অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आवेष्टन

उत्पादित वस्तू साठवून ठेवण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी व त्यांचे बाजारात वितरण करण्यासाठी त्या वस्तूंच्या नगाभोवती कागद, पुठ्ठा, काच किंवाप्लॅस्टिक इत्यादींचे विविध प्रकारे केलेले आवरण. वस्तूभोवती, विशेषत: विक्रीस ठेवलेल्या वस्तूभोवती, आवेष्टन गुंडाळण्याच्या मूळ कल्पनेमागे उपयुक्ततेपलीकडे दुसरा हेतू नव्हता. तथापि नवीन वस्तू हाताळण्यामुळे, हवामानामुळे किंवा परिवहनामुळे खराब होऊ नये, नजरेत भरावी, तिचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा हा नवा दृष्टिकोन निर्माण झाला. आवेष्टननिर्मिती हा आता स्वतंत्र उद्योग ठरला असून त्याला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या – उदा., काच, प्लॅस्टीक, पुठ्ठेवजा जाड कागद (बॉक्स बोर्ड), अल्युमिनियम फॉइल इ. – निर्मितीला विशेष महत्त्व आले आहे. आवेष्टनाद्वारे मालाच्या कलात्मक सजावटीच्या कल्पना वाढत आहेत. साहजिकच आवेष्टनाचा आकृतिबंध किंवा आखणी आणि आतील मालाच्या सुरक्षिततेला पोषक अशी बांधणी हे विषय महत्त्वाचे होत आहेत.

औषधे, रसायने, खाद्यपदार्थ व पेये, मानवी उपयोगाच्या हरतऱ्हेच्या वस्तू, कपडे, खेळणी इत्यादींचे सुरक्षित परिवहन, हाताळणी, दीर्घकालीन टिकाऊपणा यांसाठी आवेष्टनाची आवश्यकता असते. स्थूलमानाने आवेष्टनाचे प्रमुख हेतू पुढीलप्रमाणे असतात : (अ) विशिष्ट परिमाणात वस्तू वेगळी ठेवता येणे. (आ) वस्तू ग्राहकापर्यंत सुरक्षितपणे पोहचविणे. (इ) वस्तूंची मोठ्या प्रमाणावर ने-आण करता येणे. (ई) प्रामुख्याने आवेष्टनाच्या आकर्षणामुळे आतील वस्तूबद्दल ग्राहकाचे अनुकूल मत होऊन परिणामत: वस्तूचा खप वाढविणे.प्रारंभी मद्य, औषधे, तेले आणि खाद्यपदार्थ यांची नेआण करण्यासाठी वाळवून पोकळ केलेली भोपळ्यासारखी फळे, मातीची भांडी, कातडी पिशव्या इ. आवेष्टने प्रचारात होती. कालांतराने काचेच्या सुरया व विशेष तऱ्हेने भाजलेली मातीची मजबूत भांडी आवेष्टनासाठी वापरली जाऊ लागली. ही नवी आवेष्टने अधिक टिकाऊ स्वरूपाची होती.

आवेष्टनाचे स्वरूप मालाच्या गुणधर्मांनुसार ठरते; कारण प्रचार आणि प्रसिद्धी हा जरी आवेष्टनाचा महत्त्वाचा हेतू असला, तरी ज्या पद्धतीच्या आवेष्टनामुळे मालाचे परिवहन आणि टिकाऊपणा वाढणार आहे, त्या पद्धतीचे आवेष्टन वापरण्याचा वस्तुनिर्मात्यांचा आग्रह असतो. तसेच आवेष्टनास लागणाऱ्या कच्च्या वस्तूंचा पुरवठा आणि त्यांच्या किंमती यांवरही आवेष्टनाची पद्धत आणि बांधणी ठरते. त्याचप्रमाणे ज्या वस्तूभोवती आवेष्टन घालावयाचे आहे, त्या वस्तूची दर नगाप्रमाणे निश्चित होणारी किंमत पुष्कळदा आवेष्टनास लागणाऱ्या किंमतीवर अवलंबून राहते. निर्मात्याला ही किंमत वाढू द्यावयाची नसेल, तर त्याला आवेष्टनाला लागणाऱ्या खर्चाचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो.

आवेष्टनाचे दोन भाग आपोआपच पडतात. एक भाग म्हणजे प्रत्यक्ष वस्तू ज्या भांड्यात, डब्यात, बाटलीत अथवा पिशवीत ठेवली जाते, ते मूळ आवेष्टन. दुसरा भाग म्हणजे मूळ आवेष्टनासकट आतील द्रव अथवा घन पदार्थालाही अधिक सुरक्षितता लाभावी म्हणून वापरले जाणारे खोके अथवा बाह्य आवेष्टन. हे खोके बहुधा पुठ्ठेवजा कागदाचे बनवितात. अशा पुठ्ठेवजा कागदाच्या दर्जावर आणि ताकदीवर बाह्य आवेष्टनाची मजबुती अवलंबून असते. हे बाह्य आवेष्टन जितके निर्दोष आणि दर्जेदार स्वरूपात तयार होईल, तितकी आतील मूळ आवेष्टनाची सुरक्षितता निश्चित होते. मूळ आवेष्टनाची सुरक्षितता म्हणजेच अवगुंठित पदार्थाचीही सुरक्षितता होय, हे समीकरण आधुनिक आवेष्टन-उद्योगाने मान्य केले आहे.आवेष्टनातील पदार्थ अधिक सुरक्षित रहावा म्हणून बाह्य आवेष्टनाच्या आतील बाजूस कागदाचे तुकडे, वाळलेले गवत, भुसा, पुठ्ठे इ. भरणवस्तू वापरतात. फळे, बाटल्या, खडू यांसारखे पदार्थ आवेष्टनाच्या आत एकमेंकाना लागून फुटू नयेत वा खराब होऊ नयेत म्हणून यांची आवश्यकता असते. प्रत्यक्ष पदार्थ ठेवण्यासाठी वापरले जाणारे मूळ आवेष्टन त्या पदार्थाच्या गुणधर्मानुसार निवडले जाते. सध्याच्या आवेष्टन-उद्योगात यासाठी पुढील माध्यमांचा वापर करण्यात येतो.

पोती

पोती हा आवेष्टनाचा प्रकार पूर्वीपासून चालत आला आहे. गोणपाटापासून तयार करण्यात येणाऱ्या पोत्यांचा वापर लोकर, साखर किंवा विविध प्रकारची अन्नधान्ये यांच्या आवेष्टनासाठी करण्यात येतो. ही पोती प्रामुख्याने ज्यूटपासून तयार करण्यात येत असली, तरी लोकर व कापूस यांपासूनही ती तयार करण्यात येत असत. जर्मनीतील कागदनिर्मात्यांनी मात्र क्रॅफ्टपेपरपासून पोती तयार करण्याची किमया शोधून काढली व पहिल्या महायुद्धाच्या वेळी यूरोपातील कापूसटंचाईमुळे त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. पुढे अमेरिकेने त्यात सुधारणा घडवून आणली. ही पोती क्रॅफ्टपेपरपासून तयार करून त्यांवर मेणाचे लेपन करीत. त्यामुळे आतील वस्तूंना दमट हवामानापासून इजा पोचत नसे. परंतु पुढे बिट्युमेन लॅमिनेटेड क्रॅफ्ट व प्लॅस्टिककोटेड पेपर यांपासूनही पोती तयार करण्यात येऊ लागली. संपूर्ण प्लॅस्टिकच्या पोत्याप्रमाणेच पॉलिएथिलिन व पॉलिव्हिनिअल क्लोराईड यांपासून तयार केलेल्या पोत्यांचा वापर खते भरण्याकडे होऊ लागला.

काच

औषधे, अम्ले, मद्य, पेये, अत्तरे इ. द्रवपदार्थांसाठी काचेची भांडी, बाटल्या अथवा सुरया वापरण्याची प्रथा इ.स.पू. दीड हजार वर्षापासून चालू आहे. अजूनही अशा पदार्थांसाठी काचभांड्यांचा उपयोग विश्वासार्ह मानला जातो. काचेच्या बाटल्यांना बाह्य आवेष्टन लागते. एकतर अशा बाह्य आवेष्टनामुळे बाटली अथवा काचेचे भांडे हाताळणे सोपे जाते; शिवाय त्यामुळे अशा वस्तू दुकानात ठेवल्यानंतर त्यांच्या रंगीबेरंगी बाह्या आवेष्टनामुळे ग्राहकांचे लक्ष त्यांकडे वेधले जाते. अशा काचेच्या आवेष्टनांचे परिवहन मात्र काहीसे जिकिरीचे, अतएव खर्चाचे ठरले आहे. त्यामुळे जेथे शक्य असेल, तेथे काचेऐवजी प्लॅस्टिकसारखे सोयीस्कर माध्यम मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

लोखंडी आणि लाकडी पिपे : मातीच्या भाजलेल्या भांड्यांची जागा प्रथमत: वर्तुळाकार लाकडी पिपांनी घेतली. ही पिपे प्रारंभी तेले, द्रवरंग, मद्य यांच्यासाठी वापरली जात. विसाव्या शतकाच्या प्रारंभी जर्मनी आणि अमेरिका या देशांतून लोखंडी पिपांची निर्मिती सुरू झाली. त्यामुळे तेले, वंगणे, डांबर, द्रवरंग, द्रवमिश्रणे यांच्यासाठी लोखंडी पिपांचा सर्रास उपयोग सुरू झाला. मात्र रंगखडे, दाणेदार स्वरूपाचे पदार्थ व औषधांना लागणारा कच्चा माल, तसेच कोठारात ठराविक अवधीपर्यंत खास ठेवण्यात येणारी मद्यार्के यांच्यासाठी लाकडी पिपे अजूनही खात्रीची समजली जातात. अर्थात अलीकडे औषधे तयार करावयासाठी लागणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर मूलद्रव्ये यांची ने-आण करण्यासाठी पाणी अथवा हवा यांच्या परिणामापासून अबाधित राहणारी जाड, कडक पुठ्ठ्याची पिपे औषधी-कारखाने मोठ्या प्रमाणावर वापरतात. अशा पिपांना बाह्य आवेष्टनाची आवश्यकता नसते.

पत्र्याचे डबे

प्रामुख्याने खाद्यपदार्थ, बिस्किटे, चॉकोलेटे, मुलांना आवडणाऱ्या गोळ्या यांच्यासाठी पत्र्याचे डबे (टिन कंटेनर) मोठ्या प्रमाणावर प्रचारात आहेत. बेबी-फूड म्हणजे अर्भकांसाठी तयार केलेली दुधाची भुकटी अशा डब्यांतून विकली जाते. मलमे, तोंडाला लावण्याचे क्रीम, व्हॅस्लिन, काजळ, बुटपॉलिश इ. पदार्थांसाठी छोट्या डब्या वापरात आहेत. थोडक्यात, सध्याच्या आवेष्टन-क्षेत्रात या पत्र्याच्या डब्यांना विशेष महत्त्व आले आहे. या डब्यांचा दर्शनी भाग आकर्षक रंगसंगतीत छापलेला असून अत्यंत वेधक असतो. डबा अथवा डबी तयार होण्यापूर्वी पत्र्याच्या तुकड्यावर छपाई केली जाते. त्यानंतर दुसऱ्या बाजूवर (जी बाजू डब्याच्या अंतर्भागात जाते) पत्रा गंजू नये आणि त्यात ठेवला जाणारा पदार्थ खराब होऊ नये यांसाठी एका विशिष्ट संरक्षक रसायनाचा (लॅकर) लेप दिला जातो. पत्र्याच्या डब्यांना कोणत्याही बाह्य आवेष्टनाची अथवा कागदी खोक्यांची आवश्यकता नसते. आतल्या पदार्थाला सुरक्षित ठेवण्यासाठी पत्रा हे विश्वासपात्र साधन आहे. पत्र्याचे डबे वा डब्या प्राय: वर्तुळाकृती असतात. परंतु नावीन्य म्हणून बिस्किटे, चॉकोलेटे यांसारख्या वस्तूंसाठी चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी किंवा कित्येकदा अंडाकृती डब्यांची निवड केली जाते.

प्लॅस्टिक व पॉलिएथिलीन

प्लॅस्टिक हे आवेष्टन क्षेत्राला मिळालेले वरदान ठरावे, इतकी सर्वांगीण उपयुक्तता प्लॅस्टिकने आतापर्यंत सिद्ध केली आहे. अत्यंत अल्प निर्मितिखर्च, ने-आण करण्यामधील सोय व सुरक्षितपणा, वजनातील हलकेपणा या गुणांनी त्याने औद्योगिक जगात क्रांती केली आहे. प्लॅस्टिकने काच, पत्रा, आणि इतर धातू यांची कित्येत बाबतीत जागा घेतली आहे. किंमतीच्या बाबतीत ते कोणालांही परवडावे असे माध्यम आहे. प्लॅस्टिकची नवी वस्तू दिसण्यात काचेच्या वस्तूइतकीच छानदार वाटते. पॉलिएथिलीन म्हणजे कागदासारखे लवचिक प्लॅस्टिक. पॉलिएथिलीनच्या पिशव्या पावडरी, वड्या, गोळ्या अशा औषधी वस्तू किंवा खाद्यपदार्थ गुंडाळून ठेवण्यासाठी वापरता येतात. कितीतरी ठिकाणी रबराची जागा प्लॅस्टिकने भरून काढली आहे. आता कित्येक औषधी आणि रासायनिक द्रव्ये तयार करणाऱ्या संस्था काच अथवा पत्रा यांच्याऐवजी सरसहा प्लॅस्टिकची आवेष्टने वापरतात.

दुसऱ्या महायुद्धानंतर प्लॅस्टिकचा मानवी जीवनात प्रवेश झाला. तेव्हापासून प्रतिवर्षी त्याच्या वापराचे क्षेत्र विस्तारत चालले आहे. मात्र मूळ आवेष्टन प्लॅस्टिक अथवा पॉलिएथिलीनचे असेल, तर जादा सुरक्षिततेसाठी प्लॅस्टिकला बाह्य आवेष्टनाची म्हणजे कागदी खोक्याची जरूरी असते.पॉलिस्टायरिन या प्लॅस्टिकच्या प्रकाराचाही आवेष्टनासाठी उपयोग करण्यात येतो. त्याच्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या गोळ्या साच्यात घालतात व हवेचा दाब आणि उष्णता यांद्वारे फुगवून त्यांना गरजेनुसार विविध आकार देण्यात येतात. पेट्या, पातळ किंवा जाड तक्ते या स्वरूपांतही ते उपलब्ध असते. हे वजनाने हलके असून मजबूत असते. त्यामुळे विमानातून पाठविण्याच्या वस्तूंच्या आवेष्टनासाठी त्याचा फार उपयोग होतो. हे थर्मोकोल या नावानेही ओळखले जाते.

अल्युमिनियमची आवेष्टने

प्लॅस्टिकसारखा अल्युमिनियमचा वापर विस्तृत नसला, तरी आवेष्टनासाठी अल्युमिनियमच्या वर्खाचा वापर वाढत चालला आहे. बहुतेक औषधी वड्या किंवा गोळ्या अल्युमिनियमच्या वर्खात (फॉइल) हवाबंद केल्या जातात. अशा वड्यांसाठी पूर्वी बाटल्या वापरल्या जात. सिगरेटच्या आवेष्टनासाठी अल्युमिनियमचा वर्ख वापरण्याची प्रथा जुनीच आहे. चॉकोलेट, टॉफी वगैरे मुलांच्या खाऊचे पदार्थ गुंडाळण्यासाठी अल्युमिनियमचा वर्ख वापरतात. एकतर सुरक्षितपणाच्या दृष्टीने हा वर्ख आदर्श असतो, तसेच दिसावयास तो चांदीसारखा तेजस्वी आणि मोहक वाटतो. अल्युमिनियमच्या मूळ किंवा आतील आवेष्टनासाठी बाह्य आवेष्टनाची मात्र अत्यंत जरूरी असते. म्हणजे औषधी वड्यांच्या हवाबंद अल्युमिनियमच्या पाकिटासाठी जाड कार्डाचे एक बाह्य आवेष्टन असणे आवश्यक ठरते. हवा, उजेड आणि हाताळणी यांपासून वस्तू अबाधित राखण्यासाठी अल्युमिनियमचा वर्ख उपयुक्त असला, तरी तशी आवेष्टने ने-आण करताना मोठ्या प्रमाणावर खराब होण्याची भीती असते.

दबणाऱ्या नळ्या (कोलॅप्सिबल ट्यूब्ज)

या नळ्या बोटांनी सहजगत्या दाबून प्रत्येक वेळी त्यांतील आवश्यक तेवढाच पदार्थ बाहेर काढता येत असल्यामुळे अशा नळ्या दंतधावन, औषधी मलमे, सौंदर्यप्रसाधने, रंग, खाद्यपदार्थ इ. अनेक खळीच्या स्वरूपाच्या पदार्थांकरिता आवेष्टन म्हणून वापरतात. अशा नळ्यांमध्ये पदार्थ न सांडता सुरक्षित राहतो. जॉन रँड या अमेरिकन गृहस्थाने १८७० च्या सुमारास या नळ्यांचा शोध लावला. नळ्या तयार करण्यासाठी प्रथम शुद्ध अल्युमिनियमच्या गोलाकार व जाडसर चकत्या दाबयंत्रात घालून त्यांचे नळीत रूपांतर करण्यात येते. नंतर स्वयंचलित यंत्राने नळीच्या पृष्ठभागावर अंतिम संस्करण करून उष्णतासंस्करणाने योग्य ते गुणधर्म त्यांत आणले जातात.

या नळ्यांवर नंतर लेपन करून त्यांच्यावर मुद्रणयंत्राने विविधरंगी व आकर्षक मुद्रण केले जाते. या नळ्यांतून पदार्थ झिरपण्याचे प्रमाण, दाब इत्यादींची कसून चाचणी करण्यात येते. या चाचण्या भारतीय मानक संस्थेच्या मानक क्र. ३१०१ : १९६५ यानुसार घेतल्या जातात. नळ्यांची मुखे विविध प्रकारची असू शकतात व त्यांची निवड त्यांमध्ये भरावयाच्या पदार्थानुसार केली जाते. अशा नळ्यांमध्ये यंत्रामार्फत योग्य त्या दाबाखाली योग्य तेवढाच पदार्थ भरला जातो व नंतर त्यांची तोंडेही बंद केली जातात. स्वयंचलित यंत्राने दर मिनिटास ६० नळ्या भरता येतात. दबणाऱ्या नळ्यांचा विविध पदार्थासाठी उपयोग होत असल्यामुळे त्यांची मागणी सतत वाढत आहे. भारतात अशा नळ्या तयार करणारे सहा कारखाने आहेत.

सेलोफेन

अल्युमिनियम आणि पॉलिएथिलीन या माध्यमांऐवजी काही वर्षापूर्वी सेलोफेन या पारदर्शक कागदवजा माध्यमाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात असे. अर्थात सेलोफेनचे उपयोग मर्यादित आहेत. पॉलिएथिलीनमुळे सेलोफेनचा औद्योगिक क्षेत्रातील वापर कमी होत आहे.

घडीची खोकी

सर्वांच्या नित्य परिचयातील हे घडीचे आवेष्टन पुठ्ठ्याइतपत जाड कागदापासून तयार होते. अशा घडीच्या कागदी पण अत्यंत आकर्षक रंगात छापलेल्या आवेष्टनात औषधे, खेळणी किंवा तयार कपडे विकत मिळतात. आवेष्टन हा विक्रीस मांडलेल्या वस्तूचा जितका आवश्यक तितकाच अविभाज्य भाग आहे. दैनंदिन उपयोगाच्या लहानमोठ्या वस्तू, बिस्किटादी खाद्यपदार्थ, खेळणी अशा वस्तू आवेष्टनातून विकल्या जातात. कित्येक पदार्थ प्रत्यक्षपणे कागदी खोक्यात भरले जात नाहीत. पावडरी, चूर्णादी वस्तू, गोळ्या इ. जिन्नस काच, प्लॅस्टिक, पॉलिएथिलीन, सेलोफेन यांच्यापासून तयार केलेल्या मूळ आवेष्टनात भरतात. या मूळ आवेष्टनाच्या अधिक सुरक्षिततेसाठी घडीची पुठ्ठेवजा कागदी खोकी उपयोगी ठरतात. वस्तूचा आकर्षकपणा वाढविणे आणि त्या वस्तूबद्दलची आवश्यक ती माहिती ग्राहकांना देणे, यांसाठी या बाह्य आवेष्टनाचा उत्तम उपयोग होतो. नव्याने बाजारात येणाऱ्या मालाची लोकप्रियता प्रारंभीच्या काळात आकर्षक आवेष्टनावर अवलंबून असते.

घडीच्या अशा खोक्याची रचना आणि आकृतिबंध किंवा आखणी यांचा विचार स्वतंत्रपणे होतो. रचना अथवा घडण आत बंद करावयाच्या वस्तूच्या आकारमानावर ठरते; त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पुठ्ठ्याचे वजन आतील वस्तूच्या वजनावर अवलंबून असते आणि आकृतिबंध व रंगसंगती ग्राहकांच्या दृष्टीने ठरविण्यात येते. अर्थात पुठ्ठ्याचे वजन, जात, रचना, आकृतिबंध, रंगसंगती आणि तत्सम तपशील यांचा विचार खोकी तयार करावयास लागणाऱ्या खर्चाशी मिळताजुळता असावा लागतो. खोक्याची निर्मिती बेसुमार खर्चाची असेल, तर बाजारपेठेतील स्पर्धेत तो माल टिकू शकणार नाही.

खोके दुमडले जाऊन ते उपयोगात येण्यापूर्वी पुष्कळ प्रक्रिया करण्यात येतात. प्रथमत: घडण आणि आकृतिबंध यांची निश्चिती झाल्यावर योग्य मोजमापात चित्राकृती आखावी लागते. या आकृतीची मोजमापे अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी लागतात. चित्राकृती पूर्ण झाल्यावर ज्या मुद्रणपद्धतीने खोक्याची छपाई करावयाची आहे, त्यानुरूप मुद्रणाला लागणारे चित्रपत्र (प्लेट) तयार करावे लागते. छपाई पूर्ण झाल्यावर खोक्याच्या आकारानुरूप आखणी व कापणी करणारा पंच तयार करावा लागतो. त्यात दोन तऱ्हेची पाती वापरली जातात. ज्या जागी घड्या दुमडल्या जातात तेथे फक्त खोल रेषा (स्कोअरिंग) उठविल्या जातात आणि खोक्याचा उरलेला आकार धारदार पात्यांनी कापला जातो. पंच यथातथ्य मोजमापात आहे अशी खात्री झाल्यानंतर पंचिंग यंत्रात तो बसवला जातो आणि खोक्यासाठी अगोदरच छापून ठेवलेले पुठ्ठे त्या यंत्रातून पंच केले जातात. पंचमुळे सर्व बाजूंनी कापलेला आणि घड्यांची जागा दाखविणाऱ्या रेषा उमटलेला पुठ्ठा तयार होतो. नको ते भाग अलग करून खोक्याचे न दुमडलेले पुठ्ठे खोक्यावरच्या अखेरच्या प्रक्रियेसाठी तयार मिळतात.

खोक्याचे पुठ्ठे दुमडणे व चिकटविणे या क्रिया अनुभवी कामगारांकडून जलद होऊ शकतात अथवा स्वयंचलित यंत्रावरही ही प्रक्रिया अधिक जलद व व्यवस्थित होऊ शकते. प्राथमिक स्वरूपाचे पंचिंग यंत्र छोट्या उभ्या पद्धतीच्या मुद्रणयंत्रासारखेच (ट्रेडल मशीन) असते. त्या यंत्रात मुद्रणयंत्रासारखी शाई मळण्याची सोय नसते. कारण पंचिंग यंत्राचा शाईशी अथवा छपाईशी संबंध नसतो. पंचिंग जलद व अधिक दर्जेदार रीतीने करणारी स्वयंचलित यंत्रसामग्री मिळू शकते. खोके-निर्मितीसाठी स्वयंचलित यंत्रे वापरली, तर स्वाभाविकपणेच अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्यांचे उत्पादन मिळू शकते.खोक्यांची आवेष्टने दुकानांतून विक्रीस ठेवल्यानंतर ती बहुधा उघड्यावर राहतात. देशाच्या बहुतेक भागांत त्यांचे परिवहन होत असल्यामुळे या बाह्य आवेष्टनांना कोणत्याही हवामानास तोंड द्यावे लागते. साहजिकच खोक्यासाठी वापरला जाणारा जाड कागद आणि मुद्रणासाठी वापरली जाणारी शाई प्रमाणभूत दर्जाची असावी लागते. निर्मितिक्षेत्राचे बाजारपेठेतील यश प्रामुख्याने उत्तम दर्जाच्या आवेष्टनावर अवलंबून असल्यामुळे भारत सरकारने भारतीय मानक संस्थेच्या कक्षेखाली आवेष्टन हा विषय घेतला असून त्याच्या प्रमाणभूततेची मूल्ये निश्चित केली आहेत. आवेष्टन-उद्योगाला एक महत्त्वाचा राष्ट्रीय उद्योग म्हणून मान्यता मिळाली आहे.

आवेष्टनाची रंगसंगती जास्त काळपर्यंत उठावदार व तेजस्वी राहावी व आवेष्टनाच्या आकर्षकतेत भर पडावी म्हणून मुद्रणानंतर आवेष्टनाच्या मुद्रित तुकड्याला व्हार्निशचा रंगलेप देतात. व्हार्निशच्या एक अथवा दोन लेपानंतर मुद्रित नमुना अधिक तेजस्वी वाटतो. व्हार्निशमुळे रंगाचा तजेलदारपणा जसा वाढतो, तसाच त्यावर सूर्यप्रकाशाचा विपरीत परिणामही होत नाही. आवेष्टन-उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आवेष्टनासाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण वस्तूंपैकी जगात आठ टक्के लोहपत्रा, दहा टक्के लाकूड, पन्नास टक्के टिनपत्रा, कागद व जाडपृष्ठे, सत्तर टक्क्याहून अधिक काचेच्या बाटल्या आणि पॉलिएथिलीनपैकी एक चतुर्थांश प्लॅस्टिकची आवरणे वापरण्यात येतात. आवेष्टनासाठी लागणाऱ्या या माध्यमांची निर्मिती आधुनिक काळात यांत्रिक साहाय्याने होऊ लागली आहे. ठराविक व प्रमाणभूत आकाराची लाकडी खोकी, खाद्योपयोगी पदार्थांचे हवाबंद डबे, घडीचे डबे इ. वस्तू यंत्राच्या साहाय्यानेच तयार करण्यात येतात. त्यांपैकी हवाबंद व घडीच्या डब्यांचे निर्मितीप्रमाण दर मिनिटाला ६०० ते १,५०० पर्यंत असते. विविध प्रकारच्या आवेष्टनांच्या निर्मितीचा हा वेग वस्तुनिर्मितीच्या वेगाशी मेळ साधणारा असावा लागतो; कारण त्यामुळेच उत्पादित मालाच्या प्रमाणात आवेष्टनाचा पुरवठा करणे शक्य असते.

वरील प्रकारच्या आवेष्टन वस्तूंप्रमाणेच त्या त्या आवेष्टनांमध्ये विविध प्रकारांनी वस्तू भरणारी यांत्रिक उपकरणेही आज उपलब्ध झालेली आहेत. या यांत्रिक उपकरणनिर्मितीचे प्रमाण दर मिनिटाला २० ते ६०० नगांपर्यंत पडते. त्यांमध्ये बाटल्या किंवा पिपे यांत वस्तू भरणाऱ्या यांत्रिक उपकरणांप्रमाणेच, दबणाऱ्या नळ्या भरणाऱ्या व निर्वात आवेष्टन करणाऱ्या यंत्रांचाही समावेश होतो. या वस्तू भरलेल्या आवेष्टनांभोवती लेबल गुंडाळणे व ती मोहोरबंद करणे यांसाठी विविध प्रकारची द्रावके, चिकटपट्ट्या इ. वस्तूंचीही निर्मिती होत आहे.भारतात विशेषत औषधी क्षेत्र आणि दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचे उत्पादनक्षेत्र यांना आवेष्टनांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. ही मागणी समाधानकारक रीतीने पुरविण्यासाठी आवेष्टन-उद्योग स्वयंचलित यंत्रारूढ व्हावयास पाहिजे. सदोष आवेष्टन-पद्धतीमुळे निर्यात व्यापारावर विपरीत परिणाम होऊन विस्कळीतपणा व तोटा यांचा धोका निर्माण होतो. आवेष्टनांच्या प्रमाणभूततेबाबत आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे दंडक आहेत. उत्पादित वस्तूचा दर्जा तिच्या आवेष्टनपद्धतीवरही अवलंबून असतो.

संदर्भ : 1. Crouwel, W.; Weidemann, K. Packaging: An International Survey, London, 1968.

2. Hanlon, J.F.; Handbook of Package Engineering, New York, 1971.

3. Paine, F.A. Ed. Fundamentals of Packaging, London, 1962.

लेखक :ज.ग. देवकुळे,चंद्रहास जोशी,

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate