लेण्यांसाठी जगप्रसिद्ध असलेले भारतातील स्थळ. ते महाराष्ट्रात औरंगाबादच्या वायव्येस सु. २९ किमी. वर वसले आहे. या गावाजवळून इला नदी वाहते. सर्वसाधारणपणे येथील लेण्यांची निर्मिती इ.स. सहाव्या शतकापासून पुढे टप्प्याटप्प्याने होत गेली. वाकाटकांच्या ऱ्हासानंतर चालुक्य आणि कलचुरी या दोन राजवंशांच्या संघर्षकालातच ही लेणी कोरली गेली. तत्कालीन अस्थिर राजकीय परिस्थिती आणि या लेण्यांचे भौगोलिक स्थान यांतून वेरूळच्या लेण्यांतील व्यामिश्र कला आणि प्रादेशिक परंपरांचा उलगडा होतो. राष्ट्रकूट घराण्याच्या ताम्रपटात (आठवे शतक) या स्थळाचा उल्लेख `एलापुर' असा केलेला असून त्यात येथील उत्कीर्ण लेण्यांचाही संदर्भ दिला आहे. अजिंठा येथील कलापरंपरा हरिषेण या वाकाटक सम्राटाच्या मृत्यूनंतर म्हणजे पाचव्या शतकाच्या अखेरीस खंडित झाली आणि तेथून बाहेर पडलेले शेकडो कलावंत नव्या राजवटीच्या आश्रयाखाली वेरूळच्या लेण्यांवर काम करू लागले, असे एक मत आहे. वेरूळ शिल्पाचा शैलीदृष्ट्या विचार करता हे मत थोड्याफार फरकाने ग्राह्य वाटते. सहाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, बहुधा कलचुरींच्या आश्रयाखाली हे काम सुरू झाले असावे. रामेश्वर लेण्याच्या समोर सापडलेली कलचुरी नाणी या कयासाला दुजोरा देतात.
महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर तेराव्या शतकात वेरूळ गुंफामध्ये वास्तव्य करून होते, असा स्थानपोथीमध्ये उल्लेख आहे. वेरूळ हे प्रदीर्घ काळापर्यंत तांत्रिक योगाचाराचे केंद्र होते, असेही दिसून येते. यानंतरची वेरूळची जी माहिती मिळते, तीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले हे वेरूळची पाटीलकी चालवीत होते, असे कळते. अठराव्या शतकात अहिल्यादेवी होळकर (कार. १७५६–९५) यांनी इला (येलगंगा) नदीच्या काठी घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे मंदिर बांधले. अहिल्यादेवींनी माणकेश्वर मंदिराचा (कैलास लेण्याचा) जीर्णोद्धार करून तिथल्या धूपदीपासाठी वर्षासन बांधून दिले, अशीही माहिती मिळते. मंदिरावर मध्ययुगीन रंगरंगोटीच्या खुणाही स्पष्ट दिसतात. अगदी अलीकडे या लेण्यांच्या परिसरात सातवाहनकालीन (इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. तिसरे शतक) वास्तूंचे अवशेष सापडल्याची नोंद झाली आहे.
सध्याच्या गावाच्या पश्चिमेला असलेल्या बालाघाटच्या टेकड्यांत, औरंगाबाद-वेरूळ या मार्गावरच दक्षिणेकडून उत्तरेकडे लेणी खोदण्यात आलेली असून त्यांची एकंदर संख्या चौतीस आहे. पुरातत्त्वखात्याने क्रमांक न दिलेली अनेक लहानमोठी लेणी या डोंगरात पसरलेली आहेत. मुख्य समूहातील दक्षिणेकडील भागात बारा लेणी असून ती बौद्ध धर्मीयांची आहेत. त्यानंतर सतरा लेणी हिंदू धर्मीयांची असून, त्यानंतर उत्तरेकडील पाच लेणी जैन धर्मीयांची आहेत. वेरूळच्या बौद्ध लेण्यांचा प्रारंभ सहाव्या शतकाच्या सुरुवातीस व्यापक प्रमाणात सुरू झाल्याचे दिसते. परंतु त्यातील अनेक प्रकल्प पुरेशा द्रव्यबळाअभावी इ. स. ६०० च्या आसपास बंद पडले असावेत. बौद्धांनी अर्धवट सोडलेल्या कित्येक गुंफा नंतर हिंदू लेण्यांमध्ये परिवर्तित केल्या गेल्या असाव्यात. हिंदू शिल्पप्रवृत्तीचा पहिला टप्पा प्रामुख्याने पाशुपत शैव संप्रदायाशी निगडित आहे. सहाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते चालुक्यांच्या कलचुरींवरील निर्णायक विजयापर्यंत-म्हणजे सातव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत-तो पूर्ण होतो. दुसरा टप्पा राष्ट्रकूटांच्या प्रवर्धमान शासनकाळात भक्तिसंप्रदायाच्या छटा दाखवणारा तर तिसरा टप्पा, ज्यात प्रामुख्याने जैन लेणी येतात, तो उत्तर राष्ट्रकूट काळात म्हणजे दहाव्या शतकाच्या शेवटीशेवटी पूर्ण झालेला दिसून येतो. यादवकाळातही काही तुरळक काम येथे झाले असावे. आठव्या शतकात येथील स्थापत्यकलेला बहर आला आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती या काळात झाली.
यांत बहुतांशी विहारगृहे आहेत, फक्त एकच चैत्यगृह आहे. काही विहारगृहे शिल्पांनी आणि अलंकृत स्तंभांनी देखणी झालेली आहेत, तर काही अनेकमजली असल्याने भव्य वाटतात. ही सर्व प्रामुख्याने महायान पंथीयांची आहेत. काही गुंफांमधून वज्रयान प्रतिमांची सुरुवात झालेली दिसून येते.
क्रमांक 1 : हे लेणे शिल्परहित विहार आहे. भिक्षूंना निवासासाठी एकूण आठ खोल्या आहेत.
क्रमांक 2 : हे लेणे मंदिर आणि निवास अशा दोहोंसाठी उपयोगी पडत असावे. मात्र यात फक्त दोनच खोल्या निवासासाठी आहेत. मागील भिंतीत गर्भगृह व बाजूच्या बुद्धमूर्ती असलेल्या भिंती येथे आहेत. गर्भगृहात धर्मचक्रप्रवर्दनमुद्रेत सिंहासनावर बुद्धाची मूर्ती असून, डाव्या बाजूस अवलोकितेश्वर बोधिसत्त्वाची मूर्ती आहे. उजव्या बाजूच्या दुसऱ्या बोधिसत्त्वाच्या मुकुटात स्तूपाची प्रतिमा आहे. गर्भगृहातील बुद्धमूर्तीच्या वर दोन्ही बाजूंना फुलांची माळ घेतलेल्या गंधर्वांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाहेर दोन्ही बाजूंना द्वारपाल असून त्यांतील (डाव्या बाजूचा) अक्षमाला आणि कमलपुष्प घेतलेला पद्मपाणी अवलोकितेश्वर आहे. उजव्या बाजूचा द्वाररक्षक उत्कृष्ट शिरोभूषणांनी अलंकृत केलेला वज्रपाणी अवलोकितेश्वर आहे. ही मूर्ती काहींच्या मते बोधिसत्त्व मंजुश्रीची असावी.
या लेण्याला प्रवेशमंडप असावा; पण तो आता अस्तित्वात नाही. यात अत्यंत प्रेक्षणीय अशी जंभालाची (बौद्ध धर्मीयांचा कुबेर) मूर्ती आहे. त्याच्या बाजूस चवरी घेतलेले सेवक आहेत.
या प्रवेशमंडपातून आत गेल्यावर बारा खांबांचा चौकोनी मंडप आहे. त्या मंडपाच्या दोन्ही बाजूंस प्रचंड आकाराच्या पाच बुद्धमूर्ती आहेत.
क्रमांक 3 : शिल्पे, शिल्पपट आणि अलंकृत स्तंभ ही या पडझड झालेल्या लेण्याची वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या उत्तरेकडील भिंतीवर एक शिल्पपट आहे. अग्नी, मारेकारी आणि जलप्रवासातील आपत्ती यांच्यापासून अवलोकितेश्वर संरक्षण करीत आहे, अशा आशयाचा हा शिल्पपट असून यातच उजव्या बाजूला सिंह, नाग, हत्ती व पिशाच्चे यांसारख्या आपत्तींपासूनही तो रक्षण करतो, हे या शिल्पातून दाखविले आहे. बुद्ध आणि बोधिसत्त्वाचे बदलते आणि भौतिकतेकडे झुकणारे स्वरूप या शिल्पपटातून सूचित होते. मध्यभागी असलेल्या मंडपात बारा खांब असून त्यांवर पूर्ण कलश आणि पत्रपल्लवी कोरलेल्या आहेत. मंडपाच्या बाजूच्या दोन्ही भिंतींत आठ, तर गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंसही दोन खोल्या असून गर्भगृहात बुद्धमूर्ती आहे. द्वारपालांपैकी डाव्या बाजूची मूर्ती अवलोकितेश्वराची आहे.
या लेण्याच्या उत्तरेच्या भिंतीत प्रलंबपाद आसनातील, धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्धमूर्ती व अवलोकितेश्वराचा शिल्पपट आहे. उजव्या भिंतीवर तारा व वज्रयान दैवतसमूहातील देवतेचे शिल्प आहे.
क्रमांक ४ : हे दुमजली लेणे असून दुसऱ्या मजल्यावर बुद्धाची प्रतिमा आणि दोन लहान खोल्या आहेत. बुद्धमूर्तीच्या डाव्या बाजूस कमलनालधारक अवलोकितेश्वर आहे. बोधिसत्त्वांच्या शेजारी स्त्री-सेविका आहेत. याशिवाय कमलपुष्प हातात धरलेली तारा आणि कमंडलू धरलेल्या भृकुटीचे शिल्प आहे.
क्रमांक ५ : हे लेणे सर्वांत प्रचंड (३५·६६ X १७·६७ मी.) आहे. या लेण्याला `महारवाडा' असे नाव प्रचलित असले, तरी `महाविहार' याचा हा अपभ्रंश असावा. गाभारा, दालन, मुख्य मंडप आणि दोन्ही बाजूंच्या पडव्या अशी याची विभागणी करता येते. दहा खांबांच्या दोन रांगांमुळे निरुंद पडव्या निर्माण झाल्या आहेत. दर्शनी भागात चार स्तंभ आहेत, तर पाठीमागे अंतराल असून भिंतीत मध्यभागी बुद्धप्रतिमा असलेले मंदिर आहे. अंतरालाला लागून दोन खोल्या, तर मंडपाच्या लगत एकूण सतरा खोल्या आहेत. सर्वसाधारणपणे या लेण्याची रचना चैत्यगृहाप्रमाणे आहे; परंतु गाभाऱ्याची बाजू अर्धगोलाकृती नाही. लेण्याचे छतसुद्धा सपाट आहे. चैत्यगृहामध्ये आढळतो तसा स्तूप नाही; प्रदक्षिणापथही नाही. गाभाऱ्यात प्रलंबपादासनात बसलेली बुद्धाची मूर्ती धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेत आहे. मंदिराबाहेर डाव्या बाजूची अवलोकितेश्वराची मूर्ती कमलनाल आणि अक्षमाला घेतलेली आणि खांद्यावर मृगाजिन ल्यालेली आहे; तर दुसरी मुकुटधारी व अलंकार ल्यालेली आहे.
क्रमांक ६ : वास्तुविधानाच्या दृष्टीने या लेण्याचे तीन भाग पडतात. यांतील दर्शनी भागाचे स्तंभ शालभंजिकांच्या सुंदर शिल्पांनी अलंकृत केलेले होते, असे त्यांच्या अवशिष्ट स्वरपावरून दिसते. मधल्या भागात मंडप, त्यामागे अंतराल आणि त्यामागे बुद्धमंदिर आहे. दोन्ही बाजूंस दोन मोठे मंडप आणि बाजूंना नऊ खोल्या आहेत. मुख्य मंडपाचे छत कोसळल्यानंतर लाकडी छत बसविल्याच्या खुरा येथे दिसून येतात. स्तंभावर घटपल्लव (कलश आणि त्यातून डोकावणारी पाने) कोरलेले असून स्तंभाच्या वरच्या भागावर शार्दूल हस्त (ब्रॅकेट) आहेत. अंतरालात द्वारपाल वज्रपाणी व अवलोकितेश्वर यांच्या भव्य मूर्ती आहेत. त्यावर पुष्पहार घेतलेले विद्याधर आहेत. डावीकडील भिंतीवर तारादेवी आणि उजव्या भिंतीवर महामयूरी यांची सुंदर शिल्पे आहेत. मयूरवाहनाखालील बाजूस पोथी वाचत असलेला भिक्षू कोरलेला असून वर अंतराळात विद्याधर दाखविलेले आहेत. येथील गाभाऱ्याची द्वारशाखा अलंकरणामुळे उल्लेखनीय ठरते. यातील गंगा-यमुनेच्या लहान मूर्ती अत्यंत नेटक्या आहेत.
क्रमांक ७ : हे लेणे शिल्परहित असून अपूर्ण आहे.
क्रमांक ८ : या लेण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, गाभाऱ्यातभोवती प्रदक्षिणापथाची सोय हे होय. स्वतंत्र गर्भगृह व बोधिसत्त्व (अवलोकितेश्वर, वज्रपाणी), जंभाल (पांचिक) व हारिती (एक देवता) यांच्या मूर्ती येथष आढळतात. गर्भगृहात प्रलंबपादासनातील बुद्धमूर्ती असून तिच्या दोन्ही बाजूंस वज्रपाणीची आणि मंजुश्रीची मूर्ती आहे. मंजुश्रीच्या शिरोभूषणात स्तूप कोरलेला आहे. या मूर्तीची स्त्री- सेविका तिच्या वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे लक्षणीय वाटते. अंतराळाच्या उजव्या भिंतीवर महामयूरीची मूर्ती आहे. गर्भगृहासमोर मंडप आहे. यात तारा त्याचप्रमाणे जंभाल व हारिती यांच्या मूर्ती आहेत.
क्रमांक ९ : कोरीव दर्शनी भाग, प्रमाणबद्ध खांब, पद्मपाणी आणि तारा या देवतांचा प्रार्थनापट ही या लेण्याची वैशिष्ट्ये होत.
क्रमांक १० : हे लेणे `विश्वकर्मा' लेणे किंवा `सुतार' लेणे या नावाने विख्यात आहे. यात लाकडी बांधणीच्या चैत्यगृहाचा ठसा उमटलेला दिसतो व त्यामुळे या लेण्याला सुतार लेणे असे नाव पडले असावे. हे लेणे चैत्यगृह या प्रकारात समाविष्ट होत असले, तरी पूर्वीच्या चैत्यगृहांचा नालाकृती दर्शनी भाग व रचना आणि या चैत्यगृहाचा त्रिदलसदृश दर्शनी भाग व योजना यांत फरक दिसून येतो. आधीची चैत्यगवाक्षे (कार्ले, भाजे येथील) इथे अभावानेच आढळतात. `हे चैत्यगृह भारतीय शैलगृहामधील अखेरची कलाकृती' असल्याने चैत्यगृहांच्या मांडणीत किती आणि कसा फरक होत गेला, याचे प्रत्यंतर हे लेणे पाहताना येते. येथे काष्ठकामाची परंपरा खडकाच्या कोरीव कामातही जोपासली गेली. त्यामुळेच या लेण्याच्या दक्षिणेकडील व्हरांड्यात तुळ्या आणि लगी खडकातच कोरलेल्या आहेत.
या लेण्याचे सौंदर्य दरवाज्यातून डोकावल्याखेरीज उलगडत नाही. आत प्रशस्त प्रांगण असून त्याच्या दोन्ही अंगांना खांबांचे सोपे आहेत आणि समोरही ओसरी आहे. प्रांगणाच्या तिन्ही बाजूंचे स्तंभ घटपल्लवयुक्त असून ते वरचा मजला तोलन धरतात. प्रवेशमंडपाच्या मागच्या भिंतीत असलेल्या दरवाजातून चैत्यगृहात जाता येते. हे चैत्यगृह गजपृष्ठाकृती आकाराचे असून त्यामध्ये एक मोठा स्तूप कोरलेला आहे. या स्तूपाच्या दर्शनी भागावर बोधिवृक्षाखाली प्रलंबपादासनातील धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील बुद्धमूर्ती (४·८७ मी. उंच) आहे. बुद्धमूर्तीच्या दोन्ही बाजूंस बोधिसत्त्वाच्या मूर्ती व त्यावर आकाशात विहार करणारी गंधर्व -मिथुने बुद्धावर पुष्पवर्षाव करीत आहेत, असे दर्शविले आहे. छताजवळील पाटिकेवर बुद्ध, बोधिसत्त्वांच्या मूर्ती असून त्यांच्या खाली बुटक्या व स्थूल गणांची रांग कोरलेली आहे. त्यावर नागदेव व नागदेवी यांची शिल्पे आहेत. यांच्या मागून बहिर्गोल फासळ्या निघताना दाखविलेल्या आहेत.
विश्वकर्मा लेण्याचा दर्शनी भाग इतर लेण्यांहून वेगळा व कलात्मक आहे. वरच्या मजल्याच्या आत जी भिंत आहे, तीत मध्यभागी एक द्वार असून त्यातून चैत्यमंदिरात प्रवेश करता येतो. या द्वाराभोवती साधारणतः त्रिकोणी कपाटात मुख्य तोरण आणि गवाक्ष, त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंस कुंभ, अर्धस्तंभ आणि वळणदार पालवी यांचे मिळून झालेले गोष्ठपांजर, तर दरवाज्याच्या माध्यावर स्तंभशीर्ष किंवा प्रस्तर आणि यावर जवळजवळ वर्तुळाकृती गवाक्ष; आणि गवाक्ष, प्रस्तर आणि द्वार या सर्वांना सामावून घेणारी त्रिदली महिरप आहे. दोन दले जोडून त्रिदलासारखी एक नावीन्यपूर्ण आकृती लक्ष वेधून घेते. हिच्या दोन्ही बाजूंना शिखरांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. गवाक्षाच्या दोन्ही बाजूंस अंतरिक्षात गंधर्व-दांपत्ये कोरलेली आहेत. द्वाराच्या एका बाजूला अवलोकितेश्वर व दुसऱ्या बाजूला वज्रपाणी आहेत. प्रत्येक कोनाड्यात प्रणयी युग्मे कोरलेली आहेत. मिथुने आणि गण यांची रेलचेल आहे. चैत्यमंदिराचे स्तंभ साधे असले, तरी त्यांच्यावरील तुला आणि स्तंभशीर्षे यांवर यक्षशिल्पे आहेत.
गवाक्षाच्या दर्शनी भागावरील डाव्या कोनाड्यात असलेल्या शिल्पात एक शिलालेख आहे. मात्र तो महायान पंथीयांनी प्रसारित केलेला मंत्र असून तो नंतर कोरलेला असावा, असे त्यांच्या अक्षरवटिकेवरून स्पष्ट होते.
क्रमांक ११ : हे लेणे `दोन ताल' या नावानेही प्रसिद्ध आहे. या शेजारचे लेणे तिमजली असल्याने त्याला `तीन ताल' असे संबोधले जाते. ही दोन्ही लेणी येथील बौद्ध लेण्यांची अखेर दाखवतात. दो ताल लेण्यातील सर्वांत खालचा मजला १८७६ पर्यंत मातीने भरून गेल्याने त्याचे अस्तित्व कळत नसे. भिक्षुगृहे आणि बुद्धप्रतिमायुक्त गर्भगृह यांमुळे या लेण्याचे स्वरूप मंदिर आणि विहार असे दुहेरी राहिलेले आहे.
लेण्याच्या दर्शनी भागात आठ खांब कोरलेले असून त्यांच्या मागे अरुंद ओवरी आहे. या ओवरीच्या पाठीमागील भिंतीत पाच लेणी कोरलेली आहेत. पहिले लेणे अपूर्ण, तर दुसऱ्या
बुद्धप्रतिमा आहे. ही मूर्ती भव्य असून ध्यानासनात आणि भूमिस्पर्शमुद्रेत आहे. मूर्तीचे आसन गण सावरून धरीत असून जवळच बुद्धाला पायस देणाऱ्या सुजातेचे शिल्प आहे. नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूंस अवलोकितेश्वर आणि वज्रपाणी हे बोधिसत्त्व आहेत. गाभाऱ्याच्या बाजूच्या भिंतीत अनेक बोधिसत्त्वांच्या मूर्ती कोरलेल्या असून, त्यांत मैत्रेय (हातात फूल आणि मुकुटात स्तूप), स्थिरचक्र (हातात तलवार), मंजुश्री (कमळ आणि पुस्तक) व ज्ञानकेतू (ध्वज) या स्पष्टपणे ओळखता येतात. याशिवाय जंभाल (कुबेर) आणि तारा (हातात कमळ) यांचीही शिल्पे येथे आहेत. जंभालमूर्तीच्या डाव्या हातात धनाची थैली आहे आणि खाली एक व्यक्ती नाण्यांनी भरलेला कलश घेऊन उभी आहे. या मजल्याच्या मध्यभागी असलेल्या सभामंडपाच्या मागील भागाऱ्यात भूमिस्पर्शमुद्रेतील ध्यानस्थ बुद्धमूर्ती आहे.
या लेण्याचे वैशिष्ट्य असे की, मंडपाच्या उजव्या आणि समोरच्या भिंतींवर हिंदू देवदेवतांच्या - महिषासुरमर्दिनी, गणेश, काल-प्रतिमा कोरल्या आहेत. बौद्ध धर्माचा प्रभाव नष्ट झाल्याच्या काळातील त्या असाव्यात हे स्पष्ट होते.
लेखक :शां. भा.देव
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आणि वैशिष्ट्यपूर्ण स...
कान्हेरीच्या गुहा ह्या भारतातील सर्वात मोठ्या गुहा...
दक्षिणेकडील पार्श्वमंडपात शिव-पार्वती विवाह, अक्षक...
लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सुप्रसि...