तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर मानवाच्या कल्पना शक्तीला मोठ्या प्रमाणात वाव मिळाला आहे. मनातल्या अमूर्त भावनांना तो आजवर चित्ररुपात व्यक्त करत आलाय. आजवरचे सगळे शोध हे कल्पनेच्या रुपात आधी मानवाच्या मनात आले आणि मग त्यावर शोधक वृत्तीने त्याने संशोधन करून ते जगासमोर आणले आहेत. आजकाल अॅनिमेशन या क्षेत्रात अफाट संधी निर्माण होत आहेत. लहान मुलांमध्ये स्पायडरमॅन, सुपरमॅन, छोटा भीम, मोटू पतलू, एलियन्स, श्री गणेशा, डिस्ने लँड, आग ओकणारा गॉडझिला आदी अॅनिमेशनपट प्रचंड लोकप्रिय आहेत आणि गाजले देखील आहेत. ज्युरासिक पार्कसारखा चित्रपट या तंत्रामुळेच जगभरात लोकप्रिय होऊ शकला. आजच्या घडीला देशात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने आउटसोर्सिंग होऊन प्रचंड रोजगार निर्माण होतो आहे. आधुनिक तंत्राच्या माध्यमातून चित्ररुपात जिवंतपणे दृश्य उभा करण्याची ताकद या तंत्रात असून भविष्यात या क्षेत्रात संधींची कमी नसणार आहे. आपल्या कलेला मूर्तरूप देणारे हे क्षेत्र असून या सर्व बाबींचा विचार करता यातील करिअरच्या नेमक्या संधी कोणत्या आहेत? हे जाणून घेण्यासाठी हा लेख खास करिअरनामा या सदरासाठी...
पात्रता
या क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच पदवी नंतरच्या कोर्सेससाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात आता पदविका आणि पदवीही घेता येते. फाइन आर्टची पार्श्वभूमी असल्यास उत्तमच. कल्पनाशक्तीला अत्यंत महत्व असून थोड्याफार प्रमाणात गणित आणि भूमिती या विषयाचे ज्ञान असल्यास फायद्याचे ठरते.
उपलब्ध कोर्सेस
• डिप्लोमा इन अॅनिमेशन अॅण्ड फिल्ममेकिंग
• बी.एस्सी. इन अॅनिमेशन अॅण्ड फिल्म मेकिंग
• बॅचलर्स इन मल्टीमिडिया अँड अॅनिमेशन
• बॅचलर्स इन डिजिटल मिडिया
• बॅचलर्स इन गेम्स अँड इंट्रेक्टीव मिडिया डिझाईन
• बॅचलर्स इन विज्युअल कम्युनिकेशन
• अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम इन अॅनिमेशन अॅण्ड व्हिज्युएल इफेक्ट्स
• स्पेशलायझेशन प्रोग्रॅम इन मॉडेलिंग अॅण्ड टेक्स्च्युरिंग
• अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम इन व्हिज्युएल इफेक्ट्स, फ्लेम प्रीमियम
आवश्यक गुण
या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उत्तम आणि नाविन्यपूर्ण कल्पनाशक्ती असायला हवी. तसेच या क्षेत्रातील नवप्रवाह स्वीकारण्याची तयारी ठेवावी. संगणकाचे ज्ञान, इंग्रजी भाषेचे मुलभूत ज्ञान, मॅथॅमेटीक्स आणि अॅनालिटीकल स्कील गरजेचे आहे. उत्तम संवाद कौशल्य, समूहात सहकार्यवृत्तीने काम करण्याची तयारी असल्यास यश आपसूकच मिळते. एका अर्थाने तुमच्याकडे कलात्मक अभिरुची असायला हवी.
कामाच्या संधी
अॅनिमेशन इंडस्ट्रीचा विकास दिवसेंदिवस होत असून दरवर्षी या क्षेत्रात नोकरी मिळण्याची संख्या वाढत आहे. अॅनिमेशन स्टुडियो, प्रोडक्शन हाउसेस मध्ये फ्रीलान्स एनिमेशन एक्सपर्ट म्हणून काम करू शकता. इंटरटेनमेंट, विडीयो कंपनी, जाहिरात फर्म या ठिकाणी काम मिळेल. तसेच टेक्सचर आर्टीस्ट, थ्रीडी मॉडलर्स, अॅनिमेटर्स म्हणूनही करिअर करू शकता.
वेतन
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुरुवातीस १५ ते २५ हजारापर्यंत वेतन मिळू शकते. दोन ते तीन वर्षाच्या अनुभवानंतर मात्र चांगले पॅकेज मिळू शकेल. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, फिलीपीन्स या देशातून आऊटसोर्सिंगची कामे मोठ्या प्रमाणात इकडे येतात.
संस्थेची निवड करताना
प्रवेश घेताना संस्था अधिकृत आणि मान्यताप्राप्त आहे का ते तपासावे. तसेच तिथे प्रशिक्षण देणाऱ्यांविषयीही माहिती घ्यावी अर्थात फसवणुकीचे प्रकारही घडत असतात. प्रशिक्षण संस्थेची निवड काळजीपूर्वक केल्यास संभाव्य धोके टाळता येतात.
प्रशिक्षण संस्था
• आयआयटी मुंबई, गुवाहाटी
• माया अॅकेडमी ऑफ एडवांस्ड सिनेमेटिक्स, मुंबई, नवी दिल्ली
• रिलायन्स अॅनिमेशन आणि आएएमएस या अॅनिमेशन ट्रेनिंग अॅकॅडेमी, मुंबई
• झी इंस्टीट्युट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट, अंधेरी (पश्चिम) मुंबई
• जागरण इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन, नोएडा
• फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्युट, पुणे
• स्कूल ऑफ अॅनिमेशन गोरेगाव (पूर्व), मुंबई
लेखक: सचिन के. पाटील
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 7/28/2020