acc toolbox
रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
mr
1
2
mr
उघडा

धनिष्ठा नक्षत्र

विकास AI सह तुमचे वाचन सक्षम करा 

लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.

श्रवण नक्षत्राप्रमाणे हे नक्षत्र तसे पटकन ओळखता येत नाही. म्हणून या नक्षत्रास शोधण्यासाठी श्रवण नक्षत्राची मदत घ्यावी लागते.

श्रवण नक्षत्राच्या थोडे पुढे आपणास जवळजवळ असलेल्या पाच तारकांचा एक समूह आढळतो. या पाच तारका तेजस्वी नसल्या तरी साध्या डोळ्यांनी त्या दिसतात. त्यांचा आकार साधारण उडणार्‍या पतंगाप्रमाणे भासतो.

या पाच तारकांना पंचक देखिल म्हणतात.

पाश्चात्यांनी यास 'डेल्फिनियस' म्हणजे डॉल्फिन हे नाव दिले. डॉल्फिन हा देवमाशाचा प्रकार. देवमासे जरी आकाराने प्रचंड मोठे असले तरी डॉल्फिन मासा त्यातल्यात्यात सर्वात लहान आकाराचा देवमासा. तसेच हा बुद्धिमान आणि काही अंशी माणसाळू शकणारा देवमासा आहे.

धनिष्ठा या नक्षत्रास डॉल्फिन माशाचे नाव देण्यामागे ग्रीकमध्ये एक कथा आढळते.

ऍरिओन हा प्रसिद्ध गायक व गीतकार होता. आपल्या गीतांनी व गायनाने त्याने लोकांना अक्षरशः भारून टाकले. अनेक बक्षिसे त्याने मिळवली. एकदा कोरंथ शहराकडून सिसिली बेटाकडे तो जहाजातून जात असताना ऍरिओनच्या कीर्तीमुळे व त्याच्याबद्दल वाटणारा द्वेष आणि त्याने मिळवलेल्या मौल्यवान बक्षिसांना मिळवण्याच्या दुष्ट प्रवृत्तीने काही खलाश्यांनी ते जहाज समुद्रात आडवाटेला नेले आणि तेथे ऍरिओनाला ठार मारायचे ठरविले. मृत्यू पूर्वी त्याला अखेरची इच्छा विचारल्यावर त्याने अखेरच्या गायनाची परवानगी मागितली. जीवन आणि मृत्यू यांच्या लाटेवर झोके घेणार्‍या त्या जहाजात सिंतारी या वाद्यावर ऍरिओन गाऊ लागला. आणि चमत्कार झाला. याचे गायन ऐकण्यासाठी डॉल्फिन माशांचा एक थवाच जहाजाकडे आला. खलाश्यांना काही कळण्याचा आतच त्यांनी ऍरिओनाला जेनेरियस या बंदराच्या किनार्‍यावर आणून पोहचविले.

ऍरिओनच्या या सुंदर प्राचीन कथेत त्याचे प्राण वाचविणार्‍या डॉल्फिनला पाश्चात्यांनी डेल्फिनियस म्हणून आकाशात स्थान दिले.

धनिष्ठा नक्षत्राची अशी जरी एक सुंदरशी कथा असली तरी आपल्या येथे मात्र धनिष्ठा नक्षत्रावरील मृत्यू हा अशुभ मानला जातो.

भारतीय ज्योतिषविषयक ग्रंथातून धनिष्ठाच्या पाच चांदण्या (धनिष्ठा पंचक) असल्याचा उल्लेख पूर्वीपासून येतो. पण काही वैदिक संदर्भावरून धनिष्ठाच्या चांदण्या पाच नसून चार असल्याचे समजते. प्राचीन लोकांचे निरीक्षण सूक्ष्म असल्याचा प्रत्यय अनेकदा खगोलशास्त्रात येतो. तर मग या चार चांदण्याच्या ऐवजी नंतर पाच चांदण्याचा उल्लेख होणे याचा अर्थ असा होतो की नंतर या नक्षत्रामध्ये एखाद्या नवीन तार्‍याचा जन्म झाला असावा.

भारतीय वैदिक काळापासून धनिष्ठाचा उल्लेख आहे. पण त्यांना धनिष्ठा न म्हणता 'श्रविष्ठा' म्हणत असत. या शब्दाचा अर्थ 'सुप्रसिद्ध' असा आहे.

 

माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम

शेवटचे सुधारित : 04/02/2020
तुमचे रेटिंग
उघडा

धनिष्ठा नक्षत्र


विकास AI सह तुमचे वाचन सक्षम करा 

लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.


Copyright © C-DAC
vikasAi