অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पीतर कॉरनेलिस माँद्रीआन

पीतर कॉरनेलिस माँद्रीआन

माँद्रीआन, पीतर कॉरनेलिस : (७ मार्च १८७९–१ फेब्रुवारी १९४४). आधुनिक डच चित्रकार. आमर्सफोर्ट येथे कॅल्व्हिन पंथी धार्मिक कुटुंबात जन्म. वडील शिक्षकी पेशात असल्याने त्यांच्या आग्रहास्तव त्याने शिक्षणविषयक पदवी घेतली; पण त्यात त्याचे मन रमले नाही.याच्या चौदाव्या वर्षापासून त्याने चित्रकलेचे धडे घेण्यास सुरुवात केली आणि १८९२ पासून म्‌स्टडॅम येथील ‘अकॅडमी ऑफ फाइन आर्ट्‌स’ मध्येच कलेचे शिक्षण घेतले. त्याची प्रारंभीची चित्रे वास्तववादी वळणाची असून त्याला आकारांच्या घडणीत विशेष रस होता. त्याने सुरुवातीला काही निसर्गचित्रे रंगवली. त्यातं आल्हाददायक रंग, मुक्त शैली व तांत्रिक प्रभुत्व दिसून येते. तो १९१२ मध्ये पॅरिसला गेला. तिथे त्याच्यावर घनवादी चित्रशैलीचा विशेष प्रभाव पडला. या वास्तव्यात त्याने घनवादी शैलीत वृक्षमालिका आणि घनवादी चित्ररचना (काँपोझिशन्स) रंगवल्या. वास्तववादी निसर्गचित्रणापासून (द रेड ट्री ; १९०८) अमूर्तवादी चित्रप्रणालीकडे (अॅपल ट्री इन ब्लॉसम; १९११) त्याची वाटचाल चालू होती. त्यातून त्याने खास स्वतःची अशी अमूर्त चित्रशैली घडवली व तिला पुढे ‘नवरूपणवाद’ (नीओ प्लॅस्टिसिझम) असे नाव दिले. चित्रकलेच्या वास्तुकलेशी संयोग साधणारी एकात्म शैली हे नवरूपणवादाचे वैशिष्ट्य.साधुसुधे भव्य, सुघटित भौमितिक आकार व प्राथमिक रंग यांची त्यांच रचना आढळते. तो १९१४ मध्ये हॉलंडला परत आला. या कालखंडात उभ्या-आडव्या रेषाखंडांच्या अमूर्त रचना साधण्याकडे त्याचा विशेष कल दिसून येतो. आकाश, समुद्र, चर्चवास्तु यांच्या भव्यतेचा त्याच्या मनावर जो प्रभाव पडला.

त्यातून हे अमृत आकार त्याला स्फुरले असावेत, असे दिसते. त्याने थीओ व्हान डूसबर्कच्या समवेत द स्टील (म. शी. शैली) हे नियतकालिक काढून (१९१७) आपल्या नवरूपणवादच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण केले. त्यातील नॅचरल रिलिटी अँड ब्‌स्ट्रॅक रिलिटी हा लेख आधुनिक अमूर्त कलेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण आहे. पीत माँद्रीआन : प्लॅस्टिक आर्ट अँड प्युअर प्लॅस्टिक आर्ट (१९४७) हा त्याचा कलाविषयक लेखसंग्रह प्रसिद्ध  आहे. तो १९१९ साली पॅरिसला परतला. या काळात त्याने अनेक प्रयोगशील अमूर्त चित्ररचना केल्या. त्यांत काँपोझिशन विथ रेड, ब्ल्यू अँड यलो (१९३०) वैशिष्ट्यपूर्ण आहे. १९३८ साली दुसऱ्या महायुद्धाची चिन्हे दिसू लागल्याने तो लंडनला गेला व १९४० मध्ये न्यूयॉर्कला येऊन तिथेच स्थायिक झाला. यानंतरच्या काळात त्याच्या चित्रांतील रंगसंगतीमध्ये पूर्वीच्या काळ्या रंगाऐवजी पिवळ्या, लाल व निळ्या रंगरेषांचा वापर जास्त प्रमाणात दिसू लागला. न्यूयॉर्क सिटी (१९४२)ब्रॉडवे बूगी-वूगी (१९४२–४३), व्हिक्टरी बूगी-वूगी (१९४३–४४) ही या काळातील त्याची उल्लेखनीय चित्रे होत. न्यूयॉर्क येथे त्याचे निधन झाले.

विसाव्या शतकातील आधुनिक कलेत माँद्रीआनाच्या चित्रांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्याची चित्रे अप्रतिरूप कला प्रणालीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मानली जातात. ह्याचे कारण केवळ त्याने वास्तववादी निसर्गचित्रणापासून अमूर्तवादापर्यंत केलेली उत्क्रांती हेच नसून त्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यातील, त्याच्या कोणत्याही प्रकारची तडजोड न करणाऱ्या स्वयंपूर्णतेस आहे. त्याने आपल्या कलेतून आकारित वा रूपणात्मक विशुद्धतेचा शोध घेतला. कमीत कमी निर्मितीघटकांचा वापर करून (दोन, चार उभ्या-आडव्या रेषा, लाल-निळे-पिवळे हे प्राथमिक रंग) त्यांतील साध्या व लयबद्ध संबंधाद्वारा कलाभिव्यक्ती साधणे व त्या द्वारा बाह्य, वस्तुनिष्ठ दृश्य जगाचा सर्वस्वी अव्हेर करून, केवळ अमूर्तत्व साधणे हा त्याचा ध्यास होता. त्याच्या सर्वार्थाने अमूर्त असलेल्या कलाकृती अशा विशिष्ट गुणामुळे भारावलेल्या असतात, की जो त्यांना सजीवता, संवेदनशीलता व अलौकिकत्व प्राप्त करून देतो. त्याच्या भौमितिक, अमूर्त नवरूपपणवादी शैलीचा प्रभाव नंतरच्या काळातील आधुनिक चित्रकला, वास्तुकला [बौहाउस], व्यावसायिक आकृतिबंध इ. क्षेत्रांत व्यापक प्रमाणावर दिसून येतो.

 

 

 

 

 

 

संदर्भ : Seuphor, Michel, Piet Mondrian : Life and Work, New York, 1957.

लेखक :  वा. व्यं.करंजकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate