खेर, बाळ गंगाधर : (२४ ऑगस्ट १८८८–८ मार्च १९५७). महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्ते व मुंबई राज्याचे माजी मुख्यमंत्री. रत्नागिरी येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. बी.ए. एल्एल्. बी. पर्यंत शिक्षण मुंबईस झाले. त्यांनी संस्कृतचे भाऊ दाजी पारितोषिक मिळविले. मुंबईस वकिलीचा व्यवसाय सुरू केला. १९१८ मध्ये त्यांनी सॉलिसिटरच्या धंद्यात पदार्पण केले व चांगले यश मिळविले. समाजकार्याची व राजकारणाची प्रथमपासून त्यांना आवड असल्याने हरिजन सेवा संघ, खादीप्रसार वगैरे कार्यांत त्यांनी काम केले. १९२२ पासून गांधींच्या राजकारणात ते भाग घेऊ लागले. स्वराज्य पक्षाच्या मुंबई शाखेचे ते कार्यवाह होते. १९३० व त्यानंतरच्या असहकाराच्या चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला आणि काही वर्षे कारावासही भोगला. काँग्रेसने कायदेमंडळावरील बहिष्कार उठविल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीनंतर १९३७ मध्ये ते मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले.
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या आदेशानुसार त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला (१९३९). १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात त्यांना दोन वर्षांचा कारावास भोगावा लागला. महायुद्धानंतर झालेल्या निवडणुकीनंतरही मुंबई राज्यात खेर पुन्हा मुख्यमंत्री झाले. १९४७–४९ च्या दरम्यान ते संविधान समितीचे सभासद होते. १९५२ मध्ये ब्रिटनमध्ये भारताचे हायकमिशनर म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९५४ मध्ये त्यांना पद्मभूषण हा किताब भारत सरकारने दिला. १९५५ मध्ये भारतात परत आल्यावर शासकीय भाषा आयोग खेरांच्या अध्यक्षपदाखाली नेमण्यात आला. गांधी स्मारकनिधीचे ते अध्यक्षही झाले (१९५६), परंतु त्याचा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वी ते निवर्तले.
मूलोद्योग शिक्षणास त्यांनी प्रथमपासून पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्री असताना शिक्षण खाते स्वतःकडे घेतले. मराठी भाषेत सर्व शिक्षण दिले जावे, या मताचे ते एक होते आणि हे धोरण त्यांनी अंमलातही आणले. त्यांनी आपले राजकीय विचार लोकमान्य, गांधीमार्ग इ. वृत्तपत्रांद्वारे मांडले; या वृत्तपत्रांचे ते काही वर्षे संपादक होते. अस्पृश्यता निवारण मोहिमेत त्यांनी आंबेडकरांबरोबर भाग घेतला.
संदर्भ : Kher, B. G. The Pageant of Life, Ahmedabad, 1959.
लेखक - त्र्यं. र. देवगिरीकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
महाराष्ट्रातील एक राजकीय पुढारी, पत्रकार व सामाजिक...
भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण व सर्वोदय कार्य...
भारताचे सहावे राष्ट्रपती व स्वातंत्र्य चळवळीतील एक...
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘कर्नाटक सिंह’ या नावान...