मुंबईत वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांची वर्दळ ह्याशिवाय काही असेल याची कोणी कल्पनांच करू शकत नाही. पण मुंबई ह्या शहरात जशा नवनवीन विविध प्रकारच्या इमारती आहेत, त्याचबरोबर मुंबईच्या पश्चिम दिशेला पुरातन लेणी आहेत. कान्हेरी हा संस्कृत शब्द कृष्णगिरी ह्यातून घेतलेला असून त्याचा अर्थ आहे "काळा डोंगर" असा होतो.
ह्या लेणी कान्हेरी लेणी किंवा कृष्णगिरी लेणी म्हणून ओळखल्या जातात. पूर्वी ह्या कान्हेरी लेण्यापर्यंत पोहोचण्यास खूप वेळ जायचा पण आता महाराष्ट्र शासनाने येथे जाण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जसे तुम्ही ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात’ आलात तर तुम्हाला उद्यानाची गाडी दिसेल किंवा बेस्टची सुविधा पण मिळेल जी तुम्हाला थेट लेण्यांपर्यंत सोडेल. जर तुम्हाला सायकलची आवड असेल तर लेण्यांपर्यंत जाण्यासाठी उद्यानातून सायकल भाड्याने घेऊ शकता. यासाठी एका तासाचे 60 ते 300 रुपये ठेव ठेवावी लागते.
कान्हेरीच्या गुहा ह्या भारतातील सर्वात मोठ्या गुहा असून या अखंड डोंगरामध्ये 109 गुहा आहेत. ह्या गुहा म्हणजे बौद्ध धर्माचे एक मोठे केंद्र मानले जाते. पश्चिम भारतात सर्व प्रथम बौद्ध धर्माचे सोपारा हे गाव, त्यांचे जन्मस्थान मानले जाते. कान्हेरी एक अध्यात्मिक केंद्र म्हणून 11 व्या शतकात नावारुपास आले. कान्हेरी गुहा हे महायान संप्रदायाचे प्रतीक मानले जाते.
कान्हेरी गुहा उच्च डोंगरावर स्थित असल्यामुळे प्रथम काही पायऱ्या चढून गेल्यावर डोंगर खोऱ्यातून बनविलेल्या गुहा दृष्टीस पडतात. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बुद्धाची एक उंच मूर्ती दर्शनास पडते आणि एक भला मोठा सभागृह दक्षिणभागी आहे. दोन्ही बाजूला कोरलेले खांब आणि घुमटाकार छत आहे आणि शेवटी एका अखंड दगडाला कोरून एल स्तूपाची निर्मिती केली आहे. इथे गुहा क्रमांक 3 आहे ज्यामध्ये पूर्वी बौद्ध भिक्षु हे आराधना करत असत. सर्व गुहांमध्ये या गुहेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. ह्या गुहेची लांबी 26.36 मीटर आहे तर रुंदी 13.36 मीटर आणि 12.9 मीटर उंचही आहे. ह्या गुहेच्या निर्मितीसाठी सातवाहनांच्या काळात श्री सातकर्णी राजाच्या शासन काळामध्ये सुरुवात केली होती.
ह्या बौद्ध विहाराला सातवाहनांच्या धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक समजले जाते. कान्हेरी गुहा क्रमांक 1, 2, 3 पेक्षा जास्त मूर्ती ह्या 11, 41, 67, 89 आणि 90 ह्या गुहेत मिळतील. त्यामध्ये गुहा क्रमांक 41 ही महत्त्वपूर्ण आहे, कारण इथे अवलोकिटेश्वरला 4 हाथ आणि 11 डोक्यांचे दर्शन इथे घडते. कान्हेरीची प्रत्येक गुहा ही उत्तम मूर्तीचे दर्शन घडवते. येथे एवढ्या प्राचीन लेणी असणे म्हणजे हौशी पर्यटकांना एक प्रकारची पर्वणीच आहे. त्यामुळे या कान्हेरी लेणींना एकदा तरी आपण अवश्य भेट द्यावी.
लेखिका - साईली गजरे
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 1/30/2020
महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहे...
लेण्यांसाठी जगप्रसिद्ध असलेले भारतातील स्थळ.
लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सुप्रसि...
निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आणि वैशिष्ट्यपूर्ण स...