acc toolbox
रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
mr
1
2
mr
उघडा

ईडिपस गंड

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

 

सिग्मंड फ्रॉइडने (१८५६–१९३९) आपल्या  मनोविश्लेषणात ज्या अनेक नव्या व क्रांतिकारक संकल्पना मांडल्या त्यांपैकी ‘ईडिपस गंड’ही एक होय.त्याच्या मते मानवी जीवनावर कामप्रेरणेची अव्याहत अधिसत्ता असते आणि तिचे आविष्कार नानापरींनी होत असतात. मानवी वर्तनाच्या मुळाशी असलेल्या प्रेरणांपैकी कामप्रेरणा ही एक प्रबळ प्रेरणा आहे व बालपणातदेखील ही कामप्रेरणा प्रभावशाली असते. बालकाच्या ठिकाणी ती अबोधपणे असते;बालपणातील आरंभीच्या काळात ती साऱ्या शरीरभर विखुरलेली असते.
व्यक्तीच्या जीवनात ह्या कामप्रेरणेचा विकास टप्प्याटप्प्यांनी होत असतो. ज्या अवयवाद्वारे बालक कामसुख अनुभवते, त्यानुसार बाल्यावस्थेतील कामप्रवृत्तीच्या पुढील विकासावस्था आढळतात : (१) औष्ठिक : जन्मापासून सु. दीड वर्षापर्यंतच्या काळात स्तनपानाच्या निमित्ताने बालकाला प्रामुख्याने ओष्ठस्पर्शजन्य भावनिक सुखानुभूती होते. (२) गुदद्वारिक : यानंतर वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत कामप्रेरणा गुदद्वाराशी संबद्ध होते. मल रोखून ठेवण्यात बालकाला विशेष सुख वाटते. (३) जननेंद्रियसंबद्ध :यानंतर वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत बालकाला जननेंद्रियाशी चाळा करण्यात विशेष आनंद वाटतो.
तीन ते सहा वर्षे वयाच्या काळात ईडिपस अवस्था निर्माण होते. या काळात आईवडील हेच बालकाचे प्रेमविषय बनतात. मुलाला आई सर्वस्वी स्वत:साठीच हवी असते व त्याला आपला पिता प्रतिस्पर्धी वाटू लागतो. ग्रीक पुराणकथेतील ईडिपस नावाच्या राजपुत्राकडून अजाणता त्याच्या पित्याचा वध झाला आणि स्वत:च्याच मातेशी त्याने लग्न केले. बालकाचे वर्तनही या धर्तीचे असते, असे फ्रॉइडचे म्हणणे होते. मुलगा ज्याप्रमाणे आईकडे आकृष्ट होतो, त्याप्रमाणे मुलगी पित्याकडे आकृष्ट होते. मुलाच्या मनात जसा ईडिपस गंड निर्माण होतो, तसाच मुलीच्या मनात ‘इलेक्ट्रा गंड’ निर्माण होतो. इलेक्ट्रा नावाच्या राजकन्येने आपल्या प्रिय पित्याच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या आपल्या आईचा अतोनात द्वेष केला, अशी दुसरी एकग्रीक पुराणकथा आहे. त्यावरून ‘इलेक्ट्रा कॉम्‍प्‍लेक्स’ ही संज्ञा मनोविश्लेषणात आली आहे.
या ईडिपस अवस्थेत असताना बालक नाना प्रकारचे चाळे करू लागते. तेव्हा त्याला माता-पित्यांकडून ‘तुझे लिंग कापून टाकू’ अशा अर्थाची धमकी आणि क्वचित प्रसंगी मारही मिळतो. या तापदायक अवस्थेतून सुटका होण्यासाठी मुलगा आपल्या मातेवर केंद्रित झालेली कामप्रेरणा दडपून टाकतो आणि त्याचे त्याच्या पित्याशी भावनिक तादात्म्य प्रस्थापित होऊ लागते. पित्याशी मनोमन एकरूप होऊन तो जणू मातेविषयीची आपली कामना अप्रत्यक्षरीत्या तृप्त करून घेतो. याचवेळी त्याला वडिलांकडून सद्वर्तनाचे पाठ मिळतात; तेही तो आत्मसात करतो. अशा प्रकारे त्याची ईडिपस गंडातून सुटका होते. याच सुमारास त्याची विद्यार्थीदशा सुरू होते आणि त्याची कामवासना जणू अप्रकट अवस्थेत जाते व तारुण्यदशेपर्यंत ती अबोध मनात सुप्तावस्थेत राहते.
फ्रॉइडच्या मते ईडिपस गंडातूनच व्यक्तीच्या ‘सदसद्‌बुद्धी’ ची अथवा ‘पराहं’ ची निर्मिती होते. या गंडातून सुटका होण्यासाठी मूल आपल्या वडिलांशी एकरूप तर होतेच; पण त्यासोबत त्यांनी दिलेले नीतिमत्तेचे पाठही आत्मसात करीत असते. अशा प्रकारे त्याचा  पराहम्  घडविला जातो.
ईपिडस गंडातून व्यक्तीच्या केवळ पराहंचाच उदय होतो असे नव्हे, तर समलिंगी संभोगाची प्रवृत्तीदेखील त्यातूनच उत्पन्न होते. वडिलांविषयी वाटणारी आदरयुक्त भीती, स्त्रीजातीविषयी, त्यांना पुरुषासारखे लिंग नाही म्हणून वाटणारा तिटकारा, कोणीतरी समलिंगी व्यक्तीने त्याच्या शरीराशी केलेली झोंबाझोंबी अशा प्रकारच्या अनुभूतींनीं आणि गुंतागुंतीच्या मानसिक प्रक्रियांनी त्याच्या मनावर असे काही परिणाम होतात, की तो अपरिहार्यतेने ⇨ समलिंगी कामुकतेच्या आहारी जातो.
फ्रॉइडच्या मते जी व्यक्ती आपल्या बालपणातील ईडिपसतुल्य अनुभवांची समस्या निकोपपणे सोडवू शकत नाही, तिच्या अंत:करणात पुढे नाना प्रकारचे आंतरिक संघर्ष निर्माण होतात आणि ती मनोविकृतींना बळी पडते. ‘मी कुणाचाच पुत्र नाही, माझा पिता मीच, मीच माझ्या मातेचा सोबती’ अशा विलक्षण कल्पना त्याच्या डोक्यात थैमान घालतात. त्याला विविध प्रकारचे घातकी पापविचार सुचतात. नाना प्रकारच्या चिंता त्याला अस्वस्थ करतात. तो कधीकधी कायमचा वेडाही बनतो.
फ्रॉइडची ईडिपस गंडाची ही संकल्पना मानस शास्त्राच्याक्षेत्रात जितकी क्रांतिकारक, तितकीच विवाद्य ठरली. या संकल्पनेच्या मुळाशी फ्रॉइडने गृहीत धरलेली काही तत्त्वे आहेत : (१) मानवी जीवन लैंगिकतेने अथवा कामप्रेरणेने व्यापलेले आहे व बालपणातदेखील ही कामप्रेरणा प्रभावी असते. (२) बालपणातील इच्छा, प्रवृत्ती व अनुभवसंस्कार जसेच्यातसे अबोध पातळीवर कायम राहतात आणि मोठेपणी आपला प्रभाव गाजवू लागतात. फ्रॉइडची ही गृहीत तत्वे अनेक मानसशास्त्रज्ञांना मान्य नाहीत. फ्रॉइडने मुख्यत: मनोविकृतांच्या जीवनाचा परामर्श घेतला आणि चिकित्सा केली. त्यात त्याला कामप्रवृत्तीचे तांडव दृष्टोत्पत्तीस आले आणि म्हणूनच त्याने तिला एवढे प्राधान्य दिले. परंतु विकृतांच्या जीवनावरून काढलेले निष्कर्ष अविकृतांच्या जीवनालाही लागू असतात, या त्याच्या भूमिकेचे समर्थन करणे कठीण दिसते.
लेखक : अ.र.कुलकर्णी
संदर्भ: 1. Mullahay, Patrick, Oedipus: Myth and Complex; a Review of Psychoanalytic Theory, New York, 1949.

2. Freud S.; Trans. Strachey, James, The Ego and the Id, London, 1962.

 

Last Modified : 14/08/2020
Your Rating
उघडा

ईडिपस गंड


Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.


Lets Connect
Facebook
Instagram
LinkedIn
Twitter
WhatsApp
YouTube
Download
AppStore
PlayStore

MeitY
C-DAC
Digital India

Phone Icon

+91-7382053730

Email Icon

vikaspedia[at]cdac[dot]in

Copyright © C-DAC
vikasAi