बंदिस्त जागेत आयताकृती टेबलावर चेंडू व काठीने खेळावयाचे विदेशी क्रीडाप्रकार. टेबलाला चारी कोपऱ्यांत चार व लांबीच्या बाजूच्या मध्यावर दोन असे एकूण सहा जाळीची पिशवी लावलेले कप्पे किंवा खिसे (पॉकेट) असतात. एका टोकाशी निमुळत्या असलेल्या लांब काठीने छोटे चेंडू एकमेकांवर ढकलून वा टेबलाच्या खिशात घालून हे खेळ खेळले जातात. या खेळाचे अनेक प्रकार आहेत. त्यांपैकी बिल्यर्ड्झ आणि ‘स्नूकर’ हे प्रकार लोकप्रिय आहेत. इंग्लिश बिल्यर्ड्झ तीन चेंडूंनी खेळतात व या खेळात टेबलाला सहा खिसे लागतात. ‘पूल’ या प्रकारात १५ रंगीत चेंडू व एक पांढरा ‘क्यू’ चेंडू आणि टेबलाला सहा खिसे लागतात. स्नूकरसाठी २२ चेंडू लागतात. त्यांपैकी २१ चेंडू रंगीत (१५ तांबडे व ६ इतर रंगांचे) असतात व एक क्यू म्हणजे मारावयाचा चेंडू असतो आणि सहा खिसे असलेले टेबल लागते. कॅरम, कॅनन किंवा फ्रेंच बिल्यर्ड्झ तीन चेंडूंनी, खिसे नसलेल्या टेबलावर खेळतात. पूल व फ्रेंच बिल्यर्ड्झ हे प्रकार फ्रान्स व अमेरिका या देशांत विशेष खेळले जातात. बिल्यर्ड्झचे हौशी व धंदेवाईक खेळाडूंसाठी दरसाल स्वतंत्र जागतिक सामने होतात.
या खेळाचा मूळ इतिहास अनिश्चित आहे. इ. स. पू. ४०० वर्षांपूर्वी तो ग्रीसमध्ये खेळत, असे काहीजाणकारांचे मत आहे. फ्रान्समध्ये सोळाव्या शतकात बिल्यर्ड्झ रूढ होता. स्पेन्सरच्या मदर हबर्ड्स टेल (१५९१), तसेच शेक्सपिअरच्या अँटोनी अँड क्लीओपाट्रा (१६०७) या नाटकात या खेळाचा उल्लेख आढळतो. स्पेन, फ्रान्स, इटली, इंग्लंड वा चीन या देशांत अशा प्रकारच्या खेळांचा उगम झाला असावा, अशी मते आहेत. अनेक खेळांच्या संयोगातून आधुनिक बिल्यर्ड्झची १८०० च्या सुमारास सिद्धता झाली असावी, असे दिसते.
बिल्यर्ड्झ हा खेळ मुख्यतः दोन खेळाडूंमध्ये खेळला जातो. तथापि तो चार खेळाडूंचे दोन गट करूनही खेळता येतो. याचे टेबल ३.६६ मी. (१२ फुट) लांब, १.८६ मी. (६ फुट ११/२ इंच) रुंद आणि ०.८६ मी. (२ फुट १० इंच) उंच असते. अमेरिकन पूल किंवा पॉकेट बिल्यर्ड्झचे टेबल ३.०४ मी. (१० फुट) लांब व १.५२ मी. (५ फुट) रुंद असते. टेबलाला एकूण सहा खिसे असतात. टेबलाचा माथा ‘स्लेट’चा असतो आणि त्यावर विशिष्ट प्रकारच्या मऊ हिरव्या लोकरी कापडाचे आवेष्टन असते. टेबलाच्या बाजूच्या कडांवर रबर बसवून तेही याच कापडाने झाकलेले असते. या टेबलावर विशिष्ट खुणा केलेल्या असतात.
खेळताना वापरावयाची काठी (क्यू) सु. १.४४ मी. (४ फुट ९ इंच) लांब असून, ती टोकाकडे निमुळती होत गेलेली असते. टोकाला रबरी गोल टोपण बसवलेले असते. या खेळात वापरले जाणारे चेंडू हस्तिदंत, प्लॅस्टिक वा ‘क्रिस्टलेट’ नामक रसायनापासून बनवतात. त्यांतील एक साधा पांढरा (प्लेन), एक पांढऱ्यावर दोन काळे ठिपके असलेला (स्पॉट बॉल) व एक तांबड्या रंगाचा असतो. त्यांचा व्यास ५.७ ते ६ सेंमी. (२१/४ ते २१/४ इंच) असतो. प्रत्येक खेळाडू यातला एकेक पांढरा चेंडू वापरतो आणि तांबडा चेंडू टेबलावरच्या ठराविक खुणेवर (बिल्यर्ड स्पॉट) ठेवून खेळ खेळतो. खेळाडू आपला खेळ पांढरा चेंडू घेऊन सुरू करतो. पहिला खेळाडू टेबलाच्या ‘डी’ (बॉक सर्कल) भागात कोठेही चेंडू ठेवून खेळू शकतो. आपल्या पांढऱ्या चेंडूने इतर चेंडूंना ठोका दिला, म्हणजे गुण मिळतात.
तांबडा चेंडू खिशात गेला, तरी तो परत त्याच्या ठराविक जागेवर ठेवतात. खेळताना स्ट्रोक्स झाल्यावर आपला चेंडू दुसऱ्या चेंडूस चिकटून राहिल्यास तो हालवून तांबडा चेंडू बिल्यर्ड स्पॉटवर व पांढरा सेंटर स्पॉटवर ठेवतात व पुन्हा डी भागात चेंडू ठेवून खेळी सुरू करता येते. तांबडा चेंडू पुन्हा जागेवर ठेवतेवेळी, त्या स्पॉटवर एखादा चेंडू असल्यास तो पिरॅमिड स्पॉटवर ठेवतात व तोही मोकळा न झाल्यास सेंटर स्पॉटवर ठेवतात. खेळाडू गुण मिळवीत असेल, तोपर्यंत त्याला खेळता येते. एका खेळीत सलग मिळविलेल्या गुणांना टप्पा किंवा ‘ब्रेक’ असे म्हणतात. एका खेळाडूच्या पाळीनंतर दुसरा खेळाडू पाळी सुरू करतो.
वॉल्टर लिंड्रम या धंदेवाईक खेळाडूने १९३२ साली एकाच खेळीत ४,१३७ गुण मिळवून उच्चांक प्रस्थापित केला. मान्यवर खेळाडूंचे सामने ८ ते १० हजार गुणांचे असतात आणि ते अनेक दिवस खेळले जातात. ऑस्ट्रेलियाचा हौशी खेळाडू रॉबर्ट मार्शल याने १९५३ साली ७०२ गुणांच्या टप्प्याचा उच्चांक केला. अमेरिकेचा विल्यम फ्रेडरिक हॉपी हा आजवरच्या बिल्यर्ड्झच्या इतिहासातील एक उत्कृष्ट खेळाडू मानला जातो. इंग्लंडच्या जॉन रॉबर्ट्सने जागतिक अजिंक्यपदाचा बहुमान (१८७१-८५) या कालावधीत आठ वेळा मिळवून विक्रम केला आहे.
खेळामध्ये पवित्रा (स्टान्स) हा दोन्ही पाय स्थिर ठेवून, काठी आणि चेंडू यांच्या पातळीत आपली नजर आणून, डावा हात आणि बोटांची टोके टेबलावर टेकून आणि अंगठ्याने काठीला आधार देऊन (ब्रिज) घेतला जातो. काठी दुसऱ्या हाताच्या मुठीत अलगद धरून नेम साधण्यासाठी ती अनेक वेळा पुढे-मागे ढकलून टोला (स्ट्रोक) मारला जातो. चेंडू ज्या बाजूने मारावयाचा, त्या बाजूपासून तो जास्त लांब असेल, तर काठीला आधारादाखल देऊ केलेला डाव्या हाताचा ब्रिज पुरेसा नसतो, अशा वेळी, पुढील बाजूस पितळी फुली लावलेल्या काठीचा (रेस्ट) वापर करतात. पांढरा चेंडू दुसऱ्या चेंडूला योग्य त्या कोनात टोला देऊ शकला, तरच खेळाडूचे उद्दिष्ट साध्य होते.
या खेळासाठी उत्तम प्रकारचा शारीरिक समन्वय (कोऑर्डिनेशन) साधावा लागतो आणि चेंडूच्या टोल्यावर पक्की हुकुमत असावी लागते.भारतात हा खेळ ब्रिटिश अमदानीत रूढ झाला. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतील क्लबांमधून बिल्यर्ड्झच्या सुविधा असतात. भारतामध्ये विल्सन जोन्स, मायकेल फरेरा यांसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू निर्माण झाले आहेत. विल्सन जोन्स याने १९५८ व १९६४ साली हौशी खेळाडूंचे दोन वेळा जागतिक अजिंक्यपद मिळविले, तर मायकेल फरेराने १९७७ व १९८१ या दोन्ही वर्षी हौशी बिल्यर्ड्झ जागतिक स्पर्धांचे विजेतेपद मिळवले. भारतात अखिल भारतीय पातळीवर बिल्यर्ड्झचे हौशी खेळाडूंचे सामने दरसाल होतात व त्यांत काही नामवंत परदेशी खेळाडूही भाग घेतात.
संदर्भ :
1. Cottingham, Clive, The Game of Billiards, Philadelphia, 1964.
2. Lassiter, Luther; Sullivan, George, Billiards for Everyone, New York, 1965.
3. आठवले, रा. स. चौरंग गोट्यांचा खेळ, बडोदे, १८९१.
4. करंदीकर (मुजुमदार), द. चिं. व्यायामज्ञानकोश, खंड सहावा, बडोदे, १९४२.
लेखक: श्री. पु. गोखले
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
स्थूलमानाने भारतामध्ये मेंढ्यांचे चार प्रकार आढळता...