অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झॉर्झ सरा

झॉर्झ सरा

(२ डिसेंबर १८५९-२९ मार्च १८९१). प्रख्यात फ्रेंच चित्रकार. त्याचा जन्म पॅरिसमध्ये झाला व बहुतांशीवास्तव्यही पॅरिस येथेच होते. त्याने ‘एकोल दी बोझार्त’ या कलासंस्थेत १८७८-७९ या कालावधीत कलाशिक्षण घेतले. त्यानंतर एक वर्ष लष्करी सेवेत घालवल्यावर, उर्वरित आयुष्य त्याने कलासाधनेसाठी पूर्णत: वेचले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आलेल्या फ्रेंच नव-दृक्-प्रत्ययवादी चळवळीतील तो एक प्रमुख चित्रकार होता. त्याने बिंदुवाद वा विभाजनवाद या नावाने ओळखली जाणारी चित्र रंगविण्याची नवी पद्धती विकसित केली. शव्हरील या रसायनशास्त्रज्ञाची रंगांविषयीची शास्त्रीय उपपत्ती, तसेच दलाकूवा या चित्रकाराचे रंगविषयक लिखाण यांचा प्रभाव त्याच्यावर पडला; त्यांतून त्याने स्वत:ची वेगळी व अभिनव अशी खास रंगलेपनपद्धती १८८० च्या दशकात निर्माण केली. त्याने प्रकाश, वस्तूचा रंग व रंगाच्या दृक्संवेदना यांविषयी शास्त्रशुद्ध अभ्यास करून रंगलेपनाचे एक नवे तंत्र प्रस्थापित केले. त्याचे तंत्र रंगाच्या विभाजनावर आधारलेले असल्याने त्याने त्यास विभाजनवाद (डिव्हिजनिझम) असे नाव दिले. प्रकाशाच्या योगाने दृश्यमान होणारा कोणताही रंग हा संपूर्णपणे एक नसून तो अनेक रंगबिंदूच्या एकरूपतेतून बनलेला असतो. या तत्त्वानुसार सराने प्रत्येक रंगाचे त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या रंगच्छटांमध्ये विभाजन करून, लहान लहान ठिपके (बिंदू) परस्परसान्निध्यात चित्रफलकावर रंगलेपनाव्दारे मांडून, त्या रंगच्छटा त्यांच्या मूळ स्वरूपात एकमेकांशेजारी ठेवण्याचे तंत्र निर्माण केले. परिणामी पाहणाऱ्याच्या दृक्पटलावर उचित परिणाम होऊन त्याला सृष्टीमध्ये दिसणाऱ्या रंगांचा पुन:प्रत्यय यावा, हे त्यास अभिप्रेत होते. एका अर्थाने ही दृक्प्रत्ययवादाच्या पुढची पायरी होती. दृक्प्रत्ययवादी चित्रकारांचे उत्स्फूर्त व अनियमित असे रंगांचे कुंचलांकन कटाक्षाने अव्हेरून सराने चित्रफलकावर रंगांचे छोटे छोटे ठिपके अत्यंत प्रयासपूर्वक कसोशीने परस्परसन्निध मांडण्याचे नवे रंगलेपनतंत्र निर्माण केले. तसेच दृक्प्रत्ययवादयांनी अस्थिर, चंचल अवस्थेतील प्रकाशाची पालटती रूपे व गतिमान हालचालींतील माणसे चित्रांतून पकडण्याचा प्रयत्न केला, या उलट सराने आपल्या चित्रांतून त्यांच्या स्थिर गुणधर्मांवर भर दिला. द बेदर्स (१८८४) या त्याच्या सुरूवातीच्या चित्रात त्याच्या ह्या अभिनव रंगलेपनतंत्राचा प्राथमिक आविष्कार दिसतो. द्दक्प्रत्ययवादयांच्या शेवटच्या चित्रप्रदर्शनात (१८८६) सराने आपले संडे आफ्टरनून ऑन द आयलंड ऑफ ला गांदे जात्ते (१८८५) हे प्रख्यात चित्र प्रदर्शित केले. हे चित्र म्हणजे बिंदुवादी तंत्रप्रणालीचा सर्वोत्कृष्ट आविष्कार मानले जाते ( पहा : मराठी विश्वकोश : ७, चित्रपत्र ४६). पॉल सीन्याक व कामीय पीसारो हे फ्रेंच चित्रकार सराच्या ह्या बिंदुवादी रंगलेपनतंत्राने प्रभावित झाले व त्यांनी त्याचे अनुकरणही केले. सराच्या द बेदर्स व गांदे जात्ते ह्या प्रमुख चित्रांबरोबरच त्याची द मॉडेल्स (१८८६), द शॅहुत (१८८९-९१), द परेड (१८८९), द सर्कस (१८९०-९१) इ. चित्रे विशेष उल्लेखनीय आहेत. त्याने काही व्यक्तिचित्रेही रंगवली. उदा., सीन्याक या चित्रकाराचे चित्र, त्याच्या प्रेयसीचे Jeune Femme Se Poudrantहे चित्र इत्यादी. त्याशिवाय काही निसर्गचित्रेही त्याने रंगवली. त्याची ७ भव्य चित्रे, ४० लहान चित्रे, सु. ५०० रेखाचित्रे, तसेच अनेक आरेखनपुस्तिका उपलब्ध आहेत. सराच्या मोठया चित्रनिर्मितीचे प्रमाण तसे अल्पच आहे. कारण त्याचे चित्रफलक आकाराने अवाढव्य असत व त्यांवर चित्र रंगवण्याची प्रक्रिया किचकट, कष्टप्रद, संथ, सावकाश आणि अत्यंत पद्धतशीर असे. १८९० मध्ये त्याने आपल्या चित्रप्रणाली विषयीचा सिद्धांत रिझ्यूमेच्या रूपात प्रकाशित केला.

लेखक : श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate