অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वसंत शंकर कानेटकर

मराठी नाटककार व कादंबरीकार.

वसंत शंकर कानेटकर : (२० मार्च १९२० - ३१ जानेवारी २०००) जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर ह्या गावी.`रविकिरण मंडळा'तील एक कवी गिरीश (शं. के. कानेटकर) ह्यांचे पुत्र. फलटण, पुणे आणि सांगली येथे शिक्षण. एम्‌. ए. झाल्यानंतर १९४६ पासून नाशिकच्या `हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालया`त मराठीचे प्राध्यापक.

कथा-कादंबऱ्यांकडून नाटकाकडे वळले

कानेटकर कथा-कादंबऱ्यांकडून नाटकाकडे वळले. घर (१९५१), पंख (१९५३) आणि पोरका (१९५६) या त्यांच्या कादंबऱ्यांतही विषयवैचित्र्य,नाट्यात्मता, तंत्रात्मक सफाई, संवादचातुर्य व सूक्ष्म मानसचित्रण या गुणांचा आढळ होतो. या गुणांचाच विकास पुढे त्यांच्या वेगवान नाट्यनिर्मितीत घडून आला व आज नाटककार म्हणूनच ते विशेष प्रसिद्ध आहेत. वेड्याचं घर उन्हांत (१९५७) हे त्यांचे पहिले नाटक त्यानंतर त्यांनी एकुण   १४ नाटके लिहिली.  त्यांपैकी प्रेमा, तुझा रंग कसा? (१९६१), रायगडाला जेव्हा जाग येते (१९६१), मत्स्यगंधा (१९६४), अश्रूंची झाली फुले (१९६६), लेकुरे उदंड जाली (१९६६), मला काही सांगायचय! (१९७०) आणि हिमालयाची सावली (१९७२) ही विशेष उल्लेखनीय नाटके होत. व्यासांचा कायाकल्प (१९६७)आणि मद्राशीने केला मराठी भ्रतार (१९६९) हे त्यांचे एकांकिका संग्रह. वेड्याचं घर उन्हात या नाटकास `महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवा'त लेखनाचे पारितोषिक मिळाले (१९५८). रायगडाला जेव्हा जाग येते ह्या नाटकास `संगीत नाट्य अकादमी' चे पारितोषिक मिळाले (१९६४).

परंपरेचे पुनरूज्जीवन

मराठीतील ऐतिहासिक-पौराणिक नाटकांच्या क्षीण झालेल्या परंपरेचे पुनरूज्जीवन करून कानेटकरांनी त्यांस कालोचित असे नवे स्वरूप दिले.रायगडाला जेव्हा जाग येते आणि मत्स्यगंधा ही नाटके त्या दृष्टीने क्रांतिकारक मानली जातात. विविध सामाजिक पक्ष आपल्या नाट्यकृतींतून त्यांनी परिणामकारक रीत्या हाताळले. नाट्य तंत्रावरील प्रभुत्व, प्रत्येक नाटकातून आशय-अभिव्यक्तिविषयक काहीतरी नवे साधण्याची प्रयोगशीलता संवादसौंदर्य या गुणांमुळे त्यांची नाटके अतीनाट्यात्म (मेलोड्रॅमॅटिक) नाट्यप्रकाराला जवळची असूनही प्रेक्षकांची मने जिंकू शकतात. म्हणूनच त्यांची सर्वच नाटके प्रयोगदृष्ट्या अत्यंत यशस्वी ठरली.

लावण्यामयी (१९७१) हा त्यांचा कथासंग्रह अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. १९६७ मध्ये भरलेल्या बडोदे येथील वाङ्‌मय परिषदेच्या तिसाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मराठी नाट्यसंमेलनाच्या बावन्नाव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. १९७२ मध्ये भरलेल्या इंदूरच्या `महाराष्ट्र साहित्य सभे'च्या शारदोत्सवाचेही ते अध्यक्ष होते.

 

लेखक: श्री. शं. सराफ

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/20/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate