অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाबासाहेब अनंतराव भोसले

बाबासाहेब अनंतराव भोसले

बाबासाहेब अनंतराव भोसले : (१५ जानेवारी १९२१ - ६ ऑक्टोबर २००७) महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री. त्यांचे मूळ नाव बाबासाहेब भोसले बाबासाहेब भोसले गाव कलेढोण. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात तारळे येथे (ता. पाटण, जि. सातारा) झाला. बाबासाहेबांचे वडील अनंतराव प्राथमिक शिक्षक आणि सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते. बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण कलेढोण, वीटा (सांगली जिल्हा) येथे आणि माध्यमिक शिक्षण सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमध्ये घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठाची एल्‌एल्‌.बी. ही कायद्याची पदवी घेतली (१९४७). कोल्हापूर येथील विद्यार्थिसंघटनेचे ते मुख्य सचिव होते. वृत्तपत्रविद्या व कायदा या विषयांच्या उच्च अध्ययनासाठी ते इंग्लंडला गेले (१९४८-५१) व बार ॲट लॉ होऊन परतले. दैनिक नेता (सांगली) व उषा (औंध) या दैनिकांच्या संपादक मंडळावरही त्यांनी काही काळ काम केले. त्यांचा विवाह सोलापूरचे देशभक्त तुळशीदास जाधव यांची कन्या कलावती यांच्याशी झाला (१९४५).

एकोणिसशे बेचाळीसच्या ‘छोडो भारत आंदोलना’त त्यांनी सक्रिय भाग घेतल्यामुळे त्यांना दीड वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. त्या आधी सु. ११ महिने भूमिगत राहून त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत काम केले. परिणामतः ब्रिटिश सरकारने त्यांची सर्व खाजगी मालमत्ता जप्त केली होती. स्वातंत्र्योत्तर काळात बाबसाहेबांनी सातारा येथे वकिलीस प्रारंभ केला (१९५२). अल्पावधीतच ते या व्यवसायात यशस्वी झाले. याच काळात त्यांनी खटाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष, सातारा जिल्हा काँग्रेसचे खजिनदार म्हणून कार्य केले आणि पुढे ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (इं.) कमिटीचे सचिव झाले (१९७८). महाराष्ट्र महसूल न्यायाधिकारणाचे ते सदस्य होते (१९६०). १९७० पर्यंत त्यांनी या न्यायाधिकरणावर काम केले. या क्षेत्रातून अधिक व्यापक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला व ते मुंबई येथे उच्च न्यायालयात वकिली करू लागले. १९७५ मध्ये त्यांची साहाय्य्क सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. महाराष्ट्र बार कौन्सिलवर ते दोन वेळा निवडून आले.

मध्यावधी निवडणुकीत १९८० साली मुंबईतील कुर्ला उपनगरातील नेहरूनगर मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. माजी मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रहमान अंतुले यांच्या मंत्रिमंडळात ते कायदा मंत्री होते. या पदावर असतानाच राज्य शासनाच्या हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. अंतुले यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस (इं.) च्या अध्यक्षा श्रीमती इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड केली व २० जानेवारी १९८२ रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा शपथपूर्वक स्वीकार केला. पुढे विधिमंडळ सदस्यांच्या दिनांक १ फेब्रुवारी १९८३ रोजी झालेल्या बैठकीत गुप्तमतदानपद्धतीने वसंतदादा पाटील यांची महाराष्ट्राच्या नेतेपदी म्हणजे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली व त्याच दिवशी बाबासाहेब यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसचा इतिहास (१९४७) हे त्यांचे उल्लेखनीय पुस्तक. मुंबई दूरदर्शनवरील ‘कोर्टाची पायरी’ हा त्यांनी रचलेला कार्यक्रम लोकप्रिय ठरला. त्यांनी काही स्फुटलेखही लिहिले आहेत.

 

लेखक - रुक्साना शेख

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate