क्रीडाप्रकार व साधन. व्यायाम व मनोरंजन अशा दोन्ही उद्दिष्टांनी लेझीम खेळली जाते. ‘लेझम’ या मूळ फारशी शब्दावरून लेझीम शब्द प्रचारात आला असावा. त्याचा मूळ अर्थ तार लावलेले धनुष्य असा आहे. मूळ अर्थ बाजूला राहून आता लेझिमीचा आकार व वजन यांत बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळी सु. २१/२ हात लांब बांबू (वेळू) घेऊन त्याला २ हात लांब लोखंडी साखळी धनुष्यासारखी लावून ही लेझीम तयार करीत. बांबूचा लवचिकपणा कमी होऊ नये, म्हणून साखळी अडकविण्यासाठी बांबूला आकडे लावीत असत आणि व्यायाम करतानाच साखळी अकडवीत असत. धनुष्यासारख्या या बांबूचा मध्यभाग जाड करीत. व्यायामासाठी वापरावयाच्या जड लेझिमीची तार जाड आणि वजनदार असे. लेझिमीचे निरनिराळे हात करून ही मेहनत केली, म्हणजे हातात चांगली ताकद येत असे. हा खेळ खास महाराष्ट्रीय असून पेशवाईच्या पूर्वकाळापासून तो रुढ आहे. गुजरातमध्येही तो खेळला जातो.
हल्लीची लेझीम सु. ३८ ते ४५ सेंमी. (१५ ते १८ इंच) लांब लाकडी दांड्याची असून, त्या दांड्याला दोन्ही टोकांना कोयंडे बसवून लोखंडी कड्यांची साखळी जोडलेली असते. साखळी धरता येण्यासाठी मध्यभागी हाताच्या चार बोटांत बसेल एवढी, १५ सेंमी. (६ इंच) लांबीची, सरळ सळईसारखी लोखंडी मूठ असते. साखळीतील लोखंडी कड्यांमध्ये, नादध्वनी निर्माण व्हावा म्हणून पत्र्याच्या दोन दोन-तीन तीन चकत्या बसवलेल्या असतात. लेझिमीचे वजन अदमासे ०.७८ ते ०.९० किग्रॅ. (१३/४ ते २ पौंड) असते.
लेझिमीचे बडोदा-लेझीम (किंवा हिंदी-लेझीम), घाटी-लेझीम व एन्.डी.एस्.-लेझीम असे तीन प्रमुख प्रकार आहेत. बडोदा-लेझीम हा सैनिकी द्वंद्वांचे पवित्रे, आक्रमण, बचाव इत्यादींच्या मूळ रूपांचे शिक्षण तालठेक्यावर सामान्यजनांना देण्याचा एक उत्तम प्रकार आहे. तर घाटी-लेझीम व एन्.डी.एस्. - लेझीम हे प्रकार अधिक तालबद्ध व सामूहिक प्रात्यक्षिकांसाठी सुयोग्य व दर्शनीय आहेत. ताल-ठेक्यासाठी, विविध रचना-आकृतींसाठी घाटी-लेझीम व एन्.डी.एस्.-लेझीम यांचे संमिश्र प्रकार करून उत्तम प्रात्यक्षिके सादर करता येतात. नवव्या एशियाडमध्ये (१९८२, दिल्ली) महाराष्ट्राने आपल्या प्रांताचे प्रतीक म्हणून ४०० खेळाडूंचे लेझिमीचे सर्वोत्तम प्रात्यक्षिक दिले होते.
लेखक: श्री. पु. गोखले
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/26/2023