रस्त्यावर ये-जा करणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून त्यांची औटघटका करमणूक करणारे खेळ, कसरती, गायन-वादन-नर्तनादी प्रकार म्हणजे सामान्यपणे रस्त्यावरील रंजनप्रकार म्हणता येतील. प्रत्येक समाजाचे रंजनप्रकार हे संगीत, नृत्य, नाटक इ. ललित कला, शारीरिक कसरती, हिकमती, कसब-कौशल्याचे प्रकार यांच्या रूपाने निर्माण होत असतात. कला आणि क्रीडा अशा मोठ्या वर्गीकरणाखाली त्यांचा अंतर्भाव होऊ शकेल. समाजातील काही रंजनप्रकार अधिक सुसंघटितपणे विकसित झालेले दिसतात; तर काही रंजनप्रकार लोकसंस्कृतीच्या काही परंपरांतून चालत आलेले असतात. रस्त्यावरील रंजनप्रकार सार्वत्रिक असून ते बहुतेक सर्व समाजांत पूर्वीपासून प्रचलित असल्याचे दिसून येते. हे रंजनप्रकार रस्त्यावर म्हणजे खुल्या वातावरणात केले जातात. रस्त्यावर आपाततः जमणाऱ्या गर्दीचे मनोरंजन आणि उद्बोधन करणे आणि आपल्या कलेची किंवा कसबाची कदर म्हणून लोकांनी स्वेच्छेने दिलेल्या पैशांवर उदरनिर्वाह करणे, हे या रंजनकारांचे उद्दिष्ट असते. सामान्यतः पारंपारिक समाजात खेडोपाडी आणि नवोदित शहरांतूनही अनेकदा रस्त्यावरील हे रंजनप्रकार आढळतात. पारंपारिक समाजात रंजनकारांचा वर्ग हा पिढ्यान्पिढ्या हे काम करीत आल्याचे दिसून येते. आधुनिक काळात रस्त्यावरील काही नवे रंजनप्रकार दिसून येतात. उदा., डोळे बांधून मोटारसायकल चालविणे, राजकीय-सामाजिक प्रचारासाठी केली जाणारी पथनाट्ये इत्यादी. आधुनिक काळात पारंपारिक असे रस्त्यावरील काही रंजनप्रकार बंदिस्त अशा रंगमंचावर व संघटित अशा कलावंतांकडून नव्या स्वरूपामध्ये सादर केले जातात. महाराष्ट्रात ज्यांना ‘लोकसंस्कृतीचे उपासक’ असे रा. चिं. ढेरे यांनी म्हटले आहे, अशा वेगवेगळ्या ग्रामदैवतांच्या उपासकांनी पिढ्यान्पिढ्या समाजाचे रंजन आणि उद्बोधन केलेले आहे. परंतु लोकसंस्कृतीच्या या उपासकांची ही परंपराही आधुनिक काळात नष्ट होत चालली आहे. आधुनिक काळात सामान्यपणे लोकरंजनाची क्षमता आणि साध्य−साधने असलेले लोक रस्त्यावर येणे कठीण आहे. कारण रस्त्यावरील रंजनप्रकारांची जी पूर्वापार प्रथा आहे, त्या प्रथेला अनुकूल असे वातावरण आधुनिक काळात उपलब्ध नाही. औद्योगिकीकरण, नागरीकरण इत्यादींमुळे त्याचप्रमाणे आधुनिक अशी लोकरंजनाची माध्यमे−उदा., चित्रपट, रंगभूमी, नभोवाणी, दूरचित्रवाणी, सुसंघटित क्रीडाप्रकार, क्रीडागारे इत्यादींमुळे−परंपरागत पथिकरंजनक्षेत्रातील रंजनकार व प्रेक्षक यांमधील एकेकाळचा सुसंवाद किंवा संबंध नष्ट होत चालला आहे. प्रत्येक समाजाच्या रस्त्यावरील रंजनप्रकारांना आता ऐतिहासिकच महत्त्व उरले आहे.
रस्त्यावरील रंजनप्रकारांत गायन, वादन. नर्तन, नाट्य, अभिनय यांसारख्या कलांचा आविष्कार जसा प्रत्ययास येतो, त्याचप्रमाणे शरीरसौष्ठव, कसरतपटुत्व आणि इतर अनेक प्रकारची कौशल्ये किंवा कारागिरी यांचीही प्रचिती येते. तथापि या रंजनप्रकारांची साध्यसाधने मर्यादित असतात. त्यामुळे त्यांचे स्वरूप आणि परिणाम यांत एक प्रकारचा साचेबंदपणा अपरिहार्यपणे निर्माण झाल्याचे दिसून येते. पूर्वी गावोगावी, विशेषतः सुगीच्या काळात, जत्रा, उरूस तसेच ग्रामदेवतेचा एखादा मोठा उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे होत असत व अशा ठिकाणी बराच लोकसमुदाय जमत असे. तिथे व नंतर गावोगावी फिरत कोल्हाटी वा डोंबारी, गारूडी, दरवेशी, बहुरूपी इ. जमाती रस्त्यावर करमणुकीचे खेळ व कसरती करताना दिसत. आजही ते खेडोपाडी दिसतात; तथापि शहरी भागात त्यांचे प्रमाण अत्यंत कमी होत गेलेले दिसते.
भारताप्रमाणेच यूरोप, अमेरिका, आफ्रिका इ. खंडांतील विविध देशांतून एकेकट्याने वा गटाने रस्त्यावरील खेळ करणारे लोक आढळतात. अमेरिकेमध्ये दोन उंच इमारतींना दोर बांधून त्यावरून चालत जाणारे साहसी कसरतपटू पाहावयास मिळतात. आफ्रिकेमध्येही कोरड्या विहिरीत अस्वलासारखा प्राणी खाली सोडून, त्या विहिरीवर अतिअरुंद फळकुट टाकून त्यावरून नाचत नाचत विहीर पार करणारे लोक आढळतात, तसेच डोळ्यांना पट्टी बांधून, समोरच्या फळ्याच्या मध्यभागी माणूस उभा करून त्याच्या अवतीभवती चारही बाजूंना फळ्यावर अचूक नेमबाजीने चाकू-सुरे मारणारे जिप्सी हे रस्त्यावरील मनोरंजनाचे प्रकार करणारे काही उल्लेखनीय लोक होत. रस्त्यावरचे खेळ व करमणुकीचे प्रकार हे फार प्राचीन काळापासून चालत आले आहेत. प्राचीन ईजिप्शियन, ग्रीक, रोमन संस्कृतीत, तसेच पौर्वात्य देशांतही भटक्या कसरतपटूंचे आणि रंजनकारांचे अनेक प्रकार आढळत. एका ग्रीक कलशावर (इ. स. पू. सु. ५००) चाक फिरवणाऱ्या मुलाचे एक चित्र रेखाटल्याचे आढळून आले आहे. प्राचीन रोममधील भटक्या रंजनकाराला ‘जॉक्युलेटर’ अशी संज्ञा होती. हे लोकरंजनकार एकेकट्याने वा गटागटाने रस्तोरस्ती हिंडून लोकांची करमणूक करीत व त्यांच्याकडून मिळणाऱ्या बिदागीवर आपला उदरनिर्वाह करीत. मध्ययुगात अशा भटक्या लोकरंजनकारांमध्ये कसरतपटू वा डोंबारी (ॲक्रोबॅट्स, टम्बलर्स); गायक-वादक व नट; हातचलाखीचे व कौशल्याचे खेळ करणारे जादूगार (जग्लर्स, कॉन्जुरर्स); विदुषक; माकडवाले मदारी; अस्वलवाले दरवेशी अशा लोकांचा समावेश होता. पण पुढे त्यात उनाड, गुन्हेगारीवृत्तीच्या लोकांचीही−उदा., पत्त्यांची हातचलाखी करून फसविणारे, खिसेकापू इ. ह्यांचीही−भर पडत गेली.
इंग्लंडमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या प्रारंभी असे मनोरंजन करणाऱ्या परदेशी प्रवाशांचा अगदी सुळसुळाट झाला होता. परिणामी राणी एलिझाबेथने अस्वलांचे, माकडांचे खेळ रस्त्यावर करण्यास कायद्याने बंदी केली. इंग्लंडपेक्षाही इटली, भारत, ईजिप्त इ. देशांत रस्त्यावरचे मनोरंजन करणारे लोक अधिक प्रमाणात आढळतात. इटलीमध्ये विशेषतः रस्त्यावरचे गायन-वादन फार लोकप्रिय आहे. व्हेनिसमधील कालव्यांवर गाणारांचे तांडे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची करमणूक करीत फिरताना दिसतात.
फार प्राचीन काळापासून ह्या लोकांचे उल्लेख सापडतात. शुक्लयजुर्वेदाच्या वाजसनेयी माध्यंदिन संहितेत ‘वंशनर्तिन’ म्हणजे वेळूवर नाच करणाऱ्या व्यक्तीचा निर्देश आहे (३०.२१). त्यावरून कसरतीचे खेळ करणाऱ्या जमातीचे प्राचीनत्व सूचित होते. संगीतरत्नाकरामध्येही (सु. १२१०−४७) ‘कोल्हाटिका’चे (कोल्हाटी) वर्णन आढळते.
रस्त्याच्या कडेला साधारण मोकळी व लोकांच्या रहदारीची, वर्दळीची सोईस्कर जागा शोधून हे खेळ मांडतात. डोंबारी प्रथम आजूबाजूच्या लोकांचे ध्यान वेधून घेण्यासाठी ढोलके वाजवू लागतो. तोपर्यंत त्याच्या कुटुंबातील इतर माणसे फुल्यांसारख्या काठीच्या दोन-दोनच्या जोड्या साधारण १५−२० फुटांच्या अंतरावर उभ्या करतात आणि त्यावर खेचून एक दोर किंवा तार बांधतात. दरम्यान त्या डोंबाऱ्याची लहान मुलेमुली कोलांट्या उड्या, हाताची चक्री (कार्ट व्हील) इ. छोट्या-मोठ्या शारीरिक कसरती करून दाखवितात. मग हातात लांबलचक बांबू घेऊन एखादा डोंबारी किंवा त्याची स्त्री, अत्यंत बारीक अशा दोरावरून किंवा तारेवरून, ढोलाच्या तालावर कसरत करीत, तोल सावरीत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातात. आणखी एक खेळाचा एक प्रकार म्हणजे डोंबारी स्त्री आपल्या सहा-सात महिन्यांच्या तान्ह्या अर्भकाला १५−२० फुटी उंच बांबूच्या टोकाला बांधते आणि तो बांबू हात सोडून आपल्या पोटावर वा दातांवर तोलून धरीत त्या रिंगणातून फिरते. नाना प्रकारच्या कौशल्याच्या व अवघड अशा उड्या, दोरीवरच्या, तारेवरच्या, वेळूच्या काठीवरच्या चित्तथरारक साहसी कसरती, असे साधारण त्यांच्या खेळाचे स्वरूप असते. जीवावार उदार होऊन, असे रस्त्यावरचे खेळ करणाऱ्या या लोकांचे पोट मात्र अगदीच हातावर असते.
सापांचे खेळ करून दाखविणे हाच यांच्या उपजीविकेचा व्यवसाय आहे. रस्त्यावरचे मनोरंजन करणाऱ्या इतर जमातींप्रमाणे हे सुद्धा भटक्या जमातीत मोडतात. डोंबारी, गारूडी, दरवेशी इ. जमातींच्या लोकांची गावाबाहेर पाले असतात. एखाद्या गावातील मोक्याच्या चार-पाच ठिकाणी खेळ केल्यावर हे लोक दुसरे गाव शोधतात. गारूडी हे डुगडुगी, पुंगी, बासरी, ढोलके यांसारखी वाद्ये वाजवून लोकांना गोळा करतात. डालगीत त्यांचे सामानसुमान असते; तर टोपलीतून नाग, साप, अजगर, मुंगूस असे प्राणी असतात. पुंगी वाजवून नागाला डोलविणे, गुंगविणे व अखेर साप व मुंगूस दाखविणे यांसारखे खेळ, तसेच साप-मुंगुसाची लढाई दाखवून हे लोकांचे मनोरंजन करतात. यांना मदारी, सपेरा अशीही नावे आहेत. हा गारूड्यांचा व्यवसाय प्राचीन काळातही असावा, असे गरुडपुराणात, जातकांत असलेल्या उल्लेखांवरून दिसते. त्यांच्या पुंगीला उत्तरेकडे ‘बीन’ म्हणतात. दिल्लीजवळ मोलाडबंड या खेड्यात गारूड्यांना सर्पाच्या खेळांचे व्यावसायिक प्रशिक्षण देणारी एक शाळा आहे.
अस्वलाचे खेळ दाखवून गावोगाव भटकणे, हा यांचा उदरनिर्वाहाचा धंदा होय. अस्वलांना माणसाळवून, त्यांना मागील दोन पायांवर नाचायला लावून, कधी कोलांट्या उड्या मारायला लावून हे लोक इतरांची करमणूक करतात. कधीकधी अस्वलाच्या केसांची पुडी बांधून त्याचे ताईत-गंडेदोरे इ. करून देतात; तर कधी अस्वलांची नखेही अशुभ टाळण्यासाठी लोकांना विकत देतात.
हे रस्त्यावर माकडाचा खेळ दाखवतात. मदारीच्या एका हातात डुगडुगी हे डमरूच्या आकाराचे वाद्य असते. त्याच्या मध्यभागी असलेल्या निमुळत्या, बारीक गळ्याच्या भागाला दोन दोऱ्या असतात. त्यांच्या टोकांना काड्याच्या पेटीतील गुलासारखे मेणाचे गोळे असतात व हात हालविताच हे वाद्य दोन्ही पुडींवर तड्तड् वाजते. त्याच्या दुसऱ्या हातात काठी व माकडांना बांधलेल्या दोऱ्यांची टोके असतात. खांद्याला झोळी असते. माकडाचे एक कुटुंबच त्याच्या बरोबर असते. खेळ पाहणाऱ्या बालकबालिकांचा समूह तयार होईल, अशी मोक्याची जागा निवडतात. मग माकड्यांच्या कुटुंबातील-देवजा व भागाबाई या नरनरींचे भांडण सुरू होते. भागाबाईचे रुसणे, लाजणे दाखविले जाते. त्यांचे एक पोर ‘बारक्या’ (वा ‘बारकू’) हेही खेळात सामील होते आणि आईबाबांचे भांडण मिटते. यात लहान मुलांचे मनोरंजन अधिक होते.
हे नंदीबैल सजवतात व त्यांना घेऊन गावोगाव हिंडत, लोकांना त्यांचे खेळ दाखवतात. ते गुबगुबी वाजवून गुब् गुब् असा आवाज काढतात. नंदीबैलाचे रुसणे, नाच वगैरे दाखवून लोकांची करमणूक करतात व खेळाच्या अखेरीस नंदीला भविष्य विचारतात व त्यावर शिकवल्यानुसार मान हालवून नंदी होकारार्थी वा नकारार्थी उत्तर देतो. हे ‘तिरमल’ व आंध्र प्रदेशात ‘गंगेड्डू’ अशा नावांनीही ओळखले जातात.
हे लोक पावसाळा संपल्यावर गावोगावी उंट घेऊन भटकत असतात. बहुरूप्याप्रमाणेच ते निरनिराळी सोंगे व नाना वेश धारण करून लोकांची फसवणूक करतात. त्यांच्या सोंगाढोंगाच्या खेळात ते उंटालाही सहभागी करून घेतात. संवाद, पुराण कथा, गाणी इत्यादींचा समावेश त्यांत असतो. डफाच्या साथीवर ते गाणी म्हणतात. हे बोलण्यात चतुर, हजरजबाबी व विनोदी असतात.
हा मनोरंजनाचा रोमहर्षक प्रकार आबालवृद्धांना आकर्षून घेतो. हे लोक अशा प्रकारचे खेळ बहुतेक एकेकट्याने करतात. छोट्या छोट्या लोखंडी पोकळ कड्यांमधून हे लोक आपले सर्व शरीर आरपार नेतात. मनगट व कोपर यांमधील हातांच्या बाहेरच्या बाजूने मोठमोठे दगड फोडतात. जात्याच्या अवजड तळी सहज उचलतात. डोक्याला दोरी बांधून व त्या दोरीला अजस्त्र दगड बांधून, दोन्ही हात मागे बांधतात आणि फक्त डोक्याच्या ताकदीने तो दगड उचलतात. गळ्याला भाल्याचे एक टोक लावून त्याचा दंड वाकवितात. पोटावर दाबून लोखंडी पट्टी वाकवितात. अलीकडच्या काळात चालती मोटार वा मोटारसायकल थांबविणे, अशा प्रकारचे ताकदीचे प्रयोग ते करतात. तसेच सायकलीवरचे कसरतीचे प्रयोग करून हे लोक रस्त्यावर मनोरंजनाचे कार्यक्रम करतात.
हे नानाविध सोंगे धारण करून रस्तोरस्ती फिरत लोकांची करमणूक करतात. त्या त्या परिसरात प्रचलित व काही प्रमाणात सार्वत्रिक असलेल्या विशिष्ट लोकांचे पोशाख व रंगभूषा करून, त्यांच्या चालीरीती, लकबी यांचे, तसेच बोलीभाषेचे व उच्चारधाटणीचे तंतोतंत अनुकरण करून बहुरूपी अनेक वेगवेगळी रूपे धारण करतात आणि विशेषतः गावातील मुख्य बाजारपेठांमधून फिरतात. बहुरूपी हे देवादिकांची पौराणिक रूपे−उदा., गणपती, हनुमान, राक्षस इ.−त्याचप्रमाणे नित्याच्या व्यवहारातील पोलीस, हवालदार, रेल्वेस्टेशनवरील टी. सी. (तिकीट कलेक्टर), स्टेशन मास्तर, लाटसाहब (लॉर्ड साहेब) ठाकूरसाहेब, दरोडेखोर इत्यादींची सोंगेही ते हुबेहूब वठवतात. इतकी की, अनेक भलेभले लोक त्यांच्या सोंगांना फसतात. पहिल्या फेरीत हे लोक वेशभूषा-रंगभूषा करून सोंग दाखवितात व नंतर साधा नेहमीचा पोषाख करून पेशगी मागतात.
ढोलकी, एकतारा, झांज, पेटी इत्यादींसह हे लोक त्या त्या जातीजमातींची पारंपरिक गाणी, आधुनिक गाणी व नाच इ. करून लोकांचे मनोरंजन करतात. विदर्भातील हिंदी-मराठी मिश्रित भाषेत गाणी म्हणणारे तुमडी (तुंबडी) वाले हे ह्याच वर्गात मोडतात. ते ‘लाख् लख्खा’ असा हातातील घुंगुरगोळ्यांचा आवाज ठेक्यासाठी वापरतात. त्यांचे पालुपद असते, ‘बाजीराव, नाना−तो तुमडी भर देना’ गाणी केवळ मनोरंजनाची असतात, जसे−
‘एक होता गहू, त्याच्या पोळ्या केल्या नऊ,
कुऱ्हाडीनं तुटना, लई मऊ मऊ... ...’
राजस्थानी कठपुतळ्यांचा नाच दाखविणारे भाट हाही भटक्या लोकरंजनकारांचा एक प्रमुख वर्ग आहे.
चित्र, गीत व वाद्य यांच्या साहाय्याने पौराणिक प्रसंगांचे कथन करणारी ही लोकरंजनकारांची एक पारंपारिक जमात होय. बभ्रुवाहन, सीताहरण, शिवाला मोहिनी घालणारी भिल्लीण, हरिश्चंद्र, उषा-अनिरुद्ध प्रणय इ. आख्याने गात असता चित्रकथी त्यांतील विविध प्रसंगांची रंगीत चित्रे मोरपिसांच्या साहाय्याने प्रेक्षकांना दाखवतो. ही चित्रे लोकशैलीतील असून आकाराने मोठी असतात. त्यांच्या या सचित्र कथागायनाला ढोलकी व एकतारी यांची साथ असते. या साथीवर ते पोवाडेही म्हणतात. हल्ली ही जमात नामशेष होत चालली आहे. चित्रकथ्यांच्या ‘मैना’ (बायका) काश्याच्या थाळ्यावर मेण लावून तो काडीने वाजवत, त्याच्या साथीवर वेगवेगळी गाणी म्हणून भिक्षा मागतात.
याशिवाय मुलांसाठी मूकचित्रे असलेली सिनेमाची खोकी घेऊन फिरणारे लोक; तसेच रस्त्यावर जादूचे प्रयोग करणारा जादूगार; तसेच मोकळ्या रस्त्यावर खडू, कोळसा, रांगोळी, रंगपूड आदींच्या साहाय्याने रंगीत चित्रे काढणारे पथ-चित्रकार; वाळूमध्ये वालुकाशिल्पे घडवणारे कारागीर इत्यादींचा समावेशही पथरंजनकारांत करता येईल.
महाराष्ट्रात खेडोपाडी लोकसंस्कृतीच्या परंपरेतून आलेले वासुदेव, भुत्ये, पांगूळ, पोतराज इ. ग्रामदेवतांचे उपासक धार्मिक उद्बोधनाबरोबरच लोकरंजनाचेही कार्य करीत असतात. डोक्यावर मोरपिसांची टोपी घालून टाळ-चिपळ्या आणि बासरी वाजवत वासुदेव हे ‘दानपावलं ऽ वासुदेवाला, जेजुरीच्या खंडोबाला’ इ. गाणी म्हणत भल्या पहाटेस फिरतात. तसेच सायंकाळी रात्रीच्या पहिल्या प्रहरापूर्वी हातात जाड जळता पोत घेऊन, मळवट भरलेले भुत्ये जगदंबेची गाणी म्हणत हिंडतात. ⇨कानफाटे गोसावी (किनरीवाले नाथ, जोगी) हे कुका नावाचे एकतारी वाद्य वाजवून भर्तृहरी, गोपीचंद यांची गाणी म्हणत भिक्षा मागतात. ते जनावरांच्या नकला करतात व भविष्यही सांगतात. महाराष्ट्राखेरीज अन्य भागांतही हे लोक आढळतात. भराडी हे नाथपंथी गोसावी असून ते डौर (डमरू) वाजवत असल्याने त्यांना ‘डौरी’ गोसावी असेही म्हणतात. भिक्षा मागताना ते ‘अल्लख्’ असा पुकारा करतात व भैरवाच्या, शिवाच्या स्तवनाची तसेच तात्त्विक उपदेशपर गाणी म्हणतात.
पांगूळ हा ‘धर्म जागोऽधर्म जागो’ असा घोष करीत सूर्योदयापूर्वी गावात येतो. ‘पांगूळ आला । पांगूळ आला ।’ अशा हाकाट्या पिटीत तो आपल्या व अरुणोदयाच्या आगमनाची वार्ता देतो. पांगूळ हा सूर्याचा पारधी अरुण ह्याचा प्रतिनिधी मानला जातो. भिक्षा घातली की तो चक्राकार फिरून उड्या मारतो आणि सर्व देवदेवतांना ‘पाऊड’ (दान) पोहोचल्याचे गाणे म्हणतो. उदा.,
‘पाऊड पावला पाऊड पावला
पाऊड पावलाऽ जोगाईच्या अंबाबाईला’
वासुदेवाशी त्याचे साधर्म्य दिसून येते.
कडकलक्ष्मी वा पोतराज हा मरीआईचा उपासक असून तो स्त्रीसदृश वेष धारण करतो. डफ वा ढोलके वाजवत, अंगाला डावी-उजवीकडे झोके देत, नाचत तो गावात प्रवेश करतो. त्यावेळी त्याचे साथीदार सनई वाजवतात. त्यांच्याबरोबर मरीआईचा देव्हारा डोक्यावर घेतलेली स्त्री अंगात आल्याप्रमाणे नाचत असते. तिच्या एका हातात मोरपिसांचा कुंचा असतो. देवीच्या आगमनाची वार्ता देताना पोतराज ‘आलीया मरीबाई । तिचा कळेना अनुभऊ’ ह्या प्रकारचे गाणे म्हणतो. नंतर ‘बया । दार उघड बया दार उघड ।’ अशा आरोळ्या ठोकत तो स्वतःच्या अंगावर आसुडाचे फटके ओढतो. तसेच दंडामध्ये दाभण खुपसून रक्त काढतो व स्वतःच्या मनगटाचे चावे घेतो. त्याचे हे आत्मक्लेशाचे प्रकार पाहण्यासाठीही लोकांची गर्दी जमते.
बाळसंतोष ह्याला ‘बाळछंद’ असेही नाव आहे. हा पांगुळाप्रमाणेच पहाटेच्या वेळी ‘बाळसंतोष बाबा बाळसंतोष’ असा घोष करीत येतो. जीर्ण वस्त्र किंवा तान्ह्या मुलाचे अंगडे-टोपडे एवढ्या अल्पस्वल्प दानावरच तो संतोष मानतो, म्हणून तो बाळसंतोष. विविधरंगी चिंध्यांची वस्त्रे ल्यालेले बाळसंतोष भविष्यकथन करीत, विशेषतः पाऊसपाण्याचे भविष्य सांगत व भिक्षा मागत गावोगाव भटकत असतात.
वाघ्या-मुरळी हे खंडोबाचे उपासक होत. हाताने ‘घोळ’ (लहान घाट्यांचा जोड) वाजवत व खंडोबाची गाणी म्हणत वाघ्या मल्हारीची वारी मागत रस्त्यावरून हिंडताना अनेकदा दिसतो. खंडोबाच्या यात्रेत तर जागोजाग वाघ्यृ-मुरळीचे कार्यक्रम चाललेले दिसतात. मुरळी एका हाताने घोळ वाजवत नृत्य करते, त्यावेळी एक वाघ्या तुणतुण्याची साथ देतो, तर दुसरा खंजिरी वाजवून गाणी म्हणतो.
जोगती-जोगतीण हे यल्लमा देवीचे उपासक होत. डोक्यावर देवीचा ‘जग’ (परडी) घेऊन कपाळी भंडार-विभूती फासलेली जोगतीण देवीची गाणी म्हणत भिक्षा मागते व तिच्या बरोबरचा जोगती चौंडके वाजवून तिला साथ देतो.
महाराष्ट्राखेरीज अन्य प्रांतांतही असे, मुख्यत्वे धार्मिक हेतूने पण अनुषंगाने लोकरंजन करणारे भटके उपासक आढळतात. उदा., बंगालमधील बाउल पंथाचे साधक एकतारी वा डुग्गी नामक वाद्याच्या साथीवर मुख्यत्वे चैतन्य महाप्रभूंची, राधा-कृष्णाची तसेच इतरही धार्मिक गीते गात खेडोपाडी फिरताना दिसतात.
सार्वजनिक स्वरूपाच्या सण-उत्सवादी विशेष प्रसंगी काही खास पारंपरिक उपक्रम होत असतात, त्यांचा देखील समावेश रस्त्यावरील रंजनप्रकारांत होऊ शकेल. उदा., बैलपोळ्याला सजलेल्या बैलांची मिरवणूक; दसऱ्यात शृंगारलेल्या हत्तीची मिरवणूक; सार्वजनिक गणेशोत्सवांतील गणपतीच्या मिरवणुकी व मेळे; शिवजयंती उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या ढोल, लेझीम, पोवाडे आदींनी युक्त अशा मिरवणुकी इत्यादी. प्रजासत्ताक दिनासारख्या विशेष प्रसंगी रस्त्यांतून मिरवणुकीने जाणारे चित्ररथ व ⇨शोभादृश्ये वगैरेंचाही या संदर्भात उल्लेख करता येईल. अलीकडे केली जाणारी पथनाट्ये ही राजकीय-सामाजिक प्रचाराबरोबरच लोकरंजनही करतात.
रस्त्यावरील रंजनप्रकार हे बऱ्याच भटक्या जमातींचे आनुवंशिक व्यवसाय असून त्यांच्यात ते पिढ्यान्पिढ्या चालत आल्याचे दिसून येते. नंदीवाले, गारूडी, दरवेशी, मदारी यांसारख्या जातीजमातींत त्या त्या व्यवसायाशी निगडित अशा विशिष्ट पशुपक्ष्यांना शिकवून त्यांचे खेळ दाखवून उपजीविका करण्याची प्रथा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवांवर आधारलेले असे पशुपक्ष्यांचे प्रशिक्षणाचे तंत्र त्या त्या जातीजमातींत वंशपरंपरेने चालत आल्याचे दिसते.
आजच्या औद्योगिक यंत्रयुगात व रस्त्यावर उभे राहण्यास वेळ नसलेल्या समाजात मात्र हे प्रकार बव्हंशी लुप्त होत चालले आहेत.
लेखक: प. म. आलेगावकर
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020