অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भैरवमय वडनेर

भैरवमय वडनेर

वेशीवरच्या पाऊलखुणा : भैरवमय वडनेर

शेकडो वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर घेऊन मिरविणारे वडनेर भैरव हे गाव आपल्या वेगळेपणाबद्दल अजूनही अज्ञात आहे. मुख्य बाजारपेठ व त्याकाळी जिल्ह्याचे स्थान असलेले ऐतिहासिक वडनेर प्राचीन ताम्रपटातून उलगडते. भैरवनाथाचे मंदिर अन् रथयात्रेच्या परंपरेमुळे प्राचीन वडनेर भैरवमय झाल्याचे अनुभवायला मिळते.

नाशिक-चांदवड रस्त्यावर ४१ किलोमीटरवर शिरवाडे फाटा लागतो. तेथून वडनेर भैरव ४ किलोमीटर आहे. फाट्यावरून डाव्या हाताने वडनेर भैरवकडे निघाल्यावर लगेचच पालखेडचा कालवा लागतो. तो ओलांडताना डाव्या हाताच्या वडाच्या झाडाखालील एक अनोखी वीरगळ आपल्या स्वागताला सज्ज असलेली दिसते. वीरगळीला न्याहाळताना आपली पावलं एका ऐतिहासिक गावाकडे झेपावताहेत असं वाटायला लागतं अन् मनात कुतुहल निर्माण होतं ते नेत्रावती नदीच्या कुशीत वसलेल्या गावाचं वडनेर भैरव असं नाव कसं पडलं असेल याचं. पूर्वी वडनेर अन् भैरव ही दोन वेगळी गावं होती. वडनेर म्हणजे वड नेहार म्हणजेच वडांच्या झाडांचा समूह अथवा थापी अन् नेहर म्हणजे नदी. नदीच्या लगत असलेल्या वडांच्या झाडांचा समूह ते वडनेर. तसेच वटक ऋषी नावांच्या ऋषींनी हे नगर वसवल्याचा पुराणामध्ये उल्लेख मिळतो.

म्हणूनही गावाला वडनेर म्हटले गेले असावे, असे ग्रामस्थ सांगतात. भैरव गावाला भैरवनाथाच्या मंदिरामुळे भैरव नाव पडले असावे. वडनेर व भैरव ही दोन्ही गावे केव्हापासून एक झाली हे सांगणारी पिढी अथवा नोंद उपलब्ध नाही. मात्र वडनेर व भैरव ही दोन गावे वेगळी होती हे निश्चित करण्यासाठी दोन्ही गावांच्या दोन वेशी, दोन मारूती मंदिरे, दोन तालमी पुरेशा ठरतात. वडनेर भैरव ही गावे एक होण्याबाबत शिंदे व होळकर घराण्यांमधील एक व्यवहाराची नोंदही महत्त्वाची ठरते. अहिल्याबाई होळकरांनी भैरव गावातील भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हापासून वडनेर भैरवशी जोडले जावे म्हणून त्यांनी ग्वाल्हेरच्या शिंद्यांना त्यांच्या वणीच्या महसुलात असलेल्या वडनेर गावच्या बदल्यात चांदवडच्या महसुलातील पाचोरे, शिरवाडे, आहेरगाव ही गावे दिली.

त्यामुळे ही गावे आता वणी पाचोरे, वणी शिरवाडे व वणी आहेरगाव अशी ओळखली जातात. तर वडनेरला भैरवचे वैभव लाभल्याने वडनेर हे वडनेर भैरव म्हणून ओळखले जाऊ लागले. भैरवनाथाच्या संस्थानाला १२५० पासून ४४१ बिगा जमीन मिळाल्याचा उल्लेख गुरवांकडील एक दस्तात मिळतो, अशी माहिती चंद्रकांत भंडारे यांनी दिली. गावात प्रवेश करताना मल्लासारखा दिसणारी आग्या वेताळाची मूर्ती आपले स्वागत करते. हे गाव मल्लांसाठीही प्रसिद्ध असल्याचे जणू वेताळ देव सांगायला लागतो. मंदिरासमोर रस्त्यापलीकडे वर्तुळाकार दगड आहे. हे भैरव मंदिराच्या दीपमाळेचे दगड आपल्याला गावाच्या इतिहासात डोकवायला लावतात.

वडनेर भैरवचा प्रवास येथेच संपत नाही तर हा प्रवास आपल्याला येथून १४०० वर्ष मागे मूळच्या प्राचीन वडनेरपर्यंत घेऊन जातो. वडनेरचा उल्लेख आतापर्यंत तृतीय गोविंद राजाचा शके ७३० मधील वणी ताम्रपटात मिळतो. हा ताम्रपट दिंडोरी येथे सापडला असून, सध्या हा ताम्रपट बॉम्बे ब्रँच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटीत आहे. हा ताम्रपट संस्कृत नागरी लिपीत असून, राष्ट्रकूट नृपती गोविंद तृतीय यांच्या आमदानीतील आहे. या ताम्रपटाचा मुख्य उद्देश राजाने मयूरखंडी (म्हणजे वणीचा मार्केंडेय किल्ला) या राजधानीतून वेंगीनिवासी भारद्वाज गोत्री द्विवेदी दामोदर याचा पुत्र चतुर्वेदी दामोदरभट्ट याला नाशिक देशातील वटनगर (आताचे वडनेर भैरव) विषयातील (म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण अथवा प्रमुख केंद्र) अंबकग्राम (अंबकग्राम म्हणजे वणीच्या दक्षिणेस ८ मैलांवरील अंबे हे गाव) दान दिले हे नमूद करण्याचा हेतू आहे.

हा ताम्रपट वत्सराजपुत्र अरूणादित्य याने लिहिला व यावेळी याचा दूतक भुविराम होता. असे या ताम्रपटात नमूद करण्यात आले आहे. वडनेर येथील नाना ऊर्फ अहिराजी तिडके यांच्याजवळ १९१२ रोजी ताम्रपट मिळाला. हा ताम्रपट कलचुरी नृपती बुद्धराज यांचा असून तो संस्कृत भाषेत असून लिपी दाक्षिणात्य वळणाची आहे. हा ताम्रपट कलचुरी नृपती शंकरगणाचा पुत्र बुद्धराज यांच्या काळातील असून, बुद्धराजाने वटनगरचा काश्यप गोत्री ब्राह्मण बोधस्वामी याला वटनगर भागातील भट्टऊरिका जवळचे कोणिकांचे गाव दान दिले हे नमूद करण्यासाठी हा ताम्रपट कोरला. हा आदेश विदिशा (मध्य प्रदेशातील हल्लीचे बेसनगर) येथील लष्करी तळावरून अनंतमाहायी नावाच्या राणीच्या आदेशावरून महासांधिविग्रहिक अनाफित याने लिहिला. महाबलाधिकृत प्रसह्यविग्रह हा या वेळी दूतक होता. या ताम्रपटांमधील वडनेरच्या उल्लेखावरून वडनेर मुख्य बाजारपेठ असल्याचे निर्देश करते. यातील आणखी एक ताम्रपट गावातील एका व्यक्तीकडे आहे. मात्र तो दाखविला जात नसल्याने वडनेर भैरवच्या इतिहासाचे अनेक पैलू अजूनही अज्ञात आहेत. मारूती मंदिरातील दगडावरील शिलालेख ग्रामस्थांनी न जपल्याने त्यावर नोंदविलेला इतिहास गमावला आहे. हा शिलालेख कुठे आहे हे कोणालाही माहिती नाही. गावाबद्दलच्या अशा पाऊलखुणा समजल्या जाण्याची गरज आहे.

बाराबलुतेदारांचे वडनेर भैरव गाव आजही गावगाड्याची ही रचना पेठांच्या माध्यमातून स्पष्टपणे दाखविते. मुख्य बाजारपेठ रस्त्याला बाराही बलुतेदारांची दुकाने असल्याचे आजही पहायला मिळतात. ही पेठ पाहताना व्यापाऱ्यांच्या लाकडी नक्षीकामातील माड्या पाहताना नवल वाटते. त्यामुळे वडनेर भैरवच्या या पेठेला गुलजार पेठ असेही म्हणतात. `गुलजार पेठ वडनेरेची, चल सजने तुला दाखवितो’ असे शिरवाडच्या रघुनाथ माळी या शाहीराने नोंदवून ठेवले आहे. यावरून वडनेरच्या व्यापारी पेठेचे गुलजार (आबादीआबाद) महत्त्व समोर येते. दोन्ही गावच्या वेशी आज नाहीत. मात्र बाजारपेठ गल्लीने गावचे वैभव आजही टिकवून ठेवल्याचे दिसते. प्राचीन वडनेर भैरवची औरंगजेबाच्या काळात हानी झाली. औरंगजेबाने गावातील मंदिरे पाडण्याचे आदेश दिले. तेव्हा चार मुस्लिम सरदारांनी भैरवनाथाचे मंदिराचा कळस पाडण्याचा प्रयत्न केला.

मात्र कळसावर चढलेले ते सरदार वरून खाली पडून मरण पावले. त्यांच्या चार दगडी शिळा आजही मंदिराभवती आहेत. तेव्हा गावातील भैरव गावातील तिडके पाटील यांनी औरंगजेबाला असे न करण्याची विनंती केली. तेव्हा औरंगजेबाने तिडकेंना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगितले. मंदिर पाडले जाऊ नये म्हणून तिडकेंनी मुस्लिम धर्म स्वीकारला व ते तिडकेंचे पटेल झाले. त्यामुळे भैरवनाथाच्या पालखी सोहळ्यात पटेलांनाही पूजेचा मान आहे. पोळ्याच्या दिवशी वडनेरच्या वेशीतून भालेरावांचे व भैरवच्या वेशीतून तिडके (आताचे पटेल) यांचे मानाचे बैल वाजत गाजत प्रवेश करतात. गावातील बाराही बलुतेदारांना म्हणजेच प्रत्येक समाजाला मानपान दिला जातो, अशी माहिती अरूण तारकुंडे व सोपान वक्ते यांनी दिली.

औरंगजेबाच्या त्रासानंतर गाव पुन्हा स्थिरस्थावर झाले ते आहिल्याबाई होळकरांच्या काळात. अहिल्याबाईंनी भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. गावात तीन मजली चावडी बांधली, भैरवनाथ मंदिराजवळ बारव बांधली. अहिल्याबाईंनी बांधलेल्या गावात एकूण चार बारवा आहेत. त्यातील पाचोरा रस्त्यावरील बारवच आज पहायला मिळते. गावात न्यायनिवाड्यासाठी फकिरांची चावडी होती. गाव इंग्रजांच्या काळातही प्रसिद्ध होते ते दरोडेखोरांसाठी. गावावर सतत दरोडे पडत असल्याने १८०० पासून येथे पोलिस स्टेशन होते. त्यामुळे येथे स्वातंत्र्यचळवळही बळावल्याने स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणूनही वडनेरला ओळखले जाते. स्वातंत्र्य सैनिक फकिरदास भालेराव हे गावचे पहिले सरपंच होते. विशेष म्हणजे १९४५ दरम्यान गावात किसान चित्रमंदिर टॉकिज उभे राहिले होते. मशालींच्या प्रकाशात येथे नाटके सादर होत असतं.

टुरिंग टॉकिज हा फिरता नाटकाचा मंच गावात येत असे. नाट्य परंपराही गावात जपली जात होती. १९६० च्या दरम्यान गावात वीज दाखल झाली. याच दरम्यान, गावात सार्वजनिक वाचनालय उभारण्यासाठी ग्रामस्थांनी नाट्य चळवळ सुरू केली. गावकऱ्यांनी नाटक बसवून पैसा उभा केला व वाचनालय उभारले, अशी आठवणही ज्येष्ठ मंडळी सांगतात. आजही अरूण तारकुंडे नाटकांतील त्या पात्रांचे डायलॉग म्हणून दाखविताना किसान चित्रमंदिर टॉकिज मंदिरात बसून त्यांना अभिनय पाहत असल्याचा भास होतो. चित्रमंदिरनंतर जळाले अन् टिव्ही दाखल झाल्यानंतर फिरत्या टुरिंग टॉकिजलाही घरघर लागली. गावातील बोहाडे साजरा करण्याची परंपराही ९० च्या दशकात बंद पडली. सध्या वाचनालय एक छोट्याशा जागेत चालविले जाते. याची स्वतंत्र इमारत होण्याची गरज आहे.

भैरवनाथाचे मंदिर सुंदर सभामंडप आवर्जून पाहण्यासारखा आहे. मंदिराचा मूळ मंदिर गाभारा दगडी आहे. त्यात भैरवनाथ, जोगेश्वरीची राळ्याच्या लुकनने बनवलेला मुखवटा आहे. जोगेश्वरी शेजारी तिची पाठराखण पुतळाबाईची मूर्ती आहे. मंदिराच्या उजव्या हाताच्या दरवाजातून आत गेल्यावर भैरवनाथाच्या रथाचे अवशेष ठेवलेले आहेत. चैत्रेला उत्सवासाठी हे अवशेष जोडून रथ बनविला जातो. तेथून पुढे माहुरची रेणुका मातेची तांदळा आहे. त्याशेजारी भैरवाची व शंभर पार्वतीची दगडी मूर्ती आहे. भैरवनाथाचा उत्सव हे वडनेर भैरवचे मुख्य आकर्षण असते. या उत्सवात रथयात्रा चौवीस तास अविश्रांत चालते. रथात भैरवनाथाची मूर्ती ठेवण्यापासून प्रत्येक चौकात पूजेच्या मानपानाचे त्या त्या समाजाचे मानपान आधीपासून ठरलेले आहेत. त्यानुसार भैरवनाथाची म‌िरवणूक गावातून डोंगरकडेच्या कोकणटेंभी वस्तीजवळच्या जानुसघरात (जानोसा) येथे भैरवाच्या लग्नासाठी जाते.

तेथे भैरवाचा जोगेश्वरीशी विवाह लावला जातो व पुन्हा मिरवणूक मंदिराच्या दिशेने गावातून काढली जाते. यावेळी महिला मिरवणुकीसमोर दंडवत घालतात तर पुरूष मंडळी मिरवणुकीसमोर लोटांगण घालतात. हा सोहळा अनुभवण्यासारखा असतो. गावात गणपती, मारूती मंदिरे आहेत. ईदगाह व जामा मशीदही आहे. भैरवनाथ मंदिरामागे गोसावी समाजाच्या समाधी असून, त्या पाहण्यासारख्या आहेत. बाबुराव गोसावी यांनी त्याला चांगल्याबद्दतीने सांभाळल्या आहेत. गावात दहा-बारा मठ होते. यात नागासाधूंचे मठ सर्वाधिक होते. मात्र आज फक्त एकच पुरी मठ गावात आहे. संत जिवनेश्वर काळू बाबा हे वडनेरचेच. त्यांची समाधी आणि मंदीर वडनेर-शिरवाडे रस्त्यावर आहे.

सोनार अन् ब्राह्मणांसाठी ओळखले जाणारे वडनेर भैरव हे गाव पूर्वी नागवेलींच्या पाणमळ्यासाठी प्रसिद्ध होते. आता हे गाव द्राक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. काळानुसार गावची ओळख बदलली असली तरी गावचा प्राचीन इतिहास आपली ओळख ठळक व्हावा, यासाठी आसुसलेला पहायला मिळतो. प्राचीन वास्तु, ताम्रपट, वीरगळ व शिलालेखांच्या माध्यमातून गावाभर विखुरलेल्या पाऊलखुणा जपण्याची गरज हे गाव मनापासून व्यक्त करते.

लेखक : रमेश पडवळ

 

 

अंतिम सुधारित : 7/23/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate