हा खेळ फक्त स्त्रिया व मुलीच खेळतात. प्रत्येकी सात खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये हा खेळ खेळला जातो. नेटबॉलचा उगम अमेरिकेतील बास्केटबॉल या खेळातून झाला. डॉ. टोल्स यांनी १८९५ मध्ये इंग्लंडमध्ये हा खेळ नेला व रूजवला. तिथेच त्याला सध्याच्या नेटबॉलचे स्वरूप अल्पावधीतच प्राप्त झाले. पुढे या खेळाचा सर्वत्र प्रसार झाला. हल्ली हा खेळ स्वीडन, भारत, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इ. देशांत खेळला जाऊ लागला आहे. या खेळाचे नियंत्रण ‘ऑल इंग्लंड नेटबॉल असोसिएशन’ ही संस्था (स्थापना वर्ष १९२६) करीत असते.
या खेळाची साधने पुढीलप्रमाणे होत: या खेळासाठी नंबर पाचचा फुटबॉल आवश्यक असतो. त्याचा व्यास २२ सेंमी. व वजन ४०० ते ४५० ग्रॅम असते. क्रीडांगण हे ३०·४८ मी. लांब व १५·२४ मी. रूंद असते. क्रीडांगणात गोलरेषेला समांतर दोन रेषा आखून खेळपट्टीचे तीन समान भाग केले जातात. क्रीडागंणाच्या मध्यभागी ०·४५ मी. त्रिज्येचे मध्यवर्तुळ असते. तसेच गोलरेषेच्या मध्यबिंदूतून ४·८७ मी. त्रिज्येचे एक अर्धवर्तुळ काढलेले असते. गोलरेषेच्या मध्यबिंदूवर एकेक खांब घट्ट रोवतात. खांबाला वरच्या टोकास ३ मी. उंचीवर एक लोखंडी कडी असते. तिचा व्यास ३८·१० सेंमी. असतो. त्या कडीला एक लोंबती जाळी बसविलेली असते. खेळाडूच्या पायात रबरी बूट आवश्यक असतातप्रत्येकी पंधरा मिनिटांच्या चार भागांत हा खेळ चालतो. पहिल्या दोन व शेवटच्या दोन भागांमध्ये प्रत्येकी तीन मिनिटांची विश्रांती असते; तर दुसऱ्या व तिसऱ्या भागांत दहा मिनिटांचे मध्यंतर असते. अशा रीतीने एका सामन्यासाठी एकूण ७६ मिनिटांचा अवधी असतो.या खेळाच्या सामन्यासाठी दोन पंच आवश्यक असतात. त्याशिवाय गुणलेखक व वेळ बघण्यासाठी एक निरीक्षक असतो. प्रतिपक्षाला हुलकावणी देऊन स्वसंघातील खेळाडूकडे चेंडू फेकायचा व तो प्रतिपक्षाच्या हद्दीतील जाळ्यात टाकायचा, हे या खेळाचे मुख्य तत्त्व आहे. आक्रमण व संरक्षण यातून हा खेळ रंगतो. नेम मारणे व संरक्षण करणे हे या खेळाचे मुख्य घटक आहेत. चेंडूची फेकाफेक अशी करावयाची, की तो नेम मारणाऱ्या खेळाडूच्याच हाती जाईल. चेंडू जाळीत गेला की नेम मारणाऱ्या संघास एक एक गोल मिळतो. ठरलेल्या वेळात जो संघ जास्त गोल करील, तो विजयी होतो. या खेळात सांघिक समज महत्त्वाची असते. तसेच सरावाने कौशल्य प्राप्त करून घ्यावे लागते.
इंग्लंडमध्ये १९३२ सालापासून नेटबॉलचे आंतरपरगणा (इंटर काउंटी) सामाने होत आहेत. त्यात १९६७ अखेर सरे संघाने सतरा वेळा अजिंक्यपद पटकावून उच्चांक स्थापला आहे. नेटबॉलचे सामने आंतरराष्ट्रीय पातळीवरही होतात. १९६६ साली इंग्लडने नॉर्दर्न आयर्लंडचा ९२ विरुद्ध ५ गोलांनी पराभव केला होता. तसेच १९६३ मध्ये न्यूझीलंडने नॉर्दर्न आयर्लंडला ११२ विरुद्ध ४ गोलांनी पराभूत केले होते. हा एक जागतिक उच्चांक आहे. या ११२ गोलांपैकी न्यूझीलंडच्या कोलीन मॅकमास्टरने व्यक्तिगत ८६ गोल मारून विक्रम निर्माण केला. १९५४ ते ६३ पर्यंत अॅनेटी केअर्नक्रॉसने ३६ आंतरराष्ट्रीय सामन्यांतून भाग घेऊन आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे.
लेखक: बाळ ज. पंडित
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
कांदाफोडी हा एक गमतीदार खेळ आहे. या खेळीची गंमत म्...
जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग...
कसरतीच्या खेळांचे प्रकार
उड्या व उड्यांचे खेळांविषयी माहिती.