एक लोकप्रिय, अंतर्गेही क्रीडाप्रकार. १८९० च्या सुमारास हा खेळ सुरू झाला. प्रथम या खेळाचे नाव ‘पिंगपाँग’ असे होते. ‘पिगपाँग’ याचा लॅटिन भाषेत ‘टेबल’ असा अर्थ होतो, म्हणून तेच नाव या खेळाला पडले असावे. ‘गॉसीमा’ असेही दुसरे नाव या खेळाला होते. पारकर बंधूंनी ‘दिवाणखानी टेनिस’ हा खेळ अमेरिकेत सुरू केला होता. त्यांनी या खेळाचा माल इंग्लंडकडे निर्यात केला. त्याच्या जोरावर इंग्लंडनेही हा खेळ आत्मसात केला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्येच हा खेळ सुरू झाला, असेही एक मत आहे. ‘व्हीपव्हॅप’ हेही एक नाव या खेळाला होते. १९०२ साली इंग्लंडमध्ये ‘पिंगपाँग असोसिएशन’ची स्थापना झाली; पण पुढे वीस वर्षे हा खेळ लुप्तप्राय झाला.
१९२२ पासून ‘पिंगपाँग असोसिएशन’चे व खेळाचे नाव बदलले आणि ‘टेबल-टेनिस’ हे नाव अस्तित्वात आले. त्यानंतर मात्र हा खेळ बहरला. जर्मनी, हंगेरी, इंग्लंड या राष्ट्रांच्या पुढाकाराने १९२६ साली ‘इंटर-नॅशनल फेडरेशन’ ची स्थापना झाली. इंग्लंड, स्वीडन, हंगेरी, भारत, डेन्मार्क, जर्मनी, चेकोस्लोव्हाकिया, ऑस्ट्रिया आणि वेल्स हे त्या फेडरेशनचे संस्थापक-सभासद आहेत. १९७० पर्यंत नव्वद राष्ट्रीय संघटनांनी सभासदत्व स्वीकारले आहे. यूरोप, आशिया, आफ्रिका, उ. अमेरिका, द. अमेरिका आणि ओशिॲनिया अशा सहा मोठ्या संघटना स्थापन झाल्या आहेत.
टेबल-टेनिसचा खेळ एक हिरव्या रंगाचे टेबल, रॅकेट्स व एक कचकड्याचा पांढरा किंवा पिवळा गोलबारीक चेंडू आणि एक हिरव्या रंगाचे जाळे एवढ्या साहित्यानिशी खेळला जातो. टेबलाची लांबी २·७४ मी. व रुंदी १·५२ मी. असते आणि ते जमिनीपासून ७६ सेंमी. उंचीवर असते. टेबलावर मधोमध असलेल्या जाळ्याची लांबी १·८३ मी. व उंची टेबलापासून सर्वत्र १५·२५ सेंमी. असते. चेंडूचा व्यास ३·७२ वा ३·८१ सेंमी व वजन २·४ वा २·५ ग्रॅ. असते. रॅकेट हाताच्या पंजापेक्षा मोठी असते. तिचा आकार कोणताही असल्यास चालतो. रॅकेटच्या दोनही बाजूंस कोणताही रंग चालतो. सँड्विच रॅकेटची जाडी ४ मिमी.पेक्षा जास्त असू नये, असा नियम आहे; तर रबर रॅकेटची जाडी २ मिमी.पर्यंतच हवी. ह्या खेळास बंदिस्त जागा लागते. टेबलावर दिवे जमिनीपासून किमान ८।।। फुटांवर (सु. २·६५ मी.) हवेत; जास्तीत जास्त कितीही अंतरावर ते लावता येतात. मात्र टेबलावर लख्ख प्रकाश पडेल याची काळजी घ्यावयाची असते.
टेबल-टेनिसची गंगोत्री टेनिसच्या खेळात आहे. तत्त्व एकच पण थोड्या जागेत, अल्प वेळेत व अल्प खर्चात टेबल-टेनिसचा खेळ खेळता येतो. त्यामुळे हा खेळ घरातही खेळणे शक्य होते.
एकाने दुसऱ्याकडे जाळीवरून चेंडू मारणे आणि त्याने तो परतवणे ह्या क्रिया टेनिसप्रमाणे टेबल-टेनिमध्येही महत्त्वाच्या आहेत. या खेळात आरंभक (सर्व्हर) टेबलाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपल्या भागात एक टप घेऊन चेंडू धाडतो, तो प्रतिपक्षाच्या टेबलाच्या भागात पडला पाहिजे व प्रतिस्पर्ध्याने तो परतवला पाहिजे. असे एकजण चुकेपर्यंत चालते. चुकणाऱ्याच्या विरुद्ध खेळाडूस एक गुण मिळतो. दर ५ गुणांनंतर आरंभखेळी (सर्व्हिस) बदलते. २१ गुण अगोदर मिळविणारा खेळाडू जिंकतो. त्याला ‘गेम’ किंवा डाव म्हणतात. अशा तीन डावांपैकी दोन जिंकणारा किंवा पाच डावांपैकी तीन जिंकणारा खेळाडू सामन्यात विजयी होतो. जर दोघाची खेळाडूंचे २० गुण झाले असतील, तर जो लागोपाठ दोन गुण अधिक मिळवील तो विजयी होतो. अशा वेळी प्रत्येक गुणानंतर आरंभखेळी बदलते. या खेळात एक टप्पा पडल्याबरोबर चेंडू परतवायच्या असल्याने दोन्ही खेळाडूंना सतत हालचाल करावी लागते. त्यामुळे चापल्य आणि निर्दोष दृष्टी यांची कसोटीच लागते.
या खेळातील एक महत्त्वाचा नियम म्हणजे आरंभखेळी करताना चेंडू तळहातावरच ठेवावा लागतो. तो उडवून आरंभखेळी करायची असते. ज्या हातावर चेंडू आहे तो टेबलावरच हवा. प्रतिपक्षाला तो दिसावा असा त्यामागे हेतू असतो. याला ‘ओपन-पाम सर्व्हिस’चा नियम म्हणतात.विशिष्ट रंगाचाच गणवेष घालावा असा नियम नसला, तरी खेळाडूच्या शर्टचा व पँटचा रंग गडद असावा व तो पांढरा किंवा पिवळा नसावा, असे ठरलेले आहे. लांडी पँट असावी आणि शक्य तो पांढरे बूट वापरावेत, असा संकेत आहे.
भारतात पुरुष, स्त्रिया, मुले व मुली यांच्यामधील एकेरी, दुहेरी व मिश्र स्वरूपाचे सामने प्रतिवर्षी राज्य व राष्ट्रीय पातळीवर होतात. राष्ट्रीय स्पर्धेत दिल्ली व महाराष्ट्र येथील संघ बलवान आहेत. पुरुष गटात विजयी होणाऱ्या संघाला ‘बार्ना-बेलक कप’ देतात व महिलांच्या विजयी संघाला ‘जयलक्ष्मी कप’देतात. कुमारांच्या गटाला ‘रंगारामानुजम् कप’ देण्यात येतो, तर मुलींच्या गटाला ‘पद्मावती कप’ दिला जातो.
‘टेबल-टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया’ (स्थापना १९३८) ही संस्था भारतात या खेळाचे नियंत्रण करते. भारतामध्ये नंदा, फैजी बंधू, थीरूवेंगदम, के. जयंत, पतिन व्यास, उत्तम चंदाराणा, सुधीर ठाकरसी, गौतम दिवाण (पाच वर्षे राष्ट्रीय विजेता), के. नागराज, दिलीप, संपत, जयंत व्होरा, फरुक खोदायजी, नीरज बजाज, काबाड जयंत इत्यादींनी नैपुण्य मिळविले. स्त्रियांत मीना परांडे (चार वर्षे राष्ट्रीय विजेती), गुल नासिकवाला, उषा सुंदरराज, नीला कुलकर्णी व शैलजा साळोखे इत्यादींनी कीर्ती मिळवली.
इंग्लंडमधील खुल्या स्पर्धांची सुरुवात १९२१ पासून झाली. त्यांत रिचर्ड बर्गमन, बार्ना, डायना रोवे, मार्गारेट ओंसबोर्न हे खेळाडू गाजले. वैयक्तिक नैपुण्यपदाच्या जागतिक स्पर्धा १९२६-२७ सालापासून सुरू झाल्या. त्यांत हंगेरीचा व्हिक्टर बार्ना याने पाच वर्षे एकेरीतील व आठ वर्षे दुहेरीतील अजिंक्यपद मिळवले. महिला विभागात रूमानियाची अंजेलीका रोझीन हिने सहा वर्षे हे यश संपादन केले. याशिवाय सीडो व मारीआ मेडन्यान्सझ्की हे खेळाडूही चमकले. १९५३-५४ पासून जपान व चीन या आशियातील राष्ट्रांनीही या खेळात चमक दाखविली. इशिरो ओगिमुरा, टोशियाकी टनाका या दोन खेळाडूंनी दोन वेळेस आणि चुआँगत्से तुंग या चिनी खेळाडूने सतत तीन वेळेस विश्वविजेतेपद मिळविले.
पुरुषांच्या सांघिक सामन्यात हंगेरीने ११ वर्षे ‘स्वेदलींग कप’ जिंकला असून, जपानने सहा वर्षे स्त्रियांसाठी असलेला ‘कॉर्बीलॉन कप’ पटकावला आहे. अलीकडे पुरुष व महिला विभागात चीनचे खेळाडू सर्वश्रेष्ठ ठरतात.कलकत्ता येथे १९७५ मध्ये झालेल्या तेहतिसाव्या जागतिक टेबलटेनिस स्पर्धेत हंगेरीच्या जॉन्येर याने व महिला गटात उ. कोरीयाच्या यंग सन किम हिने वैयक्तिक अजिंक्यपद मिळविले. हे जागतिक सामने दर दोन वर्षांनी होत असतात.
१९३६ साली स्वेदलींग कपमधील निर्णायक सामना प्राग येथे पंचवीस तास चालला होता, तर १९६७ साली दुहेरीतील एक सामना लंडन येथे तब्बल २०४ तास चालला होता; पण हल्ली या खेळास वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. खेळ सुरू झाल्यापासून पंधरा मिनिटांत जर डाव पुरा झाला नाही, तर शीघ्र-गति-पद्धतीने (एक्सपिडाइट रूल) खेळावे लागते. त्या पद्धतीनुसार आरंभखेळी करणाऱ्याने १२ ‘रॅलीज’ मध्ये गुण मिळवला पाहिजे. अन्यथा प्रतिपक्षास गुण मिळतो. वरील नियम ज्या वेळेस लागू होतो, तेव्हापासून उरलेला डाव आणि पुढील संपूर्ण सामना या पद्धतीनुसारच खेळावा लागतो. यावेळी प्रत्येक गुणानंतर आरंभखेळी बदलते. या पद्धतीमुळे टेबल-टेनिसचा खेळ हल्ली अतिशय वेगवान झालेला आहे.
संदर्भ :
1. Barna, Victor, Table Tennis Today, London, 1962.
2. Leach, J. Better Table Tennis, London, 1969.
लेखक: बाळ ज. पंडित
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020