"सांग सांग भोलानाथ ।
पाऊस पडेल काय?”
आणि काय आश्चर्य हा भोलानाथ अर्थात नंदीबैल मान हालवून चक्क हो म्हणत होता.
नंदीबैलाचे पारंपरिक खेळ, करमणूक करून पोट भरणारे नंदीवाले आजही भटके जीवन जगत आहेत.सकाळी सकाळी साईनाथ आणि त्यांच्या सोबतचे तिघेजण उदयनगरात आले .नंदी आला, नंदी आला.खेळ बघायला या ! भोलानाथ नाव असलेल्या भल्या मोठ्या नंदीबैलाबरोबर पारंपरिक वाद्यगुबुगुबू वाजवतहोते.त्यांनी एका घरासमोर नंदी उभा केला .
“‘बाई नंदीला तव्यावरची गरम गरम पोळी घेऊन ये.”
नेमके त्यावेळी पहिल्या मजल्यावर राहणार्या राऊत वहिनी पोळ्याच करीत होत्या. नंदीवाल्याने कसे ओळखले याचे त्यांना आश्चर्य वाटले आणि दोन तीन गरम पोळ्या घेऊन त्या खाली आल्या. आणि नंदीला खाऊ घातल्या .
“भोलानाथ तुझे भले करील” नंदीबैलवाल्यांनी तोंडभरून आशीर्वाद दिला .
समोरील घरातून बाहेर आलेल्या गृहिणीला नंदीबैलवाल्याचा पुतण्या भविष्य सांगू लागला . त्यांना किती मुले किती मुली तंतोतंत सांगून झाल्यावर. बाई तुझे सर्व जीवन आजवर कष्टात गेले आहे. इथून पुढे चांगले दिवस येणार आहेत.” नंदीच्या कपाळाचे कुंकू बोटाने घेऊन बाईंना लावले आणि आणि अखंड सौभ्याग्याचा आशीर्वाद दिला. नंदीला चारा हवाय दक्षिणा दे! असे म्हणताच बाईनी दहा रुपयाची नोट काढून नंदीवाल्याला दिली
लोकांकडून पैसे , धान्य, कपडे किंवा फेटा आणि जनावरांसाठी खाद्य घेऊन हे नंदीवाले आपली उपजीविका करतात .
भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा शाळेत असताना म्हणायचो.खरेच हे नंदीवाले भाऊ, कसे जगतात? याची माहिती जाणून घ्यायला मी उत्सुक होतो .त्यांचा खेळ थांबवून मी त्यांना घरात बोलावले.
अनौपचारिक गपा मारत त्यांना बोलते केले .
“माझे नाव साईनाथ नारायण गोंडे.वय ६५ वर्षे ,राहणार मौजे नाळवंडी,तालुका जिल्हा बीड .मेंडगी जोशी ढवळा नंदीवाले. तीन वर्षाचा लागोपाठ दुष्काळ पडूनही आम्ही जिवंत आहोत ते आमच्या या ९०० किलो वजनाच्या नंदीबैलाच्या आशीर्वादाने!मी माझा पुतण्या अनिल ,अशोक आणि मुलगा करन असे चौघेजण सध्या नांदेडमध्ये फिरत आहोत. कधी हजार रुपये जमतात तर कधी दोनशे देखील मिळत नाहीत. सारेच अनिश्चित .
कोणी भाकरी,कोणी पोळी,कोणी चारा घ्यायला पैसे देतात. जुने, नवे कपडेही मिळतात.या भोलानाथाच्या कृपेनेच गावाकडे घर बांधलेय, थोडी शेत जमीन घेतलीय. सगळा आनंद आहे. आम्ही शिकलो नाहीत पण आमचे मुले शाळेत जात आहेत. त्यांनी शिकुन नोकरी करावी अशी ईच्छा आहे.
मी त्यांना म्हणालो,”हा नांदीबैल किती रुपयास घेतला आणि कुठून घेतला ?”
“या आधीचा मोठा नंदी राजस्थानातून आणला होता.त्याच्या सोबत हा फुकटच मिळाला.हा वासरू असताना महादेवाला वाहून आम्हाला त्याच धन्याने दान केला होता.मोठा नंदी म्हातारा झाला आणि तो गोशाळेत दान करून आम्ही याला तयार केले.”
“तयार केले म्हणजे काय केले ?”
“नाशिकच्या त्र्यंबकेश्वाराला अभिषेक करून याची पूजा केली आणि सिंगणापूरच्या महादेवाचे दर्शन घेऊन आल्यावरयाला प्रशिक्षण दिले.बैलाचा नंदीबैल करताना हे आवश्यकच असतात नाही तर नंदी शिंग मारतो, सांगितले ते ऐकत नाही”
“हा नंदी प्रशिक्षित आहे. शाळकरी मुलांना, ‘सांग सांगभोलानाथ ही कविता पाठ असते.ते ही कविता गुणगुणत याला पाउस पडेल काय असे विचारतात. नंदी लगेच मान हलवून ‘हो’ म्हणतो
हा नंदी आमच्या मांडीवर दोन पाय ठेऊनकुठलेही इजा न पोचू देतानाचतो.उजवा पाय वर करून आशीर्वाद देतो. घरातील लहान मुलांना नंदी आपल्या पाठीवर बसून फेरी मारतो.
आमच्या सांगण्याप्रमाणे घरालाही फेरी घालतो, नंदीला ओवाळण्यासाठी आलेल्या महिलेला आशीर्वाद देण्यासाठी उजवा पाय नंदी उचलतो. एखादेयाचे नाव घेऊन त्यांच्याकडे जायला सांगताच तो जातो.हे सगळे प्रकार पाहाण्यासाठी अबालवृध्द महिला मोठ्या संख्येने जमतात मागील अनेक पिढ्यांपासून नंदीवाल्याचा, करमणुकीचा धंदा आम्ही करतोय.”
भटक्या विमुक्त जातीत आम्ही मोडतअसलो तरी आणि आम्ही अडाणी असलो तरी,
मुलांना,नातवांना शिक्षण देत आहोत.
आमच्या समाजातील लोकांचीगणना व्हावी, आम्हाला राहाण्यासाठी कायमस्वरूपी घरे द्यावीत, रेशनकार्ड द्यावीत, आमच्या पूर्वजांनी हा व्यवसाय पूर्वजांचा आशीर्वाद म्हणून आम्ही करीत आहोत.नंदी हाच आमचा उदरनिर्वाहाचे साधन आहे.असेही साईनाथ म्हणत होते.
हो ना, हा नंदी प्रशिक्षित असल्याने त्याला सिनेमातही काम मिळाले आहे. “बापू भीरु आजेगावकर” या मराठी सिनेमाची नायिका, आपल्याला सोडून दूर गेलेल्या हिरो बद्दल याला प्रश्न विचारते.नंदी मान हालवून हो हो आणि नाही नाही अशी उत्तरे देतो.
“जान”या हिंदी सिनेमात नाईका ट्वीकलखन्नाहिच्या मागे लागतो.
साईनाथ त्याचा किसासांगतो साहेब .अहो तहसीलदार आफिसात प्रमाणपत्र काढायला गेलो तिथे जोशी नावाचे कारकून होते.ते म्हणाले ,’तुम्ही जोशी आम्ही जोशी.मला प्रमाणपत्र मिळाले नाही तुम्हाला ते कसे मिळेल? मग मी युक्ती केली.मी म्हणालो , ‘तुम्ही म्हणता ते ठीकय साहेब
मग तुमच्या मुली आमच्या मुला द्या आणि आमच्या मुली तुमच्या घरात सुन करा.’
जोशी म्हणालेते शक्य नाही. आणि गुपचूप कारवाई सुरु करून जातीचे प्रमाणपत्र दिले.या प्रमाणपत्रामुळे मुलांचे शिक्षण मोफत होत आहे इतरही सवलती मिळत आहेत.आता शिकवून माझ्या नातवाना आफिसर करणार आहे.‘”तुम्हाला भविष्य कळते काय?”
नाही साहेब !,फेस रीडिंग करीत आम्ही अंदाज बांधतो. काही खरे होतात काही खोटे.समोरील व्यक्तीला पटेल असे काहीतरी बोलतो आणि त्यांना ते खरे वाटते. भविष्य कळले असते तर नंदी घेऊन गावोगाव कशाला उन्हातान्हात भटकलो असतो
”पावसाळा आला की दोन महिने गावाकडे घरी थांबतो बाकी ‘चालू लाग बाबा’ म्हणत सोबत नंदी घेऊन आम्ही गावोगाव हिंडत असतो. रात्री गावात वस्तीजवळ मोकळ्या जागेत थांबतो.लोकांनी दिलेया भाकरी पोळ्याअसतात,रात्री तीन दगडांची चूल मांडून भाजी,डाळ तयार करतो आणि खातो.सकाळी उन्हे वाढायच्या आत नंदीबैलाचे खेळ करीत हिंडतो.
चरैवतीचरैवती अशी नित्याची भटकंती पाचवीलाच पुजलेले नंदीबैलवाले त्यांची ही गोष्ट महाराष्ट्राच्या नष्ट होत चाललेल्या संस्कृतीचाच एक भाग.
लेखक - सु. मा. कुळकर्णी
अंतिम सुधारित : 10/7/2020