অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंधुदुर्ग किल्ला

सिंधुदुर्ग किल्ला

सिंधुदुर्ग किल्ला

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्घ सागरी किल्ला व पर्यटनस्थळ. मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस सु. १·६० किमी. वर कुरटे नावाच्या बेटावर तो आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचा सिद्दी, मुंबईचे इंग्रज, गोव्याचे पोर्तुगीज आदी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली. या किल्ल्याची चिरा २५ नोव्हेंबर १६६४ रोजी प्रथम बसविली. त्याचे बांधकाम गोविंद विश्वनाथ प्रभू याने केले. विजयदुर्ग व सिंधुदुर्ग यांच्या बांधणीसाठी महाराजांनी गोवेकरी पोर्तुगीजांकडून कारागीर मागविला होता. किल्ला बांधताना कित्येक खंडी शिशाचा उपयोग पायाच्या कामासाठी केल्याचा उल्लेख कागदोपत्री आढळतो. सिंधुदुर्गच्या बंदोबस्तासाठी किनाऱ्याजवळच पद्मगड, राजकोट व सर्जेकोट यांची योजना केलेली होती. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे हे प्रमुख केंद्र होते.

सिंधुदुर्गचा विस्तार १९ हेक्टर व परिघ सु. साडेतीन किमी. आहे. किल्ल्याला ४२ बुरुज असून तटाची उंची सु. १० मी. आहे. किल्ल्याच्या ईशान्येस जिथे समुद्र खोल आहे आणि सहजासहजी नजरेस येणार नाही तिथे प्रवेशद्वार आहे; कारण ओहोटीच्या वेळीही तिथे पाणी असते. महाद्वारापासून उजव्या बाजूच्या तटावर दोन देवळ्या आहेत. यांपैकी एका देवळीत डाव्या पायाचा व दुसरीमध्ये उजव्या हाताचा ठसा आहे.

ते ठसे शिवाजी महाराजांचेच असावेत, असे जनमत आहे. किल्ल्यात मध्यभागी छत्रपती राजाराम महाराज (कार१६८९–१७००) यांच्या कारकिर्दीत बांधलेले शिवाजी मंदिर भव्य व लक्षणीय आहे. त्यातील वीरासनातील वालुकाश्म मूर्ती नावाड्याच्या टोपीसदृश शिरस्त्राण घातलेली, दाढी नसलेली अशी आहे. येथे एक म्यानात ठेवलेली तलवार आहे. मूळ मंदिर १३ X ७ मी. असून त्यापुढील सभागृह कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी उभारले (१९०७). याशिवाय किल्ल्यावर महादेव, भगवतीदेवी, महापुरुष, जरी-मरी, द्वाररक्षक हनुमंत अशी पाच छोटी मंदिरे आहेत.

खाऱ्या समुद्रात किल्ला असूनही किल्ल्यातील विहिरींचे पाणी मात्र गोडे आहे. दुधबांव, दहीबांव, साखरबांव या नावाने येथे विहिरी आहेत. तसेच एक छोटा तलाव आहे. किल्ल्यात नारळ व पोफळीची झाडे असून गोरखचिंचेचे एक झाड आहे.

कालौघात लाटांमुळे किल्ल्याचे काही बुरुज व तटाचा भाग ढासळला आहे. तटबंदीवरुन किल्ल्यात उतरण्यासाठी जिने आहेत. किल्ल्यात आडभिंत बांधलेली असून त्यात पूर्वी होडी वगैरे गुप्त साधनांची तरतूद करुन आणीबाणीच्या वेळी सुटका करुन घेण्याची व्यवस्था होती. दक्षिणेकडच्या तटाकडे चंद्राकृती व मऊ रेतीची छोटी पुळण आहे. यालाच ‘राणीची वेळा’ किंवा ‘राणीच्या समुद्रस्नानाची जागा’ म्हणतात. याखेरीज महादरवाजावरील मोडकळीस आलेला नगारखाना, राजवाड्याचे काही अवशेष दिसतात.

इ. स. १७१३ मध्ये हा किल्ला करवीर संस्थानच्या आधिपत्याखाली आला. १७६५ मध्ये तो इंग्रजांनी घेऊन त्याचे नाव फोर्ट ऑगस्टस असे ठेवले; परंतु मुंबईच्या इंग्रजांनी तो पुढे करवीरच्या छत्रपतींना काही अटींवर परत दिला आणि मालवणला वखार घालण्यास संमती मिळविली. १८१२ मध्ये कर्नल लायोनेल स्मिथ याने हा किल्ला घेऊन येथील चाच्यांचा बंदोबस्त केला.

किल्ल्यावर शिवजंयती, रामनवमी, नवरात्र इ. उत्सव तिथीनुसार साजरे करतात. काही कुटुंबांची येथे वस्ती असून अंगणवाडी व एक पूर्व प्राथमिक शाळा आहे. करवीर छत्रपतींच्या वतीने येथील शिवाजी मंदिरात प्रतिवर्षी जिरेटोप, वस्त्रे अर्पण केली जातात. तसेच किल्ल्यावरील शिवरायांच्या हाताच्या ठशाचा चांदीचा छाप बनविण्यात आला असून त्याची नित्यपूजा कोल्हापुरातील जुना राजवाडा येथील भवानी मंदिरात होते.

‘चौऱ्यांशी बंदरांत हा जंजिरा मोठा व अठरा टोपीकरांचे उरावर अजिंक्य दुर्ग होता’ असे बखरकार म्हणतात, म्हणून महाराजांनी मोठ्या अभिमानाने त्याचे नाव ‘शिवलंका’ ठेवले. स्वराज्याच्या आरमारी दलाची साक्ष देणारा हा किल्ला पर्यटक व दुर्गअभ्यासकांचे आकर्षण ठरला आहे.

 

संदर्भ : घाणेकर, प्र. के. साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!, पुणे, १९८५.

मिठारी, सरोजकुमार

स्त्रोत:मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate