लांब लांब पावले टाकीत, न पळता, जलद चालण्याची स्पर्धा. इंग्रजीत हील अँड टो (टाच व चवडा) या नावानेही ही स्पर्धा ओळखली जाते. विशिष्ट अंतर कमीतकमी वेळात चालून जाणे हे या स्पर्धेचे सामान्य स्वरूप असले, तरी विशिष्ट कालमर्यादेत सर्वाधिक अंतर चालून जाण्याच्या स्पर्धाही ठेवण्यात आल्या आहेत. जलद व पद्धतशीर कसे चालावे याचे शास्त्र बनलेले आहे. त्यातील नियमानुसार चालल्यास मोठे अंतरही, न दमता कमीतकमी वेळात काटता येते. चालण्याच्या शर्यतीचा अंतर्भाव मैदानी खेळात करण्यात येतो.
चालताना गती यावी म्हणन स्पर्धकाला चालण्याची विशिष्ट पद्धती अवलंबावी लागते. स्पर्धकाच्या पावलांच्या कोणत्या तरी भागाचा जमिनीशी संपर्क असणे आवश्यक असते. मागचे पाऊल उचलण्यापूर्वी पुढच्या पायाची टाच जमिनीवर टेकवावयास पाहिजे. या पद्धतीत टाच जमिनीवर टेकल्यामुळे चालणाऱ्याला स्वतःस पुढे झोकण्यास आणि स्वतःचे वजन चवड्यावर सावरण्यास मदत होते. पायाचा पंजा पुढच्या लांब पावलाकरिता ताणफळीचे काम करीत असतो. एक मैल कुशल चालणाऱ्यास धावणाऱ्यांपेक्षा साधारणतः २१/२ मिनिटे अधिक लागतात. चालण्यात झोकात्मक टप्प्याच्या अवधीपेक्षा आधारभूत टप्प्याचा अवधी मोठा असतो, तर धावण्याच्या क्रियेत झोकात्मक टप्पा हा आधारभूत टप्प्यापेक्षा मोठा असतो.चालण्याच्या स्पर्धा साधारणतः एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून पाश्चात्त्य देशांत लोकप्रिय होऊ लागल्याचे दिसून येते. १८५० ते १८७० पर्यंत या स्पर्धेचे स्वरूप धंदेवाईक होते. केव्हा केव्हा ही स्पर्धा मनुष्य विरुद्ध घोडा अशीही होत असे. कालमर्यादा जर भरपूर मोठी असेल, तर माणूसच विजयी होई.
इंग्लंडमध्ये १८६६ साली अॅमेच्युअर अॅथलेटिक क्लबतर्फे ठेवण्यात आलेल्या चालण्याच्या स्पर्धेत जे. जी. चेंबर्झ याने (११·२६ किमी) ७ मैलांचे अंतर ५९ मि. ३२ सेकंदात कापून विजय मिळविला होता. या विजयाच्या स्मरणार्थ ठेवलेले त्याच्या नावाचे पुष्पपात्र आजही विजयी स्पर्धकाला देण्यात येते. डब्ल्यू. मिल्हो या अमेरिकनाने ५९ वेळा चालण्याचे जागतिक धंदेवाईक विक्रम प्रस्थापित केले. त्यांपैकी काही तुलनात्मक दृष्ट्या हौशी खेळाडूंपेक्षा अधिक चांगले आहेत. यातच त्याने २२५ किमी. (१४० मैल) अंतर २४ तासात चालून जाण्याचा विक्रम केला आहे. १९६० नंतर या स्पर्धेबद्दल अमेरिकेत अधिक आवड उत्पन्न झाली. यास अध्यक्ष जॉन केनेडींचे धोरणही कारणीभूत समजण्यात येते.ऑलिंपिक क्रीडासामन्यांत १९०८ पासून चालण्याच्या स्पर्धेला स्थान देण्यात आले आहे. १९७२ मध्ये प. जर्मनीतील म्यूनिक येथे झालेल्या ऑलिंपिक क्रीडासामान्यांत २० किमी.च्या चालण्याच्या स्पर्धेत पूर्व जर्मनीचा पी. फ्रॅंकेल हा विजयी झाला ( १ ता. २६ मि. ४२·६ से.). ५० किमी.ची स्पर्धा बर्नड कानेन बुर्क या प. जर्मनीच्या खेळाडूने जिंकली (३ ता. ५६ मि. ११·६ से.).
इंटरनॅशनल अॅमेच्युअर अॅथलेटिक असोसिएशनतर्फेही स्पर्धा विशेषतः यूरोप व अमेरिकेत भरविल्या जातात. २३ ऑगस्ट १९५८ रोजी मॉस्को येथील ३२·१८ किमी.च्या (२० मैल) स्पर्धेत रशियाचा ए. वेद्याकोव्ह पहिला आला (२ ता. ३१ मि. ३३ से.). २ ऑक्टोबर १९७१ मध्ये पू. जर्मनीतील नाऊम्बुर्क येथे झालेल्या स्पर्धेत ४८·२८ किमी. (३० मैलांचे) अंतर ३ ता. ५६ मि. १२·६ सेकंदात काटून नवा विक्रम प्रस्थापित केला. दुसरे दिवशी त्याच ठिकाणी ५०,००० मीटरचे अंतर त्याने ४ ता. ४ मि. १९·८ सेकंदात कापून आणखी एक विक्रम केला. १३ एप्रिल १९७२ रोजी सुरू झालेली व ६ जून १९७२ रोजी संपलेली लॉस अँजेल्स ते न्यूयॉर्क हे अंतर चालत जाण्याची स्पर्धा इंग्लंडच्या जॉन लीजने जिंकली (५३ दिवस १२१/४ तास).
सकृत्दर्शनी चालण्याची स्पर्धा इतर स्पर्धांपेक्षा साधी व कमी त्रासाची वाटत असली, तरी प्रत्यक्षात मात्र ती तशी नाही. झपझप न पळात दूरवर चालत जाणे वाटते तितके सोपे नाही. चिकाटी, जागरूकता, सहनशक्ती, पायांचा दणकटपणा, हालचालींचे चापल्य इ. गुणांची चालण्यात कसोटी लागते. इंग्लंड, स्वीडन आणि नेदर्लंड्स या देशात तर शारीरिक क्षमता ठरविण्याकरिता चालण्याची कसोटी लावण्यात येते.स्वीडन, रशिया, ऑस्ट्रेलिया, चेकोस्लोव्हाकिया इ. देश याबाबतीत आघाडीवर आहेत. भारतात अलीकडे या बाबतीत आवड निर्माण होऊ लागली आहे.
लेखक: अच्युत खोडवे ; बाळ ज. पंडित
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/12/2023
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याबाबत माहिती.
द बिग इयर - स्पर्धा पक्षिनिरीक्षणाची- चित्रपट-परिच...
शरीरसौष्ठव म्हणजे मानवी शरीराचा सुडौल आणि सुबद्ध आ...
स्त्री किंवा पुरुष यांच्या शरीरसौष्ठवाची सौंदर्याच...