बदलत्या विज्ञान युगात मानवाची धावपळ वाढली असून त्याला येणारे ताणतणावही मोठे आहेत. प्रदूषणाच्या समस्या वाढत असताना मोठ्या प्रमाणात आरोग्याचे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. आधुनिक जीवनमान स्वीकारताना, नव्या बदलाला सामोरे जात असताना स्वत:च्या प्रकृती स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे ठरते. फास्ट फुडच्या जमान्यात आरोग्याचे प्रश्न कमी वयात उद्भवत आहेत. मानवी शरीर जणू रोगाचे माहेरघर बनत आहे. आजकाल स्वतःच्या प्रकृतीबद्दल जागरूक राहणे काळाची गरज बनली आहे. मानवाच्या वात, पित्त, कफ या प्रवृत्ती आहेत. आपला स्वभाव, प्रकृती, शरीराची रचना यानुसार कोणता आहार, कोणत्या काळात आणि कसा घ्यावा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे डायटीशीयन देत असतो. कोणते पदार्थ आपल्याला पोषक आहेत आणि ते किती प्रमाणात घ्यावेत याचेही तो वेळापत्रक देतो अर्थात तो आपल्या आहाराचे संपूर्ण नियोजन करतो. आजकाल या क्षेत्रात करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. प्रत्येकजण आपल्या आरोग्याबद्दल जागृत होत असल्याने व्यावसायिक आहारतज्ञास मोठी मागणी आहे. उच्चभ्रू व्यक्ती खाजगी आहारतज्ञ ठेवण्यास प्राधान्य देत आहेत. चला जाणून घेऊया या क्षेत्रातील करिअरच्या संधी खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी.
पात्रता
हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विज्ञान शाखेतून रसायन आणि जीवाशास्त्र या विषयासहीत बारावी पास असणे आवश्यक आहे. न्युट्रीशन डायटेटीक्स अँड फुड टेक्नोलॉजी यात पदवीधरही होता येते. तसेच फुड सायन्स या विषयातील पदविका अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. तसेच मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मेडिसिन , हॉटेल मॅनेजमेंट या विषयातील पदवीधर आहारतज्ञ (डायटीशीयन) होऊ शकतात.
कामाचे स्वरूप
आहारतज्ञ लोकांना आरोग्यदायी सवयी लावण्याचे काम करत असतात. शरीरगुणधर्मानुसार ते व्यक्तीला आहाराचे संपूर्ण नियोजन बनवून देतात. एका अर्थाने ते आरोग्याचा सल्ला देत असतात. लोकांना असणाऱ्या अॅलर्जी आणि त्यानुसार कोणता आहार घ्यावा, कोणता टाळावा याचेही ते मार्गदर्शन करतात. एकंदरीत व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षक म्हणून ते महत्वाची भूमिका बजावत असतात.
आवश्यक गुण
आहारतज्ञाकडे संवाद कौशल्य असणे गरजेचे आहे. एकपेक्षा अधिक भाषा अवगत असल्यास त्याचा फायदा होतो. विषयाचे सखोल ज्ञान आणि प्रभावी व्यक्तिमत्व असल्यास चांगल्या प्रकारे जम बसू शकतो.
संधी
आहारतज्ञाची आवश्यकता हॉस्पिटल, शिक्षण संस्था, आरोग्यविषयक काम करणाऱ्या संस्था, संशोधन करणारे समूह, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, हॉटेल, फिटनेस सेंटर, फुड प्रोसेसिंग सेंटर, युनिसेफ, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच खाजगीरित्या व्यावसायिक स्वरुपात काम करता येते. अनेक नामांकित व्यक्तींचे खाजगी आहार सल्लागार म्हणून काम करता येते. अनेक वर्तमानपत्रे, आरोग्यविषयक वेबपोर्टल, मासिके यासाठी लेखनही करता येते.
वेतन
या क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किमान एक वर्ष प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे. त्यानंतर स्वतंत्र व्यवसाय करता येतो. सुरुवातीस १५ ते २० हजार वेतन मिळू शकते. नावलौकिक मिळाल्यानंतर आकर्षक मानधन मिळते. शासकिय संस्थात त्यानुसार वेतन असते. एकंदरीत २५ हजारपर्यंत वेतनाच्या संधी या क्षेत्रात आहेत.
प्रशिक्षण संस्था
• मुंबई विद्यापीठ, मुंबई
• राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
• इंस्टीट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली विद्यापीठ
• लेडी इर्विन कॉलेज, दिल्ली
• नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रीशन, जमात−ए−उस्मानिया, हैद्राबाद
• गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर
• छत्रपती शाहू महाराज विद्यापीठ, कानपूर
• एम.एस. विद्यापीठ, बडोदा
• पंजाब विद्यापीठ, चंदीगड
मित्रहो, आहार, जैव रसायन, शरीर विज्ञान, जैव सांख्यिकी, शोध पद्धतीचा अभ्यास यात करावा लागतो यात प्रभुत्व मिळविल्यास आपण नामांकित आहारतज्ञ बनू शकता. मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींचे आहार सल्लागार म्हणून काम करणाऱ्यांची आपण नावे ऐकली असतील हा अभ्यासक्रम पूर्ण करून आपणही त्यातील एक होऊ शकता.
सचिन के. पाटील, संपर्क- ९५२७७७७७३२
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 4/19/2020