অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोवर्धन पारीख

गोवर्धन पारीख

गोवर्धन पारीख : (७ नोवेंबर १९१५ - ७ डिसेंबर १९७६) . महाराष्ट्रातील एक विचारवंत व शिक्षणतज्ञ. पारीख कुटुंब मुळचे राजस्थानी. ते अनेक पिढ्या महाराष्ट्रात स्थायिक झाले. त्यांचा जन्म मालेगाव येथे झाला. प्राथमिक शिक्षण मालेगाव, माध्यमिक शिक्षण जुन्नर येथे व महाविद्यालयीन शिक्षण एम, ए. ( अर्थशास्त्र ) पर्यंत पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. त्यांचे वडील धनराज कर्मठ ब्राम्हण होते. ते जुन्नरला किराणा मालाचे दुकान चालवीत. मुलाने महाविद्यालयात शिक्षण घेण्यास त्यांचा विरोध होता; पण हे शिक्षण घेण्याची पारीख यांची महत्त्वाकांक्षा होती व ती त्यांनी पुरी केली. पारीख यांच्या जिद्दी स्वभावाचे दर्शन प्रथम या वेळी झाले. महाविद्यालयात एक हुषार व प्रभावी वक्तृत्व असलेले विद्यार्थी म्हणून त्यांनी नाव कमावले. तरुण वयात पाचलेगावकर महाराजांच्या विचारसरणीकडे व विधायक कार्याकडे ते आकर्षित झाले होते. १९३६ सालच्या सुमारास पारीख यांच्या राजकीय मताचा कल जरी काँग्रेसकडे असला, तरी ते त्या पक्षात सामील झाले नाहीत; तसेच काँग्रेस समाजवादी पक्ष नव्यानेच स्थापन झाला असला व त्याकडे तत्कालीन तरुणवर्ग आकर्षित झाला असला, तरी पारीख मात्र झाले नाहीत. रशियातील साम्यवादी प्रयोगाचा अभ्यास त्यांनी या काळात केला आणि विचारांती पोथीनिष्ट समाजवादापासून अलिप्त राहिले, असे त्यांचे मत झाले.

पारीखांचा बालविवाह झाला होता. पुढे डॉ. कु. इंदुमती रणदिवे यांच्याशी त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाल्यावर (१५/१/१९४२) त्यांची पहिली पत्नी कायमची माहेरी राहावयास गेली. त्यांनी पूर्ण संततिनियमन केले होते. त्याचे मुख्यतः व्यसन तत्त्वचर्चा. तत्त्वचर्चेमध्ये विचारांची देवघेव ते मुक्त मनाने करीत. १९३७ साली पारीख फैजपूर येथील  अधिवेशनाला हजार होते. त्याच वेळी भाई मानवेंद्रनाथ रॉय यांच्या सानिध्यात ते आले. रॉय व त्यांच्या विचारसरणीच्या लोकांना काँग्रेसमध्ये स्थान नसल्याचे गांधीनी सूचित केले असले, तरी काँग्रेसला जहाल बनविण्यासाठी रॉय यांनी लीग ऑफ रॅडिकल काँग्रेसमेनची स्थापना केली. इंदुमतींसह पारीख तीत सामील झाले. पुढे. १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर रॉय यांचे काँग्रेसशी मतभेद होऊन ते बाहेर पडले व त्यांनी  रॅडिकल डेमॉक्रटिक पक्षाची स्थापना केली. पारीख या पक्षात सामील झाले; एवढेच नव्हे, तर या पक्षातील ते एक अग्रगण्य कार्यकर्ते होते. महायुद्धानंतर रॉय यांनी मार्क्सवादाचा फेरविचार करून नवमानवतावादाचा पुरस्कार केला. पारीख या विचारसरणीशी प्रामाणिक राहिले.

मुंबईच्या रामनारायण रुइया कॉलेजात १९४० सालापासून अर्थ सास्त्राचे प्राध्यापक म्ह्णून काम करणारे पारीख हे एक लोकप्रिय प्राध्यापक होते व पुढे ते १९५८ मध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलमंत्री झाले. दहा वर्षे त्यांनी या पदावर काढली. या काळात त्यांच्या प्रशासन कौशल्याचा विद्यापीठाच्या क्षेत्रातील सर्वांना प्रत्यय आला. विद्यापीठाच्या विस्ताराच्या व सुधारणेच्या अनेक योजना त्यांनी प्रवर्तित केल्या.

महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून वावरत असतानाच पारीखानी रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली जनता योजना तयार केली. रॉय यांच्या इंडिपेन्डंट इंडिया व पुढे रॅडिकल ह्युमॅनिस्ट या नियतकालिकांत पारीख यांचे लिखाण नियमितपणे प्रसिद्ध होत असे. लेखणीप्रमाणे त्यांना वाणीची असाधारण देणगी होती आणि लिखाणापेक्षा व्याख्यानाची त्यांना आवडही होती. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या कोनाकोपर्यावत पारीखानी आपल्या वाणीने प्रभाव टाकला होता.

विद्यापीठ सोडल्यावर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, प्राज्ञ पाठशाला मंडळ यांच्या द्वारा ते साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रात वावरत होते. जीवनाच्या अखेरीस पुण्याचा आर्यभूषण हा छापखाना सहकारी क्षेत्रात   आणून ते त्यांचे पहिले अध्यक्ष झाले. मराठी विश्वकोशाशी त्यांचा प्रथमपासून निकटचा संबंध होता. चिंतन, मनन व लेखन करण्यास अखेरच्या आठ वर्षांत त्यांना अवसर मिळाला. त्यांनी लोकहितवादी, लोकमान्य टिळक, आगरकर व म. गांधी यांच्या कार्याचे नव्याने मूल्यमापन केले. ' सेंटर फॉर द स्टडी इन सोशल चेंज' या संस्थेच्या द्वारा त्यांना निरनिराळ्या शाखांतील संशोधनाला चालना   द्यावयाची  होती. भावनात्मक्तेपेक्षा  विवेकाचा समाजमनावर प्रभाव पडावा व ही विवेकबुद्धी लोकशिक्षणाने जागृत होईल व वाढेल, अशी त्याची समजूत होती. रुढार्थाने शिक्षण तसेच लोकशिक्षण यांवर त्यांची श्रद्धा होती. नव्या आचार-विचारांचे स्वागत करण्याची बुद्धी होती. त्यांच्या बुद्धीची ठेवण चिकित्सक, विश्लेषणात्मक होती; म्हणून कोणत्याही प्रश्नाचे त्यांचे विश्लेषण चाकोरीबाहेरचे असे. तथापि त्यांच्या कठोर तर्कवादाला भावानात्मकतेची जोड मिळाली होती. आधुनिक काळातील माहाराष्ट्राच्या शैक्षणिक व बौद्धिक जीवनात परीखांचे स्थान स्वतंत्र आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती  इंदुमती पारीख या गेली अनेक वर्षे व्यवसाय सांभाळून मुंबईतील दलित व झोपडपट्टीतल्या स्त्रियांच्या उन्नतीकरिता शिक्षण , कुटुंबनियोजनाचा प्रसार इ. कार्यक्रम अंमलात आणीत आहेत.

पारीखांचे स्वतंत्र व अनुवादित ग्रंथलेखन बरेच आहे. त्यांपैकी पीपल्स प्लॅन ऑफ इकॉनॉमिक डिव्हेलपमेंट ( सहलेखक व्ही . एम, तारकुंडे; बी. एन. बॅनर्जी - १९४४), अल्फावेट ऑफ फॅसिस्ट  इकॉनॉमिक्स (सहलेखक - एम, एन. रॉय, १९४५ ), जनरल एज्युकेशन अँड इंडियन युनिव्हर्सिटीज (१९५८) ही इंग्रजी आणि म. गांधी (१९४९), राष्ट्रवादाचे शिल्पकार : बाल गंगाधर टिळक (१९६९) , लोकहितवादी - गोपाळराव हरि देशमुख (१९७०) इ. मराठी पुस्तके उल्लेखनीय आहेत. यांशिवाय राजकीय, आर्थिक, सामाजिक इ. विषयांवरील त्याचे इंग्रजी व मराठी भाषांतील स्फुटलेखन विपुल असून अत्यंत विचारप्रवर्तक आहे.


संदर्भ : प्राज्ञ  पाठशाला मंडळ,नवभारत : कै. गोवर्धन पारीख विशेषांक - दिसंबर ७७, वाई १९७७.

लेखक - गोविंद तळवलकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate