ज्या किल्यामुळे जिल्ह्याला कुलाबा असे नाव देण्यात आले, तो कुलाबा किल्ला किनार्या पासुन जवळपास फण कि.मी. अंतरावर आहे. शिवछत्रपतींनी जलदुर्गाचे महत्व लक्षात घेऊन १६८० साली या किल्ल्याची उभारणी सुरु केली. १७ बुरुज असलेल्या या किल्ल्याची लांबी ९०० फूट, रुंदी ३५० फूट व तटबंदीची उंची २५ फूट आहे. आज ३०० पेक्षा जास्त वर्षे उलटली, तरी तो सागरी लाटांची पर्वा न करता, खंबीरपणे उभा आहे.
समुद्राला पूर्ण भरती आल्यावर किल्ल्याच्या चारही बाजूंना पाण्याच्या प्रचंड लाटा उसळतात. तरीही मुख्य प्रवेशव्दारा पासून सुमारे १५ फूटा पर्यंत भरातीचे पाणी येत नाही. मुख्य भागात पुढील बाजुने व मागील समुद्राच्या बाजुने दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत. मुख्य व्दारातुन आत गेले की लगेच दुसरा दरवाजा लागतो, तो पार केला की महिषासुराचे दर्शन होते. तसेच तेथे श्रीपद्मावतीची घुमटी आहे. पूर्व दिशेस गडदेवतेचे मंदिर आहे. गणपती मंदिरा जवळच कान्होबाची म्हणजेच कानिफनाथांची घुमटी आहे.
किल्ल्यावरील पुष्करणी समोर १७५९ साली राघोजी आंग्रे यांनी सुरेख गणपती मंदिर उभारले. मंदिरातील सिध्दीविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची असून, ती असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान ठरली आहे. गाभार्यात अष्टभुजा देवी, श्री शंकर, सुर्य, विष्णु यांच्या अतिशय सुंदर मूर्ती आहेत. या मूर्तींच्या एकत्रीकरणामुळे हे 'श्री गणेश पंचयतन' म्हणून ओळखले जाते.
किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा गोडया पाण्याचा एक तलाव आहे, तसेच गोडया पाण्याची एक विहीर आहे. किल्ल्यातील एका बुरुजावर गाडयावर चढवलेल्या उत्तम स्थितीतील दोन तोफा आहेत.
समुद्राला ज्यावेळी ओहोटी असेल, त्यावेळी आपण किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकातो. यासाठी भराती ओहोटीचे वेळापत्रक माहिती असणे गरजेचे आहे. कुलाबा किल्ला पहाण्यासाठी पुरातत्व विभागाच्या कार्यालयाचे तिकीट घ्यावे लागते.
खांदेरी बेटाशेजारीच साधारण अर्धा किमी. अंतरावर उंदेरी बेट आहे. साधारणत तेथील भूप्रदेश खांदेरीप्रमाणेच आहे. किल्ल्याची तटबंदी शाबूत आहे पण पाण्याचे दुभिक्ष्य आहे.
खांदेरीप्रमाणेच उंदेरीही मुंबई पोर्ट टस्टच्या ताब्यात असल्याने येथेही त्यांच्या परवानगीनेच जाता येते. कोळयांच्या छोटया होडीतून थळ किनार्यावरून या किल्ल्यात जाता येते. उंदेरी किल्ल्यावर उतरण्याकरिता ईशान्येस बोट लावावी लागते.
तत्कालीन इतिहासात महत्व होते ते उंदेरीपेक्षा खांदेरीलाच. खांदेरीवर हल्ले चढवत असतानाच सिध्दी कासमने १६८० साली बेट ताब्यात घेऊन त्यावर किल्ला बांधला. १७६२ साली सखोजी आंग्रेंनी किल्लयावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा किल्ला सिद्यीकडून विकत घेतल्याचे सांगितल्यामुळे शाहू यांनी आंग्रे यांना हा किल्ला विकत घेण्यास सांगितले. १७३६ मध्ये चिमाजी आप्पा व मानाजी आंग्रे यांच्या सिद्यीबरोबर झालेल्या लढाईत उंदेरीचा सुभेदार सिद्यी याकुब मारला गेला. पुढे मराठे व सिद्यी यांच्यात चकमकी होतच होत्या. १७५८ मध्ये तुकोजी आंग्रे यांनी रामाजी महादेव व महादजी रघुनाथच्या मदतीने तसेच १७५९ मध्ये नानासाहेब पेशवे व सरखेल आंग्रेंनी लढाई केली. १७६० मध्ये पेशवे यांचे आरमार सुभेदार नारो त्र्यंबक यांनी हा किल्ला जिंकून घेतला. १८४० नतर मात्र उंदेरी कायमचा इंग्रजांच्या ताब्यात गेला.
अरबी समुद्रावर आपली अभेद्य जराब बसवुन असणारा, राजापुरी खाडीतील ऐतीहासीक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजापुरी येथे जावे लागते. मुरुड ते राजापुरी अंतर जवळपास ५ कि. मी. आहे.
किल्ला पाहण्यासाठी राजापुरी येथील जेटीवरुन शिडाच्या होडयांची सोय ’’ जंजिरा पर्यटक संस्था मर्या. राजापुरी ’’ या संस्थेनी केली आहे. सकाळी ७.०० वाजल्या पासुन सायंकाळी ६.०० वाजे पर्यंत किल्ल्यात जाण्या येण्यासाठी होडया उपलब्ध असतात. कमीत कमी २० प्रवासी जमल्यावर होडी सोडण्यात येते. होडीने प्रवास करण्यास लागणारी तिकीटे जेटीवर उपलब्ध असतात. साधाराण १० ते १५ मिनीटात होडीने किल्ल्यावर पोहोचता येते. किल्ल्यात उतरण्यासाठी धक्का नसल्याने सावधानतेने उतरावे लागते.
किल्ल्याच्या दोनही बाजूंना बुरुज आहेत, त्याच्यावर एका सिंहाच्या पायाखाली चार, तोंडात एक व शेपटीत एक, असे सहा हत्ती पकडलेलं शिल्प कोरलेल आहे. या मुख्य दरवाजातुन आत गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो. दरवाज्याच्या जवळच पीरपंचायतन असून, तेथील पटांगणात पीरमखानच्या जहाजाचे तीन नांगर पाहाता येतील. येथुन पुढे गेल्यावर एक मोठा गोडयापाण्याचा तलाव दिसतो. तलावाजवळ खाशा सिद्यीची मशिद असुन, आजूबाजूला घरांचे पडके अवशेष दिसतात. दरवाज्या जवळील दोन बुरुज धरुन, किल्ल्याला एकुण २४ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजाला वेगवेगळी नावे आहेत.
जंजिर्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तेथील प्रवेशव्दाराच्या वरील बाजुस नगारखान्या शेजारी असणार्या तीन तोफा. कलालबांगडी, चावरी व लांडा कासम अशी या तोफांची नावे आहेत.
जंजिर्याचा इतिहास पाहीला तर साधारणपणे पंधराव्या शतकात कोळयांचा प्रमुख राम पाटील याने चाचे व लुटारुंपासुन कोळयांचा बचाव करण्यासाठी दंडाराजपुरीच्या खाडीतील बेटावर मेढेकोट (लाकडी ओंडक्यांचा किल्ला) बांधला. पुढे या पाटलाचा बंदोबस्त करण्यास निजामाने पीरमखान याची नेमणुक केली, त्याने राम पाटलाचा बंदोबस्त करुन मेढेकोट ताब्यात घेतला. पीरमखानच्या मृत्यु नंतर साधाराणतः सन १५३८ मध्ये त्याच्या जागी बुर्हाणखानची नेमणुक करण्यात आली. त्याने मेढेकोट पाडून १५६७ ते १५७१ या काळात पक्का दगडी किल्ला बांधला व त्याचे नामकरण 'किल्ले महरुब' असे केले. छत्रपती शिवराय, राजे संभाजी, पेशवे, आंग्रे अशा अनेकांनी जंजिरा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जंजिरा संस्थान भारतात विलीन करण्यात आले.
छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत जंजीर्याला लढा देत असतांना त्यांच्या नावीक दलाचा प्रमुख दर्यासारंग दौलतखान याने सन १६६१ मध्ये जंजिर्यापासून काही अंतरावर मुरूड शहराच्या किनार्यासमोर कासा खडकावर हा किल्ला बांधला. हाच तो कासा उर्फ पद्मदुर्ग. किल्ला तसा छोटासाच पण सहा बुरूजांनी युक्त भक्कम तटबंदी किल्ल्यावर बर्याच ठिकाणी कमळाची चित्र कोरलेली दिसतात.
किल्ल्यात वाडयाचे पडके अवशेष आहेतच. शिवाय पाण्याची टाकी आहे परंतु पाणी पिण्यायोग्य नाही. किल्ल्यात असणार्या पोलादी तोफा गंजून गेल्या आहेत. जंजिरा किल्ल्यातील कलालबांगडी या तोफेच्या मार्यामुळे कासा किल्ल्याचा जंजिर्याच्या दिशेचा भाग काही अंशी फुटला होता. सिद्यीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिवरायांच्या आरमारी प्रमुख दौलतखान याने उभारलेला हा किल्ला कालांतराने सिद्यीने जिंकून त्याचा वापर तुरूंग म्हणून केला.
ऐतिहासिक वास्तूंबाबत प्रेम असणारे पर्यटक या किल्ल्यास आवर्जुन भेट देतात. पर्यटकांना खाजगी बोटीने किल्ला पहाण्यास जाता येते.
कोर्लई किल्ला पाहण्यासाठी आपल्याला कोर्लई गावातून जावे लागते. किल्ल्याच्या पायथ्याशी कोर्लई गाव आहे. शेजारीच कोळीवाडा आहे. कोळीवाडयातूनच आपल्याला किल्ल्याकडे जावे लागते. किल्ल्याचा डोंगर एखादया भूशिरासारखा पाण्यात घुसलेला आहे. तीन बाजूला पाणी आणि दक्षिण बाजूला जमिनीशी सांधलेला हा किल्ला सन १५२१ मध्ये दियोगु लोपिश दि सैकर या पोर्तुगीज सैन्याधिकार्याने बांधल्याचे म्हटले जाते.
मुख्य किल्ला पूर्व*पश्चिम जवळपास शंभर फुट तर दक्षिणोत्तर जवळपास एक हजार फुट विस्तारलेला आहे. किल्ल्याच्या प्रवेशारावर लढल्याशिवाय आत प्रवेश नाही (None Passes me but fights) असा इशारा दगडावर कोरलेला आहे.
किल्ल्यास सात दरवाजे आहेत. किल्ल्यात गोडया पाण्याची विहिर मोडकळीस आलेला चर्च तसेच एक मंदिर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी समुद्रास खेटून एक जुने दीपगृह आहे. असा हा ऐतिहासिक किल्ला बरीच वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. सन १७४० च्या आसपास तो मराठयांच्या ताब्यात आला. परंतु १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच इंग्रजांच्या ताब्यात गेला.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतील अत्यंत महत्वाचा टप्पा व पुढील राजकारभाराचा एक महत्वाचा साक्षीदार असा हा रायगड किल्ला, जिल्ह्याचे नाव देखील या किल्ल्यावरुनच पुढे आलेले आहे.
रायगडावर ९ जुन १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन खर्या अर्थाने छत्रपती झाले.
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा किल्ला एक नुसता एक गड नसुन ते एक राष्ट्रीय स्मारक आहे.
रायगडावर पहाण्यासाठी होळीचा माळ, भवानी मंदीर, जित दरवाजा, खुब लढा बुरुज, महादरवाजा, मिना दरवाजा, राणी वसा, पालखी दरवाजा, राजभवन, राजसभा,गंगासागर, नगारखाना, जगदिश्वर मंदिर, बारा टाकी, वाघदरवाजा, टकमक टोक, रामेश्वर मंदिर व शिवछत्रपतींची समाधी इ. ठिकाणे आहेत.
अलिबागपासून ७ किमी.अंतरावर डोंगरावर हा शिवकालीन किल्ला आहे. हा समुद्रसपाटीपासून सुमारे १३५७ फूट उंचावर आहे. येथे जाण्याकरीता अलिबाग - पेण मार्गावरील खंडाळा गावातून रस्ता आहे. गावाच्या पूर्वेला डोंगर दिसतो. त्याच्या पाठीमागे सागरगड लपलेला आहे. खंडाळा गावातून फलवाटेने गडावर जावे लागते. गडाच्या निम्म्या उंचीवर सिध्देश्वर मंदिर आहे. या मंदिराजवळच आश्रम तसेच विहीर आहे. येथे विश्रांतीची सोय होऊ शकते. पावसाळयाच्या दिवसात मंदिराजवळच एक धबधबा वहात असतो. श्रारावणी सोमवारी येथे बरेच भाविक हजेरी लावतात. या आश्ररमाच्या थोडं अलिकडेच एक वाट डावीकडे वर सागरगडाकडे जाते. सिध्देश्वरपासून साधारणत फन ते एक तासात आपण सागरगडावर येवून पोहचतो. सागरगडाच्या मुख्य दरवाजा पूर्णपणे ढासळलेला आहे. परंतू त्याच्या बाजूचे दोन बूरूज पडक्या अवस्थेत अस्तत्त्वात आहेत. या प्रवेशारातून गडावर प्रवेश करायचा. माची व बालकिल्ला अशा स्वरूपात गडाची रचना आहे. बालेकिल्लेवर एक लहानसं तळं मंदिर तसेच एका पडक्या इमारतीचे अवशेष आहेत. गडावर एक बारमाही पाण्याचे कुंड (पांडवकुंड) आहे.
माचीवर सतीची माळ नावाची जागा आहे. तिथं नऊ थडगी आहेत. या बाजूच्या टोकाला एक सुळका आहे त्यास वानरटोक असे म्हटले जाते. गडावर इतर कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.
अलिबागपासून ४-५ किमी. अंतरावर थळच्या किनार्यापासून ३ किमी. अंतरावर खांदेरी बेट आहे. या बेटावर १६७८ साली किल्ला बांधण्यात आला. आजूबाजूचा परिसर खडकाळ असून बेटावर १५-२० मीटर उंचीच्या टेकडया आहेत. टेकडयांच्या मधला भागही पाण्यापासून २०*२५ फूट उंचीवर आहे. तिथे जवळच बोटीचा धक्का आहे. या बेटाच्या भोवतालचा भाग खूपच खडकाळ असल्याने बोटींना मार्गदर्शन व्हावे म्हणून इथे १७६८ साली दिपगृह उभारण्यात आलं. अलिबागच्या कुलाबा किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यातही गोडया पाण्याची विहीर आहे. दीपगृहाच्या रस्त्यावर एक प्रचंड शिळा असून जर एखादया छोटया दगडाने त्या शिळेवर आघात केला तर एखाद्या भांडयावर दगड मारल्यास जसा आवाज येतो. तसा आवाज येतो.
किल्ल्याची तटबंदी शाबूत असून किल्ल्याचे दरवाजे मात्र शाबूत नाहीत. खांदेरी किल्ल्याचा तत्कालीन इतिहास थोडक्यात असा आहे. शिवछत्रपती खांदेरी बेटावर किल्ला बांधत आहेत ही बातमी जेव्हा इंग्रजांना समजली तेंव्हा इंग्रजांनी मायनाक यास बांधकाम थांबिवण्याचा आदेश दिला. परंतु मी फक्त छत्रपती शिवरायांचा हुकूम मानणारा सेवक आहे तुम्ही आदेश देणारे कोण असे रोखठोक प्रति उत्तर मायनाक यांनी पाठविले. १६७९ साली थळच्या किनार्यावर उभयपक्षी अनेक लहान मोठया चकमकी उडाल्या. अशा तर्हेने इंग्रजांना छत्रपतींचे आरमारी सामर्थ्य मान्य करावे लागले. १७७५ साली खांदेरी इंग्रजांच्या ताब्यात होता. १७८७ साली राघोजी आंग्रेंनी ताबा घेतला. १८१४ साली खांदेरीचा ताबा दुसरा बाजीराव पेशवे यांच्याकडे गेला. पुन्हा १८१७ रोजी खांदेरीचा ताबा आंग्रेजवळ आला.
सध्या खांदेरी किल्ला मुंबई पोर्ट टस्टच्या ताब्यात असल्याने किल्ल्यावर त्यांच्या परवानगीनेच जाता येते. किल्ल्यात स्थानिक कोळ्याच्या बोटीने जाता येते.
स्त्रोत : https://www.zpraigad.maharashtra.gov.in/html/tourism1.htm#1
अंतिम सुधारित : 10/7/2020
महाबळेश्वर-महाड रस्त्यावर महाबळेश्वर पासून २० कि. ...
हरिश्चंद्रगड किल्ला – ४००० फुट उंचीचा हा किल्ला गि...
किल्ले विषयी माहिती
महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे गडकिल्ले हे या आदिव...