অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वसंतराव बंडूजी पाटील

वसंतराव बंडूजी पाटील

वसंतराव बंडूजी पाटील : (१३ नोव्हेंबर १९१७ - १ मार्च १९८९) महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्ष झाली. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनातही ते सहभागी झाले. ब्रिटिश सरकारने पकड वॉरंट (अधिपत्र) काढून त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेर दादा पकडले गेले; दोन वर्षांची शिक्षा झाली; परंतु त्याच दिवशी ते तुरुंगातून पोलिसांच्या बंदुका घेऊन आपल्या काही सहकाऱ्यांसह पळून गेले. त्यांना पुन्हा पकडण्यात आले आणि एकूण तेरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९४६ मध्ये त्यांची मुदतपूर्व मुक्तता झाली. १९५२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. १९६७ पर्यंत ते आमदार होते. १९४८ मध्ये त्यांनी सांगलीला शेतकरी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर त्यांनी सहकारी तत्त्वावर सूत गिरण्या आणि तेल गिरण्या उभारल्या.

वसंतदादा पाटील ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७०-७२) व साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७०-७१) होते. यांशिवाय राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. माहाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७). १९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईस काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले. दादा १९७१ मध्ये अमेरिकेतील लुइझिअॅना येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्ञांच्या परिषदेस भारतीय शिष्टमंडळाचे नेते म्हणून हजर राहिले. यापूर्वी तीन वेळा त्यांनी जागतिक प्रवास केला होता. त्या वेळचे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनी आपल्या मंत्रिमंडळात दादांची पाटबंधारे मंत्री म्हणून नेमणूक केली. ते १९७२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. शंकरराव चव्हाणांच्या कारकीर्दीत वर्षभर पाटबांधारे मंत्री होते. पुढे त्यांचा मंत्रिमंडळात अंतर्भाव झाला नाही. त्यानंतर त्यांनी काही दिवस राजकारण संन्यास घेतला.

महाराष्ट्रात मार्च १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी वीसच काँग्रेस सदस्य निवडून आले. म्हणून त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला. १७ एप्रिल १९७७ रोजी दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मार्च १९७८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. तथापि हे संयुक्त मंत्रिमंडळ समाधानकारक कार्य करू शकत नाही, या कारणास्तव अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने वसंतदादांना मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला (१७ जुलै १९७८).

श्रीमती शालिनीबाई या त्यांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान स्थापन केले असून या प्रतिष्ठानाद्वारे महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात, सुसज्ज रुग्णालये उभारण्याची योजना आहे.

 

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate