অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बोटीवरील खेळ (डेक गेम्स)

बोटीवरील खेळ (डेक गेम्स)

बोटीवरील प्रवासात मनोरंजनार्थ खेळले जाणारे विविध खेळ या गटात मोडतात. बोटीवर प्रवाशाला अनेक दिवस प्रवासात घालवावे लागत असल्याने, तेथे करमणुकीची अनेक साधने उपलब्ध करून दिलेली असतात. पत्ते, पोहणे, चित्रपट, दूरदर्शन, जुगार, नृत्य, गायन-वादन इ. अनेक रंजनप्रकारांबरोबरच विविध खेळांचीही सुविधा असते. या खेळांचे नियोजन बोटीवरील रिकामी मोजकी जागा विचारात घेऊनच केले जाते.

डेक-टेनिसचा बोटीवरील खेळ

पूर्वी सागरी प्रवासात बोटी सतत हेलकावत असत आणि त्यावर मोकळी जागाही नसे. त्यामुळे प्रवासी आपापली आसने सहसा सोडीत नसत. परंतु बोटीच्या रचनेत तदानुषंगिक सुधारणा कालांतराने होत गेल्याने परिणामी त्या अधिक स्थिर झाल्या, तसेच बोटींवर खेळासाठी मोकळी जागाही राखण्यात येऊ लागली. आता जास्ती प्रशस्त आणि सर्व सुखसोयीनी युक्त अशा बोटीवर सु. ३०.४८ मी. (१०० फुट) जागाही खेळांसाठी वापरली जाते.

कडेफेकीचा खेळ (डेक कॉइट्स) हा बोटीवरील सर्वांत आद्य खेळांपैकी एक होय. या खेळाला जागाही कमी लागते आणि तो अद्यापही लोकप्रिय आहे. खेळाडूंनी २.७४ मी. (३ यार्ड) अंतरावर असलेल्या खुंटीभोवती प्रत्येकी चार कडी फेकावयाची व गुण मिळवायचे, असे या खेळाचे स्थूल स्वरुप आहे. यात वापरले जाणारे कडे दोरापासून बनवतात. खुंटीभोवती पडलेल्या प्रत्येक कड्यामागे एकेक गुण मिळतो. पंधरा किंवा एकवीस गुणांचा एक डाव असतो. अशाच प्रकारे बादलीमध्ये कडे टाकण्याचा खेळही (बकेट कॉइट्स) खेळला जातो. त्यात ५.४८ मी. (६ यार्ड) अंतरावरील एका बादलीमध्ये अचूक कडी टाकावयाची असतात. हा प्रकार वरवर सोपा वाटला तरी, प्रत्यक्षात बादलीत कडी टाकल्यावर ती उसळून बाहेर येतात. त्यामुळे ती फेकताना अधिक कौशल्याची व दक्षतेची आवश्यकता असते.

‘बुल’ किंवा ‘बुल बोर्ड’ हाही एक सुरुवातीपासूनच खेळला जाणारा व अद्यापही लोकप्रिय असलेला बोटीवरील खेळ आहे. एका फलकाच्या शिरोभागी डाव्या व उजव्या कोपऱ्यांमध्ये ‘बी’ हे अक्षर ‘बुल्स आय’ (लक्ष्यबिंदू) याचे निदर्शक म्हणून काढलेले असते. शिवाय त्या फलकावर १ ते १० अंक पुढील क्रमानुसार दिलेले असतात : फलकाची एकूण १२ समान चौरसांमध्ये विभागणी केलेली असते. पहिल्या आडव्या रांकेत डाव्या व उजव्या कोपऱ्यांतील दोन ‘बी’ अक्षरांच्यामधील चौरसात १० हा आकडा असतो. दुसऱ्या आडव्या रांकेत अनुक्रमे ८-१-६, तिसऱ्या आडव्या रांकेत ३-५-७ व चौथ्या आडव्या रांकेत ४-९-२ असे आकडे दर्शविलेले असतात. प्रत्येक रांकेतील आकड्यांची एकूण बेरीज १५ व्हावी, अशा प्रकारे ही रचना असते.

फलकापासून ३.६५ मी. (१२ फुट) अंतरावरून खेळाडूने आपल्याजवळील सहा रबरी चकत्या, एकावेळी एक क्रमशः १ ते १० आकड्यांवर व नंतर अनुक्रमे प्रथम उजव्या बाजूच्या बी चौरसावर व मग डावीकडील बी चौरसावर टाकावयाच्या असतात. तदनंतर उलट्या क्रमाने – म्हणजे प्रथम डावीकडील बी चौकोनापासून सुरुवात करून, मग उजवा चौकोन व १० पासून १ पर्यंत आकडे अशा क्रमाने – खेळाडूस आपला डाव पूर्ण करावा लागतो. समान खेळीमध्ये जो खेळाडू आपला डाव अगोदर पूर्ण करेल, तो जिंकतो. ‘शफल बोर्ड’ हाही असाच एक पूर्वीपासून खेळला जाणारा लोकप्रिय खेळ आहे. बोटीच्या डेकवर खडूच्या साहाय्याने दोन विशिष्ट क्षेत्रांची आखणी करतात. त्यातही ‘बुल’ प्रमाणेच १ ते १० आकडे असतात.

पहिल्या कमानीवजा भागात अधिक (+) १० व दुसऱ्या कमानीवजा भागात उणे (-) १० दाखविलेले असतात. दोन कमानींच्या मध्ये नऊ चौकोन असून त्यात १ ते ९ आकडे अशा विशिष्ट क्रमाने दर्शविलेले असतात, की त्यांच्या उभ्या तसेच आडव्याही रांकांतील आकड्यांची बेरीज १५ व्हावी. उदा., अधिक १० आकड्याच्या कमानीलगतच्या पहिल्या आडव्या रांकेतील चौकोनात ८-१-६ (दुसऱ्या आडव्या रांकेत ३-५-७ व तिसऱ्या आडव्या रांकेत ४-९-२ आणि शेवटी उणे १० ची कमान, अशी ही आखणी असते. हा खेळ दोन खेळाडूंमध्ये एकेरी, तसेच चौघांमध्ये दुहेरी खेळला जातो. खेळाडू वल्ह्यासारख्या, तळाशी रुंद व सपाट असलेल्या बांबूच्या साहाय्याने रंगीत लाकडी चकत्या उपरनिर्दिष्ट विशिष्ट क्षेत्रातून सरकवत नेत, गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. खेळाडूस गुण मिळविण्यासाठी आपली चकती कमानीमध्ये वा एखाद्या चौरसात खडूच्या रेषेला स्पर्श होऊ न देता, नेमकेपणाने सरकवावी लागते. त्या कमानीमध्ये वा चौरसात जो आकडा असतो, तेवढे गुण खेळाडूस मिळतात. उणे १० च्या कमानीमध्ये चकती गेल्यास तेवढे गुण त्याच्या एकूण गुणांतून वजा होतात. अशा रीतीने सर्वप्रथम ५० गुण करणाऱ्या खेळाडूचा वा संघाचा विजय होतो.

बोटीवरील खेळांमध्ये सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे ‘डेक-टेनिस’ हा होय. लॉन टेनिस व कडेफेक यांच्या मिश्रणातून हा खेळ सिद्ध झाला आहे. यातील आरंभखेळी व गुणमोजणी  टेनिसप्रमाणेच  असते. डेक-टेनिसचे प्रांगण (कोर्ट) साधारणपणे डेकच्या लांबी-रुंदीनुसार कमीजास्त असते. एकेरीसाठी सु. ९.१ ते १२.२ मी. (३० ते ४० फुट) लांब आणि ३ ते ४.६ मी. (१० ते १५ फुट) रुंद प्रांगण आखले जाते. जास्त गतिमान दुहेरी खेळासाठी प्रांगणाची लांबी कमी म्हणजे साधारणतः ८.५ ते १०.४ मी. (२८ ते ३४ फुट) ठेवली जाते. मात्र रुंदी ४.३ ते ४.६ मी. (१४ ते १५ फुट) या दरम्यान असावी लागते. त्याच्या मध्यभागी बांधलेले जाळे टेनिसमधील जाळ्यापेक्षा जास्त उंचीवर असते. खेळाडू एक रबरी कडे एका हाताने परस्परांकडे फेकून व झेलून हा खेळ खेळतात. आरंभखेळी (सर्व्हिस) करणाऱ्यालाच गुण मिळतात व तो चुकेपर्यंत ती खेळी त्याच्याकडेच राहते. आरंभखेळी घेतेवेळी ती स्वीकारणाऱ्या प्रतिस्पर्धी खेळाडूने स्वतःच्या आरंभखेळी-प्रांगणातच कर्णरेषेच्या दिशेला उभे असले पाहिजे. कडे प्रतिस्पर्ध्याकडे फेकण्यापूर्वी ते नीट झेलता आले पाहिजे.

झेलताना चाचपडणे वा अर्धवट पकडणे, शरीराला वा डेकला कड्याचा स्पर्श होणे, तसेच कडे परत फेकताना मध्येच थांबणे इ. प्रकार प्रमादयुक्त झेलात (फाउल कॅच) मोडतात व त्याबद्दल त्या खेळाडूस गुण गमवावे लागतात. उडी मारुन म्हणजे दोन्ही पाय जमिनीवर नसताना कडे फेकणे वा झेलणे हेही निषिद्ध मानले जाते. योग्य रीतीने टाकलेले कडे प्रतिस्पर्ध्याला झेलता न आल्यास व ते प्रांगणाच्या मर्यादेतच पडल्यास, त्याबद्दल कडे टाकणाऱ्याला गुण मिळतात. मात्र कडे फेकणाऱ्याने ते सदोष रीतीने वा प्रांगणाबाहेर फेकले, तर त्यास ती खेळी गमवावी लागते. सहा डावांचा एक संच (सेट) असतो व गुण १५-३०-४० अशा प्रकारे टेनिसच्या धर्तीवर मोजले जातात. डेक-क्रिकेट हा खेळही पूर्वी क्रिकेटच्या तत्त्वानुसार खेळला जात असे. साधारणतः ९.१ मी. (३० फुट) रुंद व १८.३ मी. (६० फुट) लांब क्रीडांगणाभोवती जाळे लावून, दोरखंडाच्या चेंडूने, चटईच्या (मॅट) खेळपट्टीवर तो खेळत असत. लाकडी ठोकळ्याच्या खोबण्यांमध्ये यष्ट्या रोवल्या जात. चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवण्यापूर्वी जितक्या लांब अंतरावर गेला असेल, त्या अंतरावरुन धावा ठरवल्या जात. या खेळास डेकवर जास्त प्रशस्त जागा लागत असल्याने, आता तो मागे पडला आहे.

लेखक: श्री. पु. गोखले

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate