17 फेब्रुवारी 1883 रोजी भारतमातेचे शूर पुत्र वासुदेव बळवंत फडके यांनी इहलोकाचा निरोप घेतला. आज त्यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त या थोर पुत्राला वाहिलेली ही सुमनांजली.
इंग्रजांच्या परकीय सत्तेतून सुटका करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपली आहुती दिली. अशाच स्वातंत्र्य सेनानीमध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा आपणास अगत्याने शूर वीरतेचा अभ्यास करण्याच्या वेळी माहिती मिळते. इंग्रजी राजसत्तेच्या काळात महाराष्ट्रातील कुलाबा-अलिबाग जिल्ह्यातील एक घराणे ते म्हणजे फडके घराणे होय. पुण्याकडे जाताना पनवेल सोडल्यावर शिरढोण हे छोटेसे गाव लागते. शिरढोण येथे बळवंतराव आणि सरस्वतीबाई यांच्या पोटी आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म दिनांक 4 नोव्हेंबर 1845 रोजी झाला. बालपणापासूनच ते बंडखोर आणि हुड होते. दिनांक 10 फेब्रुवारी 1860 रोजी त्यांचा विवाह झाला. त्यावेळी त्यांचे वय 15 वर्षांचे होते. वासुदेवरावांना प्रथम मध्य रेल्वेत लेखनिकाची नोकरी मिळाली. तो काळ इंग्रजी आमदानीचा होता. ते लहानपणापासूनच स्वाभिमानी वृत्तीचे होते, म्हणून ही नोकरी त्यांनी तत्काळ सोडली.
ते लहानपणापासूनच प्रकृतीने चांगले होते. आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे त्यासाठी काय प्रयत्न करायचे ते आजच्या व्याख्यानात सांगणार असल्याचे ते दवंडी पिटवायचे आणि हे व्याख्यान पुण्याला शनिवारवाड्यासमोर होत होते. आपल्या भाषणात ते लोकांना तळमळीने सांगत असत. आपल्याला इंग्रजांना हाकलून लावायचं. त्यासाठी तनमन बलिष्ट करायचं. त्यांचे व्यक्तीमत्व फार विलोभनीय होते. रंग गोरा, निळे डोळे, 5/10 इंच उंची त्यांच्या नजरेसमोर 1857 चे क्रांतीयुद्ध दिसत होते. ते एक मध्यमवर्गीय नेतृत्व होते. 1857च्या स्वातंत्र्यसमरापासून त्यांनी प्रेरणा घेतली. पुण्यातील वास्तव्यात त्यांच्यावर समकालीनांपैकी न्या. महादेव गोविंद रानडे यांचा सर्वाधिक परिणाम झाला. वासुदेवराव दत्तभक्त होते. घरात व मंदिरात त्यांचा दत्तनाम जप चालत असे. गुरुचरित्राचे ते वाचकही होते.
वासुदेव यांचा इंग्रज लोकांविरुद्ध प्रतिशोध घेण्याचा निश्चय हा दुसऱ्या असामान्य लोकांच्या निश्चयाप्रमाणेच दृढतर होत गेला. याला कारण त्यांचा निग्रही स्वभाव होय. रानडे यांचे भाषण ऐकूण वासुदेव बळवंताच्या मनातील देशभक्तीचे निखारे फुलून निघाले. रानडे आणि फडके या दोघांनाही परकीय सत्तेखाली चाललेल्या हिंदुस्थानाच्या शोषणाविरुद्ध त्वेष, राग, मत्सर होता. पण हे दोन भिन्न भिन्न पंथाचे नेते होते. पुण्याच्या जवळपास असलेल्या खडकवासला, हवेली, सोनापूर, कोटवाडी, सिंहगड परिसर याठिकाणी वासुदेव सेनेचा अप्रत्यक्ष अंमल सुरु झाला होता. ते संघर्ष करीत होते. लोकांशी संवाद साधत होते, त्यांचे नुसते शस्त्र बोलत नव्हते तर शब्दही बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या “हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा” आहे या उद्गारांचा 19 व्या शतकांतील तो एक आविष्कार होता, त्यांचे बंड जनता प्रियच होते. वासुदेव बळवंत फडके हे काही वाटमाऱ्या करणारे दरोडेखोर नव्हते. ते पदवी नसलेले पण पदवी इतकेच पारंगत असे अर्थशास्त्री होते. त्यामुळेच ब्रिटीश साम्राज्यशाहीचे आयात निर्यातीचे अर्थकारण त्यांनी तत्काळ ओळखले होते. शेतकरी आणि दरिद्र्यी जनता हाच वासुदेवराव स्वत:च्या क्रांतीचा आधार मानत होते. ठाण्याच्या कारावासातही त्यांना ठेवण्यात आले होते.
3 जानेवारी 1880 रोजी वासुदेवराव यांना ठाण्याच्या कारावासातून भायखळ्याला आणण्यात आले. तेथून माझगावच्या धक्क्यावरुन नेण्यात आले आणि तेथून ‘तेहेरान’ नावाच्या जहाजावर बसविण्यात येऊन जहाज ‘एडनला’ निघाले. 9 जानेवारी 1880 रोजी त्यांची बोट एडनला पोहोचली होती. वासुदेव बळवंत फडके यांना एडनच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथून त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली. पण पुन्हा ते पकडले गेले. वासुदेव यांच्या मृत्यूनंतर 57 वर्षे त्यांच्या वीरपत्नी हयात होत्या. 11 सप्टेंबर 1940 रोजी त्यांचे देहावसान झाले आहे. लॉर्ड माऊंट बॅटनने वासुदेव बळवंत फडके यांना स्वातंत्र्यलढ्याचा मानकरी ठरवले होते. लोकहितासाठी तळमळणाऱ्या त्यांच्या स्वभावामुळे ते सार्वजनिक सभेच्या कार्यक्रमात रस घेत असत.
इंग्रजी मालाविषयीचा त्यांचा तिटकारा फार होता. ते परम देशभक्त होते तसे ते ईश्वरभक्तही होते. त्यांनी आपल्या उपासनेचा एक ग्रंथ दलादन ऋषीप्रणीत श्रीदत्तलहरी नावाच्या मोठ्या शास्त्रांच्या साह्याने मराठीत सुंदर भाषांतर केले होते. ही मूळ प्रत गोवा येथील श्रीदुर्गा दत्तमंदीर माशैल यांच्या संग्रहात आहे. सन 1878 च्या शेवटी त्यांनी पुण्यात आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रांतीकारक गुप्त संस्थेची स्थापना केली होती. वैधमार्गाच्या आंदोलनाने जनजागृती करुन इंग्रज सरकारला हिंदुस्थानातून हाकलून लावता येणार नाही तर सशस्त्र बंड करुनच इंग्रज सरकार उलथून टाकावे लागेल. या निश्चितीप्रमाणे लोकांकडून त्या कार्यात आपल्याला पुरेसे सहाय्य मिळणार नाही, अशी ही निश्चिती झाल्यामुळे त्यांनी लोकांचा नाद सोडला आणि ते ग्रामीण भागातील जनतेकडे वळले. ही माणसे पुणे व सातारा येथील होती. स्वामीनिष्ठ माणसे होती आणि त्यात रामोशी लोकांचा जास्त भरणा होता.
हैदराबादेतील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हे सेतू माधवराव पगडी यांनी लिहिलेले पुस्तक पान क्र. 107 वर ते म्हणतात, वासुदेव फडके एकदा इंदुरला गेले होते. हिज हायनेस महाराज होळकर यांना ते भेटले. त्यांच्याजवळ सहाय्य मागितले असता महाराज होळकरांनी सहाय्य करण्याचे नाकारले. इंग्रज सरकार फार प्रबळ आहे, असे सांगून इंदुरच्या महाराजांनी मदत देण्याचे नाकारले. ‘स्वराज्य’ हे वासुदेव बळवंताना नुसते राजकीय ध्येय वाटत नव्हते. त्यांच्या मनात त्या ध्येयास आता धार्मिक उच्चता प्राप्त झाली होती. त्यांनी उंची कपड्यांचाही त्याग केला होता. वासुदेव बळवंत फडके यांच्या लढाऊ सेनेत भरती झालेल्या लोकांची संख्या 300 वर होती. त्यात रामोशी, कुणबी, कोळी, मातंग, धनगर, ब्राम्हण असे सर्व जातीचे लोक होते. पळस्पे हे पनवेलजवळील गाव, पळस्पे येथील छाप्याच्या दुसऱ्या दिवशी वासुदेव बळवंत फडके यांचे लोक रात्री कल्याण येथे येणार आहेत अशी कल्याण येथे हूल उठली. ती ऐकताच तेथील युरोपियन लोक घाबरुन गेले होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना तर वासुदेव बळवंत फडके यांचे जीवन हे एक स्फूर्तीचा झराच वाटले.
क्रांतीकारकांचे आणि स्वातंत्र्याच्या उपासकांचे वासुदेव बळवंत फडके हे आद्य पुरुष होते. त्या काळात स्वातंत्र्य हा शब्द उच्चारण्याची कोणाची आज्ञा नसताना ते ध्येय त्यांनी उघडउघड घोषित केले होते. त्यांच्याविषयी त्यांच्या देशबांधवाना अलोट प्रेम होते. आज दिनांक 17 फेब्रुवारी त्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस, त्यांच्या कार्याचा तर अलोट, अपूर्व असा अभ्यास केला तरी तो कमीच होय. कारण एका ध्येयाने पेटलेला हा स्वातंत्र्यवीर होता. त्यांचे कार्य कधीही न विसरण्यासारखे आहे, त्यांना या दिनानिमित्त ही सुमनांजली.
लेखक - प्रा. श्रीपाद माधव नांदेडकर,धुळे.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/31/2023
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचा एक आ...