অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ब्रिज

पत्त्यांचा एक लोकप्रिय खेळ. या खेळाचे सामान्यतः तीन प्रकार आहेत : (१) ब्रिज व्हिस्ट, (२) ऑक्शन ब्रिज व (३) कॉन्ट्रॅक्ट ब्रिज. यांपैकी पहिले दोन मागे पडले असून, सध्या कॉन्ट्रॅक्ट ब्रिज हा प्रकार सर्वमान्य व लोकप्रिय आहे. सतराव्या शतकात यूरोपात खेळल्या जाणाऱ्या व्हिस्ट या पत्त्याच्या खेळामध्ये थोडा बदल करून ‘ब्रिज व्हिस्ट’ हा प्रकार १८९४ मध्ये लॉर्ड ब्रूअम यांनी लंडनच्या ‘पोर्टलंड क्लब’ मध्ये सुरू केला. ‘डमी’ व ‘डबल’ हे प्रकार व्हिस्टमध्ये नव्हते; ते ब्रिज व्हिस्टमध्ये नव्याने आले. आठदहा वर्षे हा प्रकार लोकप्रिय होता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिज व्हिस्टच्या जागी ऑक्शन ब्रिज हा प्रकार आला.

कॉन्ट्रॅक्ट ब्रिज

प्लेफाँद या फ्रेंच खेळापासून कॉन्ट्रॅक्ट ब्रिज तयार झाला, असे एक मत असले, तरी ते आता तितकेसे ग्राह्य मानले जात नाही. अमेरिकन खेळाडूंचा एक संघ हॅरल्ड एस्. व्हॅन्डरबिल्ट यांच्या नेतृत्वाखाली पॅरिसमधील ‘व्हिजिटर्स क्लब’ मध्ये खेळण्यास जात असे; त्यांनी प्लेफाँदमधील काही तत्त्वे व ऑक्शन ब्रिजमधील काही तत्त्वे एकत्र करून एक नवाच प्रकार निर्मिला व लोकप्रियही केला. नोव्हेंबर १९२५ मध्ये लॉस अँजेल्स ते हाव्हॅना या बोटीवर हा संघ काही नियम व तत्त्वे ठरवून जो खेळ खेळत होता, तोच कॉन्ट्रॅक्ट ब्रिज होय. जगद्विख्यात अमेरिकन ब्रिजपटू ईली कल्बर्टसन यांच्या मतेही या खेळाची हीच जन्मकथा मानली जाते. त्यावेळी जे नियम व तत्त्वे ठरविण्यात आली, त्यांमध्ये आजतागायत फारसा बदल झालेला नाही. व्हॅन्डरबिल्ट यांनी या खेळाची माहिती न्यूयॉर्कमधील खेळमंडळांना दिली. अमेरिकेतील लोकांना हा खेळ फारच आवडला. पुढे एकदोन वर्षांतच ब्रिटनमध्येही त्याचा प्रसार झाला.

व्हिस्ट क्लब ऑफ न्यूयॉर्कच्या निकरबॉकर यांनी प्रथम ह्या खेळाची नियमावली व गुणनोंदणीची पद्धती तयार केली. अल्पावधीतच खेळाची लोकप्रियता झपाट्याने वाढली. ईली कल्बर्टसन यांनी १९२९ मध्ये ब्रिज वर्ल्ड हे मासिक सुरू केले. ते आजतागायत अव्याहतपणे प्रसिद्ध होत आहे. ब्लू क्लब (१९३०) हे त्यांचे पुस्तकही अत्यंत गाजले. कल्बर्टसन यांचा या खेळातील अधिकार इतका मोठा होता, की कल्बर्टसन म्हणजे ब्रिज असे समीकरणच त्यावेळी रूढ झाले होते. १९३० सालापासून इंग्लंड, अमेरिकेतील दैनिका-साप्ताहिकांतून ब्रिजसंबंधी अनेक लेखमाला प्रसिद्ध होऊ लागल्या. ब्रिज ह्या विषयाला वाहिलेली खास मासिकेही निघू लागली. १९२१ - ३९ या काळात ब्रिजची जोराची लाट पसरली. १९३८ - ३९ मध्ये ह्यूबर्ट फिलिप्स ह्यांनी बी.बी.सी. वरून ह्या खेळासंबंधी अनेक भाषणे दिली. १९३० मध्ये अँग्लो अमेरिकन्समध्ये पहिला अनधिकृत सामना झाला. या सामन्यात कल्बर्टसन यांनी जे अप्रितम कौशल्य दाखविले, त्यामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले व या खेळाला जगभर प्रसिद्धी मिळाली.

आधुनिक ‘बिडिंग’ची म्हणजे बोलीची पद्धती कल्बर्टसन यांनीचशोधून काढली. १९३३ मध्ये ब्रिज वर्ल्ड मासिकातर्फे ब्रिजसंबंधीची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद भरली. ह्या परिषदेनंतर निरनिराळ्या देशांत ब्रिज मंडळे स्थापन झाली व त्यांच्यातील अधिकृत सामन्यांना सुरुवात झाली. १९३० च्या सुमारास बोलीच्या एकंदर वीस पद्धती प्रचारात होत्या. आज हा आकडा पन्नासाच्या घरात गेला आहे. १९३६ मध्ये ‘डुप्लिकेट ब्रिज कंट्रोल बोर्ड’अस्तित्वात आले. १९३७ पासून या खेळाच्या ‘कॅमरोझ कप’ साठी स्पर्धा ठेवण्यात आल्यामुळे या खेळाची लोकप्रियता वाढली. ‘द इंटरनॅशनल ब्रिज लीग इन यूरोप’ या संस्थेने जे सामने भरविले, त्यांमध्ये अनेक यूरोपीय राष्ट्रांनी भाग घेतला. ‘द अमेरिकन ब्रीज लीग’ व ‘युनायटेड स्टेट्स ब्रिज असोसिएशन’ ह्या दोन संस्थांतर्फे अमेरिकेत सामने भरविले जात असत. १९३७ मध्ये या दोन्ही संस्थांचे एकीकरण होऊन ‘द अमेरिकन कॉन्ट्रॅक्ट ब्रीज लीग’ ची स्थापना झाली. १९३२ मध्ये ब्रिजचे प्राथमिक स्वरूपाचे नियम तयार झाले, त्यांत १९३५ मध्ये थोडेफार बदल करून ब्रिजची आंतरराष्ट्रीय नियमावली तयार करण्यात आली.

१९६३ व १९७५ साली या नियमावलीच्या नव्या आवृत्त्या निघाल्या. १९५८ मध्ये स्वीडनमधील ऑस्लो येथे ‘वर्ल्ड ब्रिज फेडरेशन’या जागतिक संघटनेची स्थापना झाली. १९५० मध्ये जागतिक अजिंक्यपदाचे सामने सुरू झाले. ‘टीम ऑफ फोर डुप्लिकेट’ पद्धतीच्या या सामन्यांसाठी ‘बर्म्यूडा बोल’ नावाचा चषक ठेवण्यात आला आहे. हे समाने दर वर्षी भरतात. १९६० साली ‘टीम ऑलिंपियाड’ ची जागतिक स्पर्धा व १९६४ साली ‘पेअर ऑलिंपियाड’ ची जागतिक स्पर्धा सुरू झाली.  या दोन्ही स्पर्धा चार वर्षांतून एकदा होतात. आज जगात ८० हून अधिक देशांत ब्रिज खेळला जातो. ह्या देशांतून ब्रिजमंडळे स्थापन झाली असून ती सर्व ‘वर्ल्ड ब्रिज फेडरेशन’ शी संलग्न आहेत.

१९५८ ते १९६९ पर्यंत सतत १२ वर्षे इटलीने जागतिक अजिंक्यपद आपल्याकडे राखले. १९७० मध्ये अमेरिकेच्या ‘डॅलस एसेस’ यांनी हे अजिंक्यपद मिळविले व चीनच्या राष्ट्रीय संघाने उपविजेतेपद मिळविले. चीनच्या या राष्ट्रीय संघाचे कप्तान चार्ल्स वेई यांनी तयार केलेल्या ‘प्रिसिजन सिस्टिम’ या पद्धतीने गेल्या दहा बारा वर्षांत ब्रिजजगताला मोहित केले आहे. जगातील अनेक तज्ञ ब्रिजपटूंनी या पद्धतीवर पुस्तके लिहिली आहेत.

भारतीय ब्रिजमंडळाची स्थापना १९७९ साली झाली. या मंडळाचे प्रारंभकाळातील अध्यक्ष रामनिवास रुईया यांच्या सक्रीय प्रोत्साहनामुळे भारतात ब्रिजची चळवळ चांगलीच फोफावली. ओरलँडो कँपॉस, रमेश गोखले, पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ब्रिज डायजेस्ट या इंग्रजी मासिकाचे संपादक अविनाश गोखले, टिब्रिवाला, जिमी मेहता, बाळू उकिडवे, फर्सी दस्तूर, शरद म्हात्रे, रुबी रॉय, संतनू घोष कर्नल व्ही. एस्. एम्. शर्मा इ. भारतातील नामांकित ब्रिजपटू आहेत. आंतरराष्ट्रीय ब्रिजच्या क्षेत्रात कल्बर्टसन यांच्यानंतर चार्ल्स एच्. गोरेन हे एक प्रख्यात खेळाडू असून त्यांनीही ब्रिजवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

आल्फ्रेड शेनवुल्ड, ह्यूग केल्से, व्हिक्टर मोलो, टेरेल्स रीस, यूअर्ट केंप्‌सन, राफेल सिओफी, ॲल्बर्ट एच्. मोअरहेड, बेन कोएन, जॉर्ज बेलाडोना, फोरक्के रिक्सी मार्कूस ही महिला ब्रिजपटू, ऑझ्‌वाल्ड जॅकोबी, एड्‌गर कॅप्लान, बॉबी गोल्ड्मन, जेरेमी फ्लिंट, रिचर्ड एल्. फ्राय, हौअर्ड शेनकेन, ॲलन सोन्टग, ॲलन ट्रस्कॉट, गेझा ओटलीक, बेनिटो गराझो, एरिक जॅनरस्टन इ. नामवंत ब्रिजपटूंची एक सातत्यशील परंपराच जागतिक ब्रिजच्या क्षेत्रात दिसून येते. आज जगभर जवळजवळ ५ कोटी ब्रिजपटू असून सु. ६००० ब्रिज- मंडळे अस्तित्वात आहेत. आतापर्यंत ब्रिजवर प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची संख्या सु. ६००० असून, जगातील सु. २५ राष्ट्रांतून या विषयाला वाहिलेली शेकडो नियतकालिके नियमितपणे प्रसिद्ध होत असतात.

खेळाचे प्राथमिक स्वरूप: हा खेळ बावन्न पानी पत्त्यांचा एक जोड घेऊन चार खेळाडूंमध्ये दोन दोन खेळाडू भागीदार याप्रमाणे खेळतात. एका खेळाडूने पाने पिसल्यानंतर त्याच्या उजवीकडील खेळाडूस ती काटावयास देण्याचा नियम काटेकोरपणे पाळला जातो. त्याने कमीत कमी चार तरी पाने काटणे आवश्यक आहे. वाटणाऱ्याने आपल्या डावीकडून वाटावयास सुरुवात करावयाची असते. प्रत्येक वेळेस एकेकच पान वाटावयाचे असते. याप्रमाणे प्रत्येकाच्या वाट्याला एकूण १३ पाने येतात. घड्याळकाट्याच्या दिशेनुसार म्हणजे डावीकडून उजवीकडे अशा क्रमाने बोली (बिडिंग) करावयाची असते. प्रत्येकजण आळीपाळीने पिसणी करतो. पाने पिसणाऱ्याने बोलीला सुरुवात करावयाची असते. समजा, अ, ब, क आणि ड हे चार खेळाडू खेळावयास बसले आहेत. यांतील अ आणि क हे तसेच ब आणि ड हे भिडू-भिडू होत.

समजा, यांतील अने प्रथम पाने वाटली आहेत. त्याची बोली करावयाची इच्छा असल्यास त्याने बोलावे; अन्यथा ‘पास’म्हणून पुढे चाल द्यावी. त्यानंतर ब, क आणि ड हे क्रमाक्रमाने चढती बोली करू शकतात. पहिल्या फेरीपुरता प्रत्येकाला बोली करण्याचा अधिकार असतो. नंतरच्या फेरीला एकजण बोलल्यास पुढील तिघांना पुन्हा बोलण्याची संधी मिळते. सर्वांनी पुढे चाल दिल्यास (‘पास’म्हटले तर) तो डाव मोडून नवीन डावाची सुरुवात केली जाते. एखाद्या बोलीवर पुढील तीन खेळांडूनी पुढे चाल दिल्यास ती बोली हा त्या डावाच अधिकृत मान्य झालेला ‘कॉल’म्हणजे बोली-करार होय. तो कॉल ज्या रंगातील आहे त्या रंगात ज्यांचा कॉल मान्य झालेला आहे त्या पक्षाच्या खेळाडूंपैकी ज्या खेळाडूने प्रथम बोली दिली असेल, तो खेळाडू या डावाचा नाविक (डिक्लेअरर) बनतो. त्याच्या डाव्या हाताचा सुरुवातीची उतारी (ओपनिंग लीड) करतो व नाविकाचा भिडू आपल्या हातातील सर्व पाने टेबलावर उताणी पसरतो. नाविकाच्या भिडूस ‘डमी’म्हणतात. तो त्या वेळेपासून खेळात फारसा भाग घेत नाही. नाविकाच्या सूचनेप्रमाणे पाने टाकतो.

ब्रिजचा उगम झाल्यापासून कल्बर्टसन खेळ-पद्धती जास्त प्रचारात होती. सु. १९४९ पासून गोरेन पद्धती विशेष प्रचारात आली. १९५९ मध्ये इटालियन खेळ-पद्धतींनी आपले प्रभुत्व गाजविले. मात्र या पद्धती फार कृत्रिम असल्यामुळे त्या लोकप्रिय झाल्या नाहीत. १९४० ते ६० या कालखंडात अनेक तज्ञ ब्रिजपटूंनी खेळाच्या विविध प्रकारच्या पद्धती तयार केल्या. मात्र १९७० पासून काटेकोर खेळ-पद्धतीचे (प्रिसिजन सिस्टिम) युग सुरू झाले.

हात-पद्धती (ट्रिक सिस्टिम) व गुण-पद्धती (काउंट सिस्टिम) : कल्बर्टसन यांच्या हात-पद्धतीमध्ये जड पानांचे मूल्य पुढीलप्रमाणे आहे :एक्का =एक ट्रिक, एक्का-राजा (एकाच रंगाचे) =दोन ट्रिक्स, एक्का-राणी (एकाच रंगाचे) =दीड ट्रिक, राजा-राणी (एकाच रंगाचे) =एक ट्रिक, राजा व हलके पान =अर्धी ट्रिक; दोन राण्या =अर्धी ट्रिक. या ट्रिक्सना मानाच्या (ऑनर ट्रिक्स) किंवा जलदगती (क्विक ट्रिक्स) असे म्हणतात. गुलाम, दश्शी ही पाने असल्यास त्यांचे अधिक मूल्य (प्लस व्हॅल्यू) धरले जाते. गुण-पद्धतीमध्ये एक्का =४, राजा =३, राणी =२ व गुलाम =१ असे गुण दिलेले आहेत. मिल्टन वर्क या ब्रिजपटूने हे गुण ह्या जड पानांना प्रथम निश्चित केले. चार्ल्स एच्. गोरेन यांनी या पद्धतीचा मोठा प्रचार केला, म्हणून या पद्धतीस ‘गोरेन सिस्टिम’हे नाव पडले. वर उल्लेखिलेल्या गुणतक्त्यावरून आधारित अशा आपापल्या पद्धती अनेक तज्ञ खेळांडूनी तयार केल्या.

एकाच पातळीवर बोली मान्य झाल्यास सात हात करावे लागतात. दोनाच्या पातळीवरील बोलीस आठ, तिनाच्या पातळीवर बोलल्यासनऊ हात करावे लागतात. जास्तीत जास्त साताच्या पातळीपर्यंत बोली होऊ शकते.

एखाद्या खेळाडूची बोली पूर्ण होऊ शकणार नाही, असे त्याच्या प्रतिपक्षाच्या एखाद्या खेळाडूस वाटले, तर त्याची पाळी येईल तेव्हा - व मधल्या खेळांडूनी एखादी नवीन बोली दिली नसेल तर - तो दुप्पट (डबल) देऊ शकतो. ज्या खेळाडूच्या बोलीवर अशी दुप्पट बोलली जाते, तो वा त्याचा भिडू पुनर्दुप्पट (रिडबल) बोलू शकतात. या दुप्पट-पुनर्दुप्पटमुळे बोली पूर्ण झाल्यास साध्या करारास मिळणाऱ्या गुणांपेक्षा दुप्पटमध्ये दुप्पट, तर पुनर्दुप्पटमध्ये चौपट गुण मिळतात, तद्वतच हात कमी झाले तरी नियमानुसार दुप्पट वा चौपट गुण ती बोली बुडविणाऱ्या प्रतिपक्षास मिळतात. या दुप्पट-पुनर्दुप्पटच्या प्रत्येक वेळी-‘मी तुमचे हात बुडवीन आणि माझे हात मी बुडू देणार नाही’किंवा ‘माझे तुमच्या आव्हानस प्रति-आव्हान आहे’-असेच अर्थ असतात, असे नाही. आपल्या हातांतील पानांची शक्ती दाखविण्यासाठीही दुप्पटीची बोली दिली जाते. भागीदारीत काही पद्धती ठरलेली असल्यास विशिष्ट अर्थ सांगण्यासाठीही दुप्पट दिली जाते.

ब्रिजमध्ये प्रत्येक रंगाला विशिष्ट दर्जा दिलेला असतो. या खेळात बिनहुकुमी डावाचा (नो ट्रम्प) अंतर्भाव आहे. त्याचा दर्जा सर्व रंगांमध्ये श्रेष्ठ समजला जातो. त्याच्या खालोखाल इतर रंग उतरत्या दर्जाने खाली दिले आहेत :

मराठी नाव

इंग्रजी नाव

बिनहुकुमी

नो ट्रम्प

इस्‌पिक

स्पेड किंवा रॉयल

बदाम

हार्ट

चौकट

डायमंड

किल्वर

क्लब

बोलीद्वारे मिळणारे गुण

इस्‌पिक आणि बदाम ह्या रंगांना जड वा भारी रंग (मेजर स्यूट) व चौकट आणि किल्वर या रंगांना कनिष्ठ किंवा हलके रंग (मायनर स्यूट) म्हणतात. एक बदाम वा एक इस्पिक बोली करून दाखविल्यास प्रत्येकी ३०/३० गुण मिळतात. चौकट किंवा किल्वर यांना प्रत्येकी २०/२० गुण आहेत. एका बिनहुकुमी बोलीला ४० गुण व पुढील प्रत्येक बिनहुकुमी बोलीस ३० गुण मिळतात. उदा., चार इस्‌पिक वा चार बदामची बोली करून दाखविली, तर ३० x४ =१२० गुण मिळतील. ५ चौकट अगर ५ किल्वरची बोली करून दाखविली, तर २० x५ =१०० गुण मिळतील. ६ बिनहुकुमीची बोली केल्यास १९० गुण मिळतील.

एकाच वेळी अगर एकाच खेपेत दिलेल्या बोलीद्वारे-अगर दोन वा तीन बोलींत-ज्या पक्षाचे १०० गुण होतील, त्याची खेळी (गेम) झाली, असे मानण्यात येते. ब्रिजच्या परिभाषेत ती बाजू ‘व्हल्‌नरेबल’(भेद्य) झाली, असे म्हणतात, ज्या पक्षाच्या अशा दोन खेळी प्रथम होतील, त्या पक्षाचे ‘रबर’झाले, असे समजले जाते. बोलीद्वारे एखाद्या पक्षाने २० ते ९० गुण मिळविले तर त्यांची आंशिक खेळी (पार्ट गेम) झाल्याचे गृहीत धरले जाते.

एका पक्षाची आंशिक खेळी झालेली असताना प्रतिपक्षाची पूर्ण खेळी (गेम) झाल्यास आंशिक खेळी बुडते. म्हणजे गुणांची एकंदर बेरीज करताना त्या आंशिक खेळीद्वारे मिळविलेले गुण जमेस धरले जातात. मात्र खेळी पुरी करण्याच्या दृष्टीने ते गुण विचारात घेतले जात नाहीत. उदा., एखाद्या पक्षाची दोन चौकट अगर दोन किल्वरची ४० गुणांची आंशिक खेळी झालेली आहे. आता त्यांना खेळी पुरी करण्यास ६० गुणांचीच आवश्यकता आहे. परंतु मध्येच प्रतिपक्षाने खेळी केली, तर ही ४० गुणांची आंशिक खेळी बुडते. म्हणजे त्यांना आता खेळी पूर्ण करण्यासाठी १०० गुणांची जरुरी आहे.

जादा गुण

एखाद्या पक्षाने सहाच्या पातळीवर कोणत्याही रंगात बोली करून ती पूर्ण केल्यास म्हणजे बारा हात केल्यास त्या पक्षाचा छोटा म्हणजे ‘लिट्ल स्लॅम’ झाला, असे समजतात आणि साताच्या पातळीवर कोणत्याही रंगात बोली करून ती पूर्ण केल्यास,  म्हणजे तेरा हात केल्यास, त्या पक्षाचा मोठा म्हणजे ‘ग्रँड स्लॅम’ झाला, असे मानतात. स्लॅम्स बोलून व पूर्ण करून दाखविल्यास विशेष गुण  (बोनस) मिळतात. हे गुण नेहमीच्या गुणांव्यतिरिक्त जादा मिळतात. लहान स्लॅमला ५०० व मोठ्या स्लॅमला १००० गुण मिळतात. हेच स्लॅम्स त्या पक्षाची भेद्य बाजू असताना केल्यास त्यांना अनुक्रमे ७५० व १५०० गुण मिळतात.

एखाद्या पक्षाच्या दोन खेळी झाल्या व त्यावेळी प्रतिपक्षाची एकही खेळी झाली नसेल, तर त्या पक्षास ७०० जादा गुण मिळतात आणि प्रतिपक्षाची एखादी खेळी झालेली असल्यास दोन खेळी करणाऱ्या पक्षास ५०० जादा गुण मिळतात. बिनहुकुमीची बोली असताना एकाच खेळाडूकडे चार एक्के असल्यास किंवा रंगात बोली असताना - ज्या रंगाची बोली असेल त्या रंगाची - पाच जड पाने म्हणजे एक्का - राजा - राणी - गुलाम व दश्शी असल्यास १५० जादा गुण मिळतात व चारच जड पाने असतील तर १०० जादा गुण मिळतात.

एखाद्या पक्षाचे हात कमी झाले, तर त्याच्या प्रतिपक्षास पुढीलप्रमाणे गुण मिळतात:

कमी हात होणे म्हणजे भुर्दंड

अभेद्य         भेद्य

साधी                     दुप्पट दुप्पट            साधी

१ हात

५०

१००

१००

२००

२हात

१००

३००

२००

५००

३हात

१५०

५००

३००

८००

४ हात

२००

७००

४००

११००

५ हात

२५०

९००

५००

१४००

६ हात

३००

११००

६००

१७००

७ हात

३५०

१३००

७००

२०००

पुनर्दुप्पट असेल तर दुप्पटीमुळे मिळणाऱ्या गुणांची दुप्पट केली जाते. जादा हात झाल्यास पुढीलप्रमाणे गुण मिळतात : बाजू भेद्य असो वा नसो; दुप्पट दिलेली नसल्यास प्रत्येक जादा हातास त्याचे मूल्य (ट्रिक व्हॅल्यू) - प्रत्येक रंगास ठरलेले - मिळते व दुप्पट असल्यास आणि भेद्य नसल्यास १०० गुण मिळतात व भेद्य असल्यास २०० गुण मिळतात. खेळ बंद करताना एखाद्या पक्षाची खेळी झालेली असेल तर त्या पक्षास न संपलेल्या (अन्‌फिनिश्ड) रबरचे ३०० जादा गुण मिळतात आणि ज्या पक्षाची आंशिक खेळी असेल, त्या पक्षास ५० जादा गुण मिळतात.

गुणमोजणी

पूर्वी कागदावर आम्ही /तुम्ही असे विभाग पाडून मिळविलेले गुण लिहीत. खेळीच्या दृष्टीने मिळविलेले गुण रेषेच्या खाली व अवांतर मिळविलेले गुण रेषेच्या वर लिहीत. गेल्या २५ - ३० वर्षांत ही पद्धती मागे पडली व फक्त तीन स्तंभांत ह्या गुणमोजणीची नोंद होऊ लागली.  पहिल्या स्तंभात खेळीच्या दृष्टीने मिळविलेले गुण लिहावयाचे. खेळी झाल्यास ते गुण खेळी झाली हे कळण्यासाठी अधोरेखित करावयाचे. दुसऱ्या स्तंभात अवांतर वा जादा मिळणारे गुण लिहावयाचे आणि तिसऱ्या स्तंभात बेरीज लिहावयाची. मात्र  लिहिणाऱ्याने गुण लिहिताना स्वतःला अधिक (+) चिन्ह द्यावयाचे व प्रतिपक्षास उणे (-) चिन्ह द्यावयाचे - उदा., अ पक्षाची चार बदामची बोली पूर्ण झाली व त्याच पक्षाची अगोदर एक खेळी झालेली असल्यामुळे आणि प्रतिपक्षाची खेळी झालेली नसल्यामुळे ७०० गुण मिळाले आणि ब प्रतिपक्षाची त्या डावापर्यंत ३०० गुणांची आघाडी असली, तर पुढील प्रमाणे गुण लिहावयाचे : अचे + (अधिक) चिन्ह आहे, असे समजू. +१२० + ७०० =+ ५२० R. अ पक्षाला त्या विशिष्ट डावाला ८२० गुण मिळाले; परंतु प्रतिपक्षाची ३०० गुणांची आघाडी असल्यामुळे ते वजा जाता अ पक्षाची ५२० ची आघाडी झाली. रबर झाल्याचे कळावे, म्हणून वर दर्शविल्याप्रमाणे या नोंदलेल्या गुणांच्या खाली रेष मारावयाची व पुढे‘आर्’ लिहावयाचा.

प्रत्यक्ष खेळ

समजा अ, ब, क आणि ड हे चार खेळाडू खेळावयास बसले आहेत. ‘अ’ ने पाने पिसली आहेत, असे समजू. त्याने उजवीकडील‘ड’ या खेळाडूला काटावयास द्यावयाचे. काटलेला भाग खाली ठेवून उरलेला भाग त्याच्यावर ठेवावयाचा. नंतर डावीकडून अनुक्रमे ‘ब’,‘क’,‘ड’ आणि शेवटी स्वतःला अशी पाने वाटावयाची. प्रत्येक वेळी एकच पान वाटावयाचे. नंतर प्रत्येकाने पाने उचलून हातात घ्यावयाची व ती घेताना १३ आहेत की नाहीत हे पाहावयाचे - नंतर सर्व रंगांची पाने लावायची आणि एक्का = ४, राजा = ३, राणी = २ व गुलाम = १ अशा कोष्टकाप्रमाणे गुण मोजावयाचे व प्रत्येक खेळाडूने ज्या पद्धतीने खेळावयाचे ठरविले असेल त्याप्रमाणे बोली द्यावयाच्या. सर्वसाधारणपणे दोन्ही भिडूंचे मिळून २४ – २६ गुण झाले तर त्या पक्षाची ‘खेळी’ होऊ शकते. तीन बिनहुकुमी, चार इस्‌पिक/चार बदाम/पाच चौकट/पाच किल्वर हे बोलींचे प्रकार (गेम कॉल्स) आहेत. यांपैकी कोणतीही एखादी बोली पूर्ण होऊ शकते. कोणती बोली मान्य (स्टँड) करावयाची, हे खेळाडूना परस्परांशी संभाषण करून ठरवता येते. ब्रिजमध्ये पानांच्या विभागणीला (डिस्ट्रिब्यूशन ऑफ कार्ड्‌स) अत्यंत महत्व आहे. सर्वसाधारणपणे १८ - २३ गुण असतील तर त्या पक्षाची आंशिक खेळी होऊ शकते व ३२ - ३३ असतील तर स्लॅम होऊ शकतो.

नवोदित खेळाडूंनी ब्रिज शिकताना बोली करणे सोपे जावे, म्हणून पुढील साधी पद्धती अवलंबावी. खेळाडूने हातातील गुणांची बेरीज ११ पर्यंत असल्यास पुढे चाल (पास) द्यावी. १२ ते १४ असल्यास १ किल्वर;१५ ते १७ असल्यास १ चौकट;१८ ते २० असल्यास १ बदाम आणि २१ व अधिक असल्यास १ इस्‌पिक अशी बोली करावी. त्या खेळाडूनंतर त्याच्या डावीकडचा प्रतिपक्षाचा भिडू बोली देतो. त्यानंतर पहिल्या खेळाडूचा भिडू बोली देतो. त्याने आपल्या हातातील गुण पहिल्या खेळाडूने जाहीर केलेल्या गुणांमध्ये मिळवावे. ती बेरीज २४ ते २६ होत असेल, तर इस्पिक हा खेळी-टप्पा (गेमझोन) दर्शविणारा कॉल द्यावा. एक इस्पिकवर-एक बिनहुकुमी हा खेळीटप्पा व नंतर चार बिनहुकुमींवर एक्के-राजे आवश्यक वाटल्यास विचारावेत-३० ते ३२ बेरीज झाली, तर एक बिनहुकुमी कॉल द्यावा. मग प्रारंभ (ओपनिंग) करणाऱ्याने आपल्या हातातील एक्के दाखवावे. ती पद्धत अशी:

दोन किल्वर     =      एक ही एक्का नाही

दोन चौकट      =      एक एक्का

दोन  बदाम     =      दोन एक्के

दोन इस्पिक     =      तीन एक्के

दोन बिनहुकुमी   =      चार एक्के

ह्याच पद्धतीने राजे दाखवावे व नंतर एकमेकांनी आपल्या हातांतील रंग दाखवावे. आपण खेळी-टप्प्यामध्ये अगर आंशिक खेळीमध्ये आहोत, हे समजून त्याप्रमाणे जपून बोली करावी. आपल्या उजवीकडच्या  खेळाडूने एखाद्या रंगात बोली दिली असेल, तर आपल्याकडे १५ किंवा अधिक गुण असल्यास दुप्पट द्यावी. ११-१४ गुण असल्यास ज्या रंगात चांगली पाने आहेत, त्या रंगात बोली द्यावी. प्रतिपक्षाचे हात होणार नाहीत, याची खात्री असल्यास दुप्पट द्यावी. आपल्या हातात चोरटी पाने किती आहेत, आपण भेद्य आहोत काय, वगैरे गोष्टी लक्षात घेऊन सावधानपणे बोली करावी. धाडस, स्मरणशक्ती, सावधपणा, अभ्यासू वृत्ती इ. गुण जोपासल्यास या खेळात नैपुण्य मिळविता येते. उच्च प्रतीच्या बौद्धिक कौशल्याचा हा खेळ असल्याने त्यातून अपरिमित असा बौद्धिक आनंद मिळतो.एक विरंगुळ्याचे साधन म्हणूनही त्यास आधुनिक जनजीवनात खास स्थान लाभले आहे.

संदर्भ : 1. Coffin, George S. Bridge Play from A to Z, London.

2. Cohen, Ben; Barrow, Rhoda, Conventions Made Clear, London, 1966.

3.  Culbertson, Ely, Contract Bridge Complete, London, 1954.

4. Frey, Charles; Truscott, Alan F. The Bridge Players Encyclopedia, London, 1967.

5. Goren, Charles H. Better Bridge for Better Players, London, 1959.

6. Goren, Charles H.; Olsen, Jack, Bridge is My Game, London, 1965.

7. Mollo, Victor, Success at Bridge, London, 1964.

8. Reese, Terence, Bridge, London, 1963.

9. Sheinwold, Alfred, First Book of Bridge, London, 1953.

11. जोशी, शरद, उत्तम ब्रिज कसे खेळावे, मुंबई, १९७२.

12. जोशी, शरद, तुम्हीच ब्रिज शिका, मुंबई, १९७१.

13. फडके, रा. ग. समग्र कॉन्ट्रॅक्ट ब्रिज, भाग १, १९७७.

लेखक: शरद जोशी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/5/2021



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate