प्राचीन काळी गुहांतून वास्तव्य करणाऱ्या आदिमानवाने आपल्या बाहुल्या हाडे, लाकूड, दगड, माती अशा साध्या माध्यमांपासून केलेल्या असाव्यात. सपाट लाकडामध्ये कोरलेल्या जुन्यात जुन्या बाहुल्या प्राचीन ईजिप्शियनांच्या थडग्यांतून (इ.स.पू.सु. ३००० – २०००) सापडलेल्या आहेत. या प्रतिमांची संख्या त्या त्या माणसाजवळ असलेल्या नोकरांच्या संख्येइतकी असावी. ईजिप्त, ग्रीस, रोम येथील मुलांच्या थडग्यांत बाहुल्या पुरण्याची प्रथा होती, असे आढळून आले आहे.
या प्राचीन बाहुल्यांशी काही धार्मिक संकेत निगडित असावेत : सुफलता विधी, यातुविद्या व अन्य धार्मिक विधी यांतील एक सांकेतिक उपकरण म्हणून विशिष्ट प्रकारच्या बाहुल्या वापरल्या जात. काही बाहुल्या या शुभशकुनाच्या मानल्या जात. त्या पीकपाणी, दूधदुभते व समृद्धी आणणाऱ्या तसेच युद्धात जय मिळवून देणाऱ्या, रुग्णांना बरे करण्याचे सामर्थ्य असलेल्या मानल्या जात. तसेच त्या काळी माणसांचा भूताखेतांवर, मंत्रतंत्रावर, जादूटोण्यावर विश्वास असे. शत्रूला शिक्षा व्हावी, या इच्छेने मेणाची बाहुली करून शत्रूच्या शरीरावर जेथे जेथे त्रास व्हावा असे वाटत असे, तेथे तेथे टाचण्या टोचावयाची पद्धती काही समाजांत रूढ होती. आपल्या कुटुंबियांच्या नावाने जपानी लोक व चिनी लोकांत बाहुल्या तयार करीत असत. त्यांना जेवढे रोग होणे शक्य असेल ते त्या बाहुल्यांना झाल्याचे कल्पून, त्या अग्नीत जाळल्या म्हणजे त्या माणसांना केव्हाही रोग होऊ शकणार नाही, अशी समजूत असे. तथापि त्या काळातही बाहुल्यांचा खेळणी म्हणूनही वापर होत असावा, असे एक अनुमान आहे. प्राचीन ग्रीसमध्ये हातापायांची हालचाल करणाऱ्या बाहुल्या ज्ञात होत्या.
सोळाव्या शतकाच्या मध्यापासून नमुनाकृती (मॉडेल) म्हणून बाहुल्यांचा उपयोग करण्यास सुरुवात झाली. पॅरिस हे नवनव्या वेशभूषांचे केंद्र असल्याने नवनव्या वेशभूषांनी सजवलेल्या बाहुल्या निर्यात करण्यात येत. त्यांच्यावर कर तर नसेच; परंतु युद्धकाळातही बाहुल्या विद्रूप होऊ नयेत, म्हणून विशेष निर्बंध घातले जात. बाहुल्यांची मोठ्या प्रमाणातील निर्मिती ही स्त्री-रूपास अनुसरून झाली असल्याचे ऐतिहासिक काळापासून आजतागायत दिसून येते. पुरुषरूपी बाहुल्या त्या मानाने कमी प्रमाणात आढळतात. लाकडी बाहुल्या खेळण्यासाठी गैरसोईच्या आणि ओबडधोबड असल्यामुळे सतराव्या शतकात चिंध्या, भुस्सा यांपासून त्या तयार करावयास प्रारंभ झाला. नंतर मेणाच्या आणि खरे केस लावलेल्या बाहुल्या आल्या. त्यानंतर पोकळ शरीर, हलणारे अवयव आणि डोळ्यांची उघडझाप करणाऱ्या बाहुल्या आल्या. मेणाची तोंडे करावयास सुरुवात झाल्यापासून त्या पोकळ करावयास प्रारंभ झाला. पोकळीत तारा बसवून त्या उभ्या व बसत्या करण्यात आल्या. डोळ्यांची उघडझाप करावयासाठी प्रारंभी बाहुलीत दोरा बसवीत असत.
एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये ज्या सुंदर बाहुल्या तयार होऊ लागल्या, त्यांना मेणाचे मुखवटे लावलेले असत. या बाहुल्या चुकूनही अग्नीजवळ नेल्या, तर विद्रूप होत. जगातील एकूण उत्पादनापैकी निम्म्यापेक्षा जास्त बाहुल्या पहिल्या महायुद्धापर्यंत जर्मनीतच तयार होत. तेथूनच चिनी मातीचे मुखवटे आणि मिनेकारी केलेले डोळे निर्यात होत असत. बाहुल्यांची तोंडे चिनी मातीची बनविण्यात फ्रान्सने प्रथम यश मिळविले. फ्रान्समध्ये ज्या अनेक प्रकारच्या बाहुल्या तयार होत, त्यांत चालणे, बोलणे, डोळ्यांची उघडझाप करणे इ. हालचाली करणाऱ्या बाहुल्यांबरोबरच लिहू शकणाऱ्या व बासरी वाजविणाऱ्या बाहुल्याही यांत्रिक क्लृप्त्यांचा वापर करून तयार करीत.
मेल्ट्सेल या जर्मन कारागिराने ‘आई’ असे म्हणणारी पहिली बाहुली तयार केली. बाहुल्या तयार करण्यासाठी लाकूड, माती, कापूस, चिंध्या, गवत, कणसाच्या साली, भुस्सा यांसारख्या साध्या वस्तूंपासून आधुनिक रबर, प्लॅस्टिक, सेल्युलॉइड यांसारख्या वस्तूंपर्यंत अनेकविध कृत्रिम व नैसर्गिक माध्यमे तसेच भरणद्रव्ये वापरतात. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी कागदलगद्यापासून बाहुल्या तयार करण्यास प्रारंभ झाला व तेव्हापासून बाहुली-उत्पादनास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली.
भारतातही बाहुल्यांचे शेकडो प्रकार लोकप्रिय असून निरनिराळ्या प्रांतांतील प्रादेशिक वैशिष्ट्ये आणि वेशभूषा त्यांत प्रामुख्याने आढळतात. त्यासाठी आधुनिक कृत्रिम साधनांबरोबरच नैसर्गिक आणि साध्या साधनांचा वापर जास्त प्रमाणात होतो. बाहुल्यांच्या साहाय्याने निरनिराळी दृश्ये व प्रसंग उभारून त्यांचे एकत्रित प्रदर्शन भरविण्याची कल्पना लोकप्रिय होत चाललेली दिसते. भारतीय वैशिष्ट्ये दर्शविणाऱ्या बाहुल्या परदेशातही निर्यात होतात. भारतात पूर्वी बालविवाह रूढ होते, तेव्हा वधूला बाहुली भेट देण्याची प्रथा होती. जपानमध्ये दरवर्षी तीन मार्चला तेथील मुली ‘हिना-मात्सुरी’ नामक बाहुल्यांचा उत्सव साजरा करतात; तेव्हा बाहुल्यांचे कुटुंब परस्परांना भेटीदाखल देण्याची पद्धती दिसून येते. त्या प्रसंगी त्यांचे आदरातिथ्य करून त्यांना स्वयंपाक करून जेवू घालण्याची प्रथा आहे. बाहुल्यांचे खेळ (पपेट-शो) करण्यासाठी ज्या बाहुल्या वापरतात, त्यांना कळसूत्री बाहुल्या म्हणतात. त्यांचे अनेक प्रकार असून हे क्षेत्र मोठे आहे. या खेळांनी मनोरंजन व उद्बोधन अशी दुहेरी उद्दिष्टे साधली जातात.
बाहुल्यांच्या खेळघराची (डॉल्स हाउस) कल्पनाही फार पूर्वीपासून रूढ आहे. सर नेव्हिल विल्किनसन यांनी तयार केलेल्या टिटानियाच्या राजवाड्याचे जगभर प्रदर्शन झाले. १९२४ साली राणी मेरीला भेट मिळालेले ‘राणीच्या बाहुल्यांचे घर’ सर एडविन लट्येन्झ यांनी तयार केले. त्यात वीज, वाहते पाणी, लिफ्ट वगैरे सोयी असून, त्यातील ग्रंथालयात असलेली दोनशे पुस्तके लेखकांच्या स्वतःच्या हस्ताक्षरांतील होती. तसेच भिंतीवरील चित्रांचा आकार टपालाच्या दोन तिकिटांएवढाच होता. हे खेळघर अजूनही विंझर किल्ल्यात पाहावयास मिळते. आधुनिक पाश्चिमात्य गृहरचनेच्या तसेच गृहशोभनाच्या वेगवेगळ्या शैलींचे प्रतिबिंबही अशा खेळघरांमध्ये पाहावयास मिळते. भारतात दिल्ली येथे ‘शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्यूझीयम’ प्रसिद्ध आहे. त्यात भारतीय आणि परदेशी नमुन्याच्या सु. २,००० बाहुल्या आहेत.
संदर्भ : Hillier, Mans, Dolls, and Doll makers, New York, 1968.
लेखक: श्री. पु. गोखले
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020