অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नौकाक्रीडा

नौकांतून केलेला जलविहार तसेच विविध प्रकारच्या नौकास्पर्धा यांचा अंतर्भाव या क्रीडाप्रकारात होतो. नौकाक्रीडांसाठी समुद्र, नद्या, लहानमोठे तलाव यांची सोय असावी लागते. बहुतेक देशांतून नौकांचे क्रीडाप्रकार लोकप्रिय आहेत.

प्रागैतिहासिक काळापासून मानवाला नौकेचा उपयोग ज्ञात होता. प्रारंभी लाकडाच्या ठोकळ्याचा गाभाकोरून नौका बनवीत व त्यास वल्ह्याने गती देत. पुढे नौकांना शिडे बांधून वाऱ्याचा उपयोग करून घेतला गेला. आधुनिक काळात वाफेच्या किंवा पेट्रोलच्या शक्तीवर चालणाऱ्या नौका प्रचारात आल्या. नौकाक्रीडांचे प्रकार प्राचीन ईजिप्शियन, ग्रीक आणि रोमन लोकांमध्येही प्रचलित होते, असे दिसते. दुसऱ्या चार्ल्‌स राजाने १६६० साली इंग्लंडमध्ये नौकेतून सहल करावयास प्रांरभ केल्याने लोकांचे लक्ष तिकडे आकर्षित झाले. त्यानंतर तेथे नौकांच्या शर्यती आणि तत्सम इतर रंजनात्मक प्रकार लोकप्रिय झाले. १७२० साली स्थापन झालेला ‘वॉटर क्लब ऑफ कॉर्क हार्बर’ हा सर्वांत जुना बोट क्लब होय. अमेरिकेतही अशा नौकांचा उल्लेख १७१७ सालापासून सापडतो. त्यानंतर न्यूयॉर्क येथे १८११ साली ‘निकरबोकर बोट क्लब’ आणि १८३५ मध्ये ‘बॉस्टन यॉट क्लब’ स्थापन  झाले; पण ते दोन वर्षांपेक्षा अधिक काळ चालले नाहीत. १८४४ साली ‘न्यूयॉक यॉट क्लब’  स्थापन झाला व तो स्थिरस्थावर झाला. अटलांटिक महासागरावरील पहिली शर्यत १८६६ साली झाली. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पूर्व किनाऱ्यापासून बर्म्यूडापर्यंत व पश्चिम किनाऱ्यापासून होनोलूलूपर्यंत अशा दोन शर्यतींची सुरुवात १९०६ मध्ये झाली.

नौकाक्रीडांचे व शर्यतींचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. त्यांपैकी तीन प्रमुख होत : (१) हाताने वल्हविण्याच्या नौकाशर्यती, (२) शीडजहाजांच्या (यॉट) स्पर्धा व (३) यांत्रिक नौका (मोटरबोट) स्पर्धा. यांशिवाय अत्यंत वेगाने नौका चालविण्याची (स्पीडबोट) शर्यतही असते. या सर्व प्रकारांच्या नौकाशर्यतींत कोणती नौका अधिक वेगाने पाण्यावरून तरंगत जाऊन शर्यत जिंकते, ते पहावयाचे असते. हाताने वल्हविण्याचे कौशल्य, शिडे उभारण्याचे व ती योग्य त्या दिशेला फिरवून वाऱ्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचे कौशल्य व सुकाणू हाताळण्याचे कौशल्यही पाहिले जाते. यांपैकी काही नौकाशर्यतींचा-वल्हविण्याच्या व शिडांच्या नौका – ऑलिंपिक सामान्यात समाविष्ट केल्यामुळे या शर्यतींना जागतिक महत्त्व व प्रतिष्ठा लाभली आहे.

हाताने वल्हविण्याच्या नौकाशर्यती

साध्या वल्ह्यांच्या साहाय्याने लहानमोठ्या नौका चालविण्याचा प्रकार पुष्कळ ठिकाणी आढळतो. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, हौशी मंडळे अशा अनेक संस्थांत हा प्रकार एक छंद म्हणून लोकप्रिय ठरला आहे. हाताने वल्हविण्याच्या नौकांमध्ये छोट्या होड्या वल्हविणे (कनुइंग) व लांब नावा वल्हविणे (रोइंग) असे प्रकार आहेत. कनुइंग हा नौकाक्रीडाप्रकार १८६५ मध्ये जॉन माग्रेगर या ब्रिटिश बॅरिस्टरने रूढ केला, असे मानले जाते. १८६६ मध्ये ‘कनु क्लब’ ची इंग्लडमध्ये स्थापना झाली. रोइंग शर्यतीचा पहिला उल्लेख १७१६ मध्ये आढळतो. हाताने वल्हविण्याच्या नौकाशर्यती सर्वांत प्रथम सुरू झाल्या. त्यांत अनेक प्रकार आहेत. एका व्यक्तीने दोन्ही हातांनी एकच वल्हे वापरून नौका वल्हविणे, दोन हातांत दोन वल्ही घेऊन नौका वल्हविणे अशा वैयक्तिक शर्यती असतात. पुढे दोनदोन माणसांनी जोडीने नाव वल्हविण्याच्या शर्यती सुरू झाल्या. त्यानंतर चार माणसांनी सांघिक रीत्या वल्ही मारून नौका वल्हविण्याच्या शर्यती आल्या, तसेच आठ माणसांचा संघ व त्यांचा एक कप्तान अशा नऊ माणसांच्या सांघिक नौकाशर्यती आल्या. या प्रकारात इंग्लंडमधील ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांमध्ये प्रतिवर्षी होणारी अत्यंत चुरशीची नौकाशर्यत प्रसिद्ध आहे. अशा सांघिक होड्यांच्या शर्यतीत प्रत्येक स्पर्धक दोन्ही हातांनी एकच वल्हे वापरतो व कप्तानाच्या इशाऱ्याप्रमाणे सर्वजण एकाच वेळी एका विशिष्ट लयीमध्ये वल्ही मारून नौकेचा वेग वाढवीत असतात. या सर्व प्रकारच्या हाताने वल्हविण्याच्या नौकाशर्यतींपैकी पाच नौकाशर्यती कनुइंग विभागात ऑलिंपिक सामन्यात १९३६ पासून घेतल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत : (१) ‘कायॅक’ एकेरी, (२) कॉयक दुहेरी, (३) चार स्पर्धकांची कॉयक स्पर्धा, (४) ‘कॅनडियन’ एकेरी आणि (५) कॅनडियन दुहेरी. वरील पाच प्रकारच्या शर्यतींचे अंतर प्रत्येकी १,००० मी. असते. स्त्रियांसाठी हे अंतर ५०० मी. असते व त्यांपैकी पहिले दोन प्रकार खास स्त्रियांसाठी असतात. स्वीडनच्या गेर्ट फ्रेड्‌रिकसनने या प्रकारातील ऑलिंपिक स्पर्धा सहा वेळा जिंकून जागतिक उच्चांक प्रस्थापित केला आहे. या प्रकारातील सर्वांत लांब अंतराचा ११,५३० किमी. चा प्रवास (न्यूयॉर्कपासून नोमपर्यंत) जी. डब्ल्यू पोप व एस्. पी. टेलर या दोघांनी २४ एप्रिल १९३६ ते ११ ऑगस्ट १९३७ या कालावधीत पूर्ण केला. याशिवाय रोइंग विभागात सात प्रकारच्या शर्यती १९०० पासून समाविष्ट केल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे : (१) ‘सिंगल स्कल्स’ ही वैयक्तिक शर्यत व (२) ‘डबल स्कल्स’ ही जोडीची शर्यत, (३) ‘कॉक्स्ड पेअर्स’ ही कप्तान असलेल्या जोडीची (तीन माणसे, पैकी दोन वल्हविणारे व एक कप्तान) शर्यत, (४) ‘कॉक्सलेस पेअर्स’ ही कप्तान नसलेल्या जोडीची शर्यत, (५) ‘कॉक्स्ड फोर्स’ कप्तान नसलेल्या चार जणांच्या संघामधील नौकाशर्यत, (६) ‘कॉक्सलेस फोर्स’ कप्तान नसलेल्या चार जणांच्या संघाच्या नौकांमधील शर्यत व (७) ‘एट्स’ म्हणजे आठ जणांचा संघ असलेल्या नौकांमधील शर्यत. रोइंग प्रकारातील ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सर्वांत जास्त म्हणजे २६ सुवर्णपदके अमेरिकेने मिळवली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या जी. एलनने २५–२६ जानेवारी १९७५ रोजी ब्रिस्बेन नदीत १६० किमी. चे अंतर ९ तास १८ मिनिटांत तोडून जागतिक विक्रम केला. अशा स्पर्धांसाठी उत्तम सराव, कौशल्य, ताकद, सांघिक शक्ती व सहकार्य यांची आवश्यकता असते.

शीडजहाज शर्यती

(यॉटिंग). हा प्रकार फार जुना व अतिशय लोकप्रिय आहे. शीडजहाजाच्या अनेक प्रकारांच्या स्पर्धा होतात. त्यासाठी नौकांचा आकार व लांबी, शीडांचा आकार व लांबी, शीडकाठीची लांबी इत्यादींविषयी नियम तयार करण्यात आले आहेत. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पुढील पाच वर्ग ‘यॉट’ या प्रकारात अंतर्भूत करण्यात आले आहेत (१) ५·५ मी. लांबीच्या शीडनौकांचा वर्ग, (२) ‘ड्रॅगन’ वर्ग, (३) ‘स्टार’ वर्ग, (४) ‘फ्लाइंग डचमन’ वर्ग, (५) ‘फिन’ वर्ग. शीडजहाजांच्या ऑलिंपिक स्पर्धांत पॉल बी. एल्व्ह्‌स्ट्रमने लागोपाठ चार वेळा सुवर्णपदके (१९४८, १९५२, १९५६ व १९६०) जिंकून जागतिक विक्रम केला. या प्रकारच्या शर्यतींमध्ये एक, दोन वा अनेक स्पर्धक एका नौकेत असतात. त्यांतील एक प्रमुख असतो व बाकीचे त्याला मदत करतात. अशा नौका बांधणे खर्चाचे असते व या शर्यतींत वेळही बराच जातो. विशेषतः अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, फ्रान्स यांसारख्या सधन देशांतील हौशी श्रीमंतांचा हा खेळ होऊन बसला आहे. नौकाविहार, मासेमारी यांसाठीही या नौकांचा वापर केला जातो.

यांत्रिक नौकाशर्यती

या शर्यतींत नौकांना प्रेरकशक्ती देणारी मोटार बसविलेली असते, त्यामुळे शिडांच्या किंवा वल्हविण्याच्या नौकांपेक्षा यांना बराच वेग असतो. त्यामुळे या वर्गातील यांत्रिक नौकांच्या शर्यतींना विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून महत्त्व आलेले आहे. या नौकाशर्यतींना अधिक लांबीचा विस्तृत जलाशय, नदी अथवा समुद्र यांची आवश्यकता असते. या प्रकारात ८ किमी. अंतराची शर्यत महत्त्वाची असते. त्यात भाग घेणाऱ्या नौका ताशी १४५ किमी. वेगाने पाणी कापून जाऊ शकतात. त्यात आजतागायत रॉन मुस्सॉन याचा ताशी १८४·२३ किमी. (११४·६५ मैल) वेगाचा जागतिक विक्रम आहे. या स्पर्धेत अनेक यांत्रिक नौका भाग घेतात व प्रतिवर्षी स्पर्धेतील या नौकांची गती वाढतच आहे.

अत्यंत वेगाने, जेट गतितत्त्वावर चालणारी नौका (जेट स्पीडबोट) तयार करून इंग्लंडच्या डोनाल्ड कँप्बेल याने एका तासास सरासरी ४१८·६६ किमी. (२६०·३५ मैल) वेगाचा विक्रम १९५९ मध्ये केला. सर्वसामान्यपणे विमानाचा हा वेग पाण्यावरील या वेगवान नौकेला प्राप्त झाला आहे, असे म्हणता येईल. या प्रकारातील जगप्रसिद्ध नौकाशर्यती पुढीलप्रमाणे होत :

हार्म्सवर्थ चषक नौकाशर्यती

१८८७ मध्ये गोटलीप डाइमलरने मोटारबोटीचा शोध लावला. इंग्लिश व अमेरिकन लोकांनी या नौकांसाठी शक्तिमान एंजिने तयार केली. या बोटींचा शर्यतींमध्ये वापर होऊ लागला. १९०३ मध्ये सर आल्फ्रेड हार्म्सवर्थने यांत्रिक नौकांच्या शर्यतीसाठी एक चषक बहाल केला, तेव्हापासून या शर्यती सुरू झाल्या. या सर्वांत महत्त्वाच्या नौकाशर्यती मानल्या जातात.

अमेरिकन सुवर्णचषक स्पर्धा

या नौकाशर्यती १९०४ पासून सुरू झाल्या. जगातील अनेक देशांचे स्पर्धक त्यांत भाग घेतात. या यांत्रिक नौका आता ताशी १६१ किमी. पेक्षा वेग धारण करू शकतात.

ऑक्सफर्ड-केंब्रिज विद्यापीठीय नौकाशर्यत

१८४१ पासून टेम्स नदीच्या पात्रात ७·२४ किमी. अंतराची ही शर्यत प्रतिवर्षी भरत आलेली आहे. या दोन विद्यापीठांत ही स्पर्धा फार प्रतिष्ठेची मानली जाते. आतापर्यंत केंब्रिजने ६१ वेळा व ऑक्सफर्डने ४८ वेळा ही शर्यत जिंकली आहे. १८७७ साली त्यांची बरोबरी झाली. हे ७·२४ किमी. चे अंतर तोडण्याचा विक्रम १७ मिनिटे ५० सेंकदांचा केंब्रिजचा (१९४८) आहे. यात वल्हविण्याची नौका ही बरीच चिंचोळी असते. आठ जणांचा वल्ही मारणारा संघ असतो, कप्तान नौकेच्या तोंडाशी पाठ करून बसतो व सुकाणू चालवून इशारे देत असतो. ही शर्यत पाहण्यासाठी लाखो लोक टेम्स नदीच्या दोन्ही तीरांवर दुतर्फा गर्दी करून आरंभापासून अखेरपर्यंत उभे असतात. या नौकांत वल्ही मारण्याचा वेग सुरुवातीस मिनिटाला ३०/४०, मध्यंतरी सु. ३२ व शेवटी ४०/४२ वल्ह्यांचे हात याप्रमाणे साधारणपणे दिसून येतो. वर उल्लेखिलेल्या सर्व प्रकारच्या नौकास्पर्धांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटना स्थापन झालेल्या आहेत.

लहानमोठ्या यांत्रिक नौका मासे धरणे, बंदुकीने मच्छिमारी करणे, सहली, नौकाविहार इत्यादींसाठी वापरल्या जातात. यांत्रिक नौकांच्या मागे बांधलेल्या फळीवर हातात धरलेल्या दोऱ्यांनी तोल सांभाळत उभे राहून पाण्यावर तरंगत नौकेमागोमाग कमीअधिक वेगाने जाण्याच्या धाडसी क्रीडेला ‘सर्फ रायडिंग’ (लाटांवरील आरोहण) असे म्हटले जाते. हा नवा धाडसी खेळ यूरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया तसेच इतर काही ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर हवा खाण्यासाठी जाणाऱ्या स्त्रीपुरुषांत खूप लोकप्रिय ठरला आहे.

पूर्वीच्या क्रीडानौका या मच्छिमारी किंवा व्यापारी नौकांसारख्याच असत आणि स्थानिक लोकच त्या तयार करीत असत. हळूहळू या नौका तयार करण्यात शास्त्रीय दृष्टी आली. अमेरिकेतील यादवी युद्धानंतर तेथे अशा क्रीडानौकांची रचना त्यांच्या उद्देशांनुसार करण्यास सुरुवात झाली. एखादी नौका कोठल्या प्रकारच्या जलप्रवाहात वापरावयाची, त्यानुसार तिची रचना करण्यात येऊ लागली. पूर्वी सर्व नौका लाकडी फळ्यांपासून आणि लोखंडी सामान वापरून तयार करीत. परंतु दुसऱ्या महायुद्धात विमानांच्या बांधणीसाठी जे निरनिराळे डिंकांचे प्रकार तयार झाले; त्यांचा उपयोग करून हलक्या स्तरकाष्ठापासून (प्लायवूड) नौकांचे सांगाडे तयार करण्यास सुरुवात झाली. त्याचप्रमाणे हलके धातूही त्यासाठी वापरण्यात आले.

विसाव्या शतकातही नौकारचनाकार आपापल्या कल्पनांप्रमाणे आपल्या नौकांची रचना करीत असत. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर, एकेका प्रकारातील नौका विपुल प्रमाणात तयार केल्यास त्यांची किंमत स्वस्त पडते, असे आढळून आल्याने त्यांचे व्यावसायिक उत्पादन रूढ  झाले. नौकांचा आकार, शीडकाठ्या, शीडे इत्यादींचे आकार व मापे, त्या लावण्याच्या विविध पद्धती या संबंधीचे संशोधन चालू झाले. त्यात गेल्या पन्नास वर्षांत पुष्कळच प्रगती झालेली दिसते.

‘डिंगी’, ‘कॅटमरान’, ‘ट्रायमरान’ या नावांचे नौकांचे काही नवे प्रकारही आता प्रचलित झालेले आहेत. डिंगी ही उघडी, अर्धी उघडी आणि ६·१० मी. पेक्षा कमी लांब व स्वस्त असते. कॅटमरान नौकेला दोन सागांडे असून ते जोडलेले असतात. ती अत्यंत वेगाने जात असल्याने लोकप्रिय ठरली आहे. त्या जातीचा ‘शिअर मास्टर’ नावाचा सु. ५ मी. लांब नौकेचा प्रकार जास्त लोकप्रिय असून ही नौका साध्या मोटारीनेही ओढून नेता येते. ट्रायमरान नावाची नौका तीन सांगाड्यांची असते.

महासागरातील शर्यतीत (ओशन रेसिंग) शिडांच्या नौका भाग घेतात. अटलांटिक महासागरातील पहिली शर्यत १८६६ साली सँडीहूक (न्यू जर्सी) ते इंग्लंड अशी झाली. तीत तीन अमेरिकन नावाड्यांनी भाग घेतला. जेन्स गॉर्डन बेनेट यांनी ‘हेन्‌रीस’ या नौकेतून ही शर्यत १३ दिवस, २१ तास व ४५ मिनिटे या वेळात जिंकली. १९०५ सालच्या सँडीहूक ते लिझार्ड (इंग्लिश खाडी) या ४८७७·९० किमी. च्या शर्यतीत अकरा स्पर्धकांनी भाग घेतला होता. अटलांटा बोटीला ही शर्यत जिंकायला १२ दिवस, ४ तास व १ मिनिटे लागले. अशा शर्यती आता इतर महासागरांतही होतात. १९२५ ते १९५९ सालापर्यंत अटलांटिक महासागरात अठरा शर्यती झाल्या. त्यांपैकी १० ब्रिटिश खेळाडूंनी, ६ अमेरिकन खेळाडूंनी, १ नेदर्लंड्सच्या खेळाडूने आणि १ स्वीडनच्या खेळाडूने जिंकली. पूर्वीसारखा शिडाच्या नौकेने पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचा धाडसी प्रकारही आता दिसू लागलेला आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या क्रीडानौकांचा उपयोग संरक्षणात्मक दृष्टीने करण्यात आला. किनाऱ्यावरून शत्रूच्या पाणबुड्यांवर व इतर हालचालींवरही त्यांतून नजर ठेवण्यात येत असे.

भारतात नौकाक्रीडांचे प्रकार

भारतात नौकाक्रीडांचे प्रकार अलीकडेच सुरू झालेले आहेत. पहिला प्रकार पुष्कळ ठिकाणी आढळतो. दुसरा आणि तिसरा प्रकारही काही थोड्याच ठिकाणी दिसतो. केरळमधील ‘ओणम्’ या सणाच्या वेळी नौकास्पर्धा होतात. त्यांना ‘वंचिकळी’ म्हणतात. या स्पर्धेतील नौका रेशमी छत्र्यांनी सुशोभित करून, त्यात बसलेली माणसे वाद्ये वाजवीत त्या वल्हवीत असतात. या स्पर्धा भारतात अत्यंत लोकप्रिय आहेत.

लेखक: मो. ना. नातू ;  श्री. पु. गोखले; शा. वि. शहाणे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/21/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate