অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वसंतराव फुलसिंग नाईक

वसंतराव फुलसिंग नाईक

वसंतराव फुलसिंग नाईक : (१ जुलै १९१३ - १८ ऑगस्ट १९७९) महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ञ. त्यांचा जन्म विदर्भातील गहुली (जिल्हा यवतमाळ) येथे सधन शेतकरी कुटुंबात झाला. नाईकांचे मूळ आ डनाव राठोड; पण गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड याने वसविले. त्याने जमीनजुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. साहजिकच तो वंजारी समाजाचा नाईक म्हणजे पुढारी झाला. त्यावरून पुढे नाईक हे आडनाव रूढ झाले. चतुरसिंगाचा फुलसिंग हा मुलगा पुढे या समाजाचा नाईक झाला. त्याच्या होनूबाई या पत्नीला दोन मुलगे झाले. राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले. वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण विविध खेड्यांत झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०).

विद्यार्थिदशेत त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांची छाप पडली. तसेच महाविद्यालयात असताना त्यांचा स्नेह नागपूरमधील घाटे या प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबाशी जडला. या स्नेहाची परिणती वसंतराव व वत्सलाबाई यांच्या आंतरजातीय प्रेमविवाहात झाली (१९४१). या विवाहामुळे विदर्भात थोडी खळबळ उडाली व उभयतांना काही वर्षे आपापल्या घरांपासून अलिप्त राहणे अपरिहार्य झाले; पण वसंतरावांनी पूर्ण विचारान्ती हे लग्न केले होते. त्यांची वकिलीही ठीक चालली होती. वत्सलाबाई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असतात. त्यांना दोन मुलगे निरंजन व अविनाश असून दोघेही सुविद्य आहेत.

वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच प्रतिष्ठाही वाढली. ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (डिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१–५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). पुढे १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी सु. १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.

प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य केले. १९७७ मार्चमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.

 

संदर्भ : 1. Desai, D. H. The Plough and the Pipe, Bombay, 1967.

२. पाटील, पं. रा. सामान्यांतील असामान्य वसंतराव नाईक, मुंबई, १९७५.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate