हातापायांच्या हालचालीने नैसर्गिक रीतीने पाण्यातून सरकण्याची क्रिया. हा एक अत्यंत लोकप्रिय असा, व्यायामदायक व रंजक क्रीडाप्रकार आहे. ज्या देशांना समुद्रसान्निध्य लाभलेले आहे, त्या देशांत पोहण्याचा आनंद मोठ्या प्रमाणात घेतला जातो. उंट वगळता अन्य चतुष्पाद प्राणी, मासे, पायाची बोटे जोडलेले पक्षी, सरपटणारे प्राणी यांना निसर्गतःच पोहण्याची देणगी असते. माणसाला मात्र पोहण्याचे खास शिक्षण घ्यावे लागते. इतर कोणत्याही व्यायामापेक्षा पोहण्यामुळे शरीरातील जास्तीत जास्त स्नायूंना व्यायाम मिळतो.
पोहण्याची कला मानवाला प्रागैतिहासिक काळापासूनच ज्ञात असावी, असे प्राचीन शिल्प, साहित्य वगैरेंच्या संदर्भावरून दिसून येते. सु. ११,००० वर्षांपूर्वीच्या लिबियन डेझर्टमधील एका गुहाचित्रामध्ये पोहणाऱ्या माणसांची रेखाटने आढळतात. इ. स. पू. २१६० च्या सुमारास एका ईजिप्शियन सरदाराने आपल्या मुलांच्या पोहण्याच्या शिक्षणाचा निर्देश केला आहे. इ. स. पू. ८८० च्या सुमारास अॅसिरियन सैनिक आधुनिक क्रॉलसदृश पद्धतीने पोहत असल्याचे एका शिल्पावरून दिसते. प्राचीन भारतीय पौराणिक वाङ्मयातही पोहण्याशी संबंधित असे निर्देश आढळतात. कृष्णाच्या व गोपींच्या जलक्रीडा सर्वश्रुतच आहेत. भीमाच्या गदेचा प्रहार चुकवण्यासाठी दुर्योधनाने कुंभक करून पाण्यात बैठक मारल्याची कथा महाभारतात आढळते. या उल्लेखांवरून प्राचीन काळी भारतात पोहण्याची व पाण्यात बुडणाराला वाचवण्याची कला अवगत असावी, असे अनुमान काढता येते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जपान इ. देशांत या कलेचा अभ्यास सुरू होण्यापूर्वी, भारतात ज्या पद्धतीने पोहत असत, त्याला ‘इंडियन स्ट्रोक’ असे म्हणण्यात येते. ह्यालाच ‘शेरण्या’ किंवा ‘वरचे हात’ असे म्हणतात. प्राचीन ग्रीस व रोम या देशांतही पोहण्याची कला फार लोकप्रिय होती. सैनिकी प्रशिक्षणाच्या दृष्टीनेही पोहण्याचे कौशल्य महत्त्वाचे मानले जाई. जपानमध्ये इ. स. पू. ३६ मध्ये सुजीन सम्राटाच्या कारकीर्दीत पोहण्याची स्पर्धा झाल्याचे उल्लेख सापडतात. इ. स. १६०३ मध्ये तर पोहणे हा शालेय अभ्यासक्रमाचा अविभाज्य घटक बनला. मध्ययुगीन यूरोपमध्ये मात्र पोहण्याची कला मागे पडली. पोहण्यामुळे रोगाच्या साथी पसरतात, असा अपसमज त्यामागे होता व एकोणिसाव्या शतकापर्यंत तो टिकून होता. १६६० पासून समुद्रस्नान करण्याची प्रथा उत्तर यॉर्कशरमध्येही असल्याचे दिसून येते. एकोणिसाव्या शतकात पोहण्याला स्पर्धात्मक क्रीडेचे स्वरूप आले. पोहण्याच्या विविध पद्धती (स्ट्रोक्स) त्या काळात प्रचलित झाल्या. १८३७ पासून ब्रिटनमध्ये पोहण्याच्या स्पर्धा सुरू झाल्या. तदनंतर या स्पर्धा इतर देशांतूनही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाल्या. १८९६ साली अथेन्स येथे ऑलिंपिक सामन्यांचे जे पुनरुज्जीवन झाले, त्यात पोहण्याच्या सामन्यांचा अंतर्भाव झाला. १९०४ साली पाण्यातील उड्या वा सूर (डाइव्ह) मारण्याच्या खेळाची त्यात भर पडली. १९१२ साली स्त्रियांचे सामने सुरू झाले.
पोहण्याचे प्रशिक्षण : पोहण्याच्या शिक्षणपद्धतीविषयी अनेक मते आढळतात. तथापि दोनच विचारसरणी मुख्यत्वे प्रचलित आहेत. यूरोपीय विचारसरणी ‘गोल हाताची पद्धत’ (ब्रीस्ट स्ट्रोक) प्रथम शिकवावी, असे प्रतिपादते; तर अमेरिकन विचारसरणी ‘सरपट पद्धत’ (क्रॉल) सुरुवातीस शिकवावी, यावर भर देते. मात्र पोहताना कोणत्या हालचाली कराव्या लागतात, याची कल्पना येण्यासाठी जमिनीवर किंवा उथळ पाण्यात कवायती कराव्यात, असे दोन्ही पद्धती मानतात.
पोहावयास शिकणाराची पाण्याची भीती नाहीशी होण्यासाठी त्याला एकदम पाण्यात ढकलून देण्याची प्रथा सर्वसाधारणपणे दिसते. परंतु अशा दांडगाईचा परिणाम उलट होण्याचा संभव असतो. पाण्याची स्वाभाविक भीती आणि मनोदौर्बल्य यामुळे शिकणाऱ्याच्या स्नायूंवर ताण पडतो. अवयवांची वेगात हालचाल केल्याने आणि ते शिथिल करता येत नसल्याने त्या अडचणीत भरच पडते. विद्यार्थ्याने शिक्षकाबरोबरच हळूहळू गळ्यापर्यंत पाण्यात शिरले असता त्याला तितकी भीती वाटत नाही. उथळ पाण्यात बुचकळ्या मारण्यापूर्वी दीर्घ श्वास घेऊन पाण्यात डोक बुडवून तोंडातून आणि नाकातून उच्छ्वास केला म्हणजे पोहताना श्वासोच्छ्वास कसा करावा, हे ध्यानात येते. शिक्षकाने विद्यार्थ्यांला पोटाखाली वा पाठीखाली हाताचा आधार देऊन; किंवा (दोरी काचू नये म्हणून) रबरी नळीचे वेष्टन असलेल्या दोरीचे कमरेभोवती वेटोळे करून ती काठीला बांधून त्याला काठावरून आधार देऊन शिकविणे सोपे जाते. शिकावयास सुरुवात करताना हवा भरलेली रबरी नळी, पोहावयाचे जाकीट, भोपळे, लाकडाची रुंद फळी, बंद डबे किंवा तत्सम पदार्थांचा कित्येकदा उपयोग केला जातो. कमरेपर्यंत असलेल्या पाण्यात ओणवून आणि दीर्घ श्वास घेऊन कमरेवरचा भाग पाण्यात जाऊ दिला व हात ताठ केले, की जमिनीवरचे पाय सुटून पोहणारा पाण्यात तरंगू लागतो. त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन, तोंड पाण्यात बुडवून, पाय मागे जातील तितके ताणून, हात डोक्यावरून पुढे ताणले, की शिकणारा पोटावर पालथा तरंगू शकतो. पाण्यावरून अधोमुख सरकत जाण्यासाठी पुढे वाकून, जुळविलेले हात डोक्यांवरून पुढे ताठ करीत खांदे पाण्याखाली नेऊन, दीर्घ श्वास घेऊन तोंड पाण्यात बुडवाने आणि पायाने पाणी रेटावे. पुन्हा पाण्यात उभे राहण्याकरिता गुडघे शरीराखाली घेत हात पाण्यात घेऊन डोके वर काढावे. खांद्याइतक्या उथळ पाण्यात बसून, दोन्ही तळहात पाण्यातच ठेवून हात बाजूंना ताणीच, कमर वर उचलीत, पायाने रेटा देत, डोके मागे नेल्यास उताणे तरंगता येते. पुन्हा उभे राहताना गुडघे वर घेत हात पुढे ढकलून डोके खाली वाकवावे लागते. इतकी प्रगती झाल्यावर पाय मारावयास शिकण्यासाठी दोन्ही हातांनी काठाला धरून किंवा काठाला जोडलेल्या दांड्याला पकडून खालीवर पाय मारताना ते गुडघ्यात थोडे वाकवून घोटे सैल ठेवावे. पाय मारता येऊ लागले, की अधोमुख सरकत जाताना किंवा उताणे तरंगताना त्याचा उपयोग करावा.
पोहणाऱ्याला तरंगता येऊन पाय मारता आले, की कुत्रा पोहतो त्या पद्धतीने (डॉग पॅडल) हात मारावयास शिकवावे. पाण्यातल्या पाण्यातच एकाआड एक हात पुढे घेत, तळहाताने पाणी दाबीत ते खांद्याच्या रेषेत आणावे. मात्र कुत्र्याच्या पद्धतीने पोहण्यात वेग येत नाही आणि ही पद्धती आकर्षकही नाही.
दुसऱ्या महायुद्धात सैनिकांच्या अभ्यासक्रमात पोहणे हा विषय ठेवलेला होता. वीस ते तीस वर्षे वयाच्या सैनिकांना ही कला लवकर आत्मसात करता यावी, म्हणून उताणे पोहावयाच्या पद्धतीचा उपयोग करण्यात आला.
पोहण्याच्या पद्धती : पोहण्याच्या गोल हात पद्धत, कुशीवरील पद्धत (साइड स्ट्रोक), सरपट पद्धत व पाठीवरील पद्धत (बॅक स्ट्रोक) ह्या सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या मूलभूत पद्धती आहेत. ह्याच पद्धतींमध्ये काहीसे फेरफार होऊन ट्रजन पद्धत, फुलपाखरी (बटरफ्लाय) पद्धत, कुशीवरील वरचे हात (ओव्हरआर्म साइड स्ट्रोक) इ. अनेक उपप्रकार निर्माण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये मात्र चारच पद्धती अधिकृत मानल्या जातात त्या अशा : गोल हात पद्धत, पाठीवरील पद्धत, फुलपाखरी पद्धत व मुक्त शैली (फ्री स्टाइल).
‘फ्री स्टाइल’ ही नावाप्रमाणेच पोहण्याची मुक्त शैली असून, त्यात स्पर्धक जलतरणपटू त्याला हव्या त्या पद्धतीने पोहू शकतो. आधुनिक स्पर्धांमध्ये स्पर्धक ‘फ्रंट क्रॉल’ पद्धतीचाच विशेषतः वापर करतात, त्यामुळे कित्येकदा ‘फ्रंट क्रॉल’लाच ‘फ्री स्टाइल’ असे म्हटले जाते. वरील पद्धतींची पुढे थोडक्यात माहिती दिलेली आहे :
गोल हात पद्धत : प्राचीन काळात हातापायांची हालचाल एकमेकांना पूरक करण्याच्या कल्पनेतून या पद्धतीचा उगम झाला. याचेच पुढे गोल हात पद्धत आणि फुलपाखरी पद्धत असे दोन प्रकार झाले. दोन्ही पद्धतींत हात संपूर्णपणे पुढे नेल्यावर तळवे पाण्याकडे करून हात जुळविल्यानंतरच हात मारावयास प्रारंभ होतो. जुन्या पद्धतीत पाणी दाबताना आणि हात बाहेरून खांद्याच्या रेषेत येताना सु. ८० अंशांचा कोन करतात. हात छातीजवळ आणि कोपरे शरीराजवळ आख्यावर, तळहात खाली करून ते पूर्वस्थितीत नेतात. त्याचवेळी पाय वर घेतल्यावर ते फाकताना, तळवे वर काढून दोन्ही घोटे जवळ घेतात. नंतर दोन्ही हात पृष्ठभागातच पुढे ताणताना, हातांची बोटे जुळविल्यावर, हात फाकून एकदम झेप घेतात. एक आवर्तन पूर्ण झाल्यावर श्वास घेण्यासाठी क्षणभर पाण्याबाहेर तोंड काढतात आणि हात पुढे घेतानाच ते पुन्हा पाण्यात नेतात. हात मागे घेताघेताच पाय जवळ घेऊन ते बेडकासारखे झटकतात. फुलपाखरी पद्धतीत पाणी दाबीत हात मांड्यांपर्यंत गेल्यानंतर ते वर येताना त्यांची हालचाल वर्तुळाकृती होते. दोन्ही पद्धतींत वेग येण्यासाठी तोंड वर काढून श्वास घेतात आणि हात पुढे नेताना तोंड बुडवून पाण्यातच श्वास सोडतात. फुलपाखरी पद्धतीने जास्त वेगात पोहता येते.
कुशीवरील पद्धत : कुठल्याही कुशीवरून हात मारताना पाय कातरीसारखे मारतात. दोन्ही पाय ताठ करून, बोटे पाण्याकडे रोखीत, पाय गुडघ्यात वाकवून परत पृष्ठभागाजवळ आणतात. खालचा पाय गुडघ्यात वाकवून वर आणताना शरीराच्या मागे ठेवतात. दोन्ही हात आलटूनपालटून, छाती आणि डोक्याखालून पुढे ढकलताना पोहणारा पाण्यात कुशीवर निजल्यासारखा राहतो. वरील बाजूचा हात गालाजवळून आणि शरीराजवळून खाली नेताना तो मांडीजवळ आल्यावर पाण्याबाहेर काढतात. वर्तुळाकार झेप घेऊन पाय लांब केल्यावर ते एकमेकांजवळ घेतात. कुशीवरील वरचे हात मारताना वरचा हात पाण्याबाहेर ताणून त्याने पाणी ओढताना शरीर थोडेसे पुढे सरकत असल्याने या हातांनी अधिक वेग येतो.
ट्रजन पद्धत : वरचे हात आणि कातरीसारखी पायांची हालचाल मिळून ही पद्धत होते. जे. आर्थर ट्रजन याने १८७३ मध्ये ही पद्धत इंग्लंडमध्ये रूढ केली. त्याने ती दक्षिण अमेरिकेतील इंडियन लोकांकडून आत्मसात केली असावी, असे दिसते. स्पर्धात्मक पोहण्यात तिला तिच्या गतिशीलतेमुळे प्राधान्य आले. या पद्धतीचा उपयोग करून ट्रजन याने पूर्वीचे उच्चांक मोडल्याने ती पुढे इतरांनीही उचलली
सरपट पद्धत : या पद्धतीने पोहणारा पाण्यावर सरपटत गेल्यासारखे वाटत असल्याने त्यास ‘क्रॉल’ हे नाव पडले. ऑस्ट्रेलियातील स्थानिक लोकांत ही पद्धत रूढ असल्याने त्याला ‘ऑस्ट्रेलियन क्रॉल’ असेही म्हणण्यात येते. १९०२ साली रिचर्ड कॅव्हिल यांनी ती इंग्लंडमध्ये आणली. त्या पद्धतीने शर्यतीतून कॅव्हिल यांना यश मिळाल्याचे पाहून अमेरिकन जलतरणपटू सी. एम्. डॅन्येल्झ याने ही पद्धत शिकून, १९०६ मध्ये १०० यार्ड (९१·४४) अंतर कमीत कमी वेळात पोहून जागतिक उच्चांक प्रस्थापित केला. यानंतर ही वेगवान पद्धत स्त्रीपुरुषांनी उचलून तिला चाळीस वर्षांत परिपूर्णता आणली. या पद्धतीत हात किंचित वाकवून, कोपर वर उचलून, तोंडासमोर तो पाण्यात खुपसून शरीराच्या मध्यरेषेपर्यंत उभा आल्यावर, त्यात बाक घेऊन कटिभागापर्यंत अलग बाहेर काढतात. हात पुन्हा पुढे टाकताना पंजाचा झोक शरीरापासून दूर आणि हवेत उंच
अंतिम सुधारित : 10/7/2020