एका विशिष्ट लक्ष्याच्या दिशेने चेंडू घरंगळत सोडण्याचा एक खेळ. त्यास हिरवळीवरील बोलिंग (लॉन बोल्स किंवा बॉलिंग ऑन द ग्रीन) असेही म्हणतात. प्राचीन काळी (इ.स.पू.सु. ५२००) ईजिप्तमध्ये अशाच प्रकारचा एक खेळ खेळला जात असल्याचे उल्लेख सापडतात. प्राचीन ग्रीस व रोममध्येही असे खेळ अस्तित्वात होते. हा खेळ प्राथमिक स्वरूपात साधारणपणे तेराव्या शतकापासून इंग्लंड व फ्रान्समध्ये खेळला जात होता. इंग्लंडमधील ‘साउदॅम्प्टन बोलिंग क्लब’ (१२९९) हा सर्वात जुना क्लब होय. क्रिश्चन स्केफिलन याने १८७९ मध्ये ‘डनेलिन बोलिंग क्लब’ ची स्थापना करून या खेळाचे पुनरुज्जीवन घडवून आणले. कालांतराने त्यास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. हा बंदिस्त जागेतही (इनडोअर) कृत्रिम पृष्ठभागावर खेळला जातो.
हिरवळीवर किंवा मऊ पृष्ठभागावर चेंडू घरंगळत सोडून तो दुसऱ्या लहान चेंडूजवळ-‘जॅक’ जवळ-नेणे, हे या खेळाचे मुख्य उद्दिष्ट होय. खेळपट्टीचा आकार साधारणतः ३६.५८ मी. (१२० फुट) लांब असतो आणि त्यात ६.१ मी. (२० फुट) रुंद व ३६.५८ मी. लांब असे उभे व समांतर सहा पट्टे आखलेले असतात. त्यामुळे एकाच वेळी सहा सामनेही खेळता येतात. जॅक म्हणजे मातीचा लहान पांढरा चेंडू असून त्याचा व्यास ६.३५ सेंमी. (२ १/२ इंच) असतो. मोठ्या चेंडूचा व्यास १२ ते १३ सेंमी. (४ ३/४ ते ५ १/८ इंच) आणि वजन १.५८ किग्रॅ. (३१/२ पौंड) असते. हे चेंडू ‘लिग्नम व्हाइटी’ नामक कठीण लाकडाचे बनवलेले असून, त्यांची एक बाजू दुसरीपेक्षा जास्त बहिर्वर्तुळाकार असते. या आकारामुळे खेळाडूस आपला चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या चेंडूला वळसा घालून जॅकच्या अधिक जवळ नेता येतो. शिवाय ३५ सेंमी. (१४ इंच) x ६० सेंमी. (२४ इंच) या आकाराची एक रबरी चटई असते.
त्या चटईवर एक पाय ठेवूनच खेळाडूस चेंडू टाकावा लागतो. हा खेळ दोघा प्रतिस्पर्ध्यांमध्ये एकेरी; प्रत्येक संघात दोन खेळाडू याप्रमाणे दुहेरी, प्रत्येक संघात तीन खेळाडू असल्यास तिहेरी व प्रत्येक संघात चार खेळाडू यांप्रमाणे चौरंगी असाही खेळता येतो. एकेरी व दुहेरीमध्ये प्रत्येक खेळाडू चार चेंडू वापरतो; तिहेरीमध्ये प्रत्येक खेळाडू तीन, तर चौरंगीमध्ये चार खेळाडू प्रत्येकी दोन चेंडू वापरतात. खेळाची सुरुवात दोन संघनायकांमध्ये ओली-सुकी होऊन करण्यात येते. ती जिंकणाऱ्या संघास प्रथम चेंडूफेकीची संधी मिळते. त्या संघातील सुरुवातीचा खेळाडू (लीड) जॅक म्हणजे लहान चेंडू पट्ट्यातून प्रथम घरंगळत सोडतो. हा चेंडू चटईपासून (म्हणजे जिथून खेळाडू मोठे चेंडू टाकतात) किमान २१.८६ मी. (७५ फुट) अंतरावर गेलाच पाहिजे. हा जॅक जिथे जाऊन स्थिर होतो, तो खेळाचा लक्ष्यबिंदू होय. दोन्ही संघांतील खेळाडू आलटून- पालटून आपल्या जवळ असलेले मोठे चेंडू एका वेळी एक यानुसार जॅकच्या जास्तीत जास्त जवळ जातील अशा प्रकारे, रबरी चटईवर एक पाय ठेवून, घरंगळत सोडतात.
आपला चेंडू जॅकच्या जास्तीत जास्त जवळ नेण्यासाठी, खेळाडू आपल्या चेंडूने जॅकजवळील प्रतिस्पर्ध्याच्या चेंडूला दूर ढकलू शकतो. तसेच त्याच्या चेंडूला वळसा घालूनही चेंडू जॅकच्या जास्त जवळ नेता येतो. आपला जॅकच्या जास्त जवळचा चेंडू प्रतिपक्षाने हालवू नये म्हणून त्याचे रक्षण करणे हाही खेळाच्या कौशल्याचा एक भाग असतो. प्रत्येक खेळाडूने आपल्या जवळचे सर्व चेंडू (म्हणजे चार वा तीन वा दोन) घरंगळत सोडले म्हणजे एक फेरी पूर्ण होते. त्यानंतर एका संघाचे, जॅकच्या सर्वांत जास्त जवळ असलेल्या प्रतिस्पर्ध्याच्या चेंडूपेक्षा, जॅकच्या जास्त जवळ जितके चेंडू असतील त्या प्रत्येक चेंडूमागे एकके गुण त्या संघाला मिळतो. नंतर जॅक खेळपट्टीच्या विरुद्ध टोकाला टाकून दुसरी फेरी खेळतात. त्यावेळी पहिल्या फेरीत आघाडीवर असलेला संघ प्रथम सुरुवात करतो. सामान्यतः २१ गुणांचा सामना असतो. ‘इंटरनॅशनल बोलिंग बोर्ड’ (आय्.बी.बी.) ही या खेळाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नियंत्रण करणारी संस्था १९०५ मध्ये स्थापन झाली. सध्या तिची १८ सदस्य राष्ट्रे आहेत. ‘कर्लिंग’ हा बर्फावरील खेळाचा प्रकार बोल्सशी खूपच मिळताजुळता आहे.
संदर्भ :
1. Bryant, D. J. Bryant on Bowls, Ontario, 1966.
2. King, N.; Medlycott, J. The Game of Bowls, London, 1975.
लेखक: श्री. पु. गोखले
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/2/2020
स्थूल रूपरेषा असलेला महाराष्ट्रीय खेळ.
कांदाफोडी हा एक गमतीदार खेळ आहे. या खेळीची गंमत म्...
उड्या व उड्यांचे खेळांविषयी माहिती.
कसरतीच्या खेळांचे प्रकार