অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंटक (इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस-INTUC.)

इंटक (इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस-INTUC.)

भारतातील पहिल्या क्रमांकाची मध्यवर्ती कामगार संघटना. इंटकच्या स्थापनेमागे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक मान्यवर नेत्यांची प्रेरणा होती. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसवर साम्यवादी नेत्यांचा दिवसेंदिवस अधिक प्रभाव पडत चालला होता. त्या संघटनेत राहून आपल्या पद्धतीने कामगारांचे हित साधणे अवघड असल्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची खात्री पटल्यामुळे त्यांनी नवीन कामगार संघटना स्थापण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार ३ मे १९४७ रोजी इंटकची स्थापना झाली. या बाबतीत महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहमदाबादला १९२० मध्ये स्थापन झालेल्या 'मजूर महाजन' या संस्थेने पुढाकार घेतला. अहमदाबादच्या कापडगिरण्यातील कामगारांच्या अडचणी निवारण्या व त्यांच्या न्याय्य मागण्या त्यांना मिळवून देण्याचे कार्य ती करीत होती. मालक व कामगार यांच्यामधील तंटे वाटाघाटीच्या व लवादाच्या पद्धतीने मिटविणे, हे मजूर महाजनच्या कार्याचे मुख्य सूत्र होते. इंटकने त्याच सूत्रावर आपल्या कार्याची उभारणी केली. इंटकला भारतभर पाठिंबा लाभला व लवकरच देशातील कामगार संघटनांची सर्वांत मोठी मध्यवर्ती संस्था म्हणून तिला प्रतिष्ठा मिळाली.

आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेवर ती भारतीय कामगारांचे प्रतिनिधित्व करते.इंटकची ध्येयधोरणे सर्वोदयवादाच्या विचारसरणीने प्रभावित झाली असून वर्गसहकार्यावर तिचा विश्वास आहे. शासनाबरोबरचे तिचे संबंध परस्परहिताच्या तत्त्वावर अधिष्ठित आहेत. संपासारख्या उपयांचा अवलंब करण्याचे इंटक शक्यतोवर टाळते. अनिवार्य न्यायनिर्णयापेक्षा ऐच्छिक लवाद पद्धतीवर ती अधिक भर देते.सुरेशचंद्र बॅनर्जी इंटकचे पहिले अध्यक्ष, तर खंडूभाई देसाई हे पहिले कार्यवाह होत. पुढे तेही इंटकचे अध्यक्ष झाले. मायकेल जॉन, जगन्नाथ मेलकोटे, काशिनाथ पांडे, हरिहरनाथ शास्त्री, वसावडा इत्यादींनीही इंटकचे अध्यक्षपद भूषविले. व्ही. व्ही. द्रविड, गुलझारीलाल नंदा ह्यांचा इंटकशी घनिष्ठ संबंध आला.इंटकशी संलग्न असलेले कामगार-संघ सर्व देशभर आणि सर्व धंद्यांत पसरलेले आहेत. इंटकचा विशेष जोर आसाम, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार आणि महाराष्ट्र राज्यांत असून तिला सदस्यत्व विशेषेकरून कापडउद्योग व विणमालउद्योग (होजिअरी), मळाउद्योग, वाहतूक आणि खाणउद्योग ह्यांमधून लाभलेले आहे. 'इंटरनॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ फ्री ट्रेड युनियन्स' ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील महासंघाशी इंटक संबद्ध आहे.

इंटकचे प्रधान कार्यालय नवी दिल्ली येथे असून तेथूनच तिचे इंडियन वर्कर हे साप्ताहिक मुखपत्र प्रसिद्ध होते. भारतातील मध्यवर्ती कामगार संघटनांमध्ये इंटकचा प्रथम क्रमांक लागतो. १९७२—७३ मध्ये इंटकशी संलग्न असलेल्या कामगार-संघांची संख्या २,१३९ व सदस्यसंख्या २०,३४,०३३ होती.

 

संदर्भ :1. Crouch, Harold, Trade Unions And Politics in India, Bombay, 1966.2. Karnik, V. B. Indian Trade Unions : A Survey, Bombay, 1966.

लेखक - व. भ. कर्णिक

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate