भारतात नद्यांप्रमाणेच तलावांनाही धार्मिक महत्त प्राप्त झालेले आहे. बहुसंख्य देवालयांसमोर तलाव बांधलेले आढळून येतात. ज्या भागांत मोठ्या नद्या कमी; तिथे देवळाच्या प्राकारात तलाव बांधीत असत. या तलावांकाठी घाट, दीपमाळा, ओवऱ्या, स्तंभावल्या, महाद्वारे इ. बांधण्याची प्रथा होती. सार्वजनिक उपयोगासाठी तलाव बांधणे, हे धर्मशास्त्रानुसार पुण्यपद मानले गेले आहे. असे तलाव बांधून ते सार्वजनिक कार्यासाठी अर्पण करण्याचा ‘तडागोत्सर्ग’ हा एक प्राचीन धार्मिक विधी होता.मत्स्यपुराण, नारदपुराण आदी पुराणांमध्ये या विधीविषयी वर्णन आढळते. या विधीचाच एक भाग म्हणून सोन्याचे मासे, कासव वगैरे करून ते तलावात सोडावेत, असे म्हटले आहे. अशा स्वरूपाचे विवेचन महानिर्वाणतंत्र (अठरावे शतक) या ग्रंथात आढळते. भुवनदेवकृत अपराजितपृच्छा (बारावे–तेरावे शतक) या ग्रंथात तलावांचे सहा प्रकार मानले आहेत; ते असे : (१) अर्धचंद्राकृती ‘सर’, (२) गोलाकार ‘महासर’, (३) चौकोनी ‘भद्रक’, (४) भद्रक एकमेकांना जोडून बनलेले ते ‘सुभद्र’, (५) ज्या तलावांत बगळे उतरतात ते ‘परिघ’ व (६) दोन परिघ एकमेकांना जोडलेले ते ‘युग्मपरिघ’. ह्यांशिवाय एक हजार दंडांच्या लांबीचे ते ज्येष्ठ, त्याच्या अर्धे ते मध्यम व एक चतुर्थांश ते कनिष्ठ असेही तलावांचे प्रकार वर्णिले आहेत. पाळाच्या आकारमानानुसार हे प्रकार पडतात. ५० हातांचे ज्येष्ठ, २५ हातांचे मध्यम व १२ हातांचे कनिष्ठ अशीही परिमाणे वर्णिली आहेत.
तलावाचा उपयोग गावास पाणीपुरवठा, देवळास शोभा, धार्मिक कार्ये, अग्निशमन, सृष्टिशोभा, पांथस्थाची सोय अशा अनेक कारणांनी प्राचीन काळापासून होत आलेला आहे. तलाव नैसर्गिक झऱ्याचे किंवा कृत्रिम साठवलेल्या पाण्याचे असल्यास त्याप्रमाणे त्यांच्या पाण्याची गोडी बदलते. तलावांना घाट बांधण्याची पद्धत जुनी असावी. बंधारे बांधून किंवा जमिनीत खणून साचवलेल्या पाण्याचे तलाव दीर्घकाळ टिकावे, यासाठी त्यातील गाळ वाहून नेण्याची सोय असते. तलावाचे बांधकाम दगडी करून तलावातील पाण्याचे शोषण कमी करता येते. मोगल काळात बंधाऱ्याच्या तलावाकाठी शीतगृहे, बारादरी, बगिचे तसेच शोभादायक सज्जे व कमानी बांधण्याचा प्रघात होता. उदयपूरचा राजसमंद (सु. १६६२–७६), अजमीरचा अनासागर (बारावे शतक) ही याची उत्तम उदाहरणे आहेत. अनासागर तलावाकाठी जहांगीरने बांधलेली ‘दौलतबाग’ (सध्याची सुभाषबाग) आणि शाहजहानने उभारलेला संगमरवरी कठडा व विश्रामस्थाने ही सौंदर्यदृष्ट्या अपूर्व आहेत. अहमदाबादजवळील सरखेज येथे मुस्लिम राजकर्त्यांनी बांधलेले तलाव व त्याकाठच्या मशिदी, कबरी, राजवाडे आदी वास्तू प्रसिद्ध आहेत. तसेच इंदूरजवळील मांडवगढ येथील नगररचनेत तलावांची योजना केलेली आहे. जहाजमहालचा (मांडू) परिसरही तलावांसाठी प्रसिद्ध आहे. मदुरा येथील मीनाक्षी मंदिरातील ‘सोनेरी कमळांचा तलाव’ प्रसिद्ध आहे. इंद्राने ब्रम्हहत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी या तलावात स्नान केले, अशी पौराणिक आख्यायिका रूढ आहे. या तलावाभोवती मोठा सभामंडप आणि ओवऱ्या आहेत. ह्याच ठिकाणी तिरूमल नायकाने बांधलेला ‘बंदियुर’ किंवा ‘मरिय्यमन तेप्पकुलम्’ (१६४५) हा दक्षिण भारतातील सर्वांत मोठा दगडी तलाव मानला जातो. त्याची लांबी ३०४·८० मी. व रुंदी २८९·५६ मी. आहे. त्यातील पाणी वैगाई नदीच्या पात्रातून घेतले असल्याने जलाशयात खंड पडत नाही. त्याच्या मध्यभागी एक छोटे बेट असून त्यावर लहान घुमट व मध्यभागी एक देवालय आहे.
आधुनिक नगररचनेतही तलावांना महत्त्वपूर्ण स्थान लाभले आहे. तलावाकाठी बागा, स्नानगृहे, घाट इ. योजिले जातात. अठराव्या–एकोणिसाव्या शतकांत मुंबईमध्ये अनेक मोठे तलाव बांधले गेले. महालक्ष्मी, गावदेवी, लक्ष्मीनारायण इ. ठिकाणच्या देवालयांत मोठे बांधीव तलाव होते. शहराच्या वाढीमुळे आणि पिण्याच्या पाण्याच्या सोईमुळे काही तलाव बुजवण्यात आले. मुंबादेवी व महालक्ष्मी येथील तलाव अलीकडे बुजवून टाकले आहेत. या तलावांच्या काठांवर दीपस्तंभ असत व त्यांच्या दिव्यांच्या प्रतिबिंबामुळे तलावांना आगळी शोभा प्राप्त होत असे. युद्धकाळात मोठ्या शहरांत तात्पुरते तलाव बांधण्यात येतात. अग्मिशामक दलांना व जनतेला पाणीपुरवठा व्हावा, म्हणून सिमेंटचे, मातीचे तसेच जमिनीखालील गुप्त तलाव मुंबईसारख्या शहरांत बांधले आहेत. ल कॉर्ब्यूझ्ये या फ्रेंच वास्तुविशारदाने चंडीगढच्या आधुनिक नगररचनेत तलावाची वैशिष्ट्यपूर्ण योजना केली आहे. त्यातील इमारतींच्या प्रतिबिंबांमुळे त्यास एखाद्या नितांतसुंदर दृश्यकाव्याचीच गुणवत्ता लाभली आहे.
कान्हेरे, गो. कृ.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/25/2020
दात व तत्संबंधी तोंडातील भाग, ह्यांचे रोग व त्यावर...
गाई-म्हशींमध्ये माज दाखवण्याची लक्षणे, प्रमाण आणि ...
बहुधा पन्नाशीनंतर दात पडायला सुरुवात होऊन 10-20वर्...
वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या काही ...