অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना

आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना

आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना : (इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन; आयटीओ). जगातील देशांमधील वस्तूंचा व्यापार अधिक खुला होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या स्थापनेची कल्पना अमेरिकेने १९४६ मध्ये सुचविली. संकल्पित आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती :

(१) संघटनेच्या सदस्य देशांतील रोजगार-स्थैर्यास व आर्थिक विकासास प्रोत्साहन देणे,
(२) आंतरराष्ट्रीय व्यापारावरील निर्बंध कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि
(३) व्यापार व तदनुषंगिक बाबींमध्ये सहकार्य व सल्ला देणारी कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय यंत्रणा उभारणे.

अमेरिकेचे उच्च जकातदर, इंग्लंडचे अधिमान्य जकातदर, फ्रान्सचे निर्बंधात्मक जकातदर आणि रशियाची राज्यव्यापार-मक्तेदारी ह्या सर्वांमुळे जागतिक व्यापाराच्या प्रगतीस जी खीळ बसली होती, ती दूर व्हावी, हा या संघटनेच्या स्थापनेमागील उद्देश होता.

संघटनेच्या हाव्हॅना सनदेवर १९४८ मध्ये सह्या होऊनही, संघटनेची प्रत्यक्ष स्थापना सदस्य-देशांना तिची सनद मान्य होईपर्यंत लांबली. अमेरिकेतील व्यापारी संरक्षक धोरणाच्या पुरस्कर्त्यांचा प्रथमपासूनच ह्या संघटनेस विरोध होता आणि खुला व्यापार धोरणाचे प्रवक्ते संघटनेने सुचविलेल्या कित्येक फेरबदलांमुळे नाराज झाले होते. १९४७ मध्ये जिनीव्हा येथे व्यापार व जकातविषयक सर्वसामान्य करार (गॅट) संमत झाला. त्यामध्ये संघटनेच्या सनदेतील बहुतेक तपशील ग्रथित केलेला होता. तेव्हापासून गॅटच्या अनेक बैठकी होऊनही, अद्याप ही संघटना मूर्त होऊ शकली नाही

 

लेखक - वि. रा. गद्रे
स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 8/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate