অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अझेअन आंरी पॉल गोगँ

अझेअन आंरी पॉल गोगँ

(जन्म ७ जून १८४८– मृत्यू ८ मे १९०३). प्रख्यात आधुनिक फ्रेंच चित्रकार. जन्म पॅरिस येथे. वडील क्लॉव्हीस गोगँ हे पत्रकार होते व आई आलीन शाझाल ही एका चित्रकाराची मुलगी होती. गोगँचे धार्मिक शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ त्याने व्यापारी नौदलामध्ये सेवा बजावली. नंतर एका बँकेत नोकरीस लागून लवकरच उच्चपद मिळवले. या आर्थिक सुस्थितीच्या व लौकिक प्रगतीच्या काळात मत्ते सोफी गाद या डॅनिश युवतीशी त्याचा विवाह झाला. त्याचे सांसारिक जीवन आनंदी व सुखी होते. ह्या काळातही चित्रे रंगविण्याचा व तत्कालीन दृक्‌प्रत्ययवादी चित्रकारांच्या कलाकृतींचा संग्रह करण्याचा विशेष छंद त्यास होता.

मात्र पुढे लवकरच पॉल गोगँच्या जीवनातील धाडसी, दुःखमय पण कलासंपन्न पर्वाची सुरुवात झाली. १८८३ मध्ये चित्रकार म्हणूनच जगायचे, असे निर्धारपूर्वक ठरवून त्याने व्यावहारिक जगाकडे पूर्णतः पाठ फिरवली. त्याने नोकरी सोडली व सर्वस्वी चित्रकलेला वाहून घेतले. त्यामुळे आर्थिक अस्थिरता व त्रस्त परिस्थिती निर्माण होणे साहजिक होते. या अनपेक्षित अस्थिरतेस कंटाळून त्याची पत्नी मुलांसह माहेरी रहावयास गेली. अशा प्रकारच्या सांसारिक प्रतिकूलतेत व उद्‌ध्वस्त मनःस्थितीतही चित्रे रंगविण्याची त्याची ऊर्मी टिकून राहिली. ह्या वेळी त्याला स्वतःमधील एका सूक्ष्म अंतस्थ ऊर्मीची जाणीव होत होती व ती त्याला या तथाकथित शिष्ट व जड सांस्कृतिक जगापासून दूर दूर नेत होती.

गोगँस स्वतःची विशिष्ट चित्ररचना व शैली निर्माण करण्यास व्हान गॉखसारख्या उत्तर दृक्‌प्रत्ययवादी समकालीन चित्रकार मित्राचा सहवास उपकारक ठरला. पॅरिसच्या चित्रजगतात गोगँला हळूहळू मान्यता प्राप्त होत होती; परंतु त्याच्या अंतरंगातील कोलाहल त्यास अशा प्रकारच्या मानसन्मानात गुरफटू देत नव्हता. ब्रिटनीसारख्या रम्य परिसरात राहूनही त्याला कलानिर्मितीसाठी स्फूर्ती लाभली नाही; तेव्हा त्याने स्वतःची असतील ती सर्व चित्रे विकून १८९१ मध्ये ताहितीस प्रयाण केले. तेथे राहून आपल्यातील सुप्त कलावंत आत्म्याचा शोध घेण्याचे आव्हान त्याने स्वीकारले. वास्तविक त्याचे धाडस लौकिक दृष्ट्या त्यास दु:सहच ठरले; तथापि कलादृष्ट्या हा त्याच्या जीवनातील अतिशय महत्त्वपूर्ण असा कालखंड होता. शारीरिक व्याधी व दारिद्र्य ह्यांनी त्याचा पाठपुरावा केला असतानाही, त्याचे कलावंत मन चित्रनिर्मितीमध्येच रंगून गेले होते. या तथाकथित असंस्कृत व अनागर बेटावर राहून त्याने आदिम रांगडेपणाचा आविष्कार घडविणारी जी चित्रे निर्मिली, त्यांकडे त्यावेळी त्याच्या सुहृद मित्रांशिवाय अन्य कोणाचेच लक्ष वेधले नाही. १८९३ मध्ये तो यूरोपला गेला; परंतु १८९५ मध्ये पुन्हा ताहितीस परत आला. सर्वसामान्य रूढींचा पगडा पूर्णपणे झुगारून देऊन तेथील मागासलेल्या व अप्रगत वातावरणात आणि प्रतिकूल अवस्थेत कलानिर्मिती करणे, त्याने स्वेच्छेने पतकरले होते. या निसर्गपरिसरात आणि प्राकृतिक स्वभावधर्माच्या, अर्धनग्न लोकांच्या सान्निध्यात त्याने जीवनाच्या विशुद्ध अंगांचा कलामाध्यमातून शोध घेतला, हेच त्याच्या चित्रांच्या चिरनूतनतेचे गुपित आहे.त्याने उत्तरायुष्यात द गोल्ड ऑफ देअर बॉडीज, बार्‌बॅरिक टेल्स, वाहिनी वुइथ गार्डिनिया  यांसारखी एकाहून एक सरस चित्रे रंगवली. झपाटलेल्या अवस्थेत, पर्णकुटीच्या भिंतीवर चितारलेल्या अफाट भित्तिचित्रांसकट स्वतःचे निवासस्थान त्याने जाळले. अनेक सुंदर चित्रांचा वारसा मागे ठेवून, व्याधिजर्जर अवस्थेत तो आत्वाना (मार्केझास) येथे निधन पावला.

आधुनिक कलेला सुसंपन्न व समृद्ध करण्यात गोगँचे कर्तृत्व महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्याची स्वच्छंद रंगसंगती, जबरदस्त रेषांनी घेरलेले आकार आणि निसर्गाचे साधे सरळ, प्रतीकात्मक चित्रण ही वैशिष्ट्ये अभिव्यक्तिवाद व रंगभारवाद या संप्रदायांना पोषक ठरली. गोगँच्या चित्रांतून बालसुलभ निरागसता, साधेपणा व आदिमतेची दुर्दम्य ओढ यांचे दर्शन घडते.

लेखिका : वि. मो. सोलापूरकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate