অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बॅडमिंटन

रॅकेट व फूल (शट्लकॉक) यांच्या साहाय्याने खेळावयाचा एक खेळ. तो खुल्या मैदानात खेळता येत असला, तरी वाऱ्याचा उपद्रव होत असल्याने प्रायः बंदिस्त प्रांगणामध्येच खेळला जातो.  बॅडमिंटनमध्ये टेनिस या खेळाची सर्वसाधारण तत्त्वे अनुसरली जातात. या खेळात रॅकेटच्या साहाय्याने फूल प्रांगणाच्या मध्यभागी असलेल्या उंच जाळ्यावरून एका भागातून दुसऱ्या भागाकडे मारले जाते. ह्या खेळाचे दोघा खेळाडूंमध्ये एकेरी; प्रत्येक संघामध्ये दोन याप्रमाणे चौघा खेळाडूंमध्ये दुहेरी व स्त्री-पुरुषांचे मिश्र सामने खेळले जातात.

हा खेळ भारतात पुणे येथे उगम पावला असावा. त्यावरून प्रारंभी तो ‘पूना’ या नावाने ओळखला जात असे. भारतात आलेल्या ब्रिटिश सेनाधिकाऱ्यांनी फावल्या वेळात खेळण्यासाठी हा खेळ १८६० च्या सुमारास शोधून काढला. १८७१ साली त्यांनी इंग्‍लंडला हा खेळ नेला. १८७३ मध्ये ग्‍लॉस्टरशर परागण्यातील बोफर्टच्या उमरावाने आपल्या बॅडमिंटन नामक निवासस्थानी या खेळाचा परिचय मेजवानीनिमित्त जमलेल्या पाहुणेमंडळींना करून दिला. त्यावरून या खेळाचे ‘बॅडमिंटन’ हे नवे नामकरण रूढ झाले. या खेळाचे आद्य नियम कराची येथे १८७७ साली कर्नल सेल्बी यांनी तयार केले. इंग्‍लंडमध्ये बाथ येथे १८७३ मध्ये पहिला बॅडमिंटन क्‍लब स्थापन झाला. ‘द बॅडमिंटन असोसिएसन ऑफ इंग्‍लंड’( स्थापनावर्ष–१८९३) या संघटनेने आद्य भारतीय नियमांच्या आधारे या खेळाचे अधिकृत नियम १८९५ मध्ये तयार केले. पुरुषांच्या ‘ऑल इंग्‍लंडस चँपियनशिप’ स्पर्धा १८९९ मध्ये सुरू झाल्या,  तर स्त्रियांच्या स्पर्धा १९०० पासून सुरू झाल्या.

१९२५ पासून खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय दौरे सुरू झाले. ‘द इंटरनॅशनल बॅडमिंटन फेडरेशन’ (आय्. बी. एफ्.) ही या खेळाचे जागतिक नियंत्रण करणारी संस्था १९३४ मध्ये स्थापन झाली. तिच्यामार्फत पुरुषांसाठी 'टॉमस चषक’  स्पर्धा १९४० पासून सुरू झाल्या. स्त्रियांसाठी ‘उबेर चषक’ १९५७ पासून सुरू झाल्या. भारतातील या खेळाचे नियंत्रण करणारी ‘बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया’ ही संस्था १९३४ साली स्थापन झाली व १९३५ पासून या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धाही सुरू झाल्या. बॅडमिंटनच्या प्रांगणाची (कोर्ट) लांबी १३.४१ मी. (४४ फुट) आणि रुंदी दुहेरी सामान्यांसाठी ६.१० मी. (२० फुट); तर एकेरीसाठी ५.१८ मी. (१७ फुट) इतकी असते. त्याच्या मध्यभागी १.५२ मी. (५ फुट) उंचीवर आडवे जाळे असून ते समोरासमोरच्या १.५५ मी. (५ फुट १ इंच) उंचीच्या खांबांना पक्के बांधलेले असते. जाळे रंगीत दोरीचे असून त्याची रुंदी ०.७६ मी. (२ १/२ फुट) असते. जाळ्यापासून १.९८ मी. (६ १/२ फुट) अंतरावर दोन्ही बाजूंना तोकडी आरंभखेळी-रेषा (शॉर्ट सर्व्हिस लाइन) असते. तसेच रुंदीच्या दोन्ही कडांपासून आत ०.४६ मी. (१ १/२ फुट ) अंतरावर व लांबीच्या दोन्ही कडांपासून आत ०.७६ मी.(२ १/२ फुट) अंतरावर प्रत्येकी दोन-दोन कक्ष (लॉबी) असतात.

याशिवाय क्रीडांगणाला उभे विभागणारी ३.०५ मी. (१० फुट) अंतरावरील मध्यरेषा (सेंटर लाइन) पायारेषेपासून (बेसलाइन) ते तोकड्या आरंभखेळी-रेषेपर्यंत असते. खेळात वापरली जाणारी रॅकेट वजनाने हलकी असून ती तातीने विणलेली असते. फुलाच्या (शट्लकॉक; शट्ल किंवा बर्ड) तळाशी एक छोटे अर्धगोलाकार बूच असून त्यास १४ ते १६ पिसे जडवलेली असतात. त्याचे वजन ४.७३ ते ५.५१ ग्रॅ. (७३ ते ८५ ग्रेन्स) असते. ‘नायलॉन शट्ल’ असाही फुलाचा एक प्रकार असून, तो बहुधा एकसंध असतो.  त्यात पिसांऐवजी मऊ प्लॅस्टिकची एक पट्टी वापरतात; तीस ‘स्कर्ट’ म्हणतात.

बॅडमिंटनचा पुरुषांचा डाव १५ गुणांचा, तर स्त्रियांचा एकेरी डाव ११ गुणांचा असतो. दोन्ही संघाचे १३ समान गुण झाल्यास, प्रथम ते गुण करणाऱ्या संघास ५ जादा गुणांपर्यंत सामना वाढविण्याचा अधिकार असतो, १४ समान गुण झाल्यास ३ जादा गुणांपर्यंत खेळता येते. स्त्रियांच्या एकेरी सामन्यांमध्ये ९ समान गुण झाल्यास ३ जादा गुणांपर्यंत, तर १० समान गुण झाल्यास २ जादा गुणांपर्यंत खेळता येते. एकूण तीन डावांपैकी दोन जिंकणारा सामान्यात विजेता ठरतो. खेळाची सुरुवात रॅकेटच्या साहाय्याने ओलीसुकी करून होते. ती जिंकणाऱ्या व प्रथम आरंभखेळी करणाऱ्या संघास ‘इन’ आणि ती घेणाऱ्या संघास ‘आउट’ अशा संज्ञा आहेत. आरंभखेळी करणाऱ्या खेळाडूने आपल्या बाजूच्या उडव्या अर्ध्या प्रांगणातून प्रतिपक्षाच्या उजव्या अर्ध्या प्रांगणात, कर्णाच्या दिशेने, फूल मारावयाचे असते आणि प्रतिपक्षाच्या खेळाडूने ते जमिनीवर पडू न देता अधांतरीच फटकावयाचे असते.

अशा रीतीने जाळ्यावरून फूल अधांतरी, जमिनीवर पडू न देता, मागे-पुढे टोलवत राहणे (व्हॉलींग) हे या खेळाचे मुख्य सूत्र होय. आरंभखेळी चुकल्यास त्या खेळाडूची आरंभखेळी रद्द होते व एकेरीमध्ये त्याच्या प्रतिपक्षी खेळाडूस, तर दुहेरीमध्ये त्याच्या साथीदारास मिळते. तो आपल्या बाजूच्या डाव्या अर्ध्या प्रांगणातून प्रतिपक्षाच्या डाव्या अर्ध्या प्रांगणातून कर्णाच्या दिशेने फूल मारतो. एकेरीमध्ये खेळाडूच्या गुणांची सम संख्या–उदा.,०–२–४ इ.–असल्यास उजव्या प्रांगणार्धातून, तर विषम संख्या–उदा., १–३–५ इ.–असल्यास डाव्या प्रांगणार्धातून आरंभखेळी करावी लागते. संपूर्ण खेळात आरंभखेळी अशी आलटून-पालटून उजव्या-डाव्या प्रांगणार्धातून चालते. मात्र दुहेरी सामन्यात जो आरंभखेळीने डावाची सुरुवात करतो, त्यास प्रारंभी फक्त एकदाच आरंभखेळीची संधी मिळते. आरंभखेळीमध्ये चुका पुढील प्रकारांनी होतात : आरंभखेळी करताना फूल, रॅकेट व रॅकेट धरलेला हात कमरेच्या वर गेल्यास ‘ओव्हरहँड’ धरतात. आरंभखेळीनंतर फूल कर्णाच्या दिशेने प्रतिपक्षाच्या योग्य त्या प्रांगणार्धात न पडल्यास, तसेच ते तोकड्या आरंभखेळी-रेषेच्या अलीकडे व जाळ्याकडील बाजूस म्हणजे ‘शॉर्ट’ पडले तर ती चूक होय. त्याचप्रमाणे फूल कक्षरेषेबाहेर पडले तर तीही चूक होय.

योग्य आरंभ खेळी करणाऱ्या संघास त्याच्या प्रतिपक्षाने चुका केल्यास गुण मिळतात. त्या चुका अशा : फूल जमिनीवर पडणे, अंगाला लागणे, जाळ्यामध्ये वा जाळ्याखालून मारणे, सीमारेषेबाहेर मारणे इत्यादी. या खेळात फटाक्यांच्या पुरोहस्त (फोरहँड) व पार्श्वहस्त (बॅकहँड) अशा दोन्ही शैली अनुसरल्या जातात. यांखेरीज ‘क्लीअर’, ‘स्मॅश’, ‘ड्रॉप’ व ‘ड्राइव्ह’ असे चार प्रमुख फटक्यांचे प्रकार वापरले जातात.  ‘क्लीअर’ या फटाक्यामध्ये खूप उंच फटकावलेले फूल कमान करून प्रतिपक्षाच्या डोक्यावरून जाऊन त्याच्या पाठीमागे पडते. ‘स्मॅश’ हा रॅकेट उंचावून अतिशय वेगाने खालच्या दिशेने मारलेला जोरदार फटका होय. ‘ड्रॉप’ या प्रकारात फूल जाळ्याला लगटून पार करून जाळ्याजवळच वेगाने व सफाईने खाली पडते. ‘ड्राइव्ह’ हा साधारण कमी उंचीवरून वेगाने मारलेला आडवा फटका होय. वरील प्रकारांमध्ये चलाखी करून व खूप वैविध्य आणून प्रतिपक्षाला फसवण्याच्या अनेकविध शक्यता निर्माण होत असतात. हा खेळ मुख्यतः मनगटाच्या ताकदीवर व वेगवान हालचालींवर यशस्वी होऊ शकतो. तसेच एकूणच शारीरिक हालचालींचा चपळपणा व तत्परता, अचूक अंदाज व गतिनियंत्रण, फूल प्रतिपक्षाच्या हद्दीत व खेळाडूच्या आवाक्यापलीकडे नेमक्या जागी टाकण्याची क्षमता (प्लेसमेंट) हे गुण खेळाडूच्या यशास पूरक ठरतात. हा खेळ कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषांना कोणत्याही ऋतूमध्ये खेळता येतो.

बॅडमिंटनची पुरुषांची आंतरराष्ट्रीय टॉमस चषक सांघिक स्पर्धा इंडोनेशियाने एकूण सहा वेळा जिंकून विक्रम प्रस्थापित केला आहे, तर स्त्रियांची उबेर स्पर्धा जपानने चार वेळा जिंकली आहे. ‘ऑल इंग्‍लंड’ पुरुषांची एकेरी स्पर्धा इंडोनेशियाच्या रूडी हार्टोनो याने आठ वेळा जिंकून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वांत वेळा विजेतेपद, दुहेरी सामने धरून–एकूण २१–मिळवण्याचा बहुमान पुरुषांमध्ये इंग्‍लंडच्या जी. ए. टॉमस याने मिळवला आहे. त्यानेच आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी टॉमस चषक प्रदान केला. स्त्रियांमध्ये हा मान अमेरिकेच्या ज्यूडी हाश्मानने एकूण १० वेळा नैपुण्यपदे जिंकून संपादन केला आहे. इंग्‍लंडच्या ए. डी. जॉर्डनने एकूण ८२ व डब्ल्यू. सी. ई. रॉजर्झ या महिला खेळाडूने एकूण ५२ आंतरराराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण करून जागतिक विक्रम केले आहेत. यांखेरीज आंतरराराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये केनेथ डेव्हिडसन (अमेरिका), वाँग पेंग सून (मलेशिया), एअर्लांड कोप्स (डेन्मार्क), एडी चूंग (मलेशिया), तान जो हॉक (मलेशिया), फेरी सोन-व्हिले (इंडोनेशिया), लिम स्वी किंग (इंडोनेशिया) इ. खेळाडू विशेष नावाजलेले आहेत.

भारतातही दर्जेदार खेळाडूंची मोठी परंपरा आहे. लुईस, देविंदर मोहन, दिवाण, सेठ, गोयल, दीपू व रोमेन हे घोषबंधू, नंदू नाटेकर, मनोहर बोपर्डीकर, प्रकाश पदुकोण, सईद मोदी इ. दर्जेदार खेळाडू झाले आहेत. महिलांमध्ये बोलंड, ग्रास, देवधर, भगिनी, मुमताज चिनॉय, सुशिला रेगे, मीना शहा, शशी भट, सरोजिनी आपटे, अमी घिया इ. खेळाडू उल्लेखनीय आहेत. १९६५ मध्ये लखनौला झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताचा दिनेश खन्ना विजेता ठरला होता.

नंदू ऊर्फ नंदकुमार महादेव नाटेकर

नंदू ऊर्फ नंदकुमार महादेव नाटेकर खेळ(१२ मे १९३३–) हा भारताचा एक अग्रगण्य बॅडमिंटनपटू होय. त्यानेच भारताला बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात प्रथम नाव मिळवून दिले. भारताचा क्रमांक एकचा बॅडमिंटनपटू (१९५३ व १९५४); क्वालालुंपुर (मलाया) येथील ‘सेलांगोर ओपन बॅडमिंटन चँपियनशिप्स’ मध्ये पुरुषांचे वैयक्तिक नैपुण्यपद (१९५६);टॉमस चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व (१९६०); अखिल भारतीय एकेरी व दुहेरी स्पर्धांचे विजेतेपद (१९६०); बँकॉकच्या ‘किंग्ज कप’चे वैयक्तिक विजेतेपद (१९६१); अर्जुन पुरस्कार (१९६१) आणि एकूण सहा वेळा एकेरीतील राष्ट्रीय अजिंक्यपद असे अनेक विक्रम व मानसन्मान त्याने आपल्या क्रीडा-कारकीर्दीत मिळवले आहेत.

प्रकाश रमेश पदुकोण

प्रकाश रमेश पदुकोण(१० जून १९५५–) हा भारताला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सन्मान प्राप्त करून देणारा श्रेष्ठबॅडमिंटनपटू होय.त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी कनिष्ठ गटातील (ज्यूनियर) राष्ट्रीय स्पर्धा जिंकून लौकिक मिळवला. त्यानंतर ओळीने नऊ वेळा राष्ट्रीय विजेतेपद जिंकले (१९७१ ते ७९); तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले (१९७८). त्याने डेन्मार्क व स्वीडन येथील स्पर्धा जिंकून ‘ऑल इंग्‍लंड’ बॅडमिंटन स्पर्धाही जिंकली (मार्च १९८०) आणि त्यायोगे अनधिकृत जगज्जेतेपदाचा बहुमान संपादन केला. भारताला हा बहुमान मिळवून देणारा तो पहिलाच खेळाडू होय. क्वालालुंपुर येथील विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या एकेरीमध्ये त्याने अजिंक्यपद मिळविले (ऑक्टो. १९८१). नाजुक व कलात्मक शैली आणि अत्यंत फसवे व सफाईदार अलगद फटके ही त्याच्या खेळाची वैशिष्ट्ये होते. त्याला १९७३ मध्ये अर्जुन पुरस्कार लाभला; तसेच अन्य मानसन्मानही लाभले आहेत.

 

भारतातील पहिलीच ‘इंडियन मास्टर्स’ ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटन स्पर्धा पुणे येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या अद्ययावत बॅडमिंटन कोर्टामध्ये नोव्हेंबर १९८१ मध्ये पार पडली. तीमध्ये पुरुषांच्या एकेरीमध्ये प्रकाश पदुकोण अजिंक्य ठरला; तर स्त्रियांच्या एकेरीमध्ये चीनची झेंग युली ही अजिंक्य ठरली. पुरुषांच्या दुहेरीत स्वीडनचे टॉमस खिल्स्ट्रॉम व स्टेफान कार्लसन आणि महिलांच्या दुहेरीत इंग्‍लंडची नोरा पेरी व जेन वेब्स्टर ही जोडी विजेती ठरली. तसेच मिश्र दुहेरीत इंग्‍लंडचे रे स्टीव्हेन्झ व नोरा पेरी यांचा विजय झाला.

बॉल बॅडमिंटन

बॅडमिंटनशी बरेच साधर्म्य असलेला हा एक खेळ आहे. या खेळात फुलाऐवजी पिवळ्या रंगाचा लोकरीचा चेंडू वापरतात. त्याचा व्यास ५.०८ ते ५.३५ सेंमी. (२ ते २ १/८ इंच) असून, वजन १३.११ ते १४.५७ ग्रॅ. (१ १/८ ते १ १/४ तोळे) असते. या खेळात वापरली जाणारी रॅकेट टेनिस–रॅकेटपेक्षा हलकी व बॅडमिंटन–रॅकेटपेक्षा काहीशी जड व जाड तातीने विणलेली असते. क्रीडांगण २४.४० मी. × १२.२० मी. (८०फुट × ४० फुट) असते. त्याच्या मध्यभागी १.८२ मी. (६ फुट) उंचीवर जाळे बांधलेले असते. हा खेळ प्रत्येकी पाच खेळाडूंच्या दोन संघांत खेळला जातो. खेळाडू क्रीडांगणाच्या आपापल्या अर्ध्या भागात पुढे दोन, मागे दोन व मध्यभागी एक याप्रमाणे उभे राहतात. बॅडमिंटनप्रमाणेच जाळ्यावरून चेंडू रॅकेटने मागे-पुढे अधांतरी टोलवीत राहणे, हे या खेळाचे स्थूल मानाने स्वरूप होय. या खेळाचा एक डाव २९ गुणांचा असतो व तीन डावांपैकी दोन जिंकणारा सामन्याचा विजेता ठरतो. हा खेळ मद्रासकडे विशेष लोकप्रिय आहे.

संदर्भ :1. Brundle, Fred, Teach Yourself Badminton, London, 1967.

2. Davidson, Kenneth R.; Winning Badminton, New York, 1964.

3. Downey, j. Advanced Badminton, 1976.

4. Hunter, Peter, Better Badminton, London 1961.

5. करंदीकर (मुजुमदार), द. चिं. व्यायामज्ञानकोश, खंड सहावा, बडोदे,  1942

लेखक: वाळ ज. पंडित

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate