অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बालकांचे खेळ

बालकांचे खेळ

बालकाच्या मनावर खेळाची आवड कोणी बाहेरून लादलेली नसते; तर ती स्वयंस्फूर्तच असते. ही उपजत आवड मुलाला एका जागी स्वस्थ बसू देत नाही. त्याला काहीतरी हालचाल करायलाच लावते. जी हालचाल प्रिय, ती हालचाल मूल वारंवार करते. तसेच प्रौढांचे अनुकरण करण्याची प्रवृत्तीही मुलांमध्ये जात्याच असते. या हालचालीतून व अनुकरण-प्रवृत्तीतून खेळाचा जन्म होतो. अशा रीतीने क्रीडेकडे मुलांची स्वाभाविक ओढ असते. क्रीडा ही सर्जनात्मक सहजप्रवृत्तीतून निर्माण होणारी नैसर्गिक क्रिया आहे. प्राणिमात्रांमध्ये ती कमीअधिक प्रमाणात दिसून येते. शिकण्याची वृत्ती अधिक असलेल्या प्राण्यांत क्रीडाप्रवृत्तीही अधिक दिसते. क्रीडेतील निर्माणक्षमता ही आनंददायी असते. त्याचमुळे आबालवृद्ध खेळात रमतात. कर्तृभाव म्हणजे कर्तृत्व गाजवण्याची इच्छा, ही मुलांना खेळाकडे खेचत असते. खेळ म्हणजे मुलांच्या शिक्षणाची निसर्गाने केलेली व्यवस्थाच होय. मुलांची वाढ त्यांच्या खेळावरच अवलंबून असते. खेळ हे मनाच्या व शरीराच्या निरोगीपणाचेच लक्षण होय. खेळापासून त्यांना परावृत्त केले की, ती स्वाभाविक चिडखोर, तुसडी व एकलकोंडी बनतात. मूल खेळत नसेल तर ते निरोगी नाही, त्याच्यात जन्मजात विकृती आहे, असे मानसशास्त्र मानते.

खेळांचे अनेकविध प्रकार आहेत. त्यांत वयोमानानुसार शिशुगटाचे, बालकांचे, कुमारांचे, तरुणांचे, प्रौढांचे, वृद्धांचे असे नानाविध प्रकार आढळून येतात. प्रस्तुत नोंदीत बालकांच्या म्हणजे साधारणपणे दोन ते बारा वर्षांपर्यंतच्या मुलामुलींच्या खेळांचाच विचार फक्त अभिप्रेत आहे.अडीच ते पाच वर्षांच्या मुलांना बदलत्या हालचाली करणे आवडते. त्यांना नावीन्याची गोडी असते. स्वच्छंदपणाने बागडणे, खाली डोके आणि वर पाय करणे, कोलांट्या उड्या मारणे, लंगडी घालणे वगैरे खेळ ही मुले खेळतात. मुले मोठी होऊ लागली, की त्यांची कल्पनाशक्ती व चैतन्यशक्ती वाढते. या अतिरिक्त शक्तीला मोकळी वाट करून देण्याचा खेळ म्हणजे एक मार्ग असतो. कल्पनाशक्तीमुळेही मुले प्रौढांचे अनुकरण करू लागतात. उदा., ⇨ बाहुलीचा तसेच भातुकलीचा खेळ. तसेच ती नवनवीन रचना करू लागतात. उदा.,मेकॅनोचा खेळ, लहान तिचाकी सायकलवर बसून प्रौढाप्रमाणे मोटार चालविण्याचा आव आणणे, काठीचा घोडा-घोडा करणे, आगगाडीप्रमाणे झुक्-झुक् आवाज करीत पळणे इत्यादी.

उद्यानात गेल्यावर ही मुले घसरगुंडी, झोके,‘सी-सॉ,’‘पिरॅमिड’,‘मेरी-गो-राउंड’ यांसारख्या क्रीडासाधनांच्या साहाय्याने खेळतात. कालांतराने ह्या खेळातही त्यांना स्वारस्य वाटत नाही. आठ ते बारा वर्षांपर्यंत त्यांची शारीरिक उंची वाढू लागते आणि त्याचबरोबर त्यांच्या आवडी-निवडींमध्येही फरक पडतो. शौर्याचे, कौशल्याचे खेळ त्यांना आवडू लागतात. त्यामुळे मुले आपापसांत मारामाऱ्यांचे खेळ, लुटुपुटीच्या लढाया व शिकारीचे खेळ खेळतात. त्यातून नकळत भावी आयुष्यासाठी त्यांची बचाव व आक्रमणाची पूर्वतयारीच होत असते. याच काळात ईर्षा व स्पर्धा या वृत्तीही वाढीस लागतात आणि मुले रस्सीखेच, कुस्ती हे खेळ अधिक पसंत करतात. रांगत्या वयात फिरता भोवरा पाहण्यात मौज वाटत होती, आता त्यांना आपल्या हातांनी भोवरा फिरवल्याशिवाय चैन पडत नाही. काही मुले पतंगाचे पेच घालू लागतात, तर त्याचवेळेला इतर मुले कुस्तीचे पेच सोडवतात. पूर्वी चेंडूशी खेळणारी मुले आता क्रिकेटचे धडे गिरवू लागतात. मुलींचे मन सागरगोटे, दोरीवरच्या उड्या, झिम्मा, फुगडी, नृत्य यांसारख्या खेळांकडे नैसर्गिक रीत्याच आकृष्ट होते.

अशा रीतीने तान्ह्या मुलाला खुळखुळा, रांगणाऱ्याला भोवरा, उभे राहणाऱ्याला पांगुळगाडा, दंगेखोर मुलाला चाक फिरवणे, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करणे व गाडा ओढणे या खेळांबद्दल ओढा वाटू लागतो आणि या खेळांतूनच बालकांचे वय वाढत असते. भोवतालच्या परिस्थितीशी संबंध येताच मुलाला लाकडी घोड्यावर बसण्यात गोडी वाटत नाही, तर तो खऱ्या घोड्यावर बसण्यासाठी धडपडतो. हळूहळू वाढत्या वयातील खेळांत नियमबद्धता, व्यवस्थितपणा येऊ लागतो.

हल्ली शिक्षणात खेळांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. त्यामुळे दोन ते बारा या वयोगटांतील मुलांना त्यांच्या मनोवृत्तींनुसार निरनिराळे खेळ शिकविले जातात. साधारणपणे पाच वर्षांच्या मुलामुलींना एकत्रित टाळ्यांचे खेळ, सांघिक गाणी व छोटी छोटी नृत्ये शिकवली जातात. सहाव्या वर्षी टिपरी, लेझीम यांसारखे खेळ; तर सातव्या वर्षी लेझीमचे पुढचे हात, कवायती व अधिक कौशल्ययुक्त नृत्ये शिकवली जातात. या शैशवावस्थेत तालबद्ध व गतिमान खेळांची मुलांना स्वाभाविक आवड असते. आठव्या-नवव्या वर्षापासून मात्र मुलांना चुरशीच्या स्पर्धात्मक खेळांची गोडी लागते. अशा रीतीने चौथ्या इयत्तेत म्हणजे साधारणतः आठव्या वर्षापासून मुले स्पर्धात्मक खेळ चांगल्या प्रकारे खेळू शकतात. या वयात मुलांना काठीच्या कवायती व संचलने, नमस्कार,⇨योगासने व अन्य व्यायामप्रकार वगैरेंचे शिक्षणही दिले जाते. याचवेळी मुलांचे संघ करून त्यांना नियमबद्ध चुरशीचे सांघिक खेळ शिकवले जातात.

दोन ते बारा या वयोगटातील मुलांच्या खेळांमागील प्रेरणा व प्रवृत्ती यांचे स्थूल विवेचन पुढीलप्रमाणे करता येईल

मनोविश्लेषणात्मक

खेळातून मुलांच्या भावविश्वाचे प्रकटीकरण होते.उदा.,बाहुलीचा खेळ.मुलीशी आई कशी वागते व आईच्या वागणुकीबद्दल त्या मुलीला काय वाटते, ह्याचे सूचन या खेळातून होते.

रचनात्मक व संकलनात्मक प्रवृत्ती

यातून मुलांची विधायक व जिज्ञासू वृत्ती दिसून येते. उदा.,ठोकळ्यांची चित्रे बनविणे, मेकॅनो,पत्त्यांचा बंगला, मातीची चित्रे तयार करणे, किल्ले बांधणे इत्यादी.

पृथक्करणात्मक वृत्ती

हातात आलेल्या वस्तूची उकल करून पाहण्याची, त्याचे पृथक्करण करण्याची मुलांमध्ये असलेली प्रवृत्ती खेळांमध्येही आढळते.

आराधना वृत्ती

लहान मुलांमध्ये वडीलधाऱ्यांच्या आदर्शपूजनाची स्वाभाविक वृत्ती असते. त्यांना आदरणीय वा आदर्श वाटणाऱ्या प्रौढ व्यक्तींचे श्रद्धापूर्वक अनुकरण करण्याकडे त्यांचा कल असतो. ह्याचे प्रतिबिंब त्यांच्या खेळांतूनही उमटताना दिसते.

पोलादी नल्यांचा पृथ्वीगोल, पाळणा , आगगाडी, घसरगुंडी, हेलीकॉप्टर, झूला, सी-सॉ, यंत्रमानव यांसारख्या विविध खेळांमध्ये रममाण झालेली मुले व खेळाचा गोड शेवट : भातुकली

 

पुनरावर्तन सिद्धांत

(रीकॅपिट्युलेशन थिअरी). मुलांच्या खेळांतून मानवाच्या वांशिक इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. हा पुनरावर्तन सिद्धांत अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जी. एस्. हॉलने प्रथम मांडला. बालकाच्या विकसनशील अवस्थांमध्ये क्रमाक्रमाने, अजाणताच, मानवाच्या आदिम काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या सांस्कृतिक प्रगतीच्या वेगवेगळ्या अवस्थांतरांचे प्रतिबिंब त्याच्या खेळांतून पाहावयास मिळते. उदा., धनुष्यबाण, तलवारबाजी यांसारख्या खेळांतून पूर्वजांच्या ऐतिहासिक कृतींनाच क्रीडारूप लाभल्याचे दिसून येते.

बालकांच्या खेळांची वर्गवारी

सर्वांनी सर्वांशी खेळावयाचे खेळ

उदा., शर्यत, मोकाट-दौड इत्यादी. यांत प्रत्येकजण दुसऱ्याचा प्रतिस्पर्धी असतो. प्रत्येकालाच पहिले येण्याची इच्छा असते. मोकाट-दौडीत पळणे, चालणे, रांगणे, लंगडणे, उड्या मारणे या निरनिराळ्या हालचालींचा अंतर्भाव होतो. संगीतखुर्ची, चमचा-लिंबयांसारख्या रंजनपर खेळांच्या सामुदायिक स्पर्धा होतात. तद्वतच मुली दोरीवरच्या उड्यांसारख्या खेळांत रस घेतात.

एकाने अनेकांबरोबर खेळावयाचे खेळ

यांत शिवाशिवी, लपंडाव, आंधळी कोशिंबीर, छप्पापाणी, तोबा, वाघ-शेळी, धबाधबी इ. खेळांचा समावेश होतो. यातूनच पुढे लहान गट मोठ्या गटांशी खेळतात. उदा., साखळीची शिवाशिवी.

एकट्याने एकठ्याशी खेळावयाचे खेळ

द्वंद्वयुद्ध, कुस्ती, मुष्टियुद्ध, जंबिया, कमरओढ, रेटारेटी अशा अनेक प्रकारच्या लढती या गटात मोडतात. तद्वतच बुद्धिबळासारखे बौद्धिक कौशल्यावर आधारित खेळही यात येतात.

लहान संघाने दुसऱ्या लहान संघाशी खेळणे

यात निरनिराळ्या टप्प्यांच्या शर्यतींचा समावेश होतो. तीन पायांच्या शर्यती, उदा., पळण्याच्या गट-शर्यती (रिले-रेस), तसेच ⇨लंगडी,⇨कबड् डी ,⇨ खोखो हे नियमबद्ध सांघिक खेळ.

मिश्र खेळ

यात दोन किंवा अधिक खेळांचा मिलाफ झालेला असतो. वाकड्यातिकड्या उड्या, छूटचे खेळ तसेच विनोदी हालचालींचे खेळ, गोष्टीरूप खेळ असे रंजनाबरोबरच मानसिक व बौद्धिक शिक्षण देणारेही खेळ यात येतात. ‘जागा बदला!’ या खेळातून स्मरणशक्ती, ‘राम-रावण’ या खेळातून एखादी गोष्ट लक्षपूर्वक करण्याची पात्रता, ‘किल्लाफोड’ या खेळामधून चढाईचे गुण व चातुर्य अशा गुणांची जोपासना होते.

टप्प्यांचे खेळ व शर्यती

लहान संघांच्या गटांत टप्प्यांचे खेळ हा एक रूढ प्रकार आहे. त्यात प्रामुख्याने टप्प्यांच्या शर्यतीचा समावेश होतो. या शर्यतीत अंतर काटण्याच्या विविध पद्धती वापरून रंगत आणता येते. खेळाडूंची समान संख्या (सामान्यपणे तीन ते पाच) असलेले दोन संघ मैदानाच्या दोन भागांत समान अंतरांच्या टप्प्यांवर आपापले खेळाडू उभे करतात. दोन्ही संघातील समान क्रमांकांच्या खेळाडूने त्याला दिलेले अंतर कशा प्रकारे-म्हणजे पळून, चालून, उड्या मारून, लंगडून, रांगून, दोरीवरच्या उड्या मारून, कोलांट्या उड्या मारून वा चेंडू हाताने थापटून टप्पे पाडत-काटावयाचे ते ठरवून दिलेले असते. तसेच कधी पहिल्या खेळाडूकडे दांडू वा निशाण वा चेंडू देण्यात येतो. शर्यत सुरू झाली, की दोन्ही संघांतील पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूने ठरलेल्या पद्धतीने अंतर काटून दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला टाळी द्यावयाची, किंवा हातात असलेली वस्तू त्याच्या हातात द्यावयाची, दुसऱ्याने ठरलेल्या पद्धतीने अंतर काटून तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूस ती वस्तू द्यावयाची, अशा रीतीने ज्या संघाला शेवटचा खेळाडू ठरलेले अंतर प्रथम काटेल, त्यासंघाचा विजय होतो. या शर्यती वेगवेगळी साधने वापरून व अंतर काटण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून विविध प्रकारे खेळता येतात. या खेळात वैयक्तिक नैपुण्याला वाव असला, तरी एखाद्या खेळाडूची चूक झाल्यास सबंध संघालाच पराभव पतकरण्याची पाळी येते.

खास मुलींचे खेळ

व्यायाम व करमुणकीबरोबरच भावी आयुष्यात उपयुक्त ठरतील, अशा गुणांची जोपासना या खेळांमुळे होऊ शकते. फुगडी, झिम्मा, कोंबडा, पिंगा, ‘किकीचे पान बाई किकी’, ‘किसबाई किस’ हे मुलींचे काही खेळ होत.

साभिनय खेळ

या खेळात एखादी मनोरंजक गोष्टी सांगायची असते आणि ती सांगताना मुलांनी प्रसंगानुसार हावभाव करायचे असतात किंवा अभिनयासह गीत गायचे असते. उदा.,‘शाळा सुटली’ यासारखे अभिनय-गीत.

पूरक खेळ

या खेळातील हालचाली सांधिक मैदानी खेळांना पोषक व पूरक ठरतात. उदा., आट्यापाट्या, लगोऱ्या, लंगडी. लंगडीतच एका पायावर उडी मारण्याच्या व्यायामी (ॲथ् लेटिक) क्रीडाप्रकाराची तयारी होते.

सांघिक मैदानी खेळ

हे खेळ नियमबद्ध असतात. कबड्डी, खोखो, विटीदांडू, रस्सीखेच, चेंडूचे खेळ इत्यादी. यांपैकी काही खेळ बाह्य साधनांशिवायही खेळता येतात.

वैयक्तिक मैदानी खेळ

या खेळांतून मुलांचे वैयक्तिक कौशल्य वाढीस लागते. मेहनतीचे महत्त्व कळते आणि जीवनाला आवश्यक असणारा आत्मविअशवास बळावतो. यांत व्यायामी व मैदानी खेळांचे काही प्रकार मोडतात. मुले पळणे, उड्या मारणे, पोहणे इत्यादींचे शिक्षण घेऊ शकतात.

विदेशी खेळ

लहान मुले क्रिकेट, रिंग टेनिस, टेबल-टेनिस इ. व मुली नेटबॉलसारख्या खेळांचा सराव करू शकतात. पाश्चात्त्य देशांत हे खेळ तसेच व्यायामी खेळ बालवयातच शिकविले जातात. भारतातही अलीकडे नवव्या-दहाव्या वर्षांपासून मुलांना ह्या खेळांची ओळख करून देण्यात येते.

बैठे खेळ

यात पत्ते व पत्त्यांचे खेळ,  कॅरम, पटावरील खेळ, व्यापार, बुद्धिबळ इ. खेळ मुले फावल्या वेळात व सुटीत खेळतात.

कवायतीचे खेळ

यातून मुलांना शिस्त व स्वच्छता यांचे महत्त्व पटते. कवायत व खेळ यांची हल्ली सांगड घालण्यात आलेली आहे. क्रिकेटसारख्या खेळात फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांना ज्या हालचाली कराव्या लागतात, त्या कवायतीत बसवल्या असून लहान मुलांचे स्नायू संवेदनाक्षम अवस्थेत असतानाच त्यांना त्या कवायती शिकवल्या जातात. तसेच व्यायाम आणि खेळ यांचाही आजकाल समन्वय साधलेला आढळतो. खेळाडूंना अशाच व्यायामावर भर देण्यास सांगण्यात येते, की ज्यामुळे खेळांना आवश्यक असणारे अवयव मजबूत होतील व त्यास अनुकूल घाट प्राप्त होईल. व्यायामशाळांतून लहान वयातच मुलांना मलखांब, कसरतीचे खेळ, लाठी, लेझीम यांबरोबर आखाड्यात कुस्ती, जोडी व फरीगदग्याचे हातही शिकवले जातात.

मनोरंजनात्मक खेळ

दोन गटांतील मुलांनी आपल्या पायाखालून वा डोक्यावरून मागच्या मुलाला जलद चेंडू देणे, टोपी उचलणे, यांसारखे खेळ, तद्वतच गुडघ्यात फुटबॉल ठेवून पळण्याची शर्यत, होड्या व पाकिटे करण्याची शर्यत, ‘सेनापती कोण?’ अशा प्रकारच्या शर्यती व खेळ शारीरिक शिक्षणाच्या तासाला सामुदायिक रीत्या खेळणे मुलांना प्रिय वाटते. वर्तुळाकार बसलेल्या मुलांच्या पाठीमागे रुमाल टाकायचा व तो ओळखायचा हा तोब्याचा खेळ, तसेच चलाखीच्या खेळांत ‘शिवाजी म्हणतो’ यांसारखे खेळ; ज्ञानेंद्रियवर्धक खेळांत डोळे बांधून गाढवाला शेपटी लावणे, अडचणीतून प्रवास करणे; स्मरणशक्ती वाढविण्यासाठी ‘मी काय पाहिले’ ते सांगणे, स्मृतीतून चित्रे काढणे, कर्णेंद्रियक्षमता-चाचणीसाठी आवाज ओळखणे, शिट्टी वाजवणाऱ्यास पकडणे इ.; अचूक दृष्टीच्या चाचणीसाठी ‘दिवा कोठे आहे?’,‘हरणाचा माग काढा!’ ‘पाय कोणाचा?’ इ. खेळ; स्पर्शज्ञानासाठी स्पर्शाने वेळ ओळखण्यासारखे खेळ; घ्राणेंद्रियासाठी कांद्याच्या वासाने मार्ग ओळखणे यांसारखे खेळ खेळले जातात. इतर करमणुकीच्या खेळांत भेंड्या, संगीतखुर्ची, गोलातील खेळात चेंडू हुकवणे, ‘तळ्यात-मळ्यात’ ह्या खेळांत निवडलेल्या नेत्याचे अनुकरण करण्याचा खेळ;बेडूक-उडी, एकांडा शिलेदार, लांडगा आणि धनगर, चुरमुऱ्याची पिशवी फोडणे, सुईदोऱ्याची शर्यत, मेणबत्ती लावणे हे सामुदायिक खेळ असून, टप्प्यातील खेळांत फुटबॉल चालवणे, हातावर चालणे वगैरे खेळ मुले आवडीने खेळतात.

परदेशांतून खेळांचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर मान्य झाल्याचे दिसून येते. बाल्यावस्थेत मुलाला खेळाचे योग्य ते प्रशिक्षण दिल्यास तो मोठेपणी उत्कृष्ट खेळाडू होतो, हे तत्त्व तेथे पायाभूत मानले गेले आहे. त्यामुळे मुलांना त्यांच्या आवडीनिवडींनुसार व शरीरप्रकृतीला अनुरुप असे अनेक खेळ शास्त्रोक्त पद्धतीने शिकविले जातात. अमेरिकेत बेसबॉल, जपानमध्ये जूदो व जपानी साखळी, इंग्लंडमध्ये क्रिकेट अशी काही उदाहरणेही देता येतील.

आनंद मिळविणे हेच बालकांचे ईप्सित असते; त्या दृष्टीने खेळ हे साधनरुप असतात. तसेच जीवनात पुढे कराव्या लागणाऱ्या आवश्यक शारीरिक कृतींची रंगीत तालीमच खेळामध्ये घडते. आजकाल खेळांचे महत्त्व भारताताही वाढते आहे. सुदृढ भावी पिढी निर्माण करण्याचे कार्य शारीरिक शिक्षणामुळेच साध्य होऊ शकेल. असा एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे. खेळांमुळे बालकांचे शरीर सदृढ होते व मन निरोगी राहते, याचीही योग्य ती जाणीव निर्माण झालेली आहे.

खेळांतून मुलांना आज्ञाधारकपणा, समता, शिस्त, खिलाडूवृत्ती, वैयक्तिक जबाबदारीची जाणीव, सांधिक भावना, सावधानता, महत्त्वाकांक्षा वगैरे गोष्टींचा लाभ होतो. हे सर्व गुण राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. खेळामुळे बालकांना नैतिक शिक्षणाचेही पाठ मिळतात व चांगला नागरिक बनण्याचे शिक्षण मिळते.

संदर्भ :

1. Dattner, Richard, Design for Play, New York, 1969.

2. Edmundson, y3wuoeph; Burnup, Charles, Athletics for Boys and Girls, London, 1965.

3. Kohl, Marguerite; Young,Frederica, Games for Children, New York, 1967.

4. Leeming, y3wuoeph, The Real Book of Games, London, 1958.

5. Wood, Clement; Goddard, Gloria, The Complete Book of Games, New York, 1940.

६. केळकर, स. आ. बाल-खेळ, मुंबई, १९५६.

७. तेरणीकर, ग. के.; चिरमुले, प्र. गो. शालेय ॲथ्लेटिक्स : मैदानी शर्यती व खेळ, पुणे १९५८.

८. पंडित, बाळ ज. कुमारांचे खेळ, पुणे, १९६१.

९. पाटील, हिराजी, विविध क्रीडीप्रकार : सामने व स्पर्धा, पुणे, १९६४.

१०. मुजुमदार, द. चिं. संपा. व्यायाम-ज्ञानकोश, खंड पहिला, बडोदे, १९३६.

११. वझे, चिं. स.विविध खेळ, भाग ३, पुणे १९६५.

लेखक: बाळ ज. पंडित

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate