অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कवायती व संचलने

कवायती व संचलने

कवायत म्हणजे सांघिक, शिस्तबद्ध शारीरिक हालचाल. कवायतीत एकच प्रकारची हालचाल, एकाच वेळी, एका हुकुमावर सर्वांनी करावयाची असते. संचलन म्हणजे एखाद्या मोठ्या समारंभाप्रसंगी अशा कवायतीद्वारा केलेले प्रदर्शन होय.

कवायतीमुळे सैनिकांत, स्वयंसेवकांत, बालवीरांत शिस्त, सांघिक वृत्ती व आत्मनियंत्रण या गुणांची जोपासना व वाढ होते. संचलनात याच गुणांचे नेत्रदीपक व उत्साहदायक प्रदर्शन करून ते प्रेक्षणीय करण्यावर भर असतो.

विशेषत: लष्करी दलांत तसेच बालवीर पथकांत आणि स्वयंसेवक दलांत कवायती व संचलने यांस विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.इ. स. पू. ३००० वर्षांपासून धार्मिक समारंभांतील संचलनांचा उल्लेख आढळतो. अशा संचलनांसाठी शहरांमध्ये प्रशस्त चौक आणि रुंद रस्ते बांधीत व ते खास राखून ठेवले जात. ग्रीक व रोमन लोकांनी कवायती व संचलने यांना प्रथम चालना दिली.

ग्रीक सैनिकांना कवायतीचे कसून शिक्षण दिले जाई. या कवायती सैन्याच्या जोरावरच त्यांनी मॅराथॉन आणि प्लाटीया येथील लढाया जिंकल्या. अलेक्झांडरच्या सैन्याची विशिष्ट रचना कवायतीच्या सतत शिक्षणाचा परिपाक होता. त्याच्या सैनिकी हालचाली मोठ्या गुंतागुंतीच्या परंतु प्रभावी असत. विशेषत: रोमन राजांना व सेनापतींना कवायती व संचलने यांची विशेष हौस होती, असे त्यांच्या सैनिकी संचलनांच्या वर्णनांवरून आढळते. सर्कस नावाच्या विस्तीर्ण पेक्षागारात रोमन सैनिकांचे शिस्तबद्ध संचलन मोठे प्रेक्षणीय होत असे. विजयसंपादनानंतर विजयी वीर आणि सैनिक विजयी संचलन करीत. ख्रिस्ती चर्चच्या संबंधात होणाऱ्या मोठ्या मेजवानीपूर्वीही संचलन होत असे.

सतराव्या शतकात स्वीडनच्या गस्टेव्हस आडॉल्फस याने कवायती आणि संचलने यांच्या साहाय्याने लष्काराचे युद्धकलेतील नैपुण्य वाढविले. झां मार्तीने या फ्रेंच सेनेच्या इन्स्पेक्टर जनरलने सैनिकी संचलने व कवायती यांत बऱ्याच सुधारणा केल्या; त्यामुळे त्याला ड्रिलमास्टर म्हणत. जर्मनीच्या फ्रीड्रिख द ग्रेटने सेनादलाच्या कवायतीत व संचलनात यांत्रिक काटेकोरपणा व परिपूर्णता आणली. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वी कवायतीत दोन व चार रांगांची प्रथा होती.

दुसऱ्या महायुद्धापासून ती बंद पडून तीन रांगांची प्रथा प्रचारात आली व ती अद्यापही चालू आहे. विसाव्या शतकात इटलीच्या मुसोलिनीला व जर्मनीच्या हिटलरला आपापल्या राष्ट्रातील सैन्यदलांच्या सामर्थ्याचे प्रदर्शन जनतेपुढे करण्याचा अभिमान वाटे. अशा जर्मन सैनिकी संचलनात एका वेळी चारपाच लक्ष सैनिक भाग घेत आणि लक्षावधी प्रेक्षकांना अक्षरश: भारून टाकीत.

मराठेशाहीत विजयादशमीला सीमोल्लंघनासाठी मराठ्यांचे सैन्य निघत असे, पण त्यात कवायती शिस्तीचा अभावच असे. ब्रिटिश व फ्रेंचांच्या आगमनानंतर पेशवाईच्या उत्तरार्धात महादजी शिंदे याने फ्रेंचांकडून कवायती फौज तयार करवून घेतली होती.

म्हैसूरसारख्या काही संस्थानांत विजयादशमीला हत्तीघोड्यांच्या लवाजम्यासह प्रेक्षणीय मिरवणुकी निघत. तो संचलनाचाच एक प्रकार होय. अलीकडे काही शिक्षणसंस्था, सेवादले, स्वयंसेवक-संघ, राष्ट्रीय छात्रसेना पथके यांतून युवकांना कवायत शिकविली जाते व प्रमुख उत्सव-समारंभप्रसंगी त्यांची संचलने घडवून आणली जातात. राष्ट्रांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त होणाऱ्या समारंभात सैन्यातील सर्व दलांचे सामुदायिक संचलन करण्याची प्रथा आहे.

ऑलिंपिक क्रीडासामने, आशियाई क्रीडसामने यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडामहोत्सवांच्या उद्घाटनप्रसंगी जमलेल्या बहुराष्ट्रीय खेळाडूंनी शिस्तीने सामुदायिक संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्याची प्रथा उल्लेखनीय आहे. त्याचेच लोण राष्ट्रीय, प्रांतीय व इतर क्रीडामहोत्सवांत आणि शालेय, विद्यापीठीय समारंभांत पोहोचले आहे.सैनिक कार्यक्षम व कर्तव्यदक्ष रहावेत, हा कवायती व संचलनांचा प्रधान हेतू आहे. अशा तयारीचा शांततेच्या आणि युद्धाच्या काळात योग्य तो उपयोग करून घेण्यात येतो.

 

 

 

 

लेखक: शा.वि. शहाणे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate