अवशेष आजही आपले अस्तित्व दाखविताना दिसतात. तेथून पुढे वाड्यासारखी दोन तटबंदी पहायला मिळते. ही तटबंदी वाड्याची नसून, मंदिराची आहे हे जवळ गेल्यावर लक्षात येते. राम मंदिराच्या तटबंदीतील भक्कम दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर लाकडी कामात छोटेखानी मंदिर पहायला मिळते. लाकडातील देव्हारा अन् आत संगमरवरी राम, लक्ष्मण, सीता व हनुमानाची मूर्ती आहे. दुसऱ्या तटबंदीत विठ्ठल रूक्मिणी मंदिर आहे. मंदिर अगदी छोटेखानी आहे. मात्र पूर्वी हा प्रशस्त वाडा असेल, असा अंदाज काष्ठशिल्प अन् आतील लाकडी कामावरून दिसते. या मंदिरासमोर आणखी एका तटबंदीत कृष्णमंदिर व त्या शेजारी दत्त मंदिर आहे. येथे चक्रधरस्वामी आल्याचे सांगितले जाते. यामुळे महानुभावपंथीयांसाठीही हे श्रद्धेचे स्थळ आहे.
गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर १९०७ ते १३ दरम्यान बंधाऱ्याच्या दगडी भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले. नांदूरमध्यमेश्वर बंधारा झाल्यानंतर गोदा अन् कादवा नदीच्या प्रवाहातील गाळ बंधाऱ्यामुळे साचला. यातून हा परिसर पक्षांच्या निवासासाठी पूरक झाला अन् हे ठिकाण पक्षीतीर्थ म्हणून नावलौकिकास आले. दरवर्षी फ्लेमिंगो, डक, स्पूनबिल, कॉमन क्रेन यासारख्या देशी-विदेशी रंगीबेरंगी रंगीबिरंगी २४२ प्रकारचे पक्षी या अभयारण्यात येतात. काही पक्षी ५० हजार किलोमीटरहून अधिक लांबचा प्रवास करून येथे येतात. पक्षांप्रमाणेच हरिण, बिबट्या,कोल्हे, रानडुक्कर, ससे हे प्राणीही या परिसरात पहायला मिळतात. २४ माशांच्या जातीही येथे पहायला मिळतात. या धरणाच्या बॅकवॉटर परिसरात सतत अनेक पक्षांची रेलचेल असते. यामुळे हा परिसर निसर्गप्रेमींसाठी खजिनाच आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते. ज्येष्ठ पक्षीप्रेमी सलीम अली यांनी नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षी अभयारण्याला भारतातील दुसरे भरतपूर म्हटले आहे. या परिसरात व बंधाऱ्याच्या पात्रात अनेक दुर्मिळ मूर्ती सापडत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
नांदूरमध्यमेश्वरला इतिहासाच्या पाऊलखुणांचा प्राचीन वारसा लाभला आहे. त्यात पक्षी अभयारण्याचा दर्जा मिळाल्याने हा वारसा अधिकाधिक उजळून काढण्याच्यादृष्टीनेही प्रयत्न व्हायला हवेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना पक्ष्यांप्रमाणेच गावातील प्राचीन मंदिरांचे पर्यटनही करविता आले तर हे नंदनवन खऱ्या अर्थाने अनुभवल्याचा आनंद पर्यटकांना होईल.
अंतिम सुधारित : 5/8/2020
अपंग, गतीमंद अनाथ बालकांच्या संगोपनासाठी सातत्याने...
जत... नेहमीच दुष्काळी असलेला भाग. खरं तर हीच या भा...