फुटबॉल म्हणजे पायचेंडू. पायाने खेळविला जाणारा, हवा भरलेला मोठा कातडी चेंडू. या सांघिक व मैदानी खेळाचे अनेक प्रकार आहे. त्यांपैकी दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे : (१) असोसिएशन फुटबॉल अथवा सॉकर आणि (२) रग्बी.
सॉकर हा प्रत्येकी अकरा खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये खेळला जातो. त्यात चेंडू हाताळणे वा तो हातात घेऊन पळत सुटणे नियमबाह्य मानले जाते. रग्बी वा रग्बी युनियन ह्या प्रकारात मात्र चेडू हाताळणे वा तो हातात घेऊन धावणे ग्राह्य मानतात. त्यातूनच रग्बी लीग हा वेगळा प्रकार १८९५ साली निर्माण झाला. रग्बी युनियन या प्रकारातून निर्माण झालेल्या अमेरिकन फुटबॉलमध्ये खूपच वेगळेपणा दिसून येतो. रग्बीमध्ये चेंडू पुढे पळवता येत नाही; या खेळात तो पुढेही नेता येतो. तसेच हा खेळ अधिक उग्र व आक्रमक असल्याने त्यात आडदांडपणा व धसमुसळेपणा जास्त आढळतो. कॅनडियन फुटबॉल हा अमेरिकन फुटबॉलशी साधर्म्य असलेला पण काही महत्त्वाचे फेरफार असलेला प्रकार आहे. आयर्लंडमध्ये खेळला जाणारा गेलिक फुटबॉल हाही एक आडदांड प्रकार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणारा ऑस्ट्रेलियन फुटबॉल हा जुन्या गेलिक फुटबॉलचे काही नियम आत्मसात केलेला तथापि वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. या सर्व प्रकारांची माहिती नोंदीत पुढे दिली आहे. यांपैकी सॉकर हा खेळ जास्त लोकप्रिय असून तो जगातील बहुतेक देशांतून खेळला जातो. भारतात ब्रिटिशांच्या बरोबर आलेला फुटबॉल म्हणजे सॉकरच होय.
आधुनिक फुटबॉलशी कमीअधिक साधर्म्य असलेले काही खेळ प्राचीन काळापासून अस्तित्वात होते. चीनमध्ये इ.स.पू. चौथ्या व तिसऱ्या शतकांत ‘त्सू-चू’ नामक असाच एक खेळ रूढ होता. प्राचीन ग्रीसमध्ये ‘हरपास्टॉन’ हा फुटबॉलसदृश खेळ होता; तोच पुढे रोमन काळात विशेषतः रोममध्ये ‘हरपास्टम’ या नावाने लोकप्रिय झाला (इ.स.पू. दुसरे शतक). रोमनांकडूनच हा खेळ ब्रिटिश बेटांवर प्रसृत झाला असावा, असे एक मत आहे. याबाबत एकवाक्यता नसली, तरी प्राचीन व मध्ययुगीन ब्रिटनमध्ये फुटबॉल मोठ्या प्रमाणावर खेळला जात होता, हे निर्विवाद खरे. अगदी प्रारंभीच्या काळात चेंडूऐवजी तशाच अन्य गोलाकार वस्तूंचा -उदा., मानवी कवट्या, जनावरांचे फुगीर मूत्राशय, शेवाळाने वा वाळूने भरलेल्या पिशव्या इ.- वापर होत असल्याचे उल्लेख सापडातत. सर्वात आद्य चेंडू म्हणजे एका डेन राजाची कवटी असावी, अशीही माहिती आढळते. त्यावरून या खेळाला प्रारंभीच्या काळात ‘किकिंग द डेन्स हेड ’ किंवा ‘किकिंग द ब्लॅडर’ असेही संबोधले जात असे. साधारणपणे बाराव्या शतकापासून सध्याचा फुटबॉल प्रचलित झाला. विल्यम फिट्झस्टिव्हनच्या हिस्टरी ऑफ लंडन (सु. ११७५) ह्या पुस्तकात ‘श्रोव्ह ट्यूझ्डे’ या धार्मिक सणाच्या दिवशी खेळल्या गेलेल्या फुटबॉल सामन्याचे वर्णन आढळते. पुढे पुढे तर इंग्लंडमध्ये श्रोव्ह ट्यूझ्डे हा फुटबॉल-दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. या खेळाचे स्वरूप त्या काळी अतिशय आडदांड, अनियमित व धोकादायक बनले होते. हे सामने कित्येकदा दोन गावांमध्ये चालत; त्यांत शेकडो माणसे झुंडींनी भाग घेत; ते तासन्तास खेळले जात व अखेरीस चेंडू प्रतिस्पर्धी गावाच्या हद्दीत गेल्यावरच ते संपत. अन्य उत्सवांच्या दिवशीही - उदा., ‘कँडलमन्स डे’- असेच फुटबॉलचे सामने होत. या खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे धनुर्विद्येसारखे लष्करी कौशल्याचे खेळ मागे पडू लागल्याने त्यावर दुसऱ्या हेन्रीने (११५४ - ११८९) आणि उत्तरकालीन राज्यकर्त्यांनी अनेकदा बंदी घातली, तथापि त्यातूनही त्याची लोकप्रियता टिकून राहिली व उत्तरोत्तर ती वाढतही गेली. इंग्लिश खेळांचा इतिहासकार जोसेफ स्ट्रट याने अशा एका सामान्याचे वर्णनही केले आहे (१८०१). या नियमविरहित, आडदांड व झुंडीच्या खेळाला एकोणिसाव्या शतकात काहीसे नियमबद्ध व क्रिडाप्रवण स्वरूप लाभले. शेफील्ड, नॉटिंगॅम, ऑक्सफर्ड, केंब्रिज व लँकाशर परगण्यांतील काही नगरी केंद्रांतून एक वेगळाच फुटबॉल हळूहळू उदयास आला; त्यात सॉकर व रगर (रग्बीचे प्राथमिक रूप) या दोहोंचेही मिश्रण होते, तथापि चेंडू हाताळण्यास परवानगी नव्हती. या फुटबॉल सामन्यांतून खेळाडूंची संख्या निश्चित होत गेली. प्रत्येक संघात अकरा खेळाडू व त्यात एक गोलरक्षक, एक पूर्ण-पिछाडी, एक निम्न-पिछाडी, एक निम्न-पिछाडी व आठ आघाडी खेळाडू अशी संघरचना अस्तित्वात आली त्यातूनच सध्याच्या सॉकरचा हळूहळू उगम झाला.
फुटबॉलच्या नियमांना व कायदेकानूंना अधिकृत रूप देण्यासाठी २६ जुलै १८६३ मध्ये लंडन येथे ‘फुटबॉल असोसिएशन’ या संघटनेची स्थापना झाली, त्याच वर्षी ‘असोसिएशन फुटबॉल’ ही संज्ञा व तिचे बोलीभाषेतील रूप ‘सॉकर’ हेही रूढ झाले. पुढील वीस वर्षांत आधुनिक फुटबॉल चांगलाच स्थिरावला. १८८३ च्या सुमारास चेंडू सरकवण्याचे (पासिंग) तंत्र विकसित झाल्याने संघरचनेतही काही फेरफार झाले : एक गोलरक्षक, दोन पूर्ण-पिछाडी, तीन निम्न-पिछाडी व पाच आघाडी खेळाडू अशी आधुनिक रचना अस्तित्वात आली. जगातला सर्वात जुना क्लब इंग्लंडचा ‘शेफील्ड फुटबॉल क्लब’ (१८५७) होय. इंग्लंडमध्ये सॉकरचा पहिला अधिकृत सामना १८६६ मध्ये लंडन विरूद्ध शेफील्ड या दोन क्लबांमध्ये झाला. १८७१ साली ‘फुटबॉल चॅलेंज कप’ सामने सुरू झाले. याच सुमारास इंग्लंडमधील निरनिराळ्या फुटबॉल क्लबांतून धंदेवाईक खेळाडू खेळू लागल्यामुळे हौशी खेळाडूंची कुचंबणा होऊ लागली, म्हणून १८९३ साली हौशी खेळाडूंसाठी ‘फुटबॉल असोसिएशन अमॅच्युअर कप’ सामने सुरू झाले. अल्पावधीतच हा खेळ जगभर लोकप्रिय झाला व त्याचे नियमन करण्यासाठी ‘फेडरेशन इंटरनॅशनेल दी फुटबॉल असोसिएशन’ (एफ्. आय्. एफ्. ए.) ही जागतिक संघटना १९०४ साली पॅरिसमध्ये स्थापना झाली. या संघटनेमार्फत १९३० पासून विश्वकरंडक (वर्ल्ड कप) स्पर्धा भरवण्यात येऊ लागल्या. दर चार वर्षांनी भरणाऱ्या या स्पर्धांमध्ये प्रमुख देशांचे राष्ट्रीय संघ भाग घेत असतात. सॉकरचा ऑलिंपिक सामन्यांमध्ये १९०८ पासून व आशियाई सामन्यांमध्ये १९५२ पासून समावेश करण्यात आला. १९५५ साली फक्त यूरोपीय देशांपुरत्या ‘यूरोपियन करंडका’ च्या सामन्यांना प्रारंभ झाला.

माहिती संकलन - अमरीन पठाण
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020