(एकपात्री नाट्यप्रयोग). अलीकडील काळात नव्यानेच रंगभूमीवर आलेला एक अभिनव नाट्यप्रयेग. हा प्रयोग प्रचलित नाट्यप्रयोगाहून वेगळ्या प्रकारचा असतो. या प्रकारात एकच पात्र रंगमंचावर येऊन स्वतःच विविध पात्रांचे संवाद म्हणून दाखविते व प्रसंगी आनुषंगिक घटनांचे वर्णनही करते. अशा एकपात्री स्वरूपामुळे संवादाबरोबरच निरूपणाचाही भाग त्यात अपरिहार्यपणे असतो. या प्रकारात अभिनयकौशल्याची नितांत गरज असते; त्या मानाने नेपथ्य किंवा वेशभूषा यांना फारसा अवसर नसतो. फार तर विविधरंगी प्रकाश-झोतांच्या साह्याने वेशभूषेत प्रसंगोचित असा थोडासा बदल करणे शक्य असते. अशा प्रकारे अत्यंत अल्प अशा रंगभूमीय साधनसामग्रीद्वारा एकपात्री नाट्यप्रयोग केला जातो.
मत्स्यपुराणामध्ये मुद्राभिनय करणाऱ्या शिवाच्या मूर्तीचे जे वर्णन केले आहे, त्यावरून नटराज हा एकपात्री नाट्यप्रयोगाचा जनक होता, असे म्हणावे लागेल. भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये ‘भाण’ हा नाट्यप्रकार एकच नट करून दाखवीत असल्याचा उल्लेख आहे; परंतु तो प्रकार एकपात्री नाट्यप्रयोगापेक्षा नाट्यछटेला अधिक जवळचा वाटतो. ⇨ एस्किलस या प्राचीन (इ.स.पू. ५२५ – ४५६) ग्रीक नाटककाराने ग्रीक रंगभूमीवर प्रथमच दुसरा नट आणला; तत्पूर्वी तेथे एकपात्री नाट्यप्रयोगच होत असत. तसेच ब्रह्मदेशातील माँग खे या नर्तकाने भारतीय खलाशाच्या जीवनावर एकपात्री नाट्यप्रयोग केल्याचा उल्लेख मिळतो.
एकपात्री नाट्यप्रयोगाची बीजे महाराष्ट्रातील बहुरूपी, नकलाकार व कीर्तनकार यांच्या सोंगा-नकला-कीर्तनांत असल्याचे दिसून येईल. गेल्या शतकात इंग्लंडमधील प्रसिद्ध कादंबरीकार चार्ल्स डिकिन्झ आपल्या ‘टेव्हिस्टॉक हाउस’ या नाट्यगृहात स्वलिखित कादंबऱ्यांतील उताऱ्यांचे नाट्यपूर्ण वाचन जाहीर रीतीने करीत असे. अलीकडे एमलिन विल्यम्स या प्रसिद्ध नट-नाटककाराने डिकिन्झच्या कादंबऱ्यांतील उताऱ्यांचे नाट्यपूर्ण वाचन लंडनमध्ये डुरी लेन नाट्यगृहात सुरू केले. त्याला फार लोकप्रियता लाभली. त्याच धर्तीवर मराठी रंगभूमीवर पु. ल. देशपांडे यांनी आपल्या बटाट्याची चाळ या एकपात्री नाट्यप्रयोगाने अशाप्रकारच्या कार्यक्रमांना सुरूवात केली व मुरलीधर राजूरकर, पद्माकर गोवईकर आणि रंगनाथ कुलकर्णी यांनी अनुक्रमे नमुनेदार माणसे,मुंगी उडाली आकाशी व एका गाढवाची कहाणी या आपल्या स्वरचित कार्यक्रमांनी ती परंपरा चालू ठेवली आहे. सुहासिनी मुळगावकर यांनी सौभद्र व मानापमान या जुन्या लोकप्रिय संगीत नाटकांतील भिन्न पात्रांचे संवाद एकटीनेच म्हणून दाखविण्याची नवीनच प्रथा सुरू केली. या नाट्यप्रयोगात त्यांचा सर्व भर संवाद आणि अभिनय यांवरच असतो.
रंगभूमीवर सादर केला जाणारा एकपात्री नाट्यप्रयोग आणि विविधपात्री नाट्यप्रयोग यांत फरक आहे.सौभद्रसारख्या मूळच्या अनेकपात्री नाटकाचे एकपात्री नाट्यप्रयोगात रूपांतर केले जाते हे खरे; परंतु नाटक एवढ्याच साहित्यप्रकारापुरता एकपात्री प्रयोग सीमित नसतो. नाट्यगुण असलेल्या कथा, कादंबऱ्या, विनोदी साहित्य यांचेही एकपात्री नाट्यप्रयोगानुकूल रूपांतर केले जाते. एवढेच नव्हे, तर आचार्य अत्र्यांसारख्या नाट्यमय जीवन जगलेल्या व्यक्तीवरही एकपात्री नाट्यप्रयोगाची उभारणी करता येते. मी अत्रे बोलतोय या सदानंद जोशींच्या प्रयोगात केवळ नकलेपेक्षा अधिक काहीतरी आढळते व हे अधिक काहीतरी एकपात्री नाट्यप्रयोगाच्या स्वरूपाचे निदर्शक ठरते.
एकपात्री नाट्यप्रयोगाचे यश दोन गोष्टींवर अवलंबून आहे. पहिली गोष्ट म्हणजे असा प्रयोग सादर करणाऱ्याचे अभिनव कौशल्य. त्यातच प्रयोगकाराच्या लवचिक व परिवर्तनक्षम आवाजांचा, निरूपणकौशल्याचा व संवादभिव्यक्तीचा अंतर्भाव होतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्रायोगिक मजकुराची गुणवता. एकपात्री नाट्यप्रयोगाचे रंगपाठ प्रयोगकार स्वतःच तयार करीत असतो. एका अर्थाने तो एकपात्री नाट्यलेखक व नट अशा दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडीत असतो. म्हणूनच एकपात्री नाट्यप्रयोगाचे यश नाटकाप्रमाणे सांघिक प्रयोगावर अवलंबून नसून, एकाच व्यक्तीच्या गुणवत्तेवर अधिष्ठित असते.
एकपात्री नाट्याचे रंगपाठ नाटकाप्रमाणे स्वतंत्रपणे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्यास या अभिनव प्रकाराच्या प्रसारास हातभार लागेल आणि रंगभूमीच्या विकासाचे हे एक नवे दालन खुले होईल.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020