অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोलो

पोलो

काठी आणि चेंडू या साधनांनी घोड्यावरून खेळावयाचा खेळ. हा अत्यंत प्राचीन खेळ असून, तो इराणमध्ये पहिल्या शतकात खेळला जात असावा, असे उपलब्ध पुराव्यावरून दिसते. तत्पूर्वीही इ. स. पू. ६०० मध्ये इराणी व तुर्कमेन लोकांमध्ये झालेल्या एका सामन्याचे वर्णन कवी फिरदौसीने केले आहे. अल्-जहिजने सु. ८६० मध्ये लिहिलेल्या एका वृत्तांतामध्ये ८०० वर्षांपूर्वीच्या या खेळाचे वर्णन केले आहे. मात्र सुरुवातीला त्याचे स्वरूप आजच्या अर्थाने खेळाचे नव्हते; तर लोकजीवनातील एक धार्मिक सुफलता विधी, असे होते. त्यात हजारोंच्या संख्येने लोक भाग घेत. सुरुवातीला त्यास घोडेस्वारांच्या पलटणींना प्रशिक्षण देणारी क्रीडा, असेही स्वरूप होते. कालांतराने पोलो हा इराणचा राष्ट्रीय खेळ बनला व तो राजघराण्यात व सरदारवर्गातही खेळला जाऊ लागला. राजपुत्रांना त्याचे खास प्रशिक्षण दिले जाई. स्त्रियाही त्यात भाग घेत असल्याचे उल्लेख आढळतात (सहावे शतक). इराणमधील पोलो खेळाची लघुचित्रेही पाहावयास मिळतात. ‘चौगान’ या नावाने हा खेळ इराणमध्ये खेळला जात असे.

ग्रेट पार्क विंझर ( इंग्लंड ) येथील पोलोच्या सामन्याचे एक दृश्य

इराणमधून हा खेळ कालांतराने अरबस्तान, तिबेट, चीन, जपान या देशांत पसरला. चीनमध्ये त्यास अमाप लोकप्रियता लाभली. पोलो ही संज्ञा ‘पुलू’ (चेंडू) या तिबेटी शब्दापासून निर्माण झाली असावी.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय पोलोपटू जयपूरचे महाराज ( दुसरा सवाई मानसिंग )

भारतात पोलो मोगल जेत्यांकरवी तेराव्या शतकात येऊन पोहोचला. त्याचे लिखित स्वरूपातील नियम प्रथम अकबर बादशहाच्या कारकीर्दीत (सोळावे शतक) तयार झाले. एकोणिसाव्या शतकात पाश्चात्त्यांनी हा खेळ भारतातच आत्मसात केला. मात्र तत्पूर्वी या खेळाचे वर्णन सर अँथोनी शर्ली यांच्या ट्रॅव्हल्स टू पर्शिया (१६१३) या पुस्तकात केलेले आढळते. आसाममधील चहामळ्याच्या ब्रिटिश मालकवर्गात हा खेळ सुरुवातीस खेळला जात होता. त्यांनी १८५९ मध्ये सिल्चर येथे पहिला ब्रिटिश पोलो क्लब स्थापन केला. १८६० या दशकाच्या प्रारंभी ‘कलकत्ता पोलो क्लब’ची स्थापना झाली. त्यानंतर अल्पावधीतच हा खेळ फार लोकप्रिय झाला. १८६९ मध्ये पोलो इंग्लंडला परिचित झाला व ‘हॅर्लिंगहॅम क्लब’ या प्रमुख संघटनेची लंडन येथे स्थापना झाली. १८७६ मध्ये जेम्स गॉर्डन बेनेट या पत्रकाराने हा खेळ अमेरिकेत नेला. त्या ठिकाणी १८८१ मध्ये प्रख्यात ‘मेडो ब्रुक क्लब’ची स्थापना झाली. खेळाडूंची संख्या सुरुवातीस आठ होती, ती पुढे पाचावर आली आणि तदनंतर अमेरिकेत १८८१ मध्ये व इंग्लंडमध्ये १८८३ मध्ये सध्याप्रमाणे चार खेळाडूंवर येऊन स्थिरावली. १८९० मध्ये ‘युनायटेड स्टेट्स पोलो असोसिएशन’ ही संघटना निर्माण झाली. तिने अमेरिकेतील खेळाच्या नियमांना अधिकृत स्वरूप दिले. अमेरिकेबाहेर ‘हॅर्लिंगहॅम पोलो असोसिएशन’ ही संघटना या खेळाचे नियंत्रण करते.

प्रत्येकी चार-चार खेळाडूंच्या दोन संघांत आणि २७४·३२ मी. (३०० यार्ड) लांब व १४६·३ मी. (१६० यार्ड) रुंद मैदानात पोलो खेळतात. मैदानाच्या सीमांवर २२·९ सेंमी. (९ इंच) उंचीच्या फळ्या लावतात. भारतात अशा फळ्या सीमारेषांवर लावीत नाहीत, म्हणून भारतातील पोलोच्या मैदानांची रुंदी १८२·८८ मी. (२०० यार्ड) ठेवतात. गोलाचे खांब (गोल-पोस्ट) सु. ३ मी. (१० फूट) उंच आणि ७·३ मी. (८ यार्ड) अंतरावर असतात. हे खांब घोड्याचा धक्का लागला तर घोड्याला इजा होणार नाही पण सहज मोडतील, अशा ठिसूळ लाकडांचे बनवलेले असतात.

चेंडू विलो झाडाच्या मुळांपासून बनवतात. त्याचे वनज १२० ते १३५ ग्रॅ. (४/ ते ४/ औंस) आणि व्यास ८·२५ सेंमी. (३/ इंच) असतो. खेळावयाची काठी वेताची असून तिची लांबी सु. १·२ ते १·४ मी. (४७ ते ५४ इंच) असते. या काठीच्या टोकाला टोले मारावयाची जी आडवी दांडी असते, ती २२·८ सेंमी. (९ इंच) लांब असते व दुसऱ्या टोकाला पकडीसाठी जाळीदार कापडाची फीत गुंडाळलेली असते; तसेच मुठीत अडकविण्यासाठी एक कातही पट्टा असतो.

खेळाडूंना खेळातील स्थानानुसार क्रमांक दिले जातात. एक आणि दोन क्रमांकांचे खेळाडू आघाडीवर खेळतात. त्यांचे काम हल्ला करावयाचे व प्रतिस्पर्धी संघाचा हल्ला परतविण्याचे असते. तिसरा खेळाडू ‘हाफ-बॅक’ (हॉकीतील सेंटर-हाफ सारखा) हा संघाच्या आसासारखा असतो. त्याचे काम हल्ल्यात पुढाकार घेण्याचे आणि चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूला - जो मागे असतो—मदत करण्याचे असते. चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूला बचावात्मक पवित्रा घेऊन प्रतिस्पर्ध्याच्या गोलांना प्रतिबंध करावा लागतो. तथापि या खेळाच्या प्रवाही, गतिमान स्वरूपामुळे खेळाडूंच्या जागा झपाट्याने बदलत असतात व प्रत्येक क्रमांकाच्या खेळाडूला वेगवेगळ्या स्थानांवरून खेळावे लागते.

या खेळातील डावपेच इतर खेळांसारखे असले, तरी घोडदौडीमुळे पोलोचा खेळ अतिवेगवान होतो. पोलोसाठी पूर्वी फार लहान घोडे वापरीत असत. तथापि १९१९ पासून घोड्यांच्या आकारांवर नियंत्रण करणारे नियम झुगारून देण्यात आले आणि अधिक शक्तिशाली व आकाराने मोठे घोडे वापरण्यात येऊ लागले. त्यानंतर विशेष पैदास केलेले वेगवान, तगडे आणि स्वारांच्या काबूत राहणारे घोडे पोलोसाठी निवडले जाऊ लागले. अर्जेटिना, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील जातिवंत घोडे वापरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे खेळात जास्त गतिमानता व प्रेक्षणीयता निर्माण झाली.

पोलोचे सामने सामान्यपणे प्रत्येकी साडेसात मिनिटांच्या आठ ‘चक्करां’चे (कालावधींचे) असतात. काही ठिकाणी ४ वा ५ चक्करांचेच सामने असतात. प्रत्येक चक्करीनंतर तीन मिनिटांची व मध्यावधीत पाच मिनिटांची विश्रांती असते. प्रत्येक गोल झाल्यानंतर संघ बाजू बदलतात. सामना सुरू करताना चेंडू मैदानाच्या मध्यभागी घेऊन सर्व खेळाडू आपापल्या गोलखांबाच्या मागे एका रांगेत उभे राहतात. निशाण खाली घेतल्यानंतर दोन्ही संघांतील क्रमांक एकचे आघाडीवरचे खेळाडू घोडदौड करून चेंडूचा कबजा घेण्याचा प्रयत्न करतात आणि खेळास सुरुवात होते. या खेळाच्या बहुतेक सामन्यांतून समतोलसाधक पद्धतीचा (हँडिकॅप सिस्टिम) अवलंब करण्यात येतो. अमेरिकेच्या एच्. एल्. हर्बर्ट याने १८८८ मध्ये ही पद्धती अंमलात आणली. खेळणाऱ्या दोन संघांमध्ये समानता असावी, हा तिचा उद्देश होय. या पद्धतीनुसार खेळाडूंना विविध गुणात्मक श्रेणी दिल्या जातात. नवशिक्या खेळाडूस शून्य (काही ठिकाणी उणे दोन), तर सर्वश्रेष्ठ खेळाडूस दहा गुण (हॅंडिकॅप्स) दिले जातात. ज्या खेळाडूस दहा गुण दिले जातात त्याने दहा गोल केलेच पाहिजेत, असा या गुणपद्धतीचा अर्थ नव्हे; तर त्या त्या खेळाडूचे गोल करण्याचे कौशल्य व क्षमता त्याच्या श्रेणीने दर्शविलेली असते. संघातील चारही खेळाडूंच्या गुणांची सरासरी म्हणजेच संघाची एकूण गुणसंख्या-टीम हॅंडिकॅप-होय. ज्या संघाची गुणसंख्या कमी असते, तो साहजिकच कमकुवत संघ ठरतो व स्पर्धेत समानता आणण्यासाठी त्या कमकुवत संघास काही गोलांचा पुढावा बहाल करण्यात येतो. त्यासाठी विशिष्ट सूत्र लावले जाते. दोन संघांच्या गुणसंख्येतील फरकाला, त्या सामन्यात खेळल्या जाणाऱ्या चक्करांच्या संख्येने गुणून त्यास आठाने (यूरोप-अमेरिकेत सहाने) भागावयाचे असते. या पद्धतीमुळे नवख्या व कच्च्या खेळाडूंना चांगल्या, तज्ञ खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळते आणि तरीही स्पर्धा रंगतदार होतात. खुल्या व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ही पद्धती वापरली जात नाही.

एखाद्या खेळाडूची काठी मोडली, तरी त्याला स्वत: मैदानाबाहेर जाऊनच बदलून आणावी लागते. काठी हातातून निसटली, तरी त्याला घोड्यावरून खाली उतरून ती उचलावी लागते. घोड्यावरून खाली उतरलेल्या खेळाडूला तो पुन्हा स्वार होईपर्यंत खेळात भाग घेता येत नाही. भारतात हा खेळ एकेकाळी राजेरजवाडे व संस्थानिकांमध्ये अतिशय लोकप्रिय होता. जयपूरचा पोलो संघ जगात उत्कृष्ट ठरला होता. जसवंतसिंग, जोधपूरचे प्रिथीसिंग, भोपाळचे नवाब, मेजर अ‍ॅटकिन्सन तसेच जयपूर संघातील १९३२—३८ या कालावधीतील विजेते खेळाडू-प्रिथीसिंग (बारियाचे), अभयसिंग, हनुतसिंग व जयपूरचे महाराज (दुसरा सवाई मानसिंग) हे भारतातील उत्कृष्ट पोलो खेळाडू होत. अलीकडे भारतीय सैन्यातील घोडदळाची संख्या कमी झाल्यामुळे या खेळालाही भारतात उतरती कळा लागल्याचे दिसून येते. १९७६ साली जयपूर येथे हत्तीवरून पोलो खेळण्यात आला. त्या सामन्यास चाळीस हजार प्रेक्षक उपस्थित होते.

पोलोचे आंतरराष्ट्रीय सामने १८८६ साळापासून इंग्लंड व अमेरिका यांच्या संघांत ‘वेस्टचेस्टर कप’साठी सुरू झाले. त्यांपैकी तीन सामने (१८८६, १९०२ व १९१४) इंग्लंडने जिंकले; तर अमेरिकेने सात सामने (१९०९, १९११, १९१३, १९२१, १९२४, १९२७ व १९३०) जिंकले. ऑलिंपिक सामन्यांतही पोलोचा अंतर्भाव करण्यात आला व १९००, १९०८, १९२०, १९२४ व १९३६ या वर्षी त्याच्या स्पर्धा झाल्या. १९३६ च्या सप्टेंबरमध्ये ‘मेडो ब्रुक क्लब’, लाँग आयलंड (न्यूयॉर्क) येथे अर्जेंटिना विरुद्ध अमेरिका या सामन्यात अर्जेंटिनाने २१ तर अमेरिकेने ९ असे एकूण ३० गोल केले. हा एक जागतिक विक्रम मानला जातो. टॉमस हिचकॉक (जूनिअर), डेव्हेरूक्स मिलबर्न, स्ट्यूअर्ट इगलहार्ट, लॅरी वॉटरबरी इ. अमेरिकेतील; सी. टी. आय्. रोअर्क, लेस्ली चीप, मेजर व्हिव्हियन लॉकेट इ. इंग्लंडमधील तसेच ल्यूइस लेसी व मॅन्युएल अ‍ॅन्ड्रादा हे अर्जेंटिनामधील उत्कृष्ट पोलो खेळाडू होत.

पोलो या खेळाचे वेगवेगळे प्रकार उत्तरोत्तर उदयास आल्याचे दिसून येते. हत्तीवरील पोलोचा उल्लेख पूर्वी आलेलाच आहे. त्याशिवाय अंतर्गेही (इन्‌डोअर) पोलो, वॉटर पोलो [→ पोहणे], सायकल-पोलो यांसारखे प्रकार पुढे आले. अंतर्गेही पोलो साधारणपणे बंदिस्त जागेत मुद्दाम समस्तर बनवलेल्या पृष्ठभागावर खेळला जातो. गोलाच्या खांबांऐवजी पुष्कळदा भिंतींवर रंगाचे पट्टे दर्शविलेले असतात. तीन-तीन जणांचे संघ हा पोलो खेळतात. या खेळातीळ चेंडू रबराचा असून त्याचा व्यास ११·४३ सेंमी. व वजन ०·१८ किग्रॅ. असते. या खेळाच्या सामन्यात साडेसात मिनिटांचे चार चक्कर असतात.

सायकल पोला या खेळाची सुरुवात भारतातच पहिल्या महायुद्धानंतर झाली. १९२६ च्या सुमारास बारियाचे महाराजकुमार सुभक सिंग यांनी सायकल पोलोचा संघ तयार केला होता. त्यानंतर या खेळात अनेक चढउतार झाल्याचे दिसून येते. १९५५ साली हैदराबाद येथे सेनादलातर्फे अखिल भारतीय सायकल पोलो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १९६६ साली हैदराबाद येथे ‘सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडिया’ ही संघटना स्थापन झाली. या संघटनेने या खेळाच्या काही नियमांत सुधारणा केल्या. उदा., टेनिसच्या चेंडूचा वापर. या राष्ट्रीय संघटनेतर्फे दिल्ली (१९७४), हैदराबाद (१९७५), जयपूर (१९७६) व पुन्हा दिल्ली (१९७७ व १९७८) येथे राष्ट्रीय स्पर्धा भरवण्यात आल्या.

संदर्भ : 1. Board, John, Polo, London, 1956.

2. “Marco” (Earl Mountbatten of Burma), An Introduction to Polo, London, 1965.

3. Vickers, W. G. H. Practical Polo, London, 1969.

स्त्रोत -मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate